अजूनकाही
दरवर्षी दसऱ्याला नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात शस्त्रपूजा होत असते. संघ सरसंघचालक मोहन भागवत यांचं शस्त्रपूजा करतानाचं छायाचित्र प्रसिद्ध होतं. या वर्षी शस्त्रांची पूजा होणार नाही, असं संघाच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमपत्रिकेतून स्पष्ट झालंय. काही संघटनांच्या आक्षेपानंतर संघानं हे पाऊल उचललंय.
संघाच्या शस्त्रपूजेविषयी भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्च्याची भूमिका सांगताना आंबेडकर म्हणाले, “संघाच्या शस्त्रपूजनात एके ४७सह अत्याधुनिक शस्त्रं असतात. ही शस्त्रं परवानगीशिवाय बाळगता येत नाहीत. एके ४७सारखं अत्याधुनिक शस्त्र फक्त भारतीय लष्कराकडे असतं. ते देशातील इतर व्यक्ती, संस्था यांना बाळगता येत नाही. देशाचा राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्रीही अशी शस्त्रं बाळगू शकत नाहीत. साधी बंदूक जवळ बाळगायलाही परवानगी लागते. असं जर आहे तर संघ ही शस्त्रं कशी जवळ बाळगतो? ही शस्त्रं बाळगण्याची परवानगी संघानं घेतली आहे काय? परवानगीची कागदपत्रं संघ दाखवील काय? मग परवानगी नाही तर ही शस्त्रं बाळगण्याप्रकरणी संघावर पोलीस कारवाई का होत नाही?”
आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय की, पूजेला विरोध नाही तर शस्त्र बेकायदा बाळगण्याला विरोध आहे. संघाबद्दलची माहिती मिळवत गेलं की, खूप खळबळजनक माहिती मिळत जाते. नागपूरचे मोहनीश जबलपूरे नावाचे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. त्यांनी माहितीच्या अधिकारात ऑगस्ट २०१७मध्ये संघाच्या शस्त्रसाठ्याविषयी माहिती मागितली होती. नागपूर पोलिसांकडे ही माहिती त्यांनी मागितली. मात्र नागपूर पोलिसांनी संघाच्या शस्त्रपूजा, शस्त्रसाठ्याविषयी आम्हाला काहीही माहिती नसल्याचं सांगितलं. महिनाभरात माहिती द्यावी लागते. तिथं २०१७ची माहिती २०१८ला दिली, पण पोलिसांनी हात झटकले.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा -
https://www.booksnama.com/client/book_list_by_category
.............................................................................................................................................
मुळात संघ या संस्थेची देशात कुठल्याही धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी नाही. म्हणजे तशी ही सारी संघटना बेकायदा आहे. संघाकडे पैसा कसा जमा होतो, याचा हिशोब नाही. संघाच्या विविध भव्यदिव्य कार्यक्रमांना जमा होणारा निधी कुठून येतो, कोण देतो, तो खर्च कसा होतो, या गोष्टी पूर्णत: लपवाछपवी करत हा व्यवहार संघ पदाधिकारी करतात. तसंच या शस्त्रसाठा प्रकरणाचंही आहे.
संघाकडे एके ४७ आणि इतर अत्याधुनिक शस्त्रं, बंदुका किती आहेत? त्या कुठून आणल्या? किंवा घेतल्या की कुणी घेऊन दिल्या? कुणाच्या नावावर त्यांची लायसन्स आहेत? मुळात परवानगी कुणी दिली? कशासाठी दिली? पोलिसांकडे याची काही माहिती आहे का? याविषयी नागपूर पोलिस आणि संघ पदाधिकारी गुप्तता पाळतात. अशी शस्त्रं बाळगणं हा देशद्रोह आहे.
एके ४७ बाळगली म्हणून अभिनेता संजय दत्तवर कारवाई झाली होती. आणि त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. मग हीच कारवाई संघ, मोहन भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर का करायची नाही, असा सवाल अॅड. आंबेडकर यांनी विचारला आहे. आणि कारवाईची मागणीही केली आहे.
संघाबद्दलची माहिती लपवणं, संघाच्या कारवायांकडे दुर्लक्ष करणं, कारवाईत टाळाटाळ करणं याबाबत नागपूर पोलीस आयुक्त गंभीर नाहीत, ते अकार्यक्षम आहेत, म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना बडतर्फ करावं अशी मागणीही अॅड. आंबेडकर यांनी केली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी संघाबद्दल नागपूर पोलिसात तीन मुद्द्यांवर प्रश्न उभे करत बंदीची मागणी केली आहे.
ते तीन मुद्दे असे –
१) संघ देशभर छोट्या निरागस मुलांना हत्यारं वापरण्याचं प्रशिक्षण देतो. असं प्रशिक्षण देणं बेकायदा, संविधान व देशविरोधी कृत्य आहे.
२) पोलीस, सरकार यांची कुठलीही परवानगी न घेता संघाचे स्वयंसेवक हत्यारं - गन, तलवारी, काठ्या हातात - घेऊन पथसंचलन करतात. हे कायद्याचं उल्लंघन आहे.
३) संघाच्या शस्त्रपूजेच्या वेळी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यातले मंत्री, सरकारी अधिकारी उपस्थित असतात. त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी.
जबलपुरे आणि त्यांच्यासारखे जागरूक नागरिक संघावर बंदी, कारवाईची मागणी करत आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर आंदोलन करत आहेत, पण संघावर करावाई होताना दिसत नाही. संघाजवळ जशी शस्त्रं आहेत, तशी शस्त्रं भारतात इतर कुठल्याही संघटनेकडे सापडली असती तर काय गदारोळ माजला असता याची कल्पना करून पाहायला हवी. संघ समर्थक नक्षलवादी, माओवादी, इतर अतिरेकी, दहशतवादी यांच्यावरील कारवाईबाबत खूप संवेदनशील असतात. अशी संवेदनशीलता संघाच्या कारवाईबद्दल, संघावर होणाऱ्या आरोपांबद्दल का दाखवली जात नाही?
पोलीस, सरकार आणि संघ समर्थकांची संघाच्या कारवायांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती आहे. ती व्यापक देशहितासाठी घातक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी व्यक्त केली आहे. खैरनार यांच्या म्हणण्यानुसार संघ एवढी गुप्तता का पाळतो? तर संघाच्या हेतूमध्ये काहीतरी काळंबेरं आहे. संघ एवढी शस्त्रं बाळगतो, ती कुठून आणली ते सांगत नाही. त्याची परवानगी घेतली का, कुणाच्या नावावर ती शस्त्रं आहेत, हे लपवलं जातं.
ही लपवाछपवी संघ का करतो? तर संघाची ही लपवाछपवी गांधी खूनानंतर सुरू झाल्याचं खैरनार सांगतात. गांधी खून खटल्यात संघाच्या पदाधिकाऱ्यांची नावं आली. या संघटनेविषयी सरकारनं माहिती गोळा करून संघावर तत्कालीन उपपंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घातली. या बंदीनंतर संघ धास्तावला. आपल्या कारवायांचं काही रेकॉर्ड मागे ठेवायचं नाही, हे तेव्हापासून संघानं आजपर्यंत सुरू ठेवलं आहे.
पुढे संघावरची बंदी उठली, पण संघ स्वत:च्या कारवाया खूप काळजीपूर्वक करू लागला. आपली खरी भूमिका काय? आपलं उद्दिष्ट काय? कोणत्या कार्यक्रमाचा हेतू काय हे संघ कधीच पारदर्शकपणे सांगत नाही. खैरनार म्हणतात, ‘मूँह में राम बगल में नथुराम, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे ही संघनीती कायम राहिली.’ त्याचा भाग म्हणून संघ प्रत्येक गोष्टीत लपवाछपवी करत असतो.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_list_by_category/
.............................................................................................................................................
दसऱ्याच्या संघ कार्यक्रमावर अनेक सजग नागरिकांनी आक्षेप घेतलाय. माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे म्हणतात, संघाची नोंदणी नाही. ही तशी गंभीर बाब. मग या संघटनेच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री कसे जातात? हे मोठमोठे संविधानिक पदावरचे लोक स्वत:चे कपडे काढून संघाचा गणवेश (पाढरा सदरा, खाकी पँट, काळी टोपी) कसा घालतात? असंविधानिक संघटनेला एवढा मान का दिला जातो?
दसऱ्याला शेतकरी नांगराची पूजा करतो. कुंभार मडकी घडवणाऱ्या चाकाची पूजा करतो. लोहार आपल्या भात्याची पूजा करतो. प्रत्येक कारागीर आपल्या रोजीरोटी देणाऱ्या अवजाराची पूजा करतो. ही खास भारतीय परंपरा आहे. मध्यमवर्गीय लोक आपल्या दुचाकी, चारचाकी गाड्यांची पूजा करतात. त्यात वावगं असं काही नाही.
पण बेकायदा शस्त्रांची पूजा, बेकायदा संघटना करते आणि त्यावर काही कारवाई होत नाही. संभाजी भिडे यांच्यावरही वारीत तलवारी घेऊन संचलन केलं, हजारो तलवारी कुठून आणल्या याविषयी गुन्हा पुणे पोलिसात दाखल आहे. पण त्यावरही काही कारवाई झालेली दिसत नाहीत. भिडे हेही ज्येष्ठ संघ स्वयंसेवक आहेत. संघ परिवारात देशभर शेकडो संघटना आहेत. त्यांच्या स्वयंसेवकांकडे बंदुका, तलवारी, बॉम्ब सापडल्याची उदाहरणं आहेत. हे स्वयंसेवक, साधक, कार्यकर्ते ही शस्त्रं कशासाठी जमा करतात? ती कुणाविरोधी त्यांना वापरायची आहेत? का वापरायची आहेत?
देशभर शेकडो गट अशी हत्यारं बाळगून आहेत. हा एक संघटीत गुन्हेगारीचा प्रकार नाही का? अशी शंका सुरेश खैरनार यांनी उपस्थित केलीय. पोलीस, सरकार या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. त्यातूनच डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खून होतात, हे आपण पाहिलंय. प्रकाश आंबेडकर यांनी तर जो न्याय माओवाद्यांना लावला जातो, त्याच न्यायानं संघ पदाधिकाऱ्यांवर मोक्का (संघटीत गुन्हेगारी कायदा) अंतर्गत कारवाई करावी आणि या हिंसक कारवायांवर चाप लावावा व देश वाचवावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. सरकार काय कारवाई करतं ते यापुढे बघायचं.
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gajanan Magar
Sat , 20 October 2018
संघाच्या शाखेत जाऊन बघा... पडलेल्या सर्व प्रश्र्नांची उत्तरे मिळतील...
Gamma Pailvan
Fri , 19 October 2018
घातलात ना घोळ!! माओवाद्यांच्या नावावर किती हत्या आहेत? वीसहजार? पन्नासहजार? की आजून जास्त? आणि संघाच्या नावावर किती हत्या आहेत? शून्य! मग संघावर बंदी घालायची का माओवाद्यांवर? -गामा पैलवान