सर सय्यद : मुस्लिमांच्या शैक्षाणिक क्रांतीचे महानायक
पडघम - देशकारण
सरफराज अहमद
  • सर सय्यद आणि अलीगढ़ मुस्लीम विद्यापीठ
  • Wed , 17 October 2018
  • पडघम देशकारण सर सय्यद अहमद खान Sir Syed Ahmed Khan अलीगढ़ मुस्लीम विद्यापीठ Aligarh Muslim University

सर सय्यद अहमद खान हे अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे संस्थापक, मुस्लीम विचारवंत. त्यांची आज जन्मद्विशताब्दी वर्षानंतरची पहिली जयंती. त्यानिमित्तानं हा विशेष लेख...

.............................................................................................................................................

भारतीय मुस्लिम समाजावर ज्या विचारपुरुषांचा प्रचंड प्रभाव जाणवतो, त्यात सर सय्यद यांचे नाव अग्रणी आहे. ज्या समाजधुरीणांनी पडत्या काळात मुस्लिम समाजाच्या विचारविश्वाला दिशा देण्याचे काम केले, त्यातही सर सय्यद यांचा समावेश होतो. काळ बदलला आहे, तुम्हीही बदलले पाहिजे, हे सातत्याने सांगत काळाला बदलण्याची योजना आखण्यासाठी त्यांनी समाजाला उद्युक्त केले. नंतरच्या पिढीतील भारतीय मुस्लिम तत्त्ववेत्त्यांवर सर सय्यद यांचा खूप प्रभाव होता. किंबहुना त्यांचे बोट धरूनच समाजकल्याणाची धुरा या महापुरुषांनी वाहिली.

मुस्लिम समाजातल्या क्रांतीचे नायक असणाऱ्या सर सय्यद यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८१७ मध्ये दिल्ली येथे झाला. अल्ताफ हुसैन हाली हे उर्दूचे प्रख्यात कवी होते. त्यांनी सर सय्यद यांचे ‘हयात-ए-जावीदा’ हे ऐतिहासिक चरित्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी सर सय्यद यांच्या घराण्याचा ३६ पिढ्यांपूर्वी प्रेषित मुहंमद (स) यांच्याशी संबंध होता, असे विधान केले आहे. सर सय्यद यांचे पूर्वज शहाजहान बादशाहच्या काळात भारतात आल्याचे मत सर सय्यद यांच्या अनेक चरित्रकारांनी मांडले आहे. त्यांच्या जन्मानंतरही त्यांचे घराणे थोड्याफार फरकाने सत्ता आणि प्रशासनाशी संबंधित होते. मोगलांच्या सैन्यात प्रशासनात त्यांच्या पूर्वजांनी काम केले होते. त्यामुळे १८५७नंतर ब्रिटिशांनी सत्ताधाऱ्यांचा समाज म्हणून मुस्लिमांवर जे अत्याचार केले होते, त्याला सर सय्यद यांचे कुटुंबदेखील बळी पडले. हे अत्याचार ते सर सय्यद यांनी स्वतः पाहिले होते.

मुस्लिम समाजाची पावलोपावली मानखंडना केली जात होती. मुस्लिमांची व्यापारी केंद्रे उद्ध्वस्त केली जात होती. मुस्लिम समाजाची अर्थव्यवस्था उदध्वस्त करून त्यांना आंग्ल अर्थव्यवस्थेचा गुलाम बनवण्याचे प्रयत्न कसोशीने सुरू होते. सर सय्यद यांच्या भविष्यातल्या राजकीय भूमिकांची ही पार्श्वभूमी होती. त्या भूमिकेच्या उराशी उदध्वस्त मुस्लिमांच्या वेदना होता. त्यामुळेच त्यांनी राजकीय संघर्षापेक्षा शिक्षणातून सामाजिक सबलीकरणाच्या भूमिकेला आधिक महत्त्व दिले.   

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

संकटग्रस्त समाजाला सोडून मी सुखात कसे जगू?

सर सय्यद यांनी वर्तमान आव्हानांशी मुकाबला करण्यापेक्षा भविष्याचे आराखडे बांधले. वर्तमान स्थिती विदारक आहे. उज्ज्वल भविष्यासाठी आज झटले पाहिजे, हे ते सातत्याने सांगत होते. १८५७चे उठाव अपयशी ठरल्यानंतर मोगल सत्तेची अनेक प्रशासकीय, राजकीय केंद्रे उदध्वस्त करण्यात आली. त्यामध्ये होणारे मुस्लिमांचे नुकसान पाहून सर सय्यद प्रचंड तणावात होते. समाजाची, देशाची दैन्यावस्था त्यांना पाहवत नव्हती. त्यामुळे तुर्कस्तानला स्थलांतरीत होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. तुर्कस्तानला स्थलांतरीत होण्यापूर्वी त्यांनी मुरादाबादला भेट दिली. मुरादाबादला आल्यानंतर समाजाची अवस्था पाहून त्यांच्या अंतकरणात वेदनांचा कल्लोळ सुरू झाला. सर सय्यद यांच्या चिंतनशील बुद्धीने हळव्या हृदयाला वेसण घातली.

सर सय्यद यांनी समाजाला दैन्यावस्थेत सोडून तुर्कस्तानला जाण्याचा विचार बदलला. त्यांच्या या निर्णयासंदर्भात २८ डिसेंबर १८८९ला एज्युकेशन कॉन्फरन्समध्ये दिलेल्या भाषणात ते म्हणाले, “जी स्थिती यावेळी समाजाची आहे, ती मला पाहवत नाही. काही दिवस मी दुःखाच्या छायेत राहत होतो. तुम्ही विश्वास ठेवा या दुःखाने माझ्यावर आघात केले, माझे केस पांढरे झाले. ज्या वेळी मी मुरादाबादला आलो, जे दुःखाचे आगार बनले होते. माझ्या समाजातील धनाढ्यांच्या बरबादीची ती कबर होती. हे पाहून माझ्या दुःखावस्थेत वाढ झाली. त्यावेळी माझ्या मनात विचार आला समाज आणि देशाला अशा अवस्थेत सोडून संपन्नावस्थेत जीवन कंठणे ही खूप मोठी असंवेदना असेल.’’

मदरसा विरुद्ध चर्चकेंद्री शिक्षणपद्धतीचा संघर्ष

सात आठशे वर्षात राजवटीचा थेट लाभ झाला नसला तरी, राजवटीने मुस्लिमांच्या निष्ठा, श्रद्धा यामध्ये ढवळाढवळ केली नाही. उलट कैकवेळा त्यांना गोंजारण्याचे प्रयत्न झाले. मदरशांसारखी साहित्यिक,  शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्रे वैभवात होती. धर्मस्थाने अबाधित राहिली. १८५७नंतर सत्तेतील बदलाने या परिस्थितीने कुस बदलली. ज्या भांडवलावर मुस्लिम समाजात जगत आला होता. त्याची लूट सुरू झाली. आंग्ल सत्तेने मुसलमानी राजवट संपवली तरी त्याच्या पाउलखुणा अबाधित होत्या. या पाउलखुणा त्या सत्तेची प्रतीकचिन्हे म्हणून आंग्ल सत्तेला खटकत होती. पण त्यावरचा थेट आघात सत्तेविरोधातल्या विद्रोहाला जन्म देऊ शकत होता. त्यामुळे इंग्रजांनी अप्रत्यक्ष आघात करायला सुरुवात केली. या साऱ्याच खुणा मिटवण्यासाठीची धडपड मुस्लिम समाज उघड्या डोळ्यांनी पाहत होता. पूर्वाश्रमीच्या सत्ताधाऱ्यांचा समाज म्हणून थेट मुस्लिम समाजावरही निर्बंध लादले जात होते. या सर्व क्रियेची प्रतिक्रीया मुस्लिम समाजात उमटणे स्वाभाविक होते.  

मुस्लिम समाज स्वतःचे अस्तित्व जपताना स्वतःभोवती केंद्रीत होत होता. त्यातून स्वतःच्या अस्तित्वाविषयीची अपार काळजी त्याला स्वनिष्ठ आत्मकेंद्री बनवत चालली होती. प्रतिक्रीयावादी बहुसंख्याक कट्टरतेच्या उगमासाठी ही परिस्थिती पुरेशी होती. अल्पसंख्य आत्मकेंद्रीतता बहुसंख्याकांच्या अस्मितावादी राजकारणाला आधार देते. घडलंही तेच. प्रशासनातून मुस्लिमांचा टक्का कमी करण्यावर भर दिला जात होता. मुसलमानांनी निर्माण केलेल्या शिक्षणव्यवस्थेवर आघात करून चर्चकेंद्रीत शिक्षणव्यव्यवस्था लागू  करण्याचे प्रयत्न केले जात होते. त्यातून मदरशांच्या भोवती मुसलमानांचे शैक्षणिक विश्व आधिकाधिक घट्ट होत चालले होते. त्याला धार्मिक अस्मितेचा पाठिंबा मिळत चालला होता. एकीकडे मुस्लिम समाजाची शिक्षण व्यवस्था राजकीय वरवंट्याखाली कोंडलेपणा सहन करत होती, तर दुसरीकडे आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या नव्या राज्यकर्त्यांच्या शिक्षण व्यवस्थेला अधार्मिक ठरवून नाकारले जात होते. अशा काळात सर सय्यद यांनी भविष्याचा वेध घेतला. राज्यकीय बदलाचे पडसाद समाजात उमटतात, हे सर सय्यद यांच्यासारख्या समाजचिंतकाला चांगलेच ज्ञात होते. राज्यकर्त्यांसोबत बदलत वेगाने चाललेल्या समाजाच्या प्रवाहाशी मुस्लिमांना जोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.   

अलीगड मुस्लिम विद्यापीठ 

लंडन दौऱ्यावर असताना सर सय्यद यांनी मुस्लिम केंब्रिजची संकल्पना मांडली. त्यासाठी अलीगड मोहमेडीयन एज्युकेशन कॉन्फरन्सची स्थापना करण्यात आली. त्यानंतर १ जून १८७५ साली सर सय्यद यांनी ‘अलीगड  मुस्लिम अँग्लो ओरिएंटल कॉलेज’ (अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी)ची स्थापना केली. सुरुवातीपासूनच अनेक भाषांमध्ये या महाविद्यालयात शिक्षण दिले जात होते. इतिहास, वर्तमान आणि भविष्य अशा तीन आघाड्यांवर अलीगड विद्यापीठात शिक्षण दिले जावे यासाठी सर सय्यद यांनी प्रयत्न केले. मुस्लिम समाज मदरसा शिक्षण प्रणालीशी धार्मिक, सामाजिक व भावनिकरित्या जोडला गेला होता. चर्चप्रणित कान्व्हेंट स्कुल प्रणाली मदरसा शिक्षण पद्धतीला आव्हान देत होती. त्या काळात सर सय्यद यांनी देखील मदरसा शिक्षण प्रणालीत बदलाचा आग्रह प्रतिपादित केला. त्यामुळे त्यांना समाजातून विरोध सुरू झाला. सर सय्यद यामुळे आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत. उलट त्यांनी ‘तहजीब उल अखलाक’ हे वर्तमानपत्र सुरू करून शिक्षणप्रसाराच्या कार्याची गती वाढवली.  

सर सय्यद यांचे साहित्य

सर सय्यद यांनी भविष्यातील धोके ओळखून इतिहासातल्या प्रतीकांच्या रक्षणासाठी मोहीम आखली. त्यांनी मध्ययुगीन इतिहासाच्या अनेक ग्रंथाचे भाषांतर केले. काहींचे भाषांतर आपल्या मित्रांकडून करवून घेतले. अबुल फज्लच्या ‘आईना-ए-अकबरी’चे भाषांतर सर सय्यद यांनी स्वतः केले. ‘अस्सारुस्सनादीद’ या पुस्तकातून त्यांनी दिल्लीतल्या २३२ ऐतिहासिक वास्तूंची माहिती दिली. या ग्रंथामुळेच त्यांनी लंडन विद्यापीठाची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. ‘असबाबे बगावते हिंद’ या छोटेखानी पुस्तकात त्यांनी १८५७च्या स्वातंत्र्य लढ्याची चिकित्सा केली. प्रेषितांच्या इतिहासावरदेखील त्यांनी प्रचंड लिखाण केले. त्याचे कालांतराने ‘एस्सेज द लाईफ ऑफ मुहंमद’ या नावाने इंग्रजीत भाषांतर करण्यात आले. आधुनिक मूल्यांच्या परिप्रेक्ष्यात कुरआनवर त्यांनी केलेले भाष्य विख्यात आहे. अनेक पाश्चात्य तत्त्ववेत्यांच्या विचारांचे दाखले देत त्यांनी कुरआनचा अर्थ लावला. यासोबतच ‘तोहफा इ इस्ना’, ‘जलाल उल खुतुब’, ‘तोहफ-इ-हसन’, ‘तशील फि जरुसाखील’, ‘इंतिखाब उल अखबेन’ या पुस्तकाचे लेखन केले. ख्वाजा फरिद यांच्या फारसी ग्रंथाचे आणि इमाम गजाली यांच्या ‘किमया-इ-सादत’ या ग्रंथाचे उर्दूत भाषांतर केले.

मुन्शी जकाउल्लाह, शिबली नोमानी आणि सर सय्यद

आधुनिक काळातील मुस्लिम इतिहासकारांत मुन्शी जकाउल्लाह आणि मौलाना शिबली नोमानी यांचे कार्य मोठे प्रेरणादायी आहे. मुन्शी जकाउल्लाह यांनी आपल्या जीवनात तब्बल १,५८००० (एक लाख अठ्ठावन्न हजार) पानांचे लिखाण केले आहे. तर मौलाना शिबली नोमानी यांनी इतिहासलेखन शास्त्रावर स्वतंत्र विचारांची मांडणी केली आहे. त्यांनी लिहिलेले प्रेषितांचे चरित्रग्रंथ प्रसिद्ध आहेत. मुगल राज्यकर्त्यांचे धार्मिक, प्रशासकीय धोरणावर त्यांचे लिखाण प्रसिद्ध आहे. ‘औरंगजेब आलमगीर पर एक नजर’ हे त्यांचे ग्रंथ इतिहासविख्यात आहे. अनेक भाषांमध्ये त्याचे भाषांतर करण्यात आले आहे. मोठमोठ्या विद्यापीठात त्या ग्रंथावर आजही संशोधन केले जाते.

या दोन्ही इतिहासकारांनी समन्वयातून प्रचंड लिखाण केले. या दोन्ही इतिहासकारांना लिखाणासाठी उद्युक्त केले ते सर सय्यद यांनी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहासलेखनाची एक चळवळ अलीगडमध्ये सुरू करण्यात आली होती. अलीगड मुस्लिम विद्यापीठातील उन्नत इतिहास संशोधन केंद्र हे या चळवळीने गाठलेले परमोच्च शिखर आहे. मध्ययुगीन इतिहासाची लाखो मूळ कागदपत्रे आज अलीगड विद्यापीठाच्या उन्नत इतिहास संशोधन केंद्रात सुरक्षित आहेत. याच इतिहास संशोधन केंद्रातून मुहंमद हबीब, अतहर अली, शिरी मंसुवी, इरफान हबीब, सय्यद अतहर अब्बास रिजवी असे प्रख्यात इतिहासकार उदयास आले.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category/

.............................................................................................................................................

ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना

ब्रिटिश लेखक जेम्स मिलने १८१७मध्ये भारताच्या इतिहासावर ‘हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया’ हा ग्रंथ लिहिला. भारतात कधीही न आलेल्या जेम्स मिलने हे पुस्तक भारतामध्ये प्रशासकीय सेवेत येणाऱ्या इंग्रज आधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी लिहिले होते. या पुस्तकातून त्याने मुसलमान राज्यकर्त्यांच्या इतिहासाविषयी अत्यंत चुकीचे समज पसरवले. मुसलमान राज्यकर्त्यांच्या इतिहासाच्या विकृतीकरणाच्या इंग्रजांच्या भविष्यकालीन योजनेची ही नांदीच होती. त्यामुळे सर सय्यद यांनी मुसलमान राज्यकर्त्यांच्या इतिहासाची मूळ साधने भाषांतरीत करण्याची पहिली योजना आखली.

सन १८६४ साली सर सय्यद यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापन केली. मध्ययुगीन इतिहासाची साधने आणि पाश्चात्त्य विचारवंताचे ग्रंथ भारतीय भाषेत भाषांतरीत करण्यासाठी या सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. पुढे याच सोसायटीचे ‘सायंटिफीक सोसायटीत’ रुपांतर करण्यात आले. कृषी, अर्थ, इतिहास, खगोल, नागरी जीवन अशा अनेक विषयांवरील तब्बल ४० ग्रंथांचे भाषांतर या सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आले. सर सय्यद यांच्या नंतर एलिएट आणि डाउसन या दोघांनी ‘इंडीयन हिस्ट्री टोल्ड बाय ओन हिस्टोरियन’ हे मध्ययुगीन तवारीखकारांच्या ग्रंथाचे भाषांतर असणारे आठ खंडांचे संकलन १८६७-७७ या काळात प्रकाशित केले. दुर्दैवाने सर सय्यद यांच्या शास्त्रीय अनुवादाच्या तुलनेत इंग्रजांच्या वसाहतवादी प्रेरणेमुळे एलिएट आणि डाउसनने भाषांतरीत केलेल्या सदोष भाषांतराचीच भारतीय इतिहासलेखनात आधिक चर्चा झाली.  

अलीगडप्रणित शैक्षणिक क्रांतीने मुस्लिम समाजातील वैचारिक चळवळींना एका वेगळ्या वळणावर आणले. त्यांच्या मध्ये शैक्षणिक क्रांती घडवण्यात सर सय्यद यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

.............................................................................................................................................

लेखक सरफराज अहमद इतिहास अभ्यासक असून गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे सदस्य आहेत.

sarfraj.ars@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 18 October 2018

सरफराज अहमद, सय्यद अली खान मुस्लिमांच्या शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते असतीलही. त्याबद्दल शंका नाही. पण यासोबत ते द्विराष्ट्रसिद्धांताचे जनकदेखील आहेत. ही बाब लेखात आलेली दिसंत नाही. याच सिद्धांतामुळे भारताचे तीन तुकडे तर पडलेच शिवाय काश्मीरची डोकेदुखीही उत्पन्न झाली. अलीगड मुस्लीम विद्यापीठ त्यःच्या विचारांचा वारसा सांगतं. मग या विषयासंबंधी त्यांची चूक दुरुस्त करणारा त्यांचा कोणी वैचारिक वारसदार उपरोक्त विद्यापीठातनं निपजेल काय? नसल्यास मुस्लिम समाजाकडे काही पर्यायी व्यवस्था आहे का? आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......