अजूनकाही
सध्या ‘#MeToo’ हॅशटॅग सर्वत्र पसरलेला दिसतोय. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातल्या स्त्रिया निर्भयपणे त्यांच्यावरील अत्याचाराबद्दल बोलतायत. अभिनेत्री तनुश्री दत्तानं कुणाचीही भीडभाड न ठेवता दहा वर्षांपूर्वी झालेल्या आणि त्यावेळीही न्याय न मिळालेल्या गोष्टीला वाचा फोडली, याबद्दल तिला धन्यवाद द्यावे लागतील.
मागच्या वर्षी अमेरिकेत चित्रपट निर्माता हार्वी वाईनस्टाईन विरोधात एकूण सत्त्याऐंशी जणींनी आवाज उठवला. त्याची दखल घेऊन त्याच्यावर लगेच कारवाई झाली. आपल्या इथं त्यावर चर्चा, प्रतिक्रिया चालू आहेत. कायदेशीर कारवाई वगैरे बाबी बोलल्या जातायत. ‘विशाखा गाईडलाईन्स’ काय आहेत, याची माहिती दिली जातेय. ही चांगली गोष्ट घडतेय.
पण हा हॅशटॅग फक्त स्त्रियांवरील अत्याचारासंदर्भातच का वापरला जातोय? कारण कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार किंवा गैरवर्तणूक करणारे जसे पुरुष असतात, तसेच ते इतर ठिकाणी असतात. उदा. घरी, सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी वगैरे. यात लहान मुलांचा समावेश का केला जात नाही? कारण असे अत्याचार करणार्यांच्या दृष्टीनं लहान मुलं आवाक्यातलं भक्ष्य असतात. त्यामुळे ज्यांना बालवयात अशा अत्याचारांना सामोरं जावं लागलंय, ते आज कदाचित भीतीपोटी बोलत नसतील. त्यांच्यापर्यंत हा हॅशटॅग पोचला पाहिजे.
इतकी पार्श्वभूमी सांगायचं कारण की, मी लैंगिक शोषणाचा गलिच्छ अनुभव घेतला आहे. माझ्यासोबत घडलं ते साधारण १९९२-९३ साली. आजपासून पंचवीस वर्षांपूर्वी. मी सातवीत होतो. एका कराटे क्लासला जायचो. के. राजू नावाचा दाक्षिणात्य माणूस कराटेचा शिक्षक होता. तो आमच्या घराजवळच राहायचा. एके दिवशी त्यानं घरी बोलावलं. त्याला जे करायचं होतं, ते माझ्यासोबत केलं. नंतर तो नेहमीच बोलवायला लागला. माझ्या मनात एवढी भीती बसली होती की, मी कराटे क्लासहून परत येतानाचा रस्ता बदलला. वाटायचं तो आपल्या मागेच असणार. घरी याबद्दल बोलायची सोय नव्हती. कुणी असं जवळचं नव्हतं, ज्याला विश्वासात घेऊन काय घडलंय ते सांगावं. त्या अनुभवाची तीव्रता वाढली, जेव्हा त्यानं माझा वर्गमित्र संतोष इंगळेलासुद्धा वापरलं. संतोषनंच सांगितलं मला. तोही कराटे क्लासला यायचा. पण कुणासमोर बोलावं हे माहिती नसल्यामुळे आम्ही गप्प बसलो. दुर्दैवानं आज संतोषशी माझा संपर्क नाही.
पुढे पुण्यात एम.ए.ला आल्यावर मात्र अचानक कुणीतरी जुन्या आठवणी उकरून काढाव्यात, तशा या कटू आठवणी आठवायला लागल्या. नैराश्यानं घेरलं, तेव्हा एका मानसोपचारतज्ज्ञाकडे गेलो. त्यांनी सांगितलं, मी डिप्रेशनमध्ये आहे. औषधं दिली. कदाचित त्यामुळेच असेल, मी स्मरणरंजनात रमत नाही. कारण परत त्या आठवणी वर यायला लागतात. आज बर्यापैकी त्यातून बाहेर पडलो असलो तरी पूर्णतः नाही.
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_list_by_category/
.............................................................................................................................................
बालवयात सेक्स वगैरे भानगडी कळण्याआधीच जर अशा प्रकारे एक्स्पोजर मिळत असेल तर त्याबद्दल एक प्रकारची घृणा उत्पन्न होते. वयात आल्यावर आणि एकूणच सेक्स, स्त्रीकडे बघण्याची पुरुषी नजर आल्यावर मात्र मला त्या पाठीमागचं गांभीर्य अजून खोलवर जाणवलं. आपण काय गलिच्छ व विचित्र अनुभव घेतलाय हे कळलं. ‘स्पॉटलाईट’ व ‘पर्क्स ऑफ बीइंग वॉलफ्लॉवर’ हे सिनेमे बघताना आपणही त्या पात्रांशी समरस झालो आहोत, ही भावना खेदाची होती की कॅथॅर्सिसची हे नक्की नाही सांगता येत, पण दिग्दर्शकांनी आपलाच अनुभव सिनेमातून मांडलाय याचा आनंद वाटला.
आपल्या या भावना मोकळ्या कराव्यात म्हणून ‘लातूर पॅटर्न’ या माझ्या कादंबरीत तपशील बदलून नायकाच्या बाबतीत तोच अनुभव लिहिला. तसंच दीपक गायकवाड हे पात्रही अशाच प्रकारे एका स्त्रीमुळे सेक्सला एक्स्पोज होतं असं लिहिलंय. हा आत्मश्लाघेपणा झाला तरीही सांगावंसं वाटलं.
आज या घटनेकडे दुसर्या बाजूनं पाहत विचार केला तर लक्षात येतं की, समजा मी त्याच्या जागी असतो अन माझ्या दबलेल्या लैंगिक भावना मोकळ्या करण्यासाठी मी कुणा मुलाचा वापर केला असता तर ते कितपत योग्य असतं? वय वाढल्यामुळे व या विषयातलं वाचन, मनन केल्यामुळे वाटतं, त्या व्यक्तीला माफ करणं हेच सध्या हातात आहे. उगाच आक्रस्ताळेपणा करून, जुना राग उकरून काढून त्याच्यावर कायदेशीर कारवाईच करणं, याला आज अर्थ नाही. पण माफ केल्यानं त्या आठवणी पुसल्या जाणार नाहीत हे नक्की. त्यांची तीव्रता कमी होईल इतकंच.
माझा या गोष्टींबद्दल असणारा राग म्हणजे आपल्या समाजाचा असणारा अतिशय दांभिक दृष्टिकोन. मी आजपर्यंत कुणाला हे सांगू शकलो नाही. मला हे सांगण्यासाठी कादंबरीसारख्या साहित्यप्रकाराचा आधार घ्यावा लागला, ज्यात काल्पनिकतेच्या वेष्टनात ते गुंडाळावं लागलं यातच सगळं आलं. आपल्या इथं एखाद्याला आपल्यावरील अन्यायाबद्दल मनमोकळेपणानं कुणाशी संवादच साधता येत नाही. अशा घटना घडल्या की, त्यावर तोंडाला कुलूप लावून गप्प बसण्याकडेच सर्वांचा कल असतो.
स्त्रियांना किमान कायद्याचा आधार आहे. विविध संस्था यासाठी काम करत आहेत, तरी ते पुरेसं नाही हे ‘#MeToo’नं दाखवून दिलंय. पुरुषी वर्चस्ववादी असणार्या आपल्या समाजात एकाधिकारशाहीचाच बोलबाला जास्त आहे. खोट्या, बेगमी प्रतिष्ठेसाठी माझ्यासारख्या असंख्य स्त्री-पुरुषांना हे अनुभव दाबून ठेवावे लागतात, हे निकोप समाजाचं लक्षण नाही. निसर्गानं कान नावाचा अवयव दिला असला तरी आपला समाज ठार बहिरा आहे, हे अनुभवांती मी म्हणू शकतो.
पंचवीस वर्षांपूर्वी घडलेली घटना मी एकालाही विश्वासात घेऊन सांगू शकलो नाही, यातच सर्व आलं. कारण समोरच्याचं ऐकून घ्यायचं असतं हे आपल्या समाजाला मान्य नाही. याची सुरुवात घरापासून होते आणि घराबाहेर पडल्यावर सार्वत्रिक हेच अनुभवायला येतं. डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला बरं वाटतं, कारण तो शांतपणे आपल्याला काय त्रास होतो हे ऐकून घेतो. औषधं वगैरे तात्कालिक गोष्टी असतात. कुणीतरी त्या वेदना ऐकून घेतोय हा विश्वासच आजाराला निम्मा पळवून लावतो. असं शांतपणे ऐकून घेणार्या डॉक्टरांची कमतरता असणं हे आपलं दुखणं आहे की अत्याचार करणारी व्यक्ती? त्या व्यक्तीला शिक्षा द्यायला कायदेशीर बाबी आहेतच की! पण ज्यांना कान असून जे बहिरे आहेत, त्यांना कशी शिक्षा करणार?
मी कादंबरीत हे लिहूनही परत एकदा लिहितोय, याचं श्रेय तनुश्रीला आणि ‘हे सर्व संमतीनेच होत असतं’ असं उथळ, बेजबाबदार मतं मांडणार्या वर्गाला. तनुश्री दत्ता काय किंवा मी काय अनुभव, अत्याचार तोच आहे. फरक आहे तो फक्त स्त्री-पुरुष असण्यात. यासाठी तनुश्रीला मी परत एकदा धन्यवाद देतो. स्त्री-पुरुष नातेसंबंधांकडे अशा पद्धतीनं बघणारा वर्ग हा जास्त घातक आहे. त्याला याचं गांभीर्यच नाही. आपल्या घरातल्या एखाद्या स्त्रीला किंवा शाळकरी मुलाला याची झळ बसू शकते, याची कसलीही जाणीव नाही. त्यांनी थोडं डोळस व्हावं. वास्तव स्वीकारावं. त्यावर चर्चा करावी. आपल्या खोट्या प्रतिष्ठेतून बाहेर पडून इतरांशी सल्लामसलत करून आपल्या घरातल्या कुणाला अशा अनुभवाला सामोरं जावं लागलं असेल तर त्यावर गप्प न राहता बोलावं, यासाठी लिहितोय. जेणेकरून माझ्यासारखे असंख्य जण किमान बोलायला लागतील. कदाचित यामुळे मनावर जे अनावश्यक ओझं निर्माण झालंय ते कमी होईल. रात्री शांत झोप लागेल. परत परत उफाळून येणार्या त्या आठवणी कमी प्रमाणात आठवायला लागतील.
आपल्या समाजात तळागाळापर्यंत शिक्षण पोचलंय असं म्हटलं जातं, तर मग हा समाज असा असमंजस, असमजूतदारपणे का वागतो?
.............................................................................................................................................
लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक व कादंबरीकार आहेत.
genius_v@hotmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment