‘#MeToo’...एका संपादकाचा कबुलीजबाब!
पडघम - माध्यमनामा
प्रवीण बर्दापूरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 13 October 2018
  • पडघम माध्यमनामा मी टू #MeToo

‘मी टू’च्या निमित्तानं अनेक गौप्यस्फोट सध्या होताहेत. त्यात सत्यता किती हे कळायला मार्ग नसला तरी अनेकांचे बुरखे टराटरा फाटताहेत. ‘इतक्या वर्षांनी का’, ‘किती जुनं झालं’, इथपासून ते भाषक आणि प्रादेशिक वादही त्यात आणला जात आहे. ते सर्व निरर्थक आहे. वनवासातून परतल्यावर सीतेलाही पावित्र्याची परीक्षा द्यायला लावणारी मानसिकता आता बदलायला हवी. शोषण आणि अन्याय कधीच ‘पडेल’ नसतो. तो कधीच ‘शिळा वा जुना’ होत नाही, कारण शोषण असो की, अन्याय त्याला कारणवश वाच्यता फुटली नाही किंवा फोडता आली नाही तरी न दिसणारी ती एक कायम भळभळती जखम आणि असह्य ठसठसणारी वेदना असते. म्हणून या सर्व प्रकरणांची चौकशी व्हायलाच हवी. जे काय असेल ते सत्य प्रकाशात यायलाच हवं. दोषी आढळतील त्यांना शिक्षा आणि दोषी नसतील त्यांना क्लीन चीट द्यायला हवी.        

१९७८ साली मी पत्रकारीतेत आलो आणि १९८३पासून सतत ज्येष्ठ पदावर आहे. बारा वर्षांपेक्षा जास्त काळ निवासी संपादक आणि संपादक राहिलो. ज्येष्ठ आणि कनिष्ठ पदावरील शेकडो स्त्री आणि पुरुष सहकार्‍यांसोबत काम करता आलं. ते सर्व एकजात सभ्य होतेच असं नाही. वाईट अनुभव कमी आले असले तरी आले, हे मात्र खरंय. 

‘मी टू’ मोहीम सुरू झाल्यापासूनच मीडियातील अशा घटनांबद्दल काय, अशी पृच्छा समाजमाध्यमांवरून झाली. माध्यमात एकच रंगीला रतन नाही, अनेक आहेत. त्यांच्याविषयी लिहावं किंवा नाही असा संभ्रम होता. कुणाही सहकारी स्त्रीनं तेव्हा आणि आतापर्यंत त्यासंदर्भात तक्रार केलेली नाही. दुसरं म्हणजे , आपण चाळीस वर्षं घालवली त्या बिरादरीला कशाला आणखी बदनामीच्या खाईत लोटायचं, असा तो संभ्रम होता. माझ्या एके काळच्या सहकारी भक्ती चपळगावकर-भाळवणकर आणि नीता कोल्हटकर यांनी लिहिलेल्या पोस्ट वाचल्यावर मनातला संभ्रम दूर झाला.

समंजस वयातील परस्पर संमतीनं असलेल्या स्त्री-पुरुष संबंधांविषयी मला काहीच म्हणायचं नाहीये. तो त्यांच्या धारणा, आनंद आणि स्वातंत्र्याचाही भाग आहे, अशी माझी भूमिका आहे. व्यावसायिक पदाचा गैरवापर करून सहकार्‍यांसोबत झालेल्या अशा प्रकारांना मात्र माझा विरोध आहे. वैयक्तिक पातळीवर (म्हणजे आपल्या व्यावसायिक कक्षेच्या   बाहेर) कोण कुठे काय करतो, याबद्दल अवाक्षर उच्चारायचं नाही; त्याची दखलच घ्यायची नाही, हे भान मी कटाक्षानं पाळतो. मात्र, एक ‘लीडर’ म्हणून अशा प्रकारांना मी कधीच माझ्या टीममध्ये स्थान मिळू दिलं नाही किंवा ‘...व्यभिचारात आनंद आहे’सारखे सूचक डायलॉग्ज मारत त्या प्रकारांचं कधीही समर्थन केलेलं नाही.

अशा अनेक घटना पूर्वीही सभोवताली घडत होत्या आणि त्याबद्दल कुजबूज ऐकू यायची हे खरं. विशेषत: केवळ मुद्रित माध्यमं असताना तर प्रसिद्धीसाठी काय वाट्टेल ते करायला तयार असणारे स्त्री आणि पुरुष दिसायचे. मुद्रित माध्यमांचा विस्तार झाल्यावर त्या घटनांत मोठी वाढ झाली. त्याचा सूचक बोभाटा मीडियानं केला. कधी प्रसिद्धीची हौस भागवून घेण्यासाठी , कधी आगतिकतेनं, तर कधी खुशीनं, या घटना घडत असल्याचं बघायला मिळालेलं आणि मिळत आहे. (प्रसिद्धीसाठी पार्ट्या देणारे आणि भेटवस्तूंचा मारा करणारे पुरुष पूर्वी असायचे/आताही आहेत.) अशा घटनात रस घेणारे काही  वार्ताहर, उपसंपादक आणि संपादक मला ठाऊक आहेत. स्त्री शोषणाच्या माध्यमांतील घटनांची संख्या आणि  व्याप्ती मोठी असली आणि डावे-उजवे, पुरोगामी-प्रतिगामी असे सर्व आकंठ बुडलेले असले तरी त्या घटनांना आजवर फारशी प्रसिद्धी लाभली नाही.  

अगतिकता कशी असते हे मला मुख्य वार्ताहर असताना समजलं. आमचे बॉस एक नामवंत हस्ती होते. ते दौर्‍यावर जाताना त्यांच्यापेक्षा वयानं सुमारे पंचवीस वर्षं लहान असणार्‍या एका महिला उपसंपादकाला सोबतीला नेत असत. त्याची खूप कुत्सित चर्चा आमच्या कार्यालयात आणि पत्रकारीतेतही होती. एक दिवस न राहावून ‘तू असं का करतेस’, असं मी तिला विचारलं, तेव्हा ती म्हणाली, ‘तुम्हाला काय वाटतं मी काय स्वखुशीनं करते? त्यांच्यासोबत जाणं आणि त्यांना सर्व प्रकारे रिझवणं ही माझी आगतिकता आहे. मला नोकरीची किती गरज आहे ते तुम्हाला ठाऊक नाही. माझी ही नोकरी गेली तर माझं कुटुंब उपाशी मरेल. त्यांच्या जागी तुम्ही आलात तर मी तुमच्यासोबतही येईन...’ असं बरंच काही ती बोलली. ते तिचं सांगणं अंगावर काटा उभा करणारं आणि संपादकाविषयी घृणा निर्माण करणारं होतं. त्यानंतर त्या संदर्भात शहर वृत्त विभागात होणार्‍या चर्चा मी बंद करायला लावल्या.

दिसायला सुंदर असलेल्या एका विवाहित उपसंपादकालाही या महाशयांनी त्यांच्यासोबत शय्यासोबत करण्यासाठी भरपूर त्रास दिला, पण तिनं दाद दिली नाहीच. अखेर मित्रवर्य (आता दिवंगत) हेमंत करकरे यांच्या पदाचा वापर करून त्या महिला सहकार्‍याची अन्यत्र बदली करण्यात यश आलं.     

आधी निवासी संपादक आणि नंतर संपादक म्हणून ‘अशा’ तीन घटनांना मला सामोरं जावं लागलं. महत्वाचं म्हणजे या तिन्ही घटनांत कोणाही स्त्री सहकार्‍यानं किमान तक्रार देण्याची तयारी दर्शवली नाही. मी निवासी संपादक झाल्यावर ज्या पहिल्या सहा नियुक्त्या झाल्या, त्यात नुकतीच पदवी मिळवलेले,पत्रकारीतेत क्रांती करण्याच्या भाबड्या चैतन्यांनी सळसळलेले तीन युवक आणि तीन युवती होत्या. त्या सर्वांची निवड माझ्या ज्येष्ठ सहकार्‍यांच्या एका समितीनं केलेली होती. ती समिति हा निवड प्रक्रियेत सहकार्‍यांना सहभागी करून घेण्याचा माझ्या कार्यशैलीचा एक भाग होता, पण ते असो.

निवड समितीत असलेल्या तेव्हा ४४ वर्षांचा अविवाहित, एका ‘संस्कार आणि संस्कृतीचा ठेकेदार’ असलेल्या सहकार्‍याचा एका तरुणीच्या नियुक्तीसाठी जरा जादाच आग्रह होता. ती तरुणी सुंदर होती आणि मोकळ्या संस्कृतीत वाढलेली, शिवाय कुशाग्र म्हणता येईल अशी होती. त्यामुळे तिची निवड अपेक्षितच होती. आमच्या संस्कारी सहकार्‍यापेक्षा ती २० वर्षांनी तरी लहान असावी. काही दिवसांनी त्या दोघांविषयी चर्चा सुरू झाली. गावातही ते दोघे दोन-तीन  वेळा एकत्र दिसले, पण मला त्याच्याशी काहीच देणं-घेणं असण्याचं कारण नव्हतं. काही दिवसांनी सहकार्‍यांनी त्या दोघांच्याविषयी लेखी तक्रार केली. त्या कन्येला बोलावून विचारणा केली, तेव्हा ती म्हणाली, ‘लोक काहीही बोलतात. त्यांच्या माझ्या वयात वीस वर्षांचं अंतर आहे. शिवाय अशा ऑर्थोडॉक्स माणसाशी लग्न करायला मी काही वेडी नाही. माझं लग्न ठरलेलं आहे. तो अमेरिकेतून आला की आम्ही लग्न करणार आहोत.’ मी विषय संपवून टाकला.

त्यानंतर काही महिन्यांनी इंग्लंड दौरा आटोपून मी मुंबई विमानतळावर उतरलो. मोबाइल सुरू केला आणि पहिलाच एसएमएस वाचून दचकलो. तो एसएमएस ‘ती वेश्यावृत्तीची आहे’, अशा आशयाचा होता आणि तो तिनेच मला फॉरवर्ड केलेला होता. ताबडतोब तिला फोन केला आणि विचारलं तर ती रडवेल्या म्हणाली, ‘मी नकार दिल्यावर त्या ज्येष्ठ सहकार्‍यानंच तो एसएमएस अनेकांना पाठवलेला आहे’. हे माहिती असावं म्हणून तिनं तो मला पाठवलेला होता. नागपूरला परतल्यावर मी तिला बोलावून घेतलं. केबिनमध्ये आल्या आल्याच त्या सहकार्‍यानं तिच्या संदर्भात इतरांना वाटलेलं एक पत्रक माझ्या हातात ठेवलं. ते वाचल्यावर मी तिला म्हटलं ‘तू तक्रार दे. आपण पोलिसांकडे जाऊ’. आमच्या लीगल सेलच्या प्रमुखाशीही मी लगेच बोललो. पण, त्या कन्येनं तक्रार देण्यास ठाम  नकार दिला. ‘एक तर बदनामी होईल. दुसरं म्हणजे लग्न झालं की, मी लगेच परदेशात स्थायिक होणार आहे. पोलिस केसचं झेंगट परवडणार नाही मला’, असं तिचं म्हणणं होतं. थोडा वेळ शांततेत गेल्यावर तिनं पर्स उघडली, नोकरीचा राजीनामा काढला आणि माझ्या हाती दिला.

चौकशी केली तर तो ज्येष्ठ सहकारी कार्यालयातच होता. त्याला बोलावलं. आल्यावर तिच्याकडे पाहून तो निलाजरा हसला. मी उठलो आणि त्याच्या कानाखाली एक खाडकन आवाज काढला. अनपेक्षित झालेल्या या आघातानं तो हेलपाडला, दोन खुर्च्याही पडल्या. तो आवाज ऐकून काही सहकारी धावत आले. तिच्या राजीनाम्याचा कागद फडकावत, टेबलवरचा कोरा कागद पुढे सरकवत मी कडाडलो, ‘तिनं तुझ्या घाणेरड्या वर्तणुकीची तक्रार केलीये. राजीनामा दे ताबडतोब नाही तर पोलिसांकडे पाठवतो हे प्रकरण’. त्यानं थरथरत्या हातांनी राजीनामा लिहिला. माझ्याकडे दिला आणि खाली मान घालून तो बाहेर पडला. ती कन्या म्हणाली, ‘त्यांना मारलं तेवढी शिक्षा पुरेशी होती. राजीनामा घ्यायला नको होता. उघड्यावर पडतील ते. तुम्हाला सांगते सर, आम्हा मुलींना हे प्रकार काही नवीन नाहीत. अंगाला हात नाही लावू दिला की, पुरुष असेच विकृत वागतात. आम्हाला सवय होते त्याची...’ तिचं म्हणणं ऐकून मी नि:शब्द झालो. स्त्रिया किती मोठ्या मनाच्या आणि वैपुल्यानं समंजस असतात हे जाणवून ओशाळलोही. त्यानंतर त्या महापुरुषाला नागपुरात कुठेही मी नोकरी मिळू दिली नाही. तो कोणत्याही वृत्तपत्राकडे गेल्याचं कळलं की फोन करून त्याचे प्रताप कळवत असे! ती कन्या अजूनही माझ्या संपर्कात आहे.

आमचा एक सहकारी मूळचा सोलापूरकर. त्याची प्रत्येक नोकरी अशा पत्रकारिताबाह्य कारणासाठी गेलेली तरी कुमार केतकर यांच्या अनाकलनीय लोभामुळे त्याला पुण्यात नोकरी मिळालेली होती. जास्तच ‘कर्तृत्व’ गाजवल्यानं त्याला अखेर माझ्याकडे नागपूरला शिक्षा म्हणून पाठवण्यात आलं. खमकेपणानं हाताळल्यानं काही कारनामे करण्याआधीच त्याची हकालपट्टी करण्यात आम्हाला यश आलं. त्याच्या हकालपट्टीच्या संदर्भात तेव्हा ‘लोकसत्ता’च्या अंकात चौकटीत सूचनाही प्रकाशित झाली होती. नंतरही त्याच्या नोकर्‍या याच कारणांनी गेल्या हे जगजाहीर असूनही पत्रकार संघटना त्या रंगीला रतनला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करतात, सन्मान स्वीकारतात... त्या बातम्या वाचताना आपण पत्रकार असल्याची लाजच वाटते...

माझ्या एक दिवंगत सहकार्‍याच्या विधवा पत्नीकडे रात्री-बेरात्री माझ्या टीममधील एक सहकारी जातो, हे कळल्यावर तिने तक्रार द्यावी असं मी सुचवलं. तिनं नकार दिला. बदनामीची भीती, हेच कारण. अखेर त्याची आडवळणाच्या गावी बदली केली आणि तो आदेश सोपवताना कानाखाली एक आवाज काढून बदली का केली, हे त्याला सांगायला मी विसरलो नाही.

गेली अनेक वर्षं या घटना मनात होत्या, पण त्या लिहिण्याचा किंवा सांगायचा धीर होत नव्हता. भक्ती चपळगावकर-भाळवणकर आणि नीता कोल्हटकर यांच्यामुळे हा कबुलीजबाब देण्याचं धैर्य आलं. ‘धन्यवाद’ म्हटलेलं त्या दोघींनाही आवडणार नाही.

आणखी एक कबुलीजबाब

याचा अर्थ कामाच्या ठिकाणी मी कुणा महिला सहकार्‍याशी गैरहेतूनं वागलो नसलो तरी फ्लर्ट मात्र केलं आहे. ही गुस्ताखी मी चक्क एका ज्येष्ठ सहकार्‍यासोबत केली. ते फ्लर्ट आयुष्यातल्या सर्व भल्याबुर्‍या, अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. ते फ्लर्ट आणि मी गेली ३४ वर्षं कधी वाद घालत तर कधी सुखानं नांदत आहोत. त्या फ्लर्टचं नाव आहे मंगला!

.............................................................................................................................................

भक्ती चपळगावकर-भाळवणकर यांच्या लेखाची लिंक -

.............................................................................................................................................

नीता कोल्हटकर यांचं ट्विट 

A Marathi senior editor wt whom I was travelling in a cab yrs ago, while I sat in a corner, grabbed my face to try & kiss. I pushed him away. But left me disgusted @nashikar  

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Ashwini Funde

Sun , 14 October 2018

सर, लेख आवडला...बहुतेकदा लैंगिकतेबाबत मेंदूत सदैव विकृत विचार करणाऱ्यांना पीडित स्त्रिया प्रतिकार करत नाहीत...त्या स्वतः माघार घेतात किंवा स्वतः चा मार्गच बदलतात, त्यांना घडलेल्या प्रकाराची चर्चाही नको असते, त्यामुळे वर्षांनुवर्षे 'फ्रॉटेयर्स' किंवा 'शोषक' असलेल्या पुरुषांचे फावते...अशाप्रकारे वागून त्यांच्या गैरवर्तनाला स्त्रियांनी पाठीशी घातलेले असते, असे वाटते. त्यामुळेच अशी विकृत प्रवृत्ती बाळावताना तसेच ताठ मानेने जगताना दिसते.अशा पुरुषांना चोप देण्याचे काम तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात केले आणि ते लेखातून मांडले देखील! आपल्या जुन्या पुरुष सहकाऱ्यांबाबत इतके स्पष्टपणे लिहून आपण '#मी टू' ला दिलेले समर्थन विशेष आवडले! -अश्विनी फुंदे


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......