अजूनकाही
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता गेल्या. त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा होते आहे. कुणी त्यांच्या ‘अम्मा ब्रँड’ वस्तूंवर भर देत आहे, तर कुणी त्या राज्यातील त्यांच्या लोकप्रियतेवर. कुणी त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी बोलत आहे, तर कुणी त्यांच्या सोने, चप्पल जोड, साड्या यांच्याविषयी. लग्न केलेल्या व्यक्तीला कुठलाही संपत्तीचा मोह नसतो, हे भारतीय परंपरेतील सत्य जयललिता यांच्याबाबतीत कसे लागू पडत नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांच्या अमाप बेनामी संपत्तीबद्दल त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली, पण सरतेशवेटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बा इज्जत बरी केलं.
जयललिता प्रसारमाध्यमांच्या दृष्टीने, सोशल मीडियाच्या नजरेतून भ्रष्टाचारी, अहंमन्य आणि स्वत:ला परमेश्वराचा अवतार समजणाऱ्या होत्या, पण त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूमधील हजारो स्त्री-पुरुष स्वत:च्या कुटुंबातील सदस्य गेल्यासारखा शोक करताना टीव्ही दिसत होते. ही त्यांची सर्वसामान्य जनतेमधील लोकप्रियता नोंद घेण्यासारखी आहे.
जयललिता हा भारतीय राजकारणातला एक करिश्मा होता. कुणावर तरी जीव ओवाळून टाकणाऱ्या, प्रेम करणाऱ्या, पण लग्न न करणाऱ्या; स्वत:चं कुटुंब नसलेल्या, पण सर्वसामान्य जनतेविषयी ममत्व असलेल्या; पुरुषांच्या राजकारणात स्वत:चा दरारा निर्माण करणाऱ्या; एकट्या असूनही प्रचंड संपत्ती जमवणाऱ्या, भ्रष्टाचारी असूनही बेहिशोबी लोकप्रियता असणाऱ्या, एका राज्याच्या मुख्यमंत्री असूनही केंद्र सरकारच्या दबावाला बळी न पडणाऱ्या, एकला चलो रे वृत्तीने काम केल्यामुळे आपल्यानंतर नेतृत्वाची दुसरी फळीच तयार न होऊ देणाऱ्या, जयललिता यांचा सुपरस्टार अभिनेत्री ते सुपरस्टार मुख्यमंत्री हा प्रवास चकित करणारा आहे.
आतापर्यंत प्रसारमाध्यमांतून, सोशल मीडियावरून ज्या जयललिता माहीत झाल्या आहेत, त्यापेक्षा वेगळ्या जयललिता पुढील दोन मुलाखतींमधून पाहायला मिळतात. करारी, अहंमन्य, लोकानुनयी, आत्ममग्न वाटणाऱ्या, असणाऱ्या जयललिता यांच्यामध्ये एक संवेदनशील महिला, विचारी राजकारणी आणि पुरुषप्रधान भारतीय राजकारणात महिलांचं स्थान नेमकं कसं आहे, याचं पुरेपूर भान असलेली मुख्यमंत्री कशी होती, हे या मुलाखतींमधून पाहायला मिळतं.
या दोन्ही मुलाखती इंग्रजीमध्ये आहेत. जयललिता यांचं इंग्रजी फ्लॉलेस आणि चांगलं असल्याने या मुलाखतींमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळा प्रकाश पडतो. ५ डिसेंबरला रात्री ११-३० जयललिता यांचं निधन झाल्यापासून गेल्या दोन दिवसांत सोशल मीडियावर त्यांच्या दोन मुलाखती चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
त्यातील ही पहिली. सिमी गरेवाल यांनी घेतलेली. गरेवाल समोरच्या व्यक्तीला अतिशय चांगल्या प्रकारे बोलतं करतात. त्यामुळे त्यांच्या मुलाखती या नेहमीच वेगळं काहीतरी देतात. त्यांनी घेतलेल्या जयललिता यांच्या या मुलाखतीमधूनही ते दिसतं. गरेवाल यांनी अतिशय नेमके प्रश्न विचारून जयललिता यांनी बोलतं केलं आहे. फार काही गॉसिप्स, स्कुप्स किंवा वादग्रस्त विधानं काढून घेऊन त्यांचं भांडवल करण्याचा सोस गरेवाल यांना नसतो, याची पुरेपूर खात्री असल्यामुळे जयललिता या मुलाखतीमध्ये अतिशय मनमोकळ्या, ताणरहित आणि खिळाडूवृत्तीच्या दिसतात. आपल्या पहिल्या क्रशपासून ते खाजगी आयुष्याविषयी त्या दिलखुलासपणे बोलल्या आहेत. त्यामुळे या मुलाखतीमधून त्यांनीच म्हटल्याप्रमाणे त्या ‘अति-संवेदनशील’ असल्याचे दिसते, जाणवते आणि काही प्रमाणात पटतेही.
हा त्यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, पहिल्या भागाइतकाच चांगला आहे.
ही जयललिता यांची दुसरी मुलाखत. ती घेतली आहे ‘डेव्हिडस अॅडव्होकेट’ म्हटल्या जाणाऱ्या करण थापर यांनी. थापर हे अतिशय नेमके पण भेदक प्रश्न विचारून, समोरच्या व्यक्तीला प्रश्नांच्या सापळ्यात अडकवून त्याच्याकडून हवं ते काढून घेणारे मुलाखतकार मानले जातात. आपल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत ते तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत राहतात. जयललिता यांच्या या मुलाखतीमध्येही ते पाहायला मिळतेच. त्यामुळेच आधीच प्रसारमाध्यमांविषयी फारसं बरं मत नसलेल्या जयललिता या मुलाखतीमध्ये ‘अलर्ट’ स्थितीमध्ये असलेल्या दिसतात. ‘प्रसारमाध्यमं आपल्याविषयी पूर्वग्रहदूषित का आहेत’ याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं आहे की, ‘मी स्वत:ला घडवलेली स्वतंत्र बाण्याची महिला राजकारणी आहे. त्यामुळे मला इतर महिला राजकारण्यांसारखी कौटुंबिक पार्श्वभूमी नाही.’ प्रसारमाध्यमांनी जयललिता यांची लोकशाहीविरोधी, असमंजस आणि खुनशी अशी प्रतिमा का रंगवली, याचाही त्यांनी खुलासा केला आहे. याच मुलाखतीमध्ये शेवटी त्या म्हणतात की, मी या मुलाखतीच्या दृष्टिकोनाविषयी नाराज आहे. शेवटी तर त्यांनी करण थापर यांना असंही म्हटलं आहे की, “I must say it wasn’t a pleasure talking to you. Namaste.’
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment