अजूनकाही
गुजरातच्या रेल्वे स्टेशनवर प्रवासी बिहारींची गर्दी झालीय. बाडबिस्तारा बांधून आपल्या गावी परतणाऱ्या चेहऱ्यांवर अनिश्चित भविष्याची चिंता सहजपणे वाचता येते. दरभंगाहून अहमदाबादला आलेल्या साबरती एक्सप्रेसमधून उतरलेले तरुण ज्या तटस्थपणे टीव्ही कॅमेऱ्यासमोर गुजरातमधली हालत सांगत आहेत, त्यावरून कळतं की हल्ल्यांनी त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण केलेला नाही. पण त्यांना परेशानी आणि चिंता दिलेली आहे. तिरस्कार नसणं ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणावी लागेल.
बिहारी महाराष्ट्र, आसाम आणि आता गुजरामधून मार खाऊन चुपचाप परतत आहेत. याचा काही परिणाम राज्यातील नेत्यांवर होईल? तसं तर काही वाटत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार टीव्हीवर सांगत होते की, ते घटनांवर लक्ष ठेवून आहेत आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याशी बोलले आहेत. एकदम सुस्त सरकारी स्पष्टीकरण.
प्रसारमाध्यमं बरीच समजूतदार आहेत. त्यांना प्रत्येक घटनेचं महत्त्व समजतं आहे. त्यांना माहीत आहे की, १४ महिन्यांच्या मुलीवर बलात्काराच्या घटनेनं या परप्रांतीयांवरील हल्ल्यांना सुरुवात केली, त्यात कुठलाही धर्म नाही. प्रसारमाध्यमं तटस्थपणे मुलीवरील बलात्काराची घटना आणि परप्रांतीयांना पळवून लावण्याच्या घटना सांगत आहेत. त्याला बिहारच्या उदध्वस्त झालेल्या अर्थव्यवस्थेशी आणि भरकटलेल्या राजकीय नेतृत्वाशी काही देणंघेणं नाही. ते हे सांगायला तयार नाहीत की, नियोजित हल्ले एखाद्या घटनेवरून होत नसतात. तिरस्काराची भावना समाजामध्ये पूर्णपणे भिनल्यानंतरच असं होतं.
त्यांना हे सांगायचं नाहीये की, जवळपास दीड दशकांपासून बिहारमध्ये सत्तेत असलेले नीतीशकुमार आणि त्यांचा सहकारी पक्ष भाजप बिहारच्या लोकांना इतकंच देऊ शकलाय की, त्यांना आपल्या उपजीविकेसाठी देशातल्या दुर्गामातल्या दुर्गम भागाची चकरा माराव्या लागतात. देशातला असा कुठलाही भाग नाही की, जिथं बिहारी कामासाठी जात नाहीत.
...............................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
...............................................................................................................................................................
काही वर्षांपूर्वी सर्वमान्य बिहारी अपमान आणि तिरस्कार विसरण्यासाठी म्हणत असे की, देशातल्या नागरी सेवा आणि वैज्ञानिक संस्थांमध्ये असलेलं आमचं प्रतिनिधित्व पाहा. आता हा स्वर ऐकायला मिळत नाही. कारण त्याला हे माहीत झालं आहे की, या सत्यापासून कुठला फायदा मिळणार नाही. त्याला हे समजून चुकलंय की, बिहारची हालत अशीच राहणार आहे.
दिल्ली, मुंबई, सूरत, बडोद्यापासून देशातल्या कुठल्याही औद्योगिक शहराच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या बिहारीच्या जीवनावर क्वचितच एखादा सिनेमा वा लघुपट बनवला गेला असेल. दिग्दर्शक प्रकाश झा यांनीही बिहारच्या दबंगांवरच सिनेमे बनवले आहेत. हे देशाच्या मध्यमवर्गाच्या त्या भावनेला दृढ करतं की, बिहारचा समाज अज्ञानी आहे. यामुळे झा यांना मुंबईतही कुठली अडचण येत नाही. कारण शिवसेना आणि मनसे यांसारख्या पक्षांचा हा आरोप सिद्ध होतो की, बिहारी वाईट असतात!
रेल्वेच्या सामान्य डब्ब्यातून जनावरांसारखा प्रवास करणाऱ्या बिहारींना विचारा की, त्यांचा प्रवास कसा पार पडतो. ते सांगतील की, रेल्वे पोलिसांपासून रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत सगळे त्यांच्याशी कशा प्रकारे वर्तन करतात.
कुणाला हे सांगायला वेळ नाही की, उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमागे त्याच पक्षांचा हात आहे, जे हिंदुत्ववादी आहेत आणि ज्यांची युती भाजपसोबत राहिली आहे. हे सर्वांना माहीत आहे की, भाजप महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच विस्तारला आहे. शिवसेनासारखे पक्ष गुजरात आणि कर्नाटकमध्येही उदयाला आले आहेत. गुजरातमध्ये अस्तित्वात आलेल्या ‘ठाकोर सेना’चं नेतृत्व सध्या काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर यांच्याकडे आहे. काँग्रेसही या पक्षांचं पालनपोषण करण्यात मागे राहिलेली नाही. या पक्षांचा सामना करण्याची रणनीती काँग्रेसचं काय कुठल्याच पक्षाकडे नाही.
महाराष्ट्रात राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पक्षांमध्ये स्पर्धा लागलेली असते की, उत्तर भारतीयांना कोण जास्त त्रास देतं. मुंबईत एक रेल्वे पूल पडल्यानंतर त्या पुलावर सामान विकणाऱ्या बिहारींना मनसेनं आपलं लक्ष्य बनवलं होतं. मनसेच्या सैनिकांनी त्यांना अशा प्रकारे मारहाण केली की, जणू काही ते चोर-लफंगे आहेत. राज्याच्या भाजप सरकारनं या मनसे सैनिकांविरोधात कुठलीही कारवाई केली नाही.
बिहारसारख्या राज्यांच्या मागासलेपणाबाबत आता राजकारणात होणारी चर्चा बंद झाली आहे. हे जाणून घेण्यात कुणालाही स्वारस्य नाही की, त्यांच्या येण्याआधी अत्यंत समृद्ध असलेल्या या प्रदेशातले उद्योग-धंदे इंग्रजांनी बंद केले आणि तिथल्या संपत्तीची लूट केली. स्वातंत्र्यानंतर विपन्न झालेल्या या राज्यांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी कुठलंही सक्षम धोरण राबवलं गेलं नाही. त्यांना ना नव्या औद्योगिकीकरणाचा फायदा मिळाला, ना पर्यायी अर्थव्यवस्था बनवण्याचा प्रयत्न केला गेला.
जागतिक बँकेने या राज्यांचं मागासलेपण दूर करण्यासाठी एक दुष्प्राप्य फॉर्म्युला दिला आहे आणि राजकीय नेत्यांना त्याचा अमल करण्यात मजा येतेय. हा फॉर्म्युला आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाचा. एक्सप्रेस आणि हायवे बनवा, स्मार्ट सिटी बनवा. प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याला यात रुची आहे. उत्तर प्रदेशात मायावती, अखिलेश आणि योगी आदित्यनाथ यांच्यात यावर कुठलाही वाद नाही की, एक्सप्रेस वे लवकर पूर्ण केला जावा. उघड आहे की, ठेकेदारीतून मिळणारं कमिशन नेते आणि पक्षाला सारखंच मालामाल करतं. जनताही या चमकत्या सडकांना पाहून सदगदित होते!
बिहारमध्येही नीतीशकुमार यांनी हा फॉर्म्युला अवलंबला आहे. मोठ्या सडका बनवल्या आणि लोकांना खूश केलं. ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, पण बिहारींना उपजीविका मिळाली नाही.
बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मजुरांच्या श्रमातून दुसऱ्या राज्यांच्या सडका तयार झाल्या, गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या, कारखाने उभे राहिले. पण बिहारी आजही दूध पोहचवण्याचं आणि इतर छोटी-मोठी काम करून तेथील संपन्न व मध्यमवर्गाची सेवा करत आहेत. त्या बदल्यात मात्र त्यांना तिरस्कार मिळतो. नीतीशकुमार यांनी आता हे सांगणं सोडून दिलंय की, त्यांचं सरकार बाहेर जाऊन काम करणाऱ्यांच्या अधिकारांचं रक्षण करेल. त्यासाठी तयार केलेला विभाग कुठे नजरेस पडत नाही. रोजगार देऊन बाहेर जाणाऱ्यांना थांबवण्याची अपेक्षा त्याच्याकडून करण्यात अर्थ नाही.
अनुवाद - टीम अक्षरनामा
.............................................................................................................................................
हा मूळ हिंदी लेख http://www.drohkaal.com या पोर्टलवर ८ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
.............................................................................................................................................
लेखक अनिल सिन्हा ‘द्रोहकाल’ या ऑनलाईन पोर्टलच्या संपादक मंडळाचे सदस्य आहेत.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Alka Gadgil
Fri , 12 October 2018
Aho he Bihari Garvase kehanar hote, Garvse ladhnar hote, tyanka palvun dilyanni, Devak kalji
Gamma Pailvan
Fri , 12 October 2018
अनिल सिन्हा, तुमच्या लेखावरून गरीब बिच्चारे बिहारी असा समज होतो आहे. तो खरा असेलही. मी त्याच्या खरेखोट्याची शहानिशा करीत नाही. पण एक निरीक्षण सांगू इच्छितो. बिहारी लोकं गुन्हेगारीत बरेच आघाडीवर असतात. याचा अन्वयार्थ तुम्ही लावा. मला लावता येत नाहीये. आपला नम्र, -गामा पैलवान