हे परप्रांतीय असतात कोण?
पडघम - देशकारण
बाळासाहेब राजे
  • गुजरातमध्ये गेले काही दिवस परप्रांतीयांवर हल्ले होत आहेत. त्यापैकी हे एक छायाचित्र
  • Wed , 10 October 2018
  • पडघम देशकारण परप्रांतीय Outsider

सप्टेंबर २००१ ते ऑक्टोबर २००३ या दोन वर्षांच्या कालावधीत मी मिरजेत शिकायला होतो. मिरज शहर सांगली - मिरज - कुपवाड या महानगरपालिकेचा एक भाग होते. मुळात ही तिन्ही शहरं आता एकच झाली आहेत. यातला कुपवाड हा भाग एमआयडीसीचा आहे.

मी शिकायला असताना आमच्या कॉलेजच्या परिसरात एक खानावळ होती. ती आम्ही शिकत असलेल्या संस्थेच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये असलेला सिद्धू नावाचा शिपाई चालवत असे. तो शेजारच्या विजापूर जिल्ह्यातला होता. विजापूर कर्नाटक राज्यात आहे. सिद्धूच्या बोलण्यातील कानडी हेल मला गोड वाटत असे. नीर कुडू म्हणजे पाणी दे, बान कुडू म्हणजे भात दे, असं जुजबी कानडी बोलायला तेव्हा मी शिकलो होतो. त्या खानावळीनं आईनं तयार केलेल्या स्वयंपाकाची उणीव कधी भासू दिली नाही. त्याची भाषा वेगळी आहे नि त्याचं राज्य वेगळं आहे, म्हणून तो परप्रांतीय आहे असा विचार माझ्या वा माझ्या सहाध्यायांच्या मनाला कधीही शिवला नाही. उलट सिद्धू आणि त्याचे कुटुंबीय जेव्हा जेव्हा सुट्टीवर जात असे, तेव्हा त्याच्या झोपडीवजा घराची चावी आमच्या मित्रांपैकी कुणाकडे तरी असायची आणि कॉलेज सुटल्यानंतर आमच्यापैकी बरेच जण टीव्ही पाहण्यासाठी तिथं पडीक असायचे.

दुसऱ्या वर्षी आम्ही मेस बदलली. ती मेस ज्यांची होती, त्यांना आम्ही मामा म्हणत असू. सकाळी आणि रात्री वेळेत आमच्या हॉस्टेलमध्ये सुग्रास भोजन पोचवण्याचं काम मामा करत असत. डब्यात असलेली कोशिंबीर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ होता. नपेक्षा तशी कोशिंबीर मी कॉलेज सुटल्यापासून आजपर्यंत खाल्लेली नाही. मामांनी दिलेल्या कोशिंबिरीत डाळिंब, द्राक्षं आणि सफरचंद असायचं. मामा स्वतः शाकाहारी व आध्यात्मिक असूनही आमच्या आग्रहाखातर आम्हाला आठवड्यातून एकदा झणझणीत अंडाकरी मिळत असे. ती त्यांनी दुसऱ्याकडून बनवून घेतलेली असे. तर हे मामादेखील कानडी होते.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

आमच्या कॉलेजच्या आवारात एक कँटीन होतं. तिथं एक रुपयात चहा मिळत असे. वर्षभरानंतर साखर महाग झाल्यामुळे चहाची किंमत वाढवून दीड रुपया केली होती. आमच्या गप्पांच्या अनेक मैफिली तिथंच रंगत होत्या. तर हे कँटीन चालवणाऱ्या सदगृहस्थाचं नाव होतं सॅमसन.

आमच्या कॉलेजच्या समोरच कृपामयी मेंटल हॉस्पिटल होतं. जिथं उपचार घेतल्यामुळे हजारो लोकांचं जगणं सुखद झालं होतं. हे हॉस्पिटल चालवणारे डॉक्टर बंगाली होते. त्यावेळी बहुधा त्यांची तिसरी पिढी तिथं काम करत होती आणि हॉस्पिटलमधील बहुतांश मनोरुग्ण महाराष्ट्रातील होते.

कॉलेजच्या समोर आणखी एक भव्य वास्तू होती. तिचं नाव होतं तुळूनाडू सांस्कृतिक भवन. माझ्या आठवणीनुसार ती वास्तूही कानडी लोकांची असावी. तिथं विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असे. मी व माझ्या मित्रांनी तिथल्या अनेक कार्यक्रमांना आगंतुकपणे उपस्थिती लावलेली आहे. बरोबरच तिथल्या अनेक मेजवान्याही झोडलेल्या आहेत.

आमच्या कॉलेजच्या जवळच सांगली मिरज रस्त्यावर रेल्वेपुलाच्या बाजूला मारुतीचं एक छोटंसं मंदिर होतं. आम्ही नित्यनेमानं तिथं दर्शन घेण्यासाठी जात असू. मारुतीचं मंदिर रेल्वे पुलाच्या पलीकडे तर रेल्वे पुलाच्या अलीकडे एक केरळी हॉटेल होतं. तिथं काम करणारा पोऱ्या तर माझा मित्रच झाला होता. तिथला गरमागरम चहा आणि बनपाव हा माझा आवडता पदार्थ होता. त्या केरळी हॉटेलातील काकडी टाकून केलेली भजी आणि ऑम्लेटचं नाव काढताच माझ्या तोंडाला पाणी सुटतं.

आमच्या कॉलेजपासून मिरज शहरात प्रवेश करताना मिशन चौक लागतो. पारतंत्र्याच्या काळात तत्कालीन इंग्रज डॉक्टरांनी उभारलेलं मिशन हॉस्पिटल आजही दिमाखात उभं आहे. नानाविध रोगांवर अल्पदरात उपचार करण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. माझे आजोबा सांगायचे की, पन्नास-साठ वर्षांपूर्वी आपल्याकडे वैद्यकीय सुविधा नव्हत्या, तेव्हा लातूर जिल्ह्यातील अनेक लोक याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जात असत. तर या मिशन चौकात एक चहाचा ठेला लावलेला असायचा. तिथला चहा स्वादिष्ट होता, पण महागही होता. तरीही अनेक लोक गर्दी करत. कारण चहाला असलेली चव. या चहात आल्याबरोबर इतर अनेक मसाले वापरले जायचे. हा चहाचा ठेला चालवणारा अण्णा दाक्षिणात्य होता. बहुधा तो आंध्र प्रदेशातील असावा.

मागच्या आठवड्यात मी नांदेडहून सचखंड एक्सप्रेसनं औरंगाबादला जात असताना माझ्या शेजारी बसलेला प्रवाशी मथुरेचा होता. तो इकडे उसापासून गुळ तयार करण्याचं काम करतो. ते काम जिकिरीचं असतं, ज्याला त्यातल्या लहानसहान खाचाखोचा माहीत आहेत, असा माणूसच ते काम करू शकतो.

माझे दोन नातेवाईक नोकरी करण्यासाठी अरब देशात दहापेक्षा अधिक वर्षं होते. तिथं बक्कळ पैसा कमावून आता स्वतःच्या व्यवसायात स्थिर झाले आहेत.

माझं आडनाव राजे आहे, ते ऐकणाऱ्याला वेगळं वाटणं साहजिक आहे. नांदेड, लातूर, पुणे, पुसद, औरंगाबाद, मुंबई या शहरात या आडनावाची मोजकी माणसं आढळतात. आम्ही मूळचे कुठले, याविषयीही दोन प्रवाह आहेत. कोणत्याही एका मुद्द्यावर ठाम न राहणं, हा आपलाच दोष असतो, ते जाऊ द्या. पण काहीजणांच्या मते आम्ही मूळचे राजस्थानातील आहोत, तर आणखी काहीजणांच्या मते आमचं मूळ तेलंगणा प्रदेशात आहे. म्हणजे या महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा मीही एक परप्रांतीय आहे.

लोक स्थलांतर का करतात, तर या प्रश्नाचं एकच एक उत्तर म्हणजे पोटासाठी. जग हे एक खेडं झालं आहे, असं म्हणण्याच्या युगात जर कुणी अमका माणूस परप्रांतीय म्हणून त्याच्यावर हल्ले करत असेल, तर हे नीचपणाचं कृत्य आहे. एक माणूस म्हणून आणि त्यातल्या त्यात राजस्थान वा तेलंगणातून आलेला परप्रांतीय म्हणून मी अशा भ्याड हल्ल्याचा निषेध करतो.

आजकाल परप्रांतीय अकुशल कामगारांवर काही टगे वारंवार भ्याड हल्ले करत आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी हा लेखप्रपंच. हाच न्याय सगळीकडे लावायचा का? आणि आपण खरंच भारताचे नागरिक आहोत का? साला, सगळ्या एकात्मतेच्या गोष्टी पुस्तकातच शोभून दिसतात, हे मात्र खरे!

.............................................................................................................................................

लेखक बाळासाहेब राजे ग्रामीण भवतालाची स्पंदनं टिपणारे मुक्त लेखक आहेत.

spraje27@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......