अजूनकाही
२ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०१९ यादरम्यान गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. गांधी कसे आमचेच आहेत, ते आम्हाला कसे ‘प्रात:स्मरणीय’ आहेत, असे प्रत्येक राजकीय पक्ष ‘दम’ देऊन सांगत फिरेल, तेव्हा लोकशाहीतले सजग नागरिक म्हणून आपण गांधींचे विचार समजून घेणं, त्याचा प्रसार करणं, हे आपलं आद्यकर्तव्य आहे. सजग नागरिक म्हणून हे करणं, हीच राष्ट्रपिता महात्मा गांधींना खरी आदरांजली ठरेल!
.............................................................................................................................................
शाळेत असताना भारतीय स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन, या दोन्ही दिवशी सकाळी गावातून निघणाऱ्या प्रभात फेरीत एक घोषणा ठरलेली असायची- ‘एक रुपया चांदी का, हमारा देश गांधी का!’ या घोषणेचा अर्थ काय, हे कळायचं नाही. मात्र प्रभात फेरीतला प्रत्येक जण मोठ्या आवाजात ही घोषणा द्यायचा. माझी काकू जात्यावर दळण दळताना, जात्यावरची गाणी म्हणायची. त्यातली एक ओळ आजही आठवते- "उचललेस मीठ तू, साम्राज्याच्या खचला पाया.”
ही दोन्ही वाक्यं मला लहानपणापासून एका नावापाशी घेऊन जातात. आणि ते नाव म्हणजे, भारतीय जनमानसावर ज्यांनी प्रचंड प्रेम केलं असे – गांधी!
गांधी हे नाव शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात घेतलं जायचं. तेव्हा वाटायचं की, या माणसाचं असं नेमकं केलं तरी काय, ज्यामुळे सुशिक्षितापासून ते अडाणी माणसापर्यंत प्रत्येक भारतीय माणूस त्यांचं नाव घेतो?
गांधी हे नाव सातत्यानं कानावर पडत आलं. ते प्रत्येक भारतीय तरुणाच्या कानावर कमी-अधिक प्रमाणात पडतं. शाळा न शिकलेली काकू जेव्हा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाचा उल्लेख आपल्या गाण्यातून करत असे, तेव्हा मला गांधी इथल्या जनमानसाच्या हृदयात कसे घट्ट बसले आहेत, हे लक्षात यायचं. इतकं प्रेम मिळवण्यासाठी माणूस मुळात नैतिक असावा लागतो. आणि ही नैतिकता गांधींच्या संपूर्ण जीवनाचा मूळ गाभा होता. मग गांधींबद्दल समजून घ्यायचं ठरवलं. पण त्यांच्याबद्दल भारतीय समाजात गैरसमज इतक्या मोठ्या प्रमाणात पसरवलेले आहेत की, गैरसमजाला सत्य मानणाऱ्या वर्गाला गांधी कधीच आपले वाटले नाहीत. आणि या वर्गानं कधी सत्य, अहिंसा, नैतिकता या मूल्यांना स्वीकारलंही नाही, ही खरी शोकांतिका आहे.
गांधी समजून घेण्यासाठीच पहिलं निमित्त ठरलं, ते ‘माझे सत्याचे प्रयोग’. त्यावेळी मी ११वीत होतो. निमित्त होतं एका महाविद्यालयीन स्पर्धेचं. या एका पुस्तकानं माझ्या गांधी समजून घेण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. पुस्तक वाचून प्रचंड भारावून गेलो होतो. कारण मानवी जीवनात नैतिकतेचं किती मोठं स्थान आहे, हे पहिल्यांदा समजलं. त्यानंतर हळूहळू आणखी वाचत गेलो. पुढे रिचर्ड अॅटनबरोचा ‘गांधी’ हा चित्रपट या प्रवासात महत्त्वाचा ठरला.
मग काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या. गांधींवर प्रेम करणारा वर्ग देशात मोठा आहे. तो स्वातंत्र्यपूर्व काळात होता आणि आजही आहे. तसंच त्यांचा द्वेष करणाऱ्यांची संख्या कमी असली तरी, अत्यंत हीन स्तराला जाऊन त्यांना बदनाम करणारी ही मंडळी आहेत. पण तरीही या द्वेषमूलक वर्गाला मात्र गांधींचा उघड उघड विरोध कधी करता येत नाही.
गांधींनी देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. मात्र याच देशातल्या कट्टरवादी, अमानवी, हिंसक, प्रवृत्तीनं त्यांना गोळ्या घातल्या, यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. हजारो लोक एका हाकेवर आपलं सर्व काही सोडून गांधींनी पुकारलेल्या अहिंसक लढ्यात मार खायला तयार होत, यामागे काय कारण होतं? मुळात मानवी मन हे हिंसेला नकार देतं. हे ओळखून गांधींनी अहिंसा लोकांच्या मनात रुजवली, लोकांची मनं जिकली, प्रचंड विश्वासाहार्यता कमावली. या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी माणसाच्या अंतरमनात नैतिकतेचा अखंड ध्यास असावा लागतो. हे सगळं वाटतं तितकं सहजसोपं नाही. पण हे सगळं गांधींनी करून दाखवलं. कारण भारतीय जनमानसाचं लाभलेलं प्रेम आणि त्यांचंही या जनमानसावर असणारं प्रेम यात तेवढं सामर्थ्य होतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सातत्यानं गांधींना बदनाम करण्याचं काम विरोधकांनी केलं. स्वातंत्रपूर्व काळात आणि स्वातंत्रोत्तर काळातदेखील त्यांना ‘खलनायक’ म्हणून पुढे केलं गेलं. मुस्लिमधार्जिणे, अहिंसेचं ‘तत्वज्ञान’ पाजळणारे, सनातनी हिंदू, सरदार पटेलावर अन्याय करणारे, असे आरोप त्यांच्यावर आजही लावले जातात. यामागे हेतू असतो, तो त्यांना बदनाम करण्याचा. आजही कितीतरी गट, संघटना, सतत असे आरोप करतात. हे आरोप कसे खोटे आहेत, याचं विवेचन करण्याशिवाय पर्याय नाही. कारण भारतीय लोकशाहीचा हा डोलारा सांभाळताना उच्चकोटीची नैतिकता अंगी असावी लागते. आणि यासाठी नैतिक बळ लागतं. त्यासाठी प्रेम, शांती, अहिंसा, नैतिकता या मार्गाचा स्वीकार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून गांधींना सोडून पुढे जाता येत नाही.
हे आरोप कसे खोटे आहेत, याचा माझ्या वाचनात आलेले संदर्भ.
गांधी मुस्लिमधार्जिणे होते असे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं, की गांधींनी हयातभर मुस्लिमांना कुठलीही विशेष तरतूद, करार, अथवा सूट दिली नाही. राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात ३१ डिसेंबर १९१६ साली लखनौ करार झाला. या करारानुसार मुस्लिमांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व लोकमान्य टिळक करत होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. उलट गांधींनी मुस्लिमांच्यासाठीच्या सगळ्या विशेष तरतुदी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारताच रद्द केल्या.
अहिंसेचं ‘अतिसमर्थन’ अशी सर्वसाधारण विरोधकांची बोंब असते. गांधींच्या या अहिंसेमुळे देशाला उशिरा स्वातंत्र्य मिळालं, असा आरोपदेखील केला जातो. यावर साधं आणि सरळ उत्तर म्हणजे बहुसंख्य लोकांना एकत्र करायचं असेल, तर अहिंसा हेच तत्त्व स्वीकारावं लागतं. बहुसंख्य लोक एकत्र आले असता, त्यांचं रूपांतर झुंडीत होऊ नये, कारण झुंडीला विचार नसतो. हिंसेच्या मार्गानं चालणारे लढे मानवी मूल्य पायदळी तुडवतात. त्यातून फक्त आणि फक्त नुकसान होतं, ही गांधींची भूमिका लक्षात न घेता त्यांच्यावर आरोप करतं सुटणं निव्वळ हस्यास्पद आहे. आज लोकशाही मार्गानं निघणारे मोर्चे हिंसक वळण धारण करतात, हे दिसतंच आहे. तेव्हा या हिंसक लढ्याबद्दल प्रत्येक जण राग व्यक्त करत असतो. हेच सूत्र गांधींच्या अहिंसा या तत्त्वाला कधीतरी विरोधकांनी लावून बघितलं पाहिजे. त्यामुळे मानवी मूल्यं जपायची असतील तर अहिंसा या मूल्याला बाजूला सारून ते शक्य नाही. कारण पुढे हा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर इथं संविधान लागू होणार होतं… जे की या सर्व मानवी मूल्यांचा स्वीकार करणारं होतं. त्यामुळे अहिंसा या तत्त्वाला वगळून चालणार नाही.
गांधी स्वतःला ‘सनातनी हिंदू’ म्हणवून घेत. पण या शब्दावर अडून बसणाऱ्या वर्गानं याचं उत्तर दिलं पाहिजे, की सनातनी हिंदू असणारे गांधी आपल्या प्रार्थनास्थळी कुठल्याही हिंदू देवाची मूर्ती ठेवत का नाहीत? आणि आपल्या प्रार्थनेत ते ‘ईश्वर अल्ल्हा तेरो नाम सब को सन्मती दे भगवान’ असं का म्हणतात? मुळात गांधी ज्या धर्माबद्दल बोलतात, तो धर्म ईश्वरनिर्मित नाही, तर माणसाच्या मनात असलेल्या माणुसकी धर्माबद्दल ते बोलतात. इथं एक संदर्भ नमूद करण्यायोग्य आहे, ज्यामुळे हा मुद्दा आणखी स्पष्ट होईल. एका पत्रकारानं त्यांना विचारलं, “तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता, पण मंदिरात जात नाही?’ त्यावर गांधी त्याला म्हणतात, ‘पापी माणसं मंदिरात जातात.’ यावरून गांधींची विवेकी भूमिका समजून घ्यायला हवी. हे लक्षात न घेता उठसूठ गांधी कसे हिंदुत्ववादी होते, हे सांगणारा वर्ग गांधींना ‘हायजॅक’ करू पाहतोय.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
नेहरूंना पंतप्रधान करून सरदार पटेलांवर अन्याय केला, असा देखील आरोप गांधींवर केला जातो. या ठिकाणी हे लक्षात घ्यायला हवं की, भारत स्वतंत्र (१९४७) झाला, तेव्हा सरदार पटेल (जन्म १८७५) ७२ वर्षांचे होते. आणि त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. सरदार पटेल सतत आजारी असायचे. अशा वेळी नव्यानं स्वातंत्र्य मिळालेल्या भारताची सूत्रं सरदार वल्लभभाई पटेलांच्या हाती देण्याऐवजी ५८ वर्षीय नेहरूंच्या हाती देणं योग्य होतं, ही वास्तव परिस्थिती गांधींच्या लक्षात होती. त्यामुळे नेहरूंना देशाचे पहिला पंतप्रधान करावं, असं त्यांनी सुचवलं. आणि भारत स्वातंत्र्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे १५ डिसेंबर १९५० रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचं निधन झालं.
किमान हे चार मुद्दे लक्षात न घेता, गांधींवर आरोप करणं तथाकथित विचारवंतांना राष्ट्रभक्तीचे आणि बदनामीचे झेंडे मिरवण्यात आनंद वाटतो. त्यांनी हे चार मुद्दे समजून घेतले पाहिजेत. गांधींना बदनाम करून राजकीय स्वार्थाची, स्वहिताची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सातत्यानं होत असतो. तेव्हा सजग भारतीय नागरिक म्हणून यामागचा हेतू लक्षात घेतला पाहिजे. गांधींना बदनाम करणारं टोळकं वेळीच उघडं पाडले पाहिजे. सत्य, अहिंसा, शांति, मानवता, प्रेम, नीतिमत्ता, करुणा या मानवी मूल्यांनाच या टोळक्यांचा विरोध आहे, हे विसरून चालणार नाही. तसंच गांधींना चरखा आणि स्वच्छता अभियानासाठी मर्यादित ठेवू पाहणाऱ्या सरकारनं त्यांच्या मानवी मूल्यांवरील श्रद्धेची जणू हेटाळणीच सुरू केली आहे, अशी शंका घेतली तर फार वावगं ठरणार नाही. गांधींची ‘Times’ या जगप्रसिद्ध साप्ताहिकानं ‘२० व्या शतकातील सर्वांत प्रभावी व्यक्ती’ म्हणून नोंद घेतली आहे, हेही विसरून चालणार नाही.
२ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०१९ यादरम्यान गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. गांधी कसे आमचेच आहेत, ते आम्हाला कसे ‘प्रात:स्मरणीय’ आहेत, असे प्रत्येक राजकीय पक्ष ‘दम’ देऊन सांगत फिरेल, तेव्हा लोकशाहीतले सजग नागरिक म्हणून आपण गांधींचे विचार समजून घेणं, त्याचा प्रसार करणं, हे आपलं आद्यकर्तव्य आहे. सजग नागरिक म्हणून हे करणं, हीच राष्ट्रपिता महात्मा गांधींना खरी आदरांजली ठरेल!
संदर्भ ग्रंथ -
१. शिवरात्र - नरहर कुरुंदकर, देशमुख आणि कंपनी प्रकाशन
२. गांधीजी आणि त्यांचे टीकाकार - सुरेश द्वादशीवार, साधना प्रकाशन
३. थर्ड अँगल - विनोद शिरसाठ, साधना प्रकाशन
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Kedar Dilip
Mon , 08 October 2018
Dhananjay good?
Gamma Pailvan
Mon , 08 October 2018
भातुकलीच्या परीकथांत गांधी शोभून दिसतात! गांधी जर एव्हढे उत्तुंग होते, तर मग बाबासाहेब आंबेडकर त्यांना 'मीडिया महात्मा' का म्हणतात? -गामा पैलवान