शहीद भगतसिंग यांची नुकतीच (२८ सप्टेंबर) जयंती साजरी झाली. त्यानिमित्तानं हा लेख...
...............................................................................................................................................................
भगतसिंगांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या रूढीप्रथामुक्त पारिवारिक वातावरणामध्ये तर्क, विद्रोह आणि धाडसी वृत्तीची जडणघडण स्वाभाविक पद्धतीनं झाली. यशपाल यांच्या ‘फांसी के फंदे तक’ या पुस्तकात भगतसिंग यांनीच सांगितलेला एक किस्सा आहे. सध्या पाकिस्तानात असलेल्या होशियारपूर गावात भगतसिंगांचा परिवार राहायचा. त्या गावातली संपूर्ण वस्ती शिखांची होती. त्या ठिकाणची जमीन तंबाखूच्या पिकासाठी अनुकूल होती, पण शिखधर्मीय तंबाखूला अपवित्र मानत असल्यानं त्यांना तंबाखूची शेती मान्य नव्हती. असं असतानाही भगतसिंगांचे आजोबा सरदार अर्जुनसिंग यांनी मात्र आपल्या शेतात तंबाखू पिकवला. गावात पंचायत जमल्यावरही ते ठाम राहिले. झालेलं उत्पादन त्यांनी घरात ठेवलं. त्या काळी तंबाखू पिकवणं ‘अपवित्र’ होतं. त्यातही एका शिखानं घरात तंबाखू ठेवणं हे धर्माला उघड आव्हानच होतं. परिणामी त्यांना शीख बिरादरीतून काढून टाकण्यात आलं. त्यांनी गावाला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करून पहिला. एके दिवशी त्यांना समाधानकारक मोबदला देणारा ग्राहक भेटला आणि तंबाखू चांगल्या भावात विकला गेला. अर्जुनसिंग यांनी बिरादरीला संगितलं, ‘मी माझा गुन्हा कबूल करतो, पण आता ती अपवित्र तंबाखू माझ्या घरातून निघून गेली आहे. घृणीत वस्तू स्पर्श करूनही शीख धर्माच्या दीक्षेचं एक कर्मकांड (अमृत प्राशन) केलं की, माणूस पवित्र होऊन जातो. तर मी आता माझ्या घराची व स्वतःची शुद्धता करतो. मला पुन्हा समाजात समाविष्ट करा.’ अशा तर्हेनं व्यावहारिक क्लृप्त्या वापरून परत ते समाजात सामील झाले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या एका मित्राला ही गंमत सांगितली, ‘‘बिरादरीसमोर तंबाखूसारखा निषिद्ध पदार्थ स्पर्श करणारा माणूस पुन्हा गुरूंच्या आज्ञेनं पवित्र होतो, असं आता मी उदाहरण आहे. इवढुशा गोष्टीसाठी मी तरी कशाला सर्वांशी काडीमोड घेऊ?’’
शेतकर्यानं उत्पादनात नफा मिळत असेल तर धार्मिक रूढी बाजूला टाकाव्यात, त्याचं हे एक उदाहरण.
भगतसिंगांचे आजोबा सरदार अर्जुनसिंग हे सक्रिय समाजसुधारक आणि सामंती शोषणाविरुद्ध लढणारे होते. यांची तिन्ही मुलं किशनसिंग (भगतसिंगांचे वडील), अजितसिंग आणि सुवर्णसिंग स्वातंत्र्यसैनिक होते.
भगतसिंग जन्मले १९०७ साली. त्या काळात त्यांचे काका सरदार अजितसिंग व लाला लजपतराय इंग्रजांच्या शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध जनजागरण अभियान चालवत होते. अजितसिंग यांनी ‘पगडी संभाल ओ जट्टा’ (शेतकर्या तुझी इज्जत सांभाळ, तुझी पगडी उतरत आहे) हे गाणं शेतकर्यांच्या शोषणावर लिहिलं होतं. इंग्रज सरकारनं ते सरकारविरोधी ठरवून त्यावर बंदी घातली.
नॅशनल कॉलेजमध्ये असताना भगतसिंगांना नाटक बसवायचं होतं. कुणीतरी लिहिलेल्या ‘महाभारत’ या नाटकात अनेक बदल करून त्यांनी नवीन नाटक बसवलं. शेतकर्यांच्या दुर्दशेवरील या नाटकाचं नाव, कथा व संवाद काहीसं बदलून ‘कृष्णविजय’ केलं. इंग्रजांना कौरव आणि देशभक्तांना पांडव बनवून नाटक उभं करण्यात आलं. त्यात अजितसिंगांचं ‘पगडी संभाल ओ जट्टा’ हे गाणं बसवलं गेलं. इंग्रजांच्या नजरेत आल्यावर या नाटकाच्या बर्याच सरकारविरोधी भागांना व गाण्याला बेकायदेशीर ठरवण्यात आलं. तरी लाहौर व गुजरावालाच्या प्रांतीय काँग्रेस अधिवेशनात नाटकाचा प्रयोग सादर केला गेला. शेतकर्याच्या दुर्दशेवर त्यांना संघर्षाचं आव्हान करणार्या या नाटकाची व गाण्याची झलक आपल्याला राजकुमार संतोषीच्या ‘लिजंड ऑफ भगतसिंग’मध्ये पाहायला भेटते.
...............................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
...............................................................................................................................................................
१९२७ साली भगतसिंगांना पहिल्यांदा संशयाच्या आधारावर अटक करण्यात आली. ६० हजार रुपयांच्या जामिनीवर त्यांची सुटका झाल्यानंतर घरच्यांनी त्यांना अडकवून ठेवण्यासाठी डेअरी उघडून दिली, तसंच शेतमजुरांचा पगार इत्यादी हिशोब ठेवण्यासाठी एक रजिस्टरदेखील दिलं. त्यादरम्यान भगतसिंगांनी रशियन लेखक लेव टॉलस्टॉय यांची ‘पुनरुत्थान’ ही कादंबरी वाचून काढली. त्यांना आढळलं की, सर्व शेतमजूर कर्जात आहेत. विचारपूर केल्यावर कळालं की, त्यांना मिळणारं वेतन अपुरं आहे. भगतसिंग यांनी त्यांचं सर्व कर्ज माफ करून टाकलं. वडिलांनी कारण विचारल्यावर ते म्हणाले, ‘कारण आपण त्यांच्या श्रमातून फायदा कमावतो म्हणून त्यांच्या नुकसानीची काळजीदेखील आपण करायला पाहिजे. म्हणून मी कर्ज माफ करून आपलं काम पूर्ण केलं.’
१८५७च्या विद्रोहानंतर पहिल्यांदाच म. गांधीजींनी पुकारलेल्या असहकार आंदोलनात शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. गांधीजींनी कर, भाडे, जमीन मालकाकडून शेतकर्याला हिसकावून लावणं अशा गोष्टींना मुद्दा बनवून शेतकरी प्रश्नांना स्वातंत्र्य चळवळीची जोड दिली. या अहिंसक आंदोलनात १५ वर्षीय भगतसिंग, चन्द्रशेखर आझाद, सूर्यसेन, भगवतीचरण वोहरा, यशपाल, शिव वर्मा, गयाप्रसाद हे शेतकरी कुटुंबातील तरुण सामील झाले. उत्तर प्रदेशच्या चौरीचौरा गावात पोलिसांच्या गोळीबारात अनेक शेतकरी मारले गेले. रागावलेल्या शेतकर्यांनी पोलिस ठाणं जाळून टाकल्यानं त्यात लपलेले २२ पोलीस आगीत मरण पावले. या हिंसाचारानंतर गांधीजींनी काँग्रेसच्या इतर कोणात्याही नेत्याला विचारात न घेता आंदोलन मागं घेतलं. त्यांच्या या निर्णयामुळे तयार झालेली शेतकरी चेतना आणि सांप्रदायिक एकता भंग पावली. फुटाफुटीतून जातीय दंगलींचं प्रमाण वाढलं. अचानक आंदोलन मागे घेतल्यानं अहिंसक सत्याग्रहात गांभीर्यानं भाग घेणार्या युवा व उत्साही स्वातंत्रसैनिकांमध्ये मोठी निराशा पसरली. आणि त्यांनी आपला मार्ग बदलला.
भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी मार्च १९२६ साली ‘भारत नौजवान सभा’ ही संघटना स्थापन केली. या संघटनेच्या राजकीय कार्यक्रमात संपूर्ण भारतात शेतकरी व कामगारांची संघटना स्थापन करून त्यांच्या पूर्ण स्वाधीन गणराज्याच्या निर्मितीचं लक्ष्य ठरवण्यात आलं. तरुणांमध्ये राष्ट्रवाद, देशभक्ती, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक विचारसरणीचा प्रचारप्रसार करणार्या या संघटेनेनं सर्व जाती व धर्मियांसाठी सामूहिक भोजन, कविता, गाणं, चर्चासत्र व नाटकांतून सामाजिक-राजकीय विषयांवर जनजागृतीचे अनेक कार्यक्रम हाती घेतले.
मार्च १९२८च्या शेवटी लाहौरमध्ये एक ‘राष्ट्रीय सप्ताह’ आयोजित करण्यात आला. भारत नौजवान या संघटनेच्या वतीनं भगतसिंगांनी किरती पार्टीच्या सोहन सिंग जोश यांची भेट घेऊन शेतकर्यांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या दोन्ही संघटनांनी २८ मार्च १९२८ रोजी एक सभा घेतली. त्यात मुंबईचे कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे आणि ब्रिटिश कम्युनिस्ट पार्टीचे फिलिप स्प्राट यांचं ‘भारताची स्वाधीनता म्हणजे काय?’ या विषयावर भाषण झालं. सभेत निर्णय घेण्यात आला की, क्रांती किंवा इतर प्रयत्नांनी शेतकरी व कामगारांकडे सत्ता हस्तांतरणासाठी काम केलं जाईल. या संमेलनानं स्फूर्ती घेऊन किरती पार्टीनं आपलं नाव ‘किरती किसान पार्टी’ असं केलं. दोन्ही संघटनांनी काही महिन्यांनी काँग्रेसवर दबाव टाकून लाहौर जिल्ह्यातील झमाँ गावात गव्हाची शेती बरबाद होण्याच्या मुद्द्यावर बैठक बोलावली. या बैठकीत काँग्रेसचे डॉ. सत्यपाल किचलू, एम ए. माजीद आणि केदारनाथ सहगल या नेत्यांनी सहभाग घेतला.
जून १९२८मध्ये भारत नौजवान सभातर्फे बारडोली सत्याग्रहाच्या समर्थनात निर्णय घेण्यात आला. दोन्ही संघटनाचा कार्यक्रम दलित अत्याचार आणि शेतकरी कामगार यांच्या मागण्यावर केंद्रित करण्यात आला. शेतकर्यांचे प्रश्न, जमिनीचे मुद्दे आणि आर्थिक तक्रारी यांचा संबंध त्यांनी शाही जमीनदारी आणि ब्रिटिश शासनाच्या शोषणाशी जोडून स्वातंत्र्यप्राप्ती वा व्यवस्था परिवर्तनशी जोडला. शेतकर्यांना त्यांच्या अधिकारांसाठी जागरूक करत स्वातंत्र्य चळवळीत उतरवण्यात आलं.
भारत नौजवान सभेच्या वतीनं सप्टेंबर १९२८ मध्ये लायलपूर इथं शेतकरी कामगार संमेलन आयोजित करण्यात आलं. या संमेलनात श्रीपाद अमृत डांगे फिलिप्स स्क्राट, ब्रोड ले यांनी संबोधित केलं. २५००० लोकांच्या सहभागानं घडून आलेल्या या जाहीर सभेत संपत्तीचं राष्ट्रीयीकरण, सामाजिक क्रांती, ब्रिटिशांच्या समर्थनानं भांडवलदार व जमीनदारवर्गाकडून होणार्या शेतकर्यांच्या व कामगारांच्या शोषणाविरुद्ध लढण्याचं आव्हान करण्यात आलं. या सभेचा प्रभाव इतका होता की, त्याला प्रत्युत्तर म्हणून तातडीनं ‘प्रांतीय जमीनदार लीग’ची वार्षिक सभा बोलावून जमीनदारांच्या बाजूनं चौधरी छोटूराम यांनी भारत नौजवान सभेचे अध्यक्ष रामचंद्र यांच्यावर टीका करून कठोर निषेध करणारा ठराव पारित केला. काँग्रेस पक्षाच्या तुलनेत पंजाब भागात नौजवान सभेची लोकप्रियता वाढत गेली.
१ फेब्रुवारी १९३० रोजी पुन्हा याच मुद्यांवर एक जाहीर सभा भारत नौजवान सभेच्या वतीनं शहदरा भागात घेण्यात आली. राष्ट्रीय अभिलेखागाराच्या भारत व होमपोल फाइल क्रमांक ३०/५०/१९३१ मध्ये आढळलेल्या १४ डिसेंबर १९३१च्या मुख्य आयुक्तांच्या अहवालात नोंद आहे- “त्या वर्षी गव्हाच्या उत्पादनाला मिळालेल्या कमी भावामुळे पंजाबचे शेतकरी हवालदिल झाले होते. प्रांताचे गव्हर्नर यांनी मान्य केलं की – ‘खरीफ पिकाचं देणं बाकी आहे. ग्रामीण लोकसंख्या मानसिकरित्या अस्वस्थ आहे.’ नौजवान भारत सभा आणि किरती किसान पार्टीनं महसुलाच्या मुद्द्यावर शेतकर्यांची एकजूट उभारून संपूर्ण कर्ज माफीची मागणी केली. दिल्लीच्या गावांत कार्यकर्त्यांनी महसूल संग्रह बहिष्कारासाठी अनेक दौरे केले. कास्तकरांना माफीचं आवेदन पत्र देण्याचं आव्हान करण्यात आलं. सोय व्हावी म्हणून छापील निवेदनंदेखील वाटण्यात आली.”
शचिंद्रनाथ सान्याल यांनी क्रांतिकारकांना एकत्र करण्याच्या उद्दिष्टानं ‘हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन’ १९२३ साली सुरू केली. रशियन बोल्शेविक क्रांतीचा प्रभाव व साम्यवादी विचारसरणीचं आकर्षण या संघटनेच्या जाहीरनाम्यात दिसून येतं. पण सान्याल यांचा कल ईश्वरवाद आणि रहस्यवादाकडे होता. इतिहासाचं भौतिकवादी विश्लेषण, वर्ग संघर्षाची अवधारणेत कम्युनिझमशी मतभेदाचे मुद्दे होते. त्यांच्या मते ‘केवळ मध्यमवर्गीय तरुण क्रांती करू शकतो. शेतकरी व कामगार क्रांतिकारी सैन्याचे शिपाई असतील.’
भगतसिंगांनी त्या जाहीरनाम्यात अनेक सुधारणा घडवून ८-९ सप्टेंबर १९२८ दिल्लीच्या फिरोझशाह कोटला मैदानात एका बैठकीच्या माध्यमातून संघटनेचं नाव बदलून ‘हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी’ असं करण्याचं मान्य करून घेतलं.
कारागृहात असताना भगतसिंगांनी २४ जुलै १९३० रोजी सहकारी जयदेव कपूर यांना लिहिलेल्या पत्रात एकूण १२ पुस्तके वाचण्यासाठी पोहोचवण्याची मागणी केली. त्यातील चार पुस्तकं – सोविएट्स अॅट वर्क, फील्ड्स फॅक्ट्रिज अँड वर्कशॉप्स, लँड रिव्होल्युशन इन रशिया, पंजाब पिजेंट्री इन प्रास्पेरिटी एंड डेट - शेतीच्या मुद्द्यांना धरून होती. ‘क्रांतिकारी कार्यक्रमाचा मसुदा’ या आपल्या लेखात भगतसिंग लिहितात- ‘खरं क्रांतिकारी सैन्य तर गावात आणि कारखान्यात आहेत. क्रांती राष्ट्रीय असो की समाजवादी, ज्या शक्तींवर आपण अवलंबून आहोत ते आहेत शेतकरी व कामगार. त्यांच्या समर्थनासाठी प्रचार करणं गरजेचं आहे.’
भगतसिंगांनी त्यांच्या दीड वर्षाच्या बंदिवासात वाचलेल्या अनेक पुस्तकांपैकी काहींचं टिप्पण त्यांच्या सध्या वहीत सापडतं. त्यात १०८ लेखकांच्या ४३ पुस्तकांची उद्धरणं आहेत. जेल नोटबुकमध्येही काही ठिकाणी शेतीवर आधारित टिपणं आहेत. त्यापैकी वहीच्या पान क्रमांक दोनवर त्यांनी जमिनीची मापं लिहिली आहेत- ‘जर्मन २० हेक्टर – ५० एकर म्हणजे १ हेक्टर = २ १\२ एकर’. पान क्रमांक ५९ वर यंत्राचा शेती व मनुष्यश्रमावर होणार्या परिणामाची तुलना करण्यात आली आहे. पान क्रमांक २८६ वर माँटेग्यु रिपोर्टचा दाखला देऊन ते लिहितात, “पूर्ण भारतात ३१ कोटी ५० लाख लोकांपैकी २२ कोटी ६० लाख लोक जमिनीवर अवलंबून आहेत. त्यापैकी २० कोटी ८० लाख लोक सरळ शेतीवर जगतात किंवा आश्रित आहेत.’
भगतसिंगांच्या अखेरच्या ‘संदेश’ नावाच्या लेखात त्यांच्या विचारांची दिशा व स्पष्टता दिसते. काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करत शेतकर्यांबद्दल ते लिहितात, ‘खर्या क्रांतिकारक सैन्याच्या तुकड्या खेड्यापाड्यांमध्ये व कारखान्यात आहेत, शेतकरी व कामगार आहेत. पण या शक्तींना हाताळणं आपल्या भांडवली नेत्यांना नको आहे. तसं धाडस होणं शक्य नाही. निद्रिस्त सिंह एकदा झोपेतून जागा झाला तर त्याला आवरणं शक्य होणार नाही. आपल्या नेत्यांना जे साधायचं आहे, ते साध्य झाल्यानंतरसुद्धा ते थांबणार नाही.... जेव्हा महाकाय शेतकरी वर्ग केवळ एका परक्या राष्ट्राच्या सत्तेचंच नव्हे तर जमीनदार वर्गाचंही जोखड उलथून फेकून द्यायला निघालेला पाहिला, तेव्हा या नेत्यांना जी धडकी भरली, तिचं स्पष्ट प्रतिबिंब १९२२च्या बार्डोली ठरावामध्ये पाहायला मिळतं. याच ठिकाणी आपले नेते शेतकऱ्यांपुढे झुकण्यापेक्षा ब्रिटिशांपुढे शरण जाणं पसंत करतात. पं. जवाहरलाल नेहरू वगळता दुसर्या कुठल्या तरी नेत्याचं तुम्ही नाव घेऊ शकता काय की, ज्यानं शेतकरी व कामगारांना संघटित करण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत? नाही, ते धोका पत्करणार नाहीत. येथे ते कमी पडतात. त्यांना संपूर्ण क्रांती नको आहे असं मी म्हणतो ते यामुळेच.”
असेंबलीत बॉम्ब फेकल्यानंतर ६ जून १९२९ रोजी दिल्लीचे सेशन जज न्या. लिओनिल मिडल्टन यांच्या कोर्टात ‘तुमच्या मते क्रांती म्हणजे काय?’ असे भगतसिंग व बातुकेश्वर दत्त यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘समाजाचं प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कांपासून वंचित ठेवलं जातं आणि शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळ कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसर्यांचे अन्नदाते शेतकरी आज गरजवंत बनले आहेत. जगभराच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करणार्या विणकरांना आपलं व पोराबाळांचं अंग झाकण्याइतकेदेखील कपडे मिळत नाहीत. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वतः मात्र घाणेरड्या झोपड्यात राहून आपली जिवनलीला समाप्त करतात. या विपरीत समाजतील शोषक भांडवलदार छोट्या-मोठ्या कारणांसाठी लाखो लोकांचे नशीब उलटंपालटं करू शकतात. ही भयानक विषमता आणि जबरदस्तीनं लादला गेलेला भेदभाव जगाला एका महाभयंकर प्रलयाकडे खेचून नेत आहे. ही स्थिती अधिक काळ टिकणं शक्य नाही. धनिक समाज एका भयंकर ज्वालामुखीच्या तोंडावर बसून रंगेल चैनबाजी करत आहे आणि या शोषितांची निष्पाप मुलं आणि कोट्यवधी शोषित जनता एका भयानक दरीच्या काठावरून चालली आहे.”
आपल्या राजकीय कार्यक्रमात भगतसिंगांनी स्पष्ट निर्देश दिले की, जमीनदारी व्यवस्थेचं उच्चाटन, शेतकर्यांची कर्जमाफी, क्रांतिकारी राज्याकडून जमिनीचं राष्ट्रीयीकरण याने चांगली व सामूहिक शेती व्यवस्था स्थापित केली जाईल, शेतकर्यांवर लागू कर समाप्त संपुष्टात आणून किमान एकच भूमीकर लागू करणं, कारखान्यांचं राष्ट्रियीकरण, देशाचं औद्योगीकरण, गरजेप्रमाणे कामाचे तास कमी करणं, आवासाची गॅरंटी आदि उद्दिष्ट ठरवलं.
भगतसिंगांचे मित्र राम शरण दास यांच्या ‘स्वप्ननगरी’ या कवितासंग्रहाची प्रस्तावना त्यांच्या आग्रहावरून भगतसिंग यांनी लिहिली. त्यात शेतावर काम करणार्या शेतकरी व नोकरीवर असलेल्या सरकरी कर्मचार्यांची तुलना करताना डाव्या स्वप्नाळू विचारांवर मत व्यक्त करत ते लिहितात, ‘वस्तुस्थिती अशी आहे की, अगदी बोल्शेविकांनाही हे मान्य करावं लागेल की, मानसिक श्रम हे शारीरिक श्रमाइतकेच उत्पादक श्रम आहेत आणि भावी समाजात जेव्हा निरनिराळ्या घटकांची नाती ही समानतेच्या पायावर आधारलेली असतील, तेव्हा उत्पादक आणि वितरक यांना समान गणलं जाईल. एखाद्या खलाशानं आपल्या चरित्रार्थासाठी रोजचे चार श्रम करण्यासाठी दर चोवीस तासांनी जहाज थांबवून किनारा गाठावा, किंवा शेतावरचं काम पूर्ण करण्यासाठी शास्त्रज्ञानं प्रयोगशाळेतील प्रयोगकार्य बंद ठेवावे अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. दोघंही जण चांगले उत्पादक श्रम करत असतात. फरक एवढाच राहील की, समाजवादी समाजात मानसिक श्रम करणार्यांना शारीरिक कष्टाची कामं करणार्यांपेक्षा कोणत्याही प्रकारे श्रेष्ठ मानलं जाणार नाही.”
आपल्या लक्ष्यप्रती स्पष्टता, शास्त्रीय- ऐतिहासिक दृष्टिकोनातून सामाजिक प्रश्नाचं विश्लेषण करण्याची बौद्धिक क्षमता, अफाट चौफेर वाचन, वीरता, धाडस, देशभक्ती आणि त्याग या गुणांनी भरलेला कार्यकर्ता व नेता भगतसिंग भारताच्या वर्तमान परिस्थित आजही योग्य दिशा दाखवत आहे. शेती, सांप्रदायिकता, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, राजकारण व धोरणांच्या बाबतीत यामुळेच तो प्रासंगिक असा दीपस्तंभ आहे. शेतकर्यांची आजची अवस्था आणि त्यांचे लढे पाहता भगतसिंग खूप प्रासंगिक आहे.
.............................................................................................................................................
कल्पना पांडे यांचा ई-मेल - kalpanasfi@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 08 October 2018
कल्पना ताई, लेख चांगला आहे. फक्त लेखातलं एक वाक्य रोचक वाटलं. हेच ते वाक्य : >>शेतकर्यानं उत्पादनात नफा मिळत असेल तर धार्मिक रूढी बाजूला टाकाव्यात, त्याचं हे एक उदाहरण.>> . आता असंय की गुरूंनी शिखांना तंबाखू निषिद्ध ठरवलेली होती ती काहीतरी कारण म्हणूनंच ना? गुरूंचा आदेश धुडकावून लावण्यात कसलं आलंय शौर्य? शाम्बरेक वर्षांनी आज (२०१८ साली) पंजाबात काय परिस्थिती आहे? उडता पंजाब हा पिक्चर पाहिलंय ना तुम्ही? नशापाणी ही पंजाबातली आजची एक भीषण समस्या आहे ना? मोठ्यांच्या सगळ्या गोष्टी सरसकटपणे स्वीकारायच्या नसतात. तारतम्य हवंच. आपला नम्र, -गामा पैलवान