दिनकर मनवरांसारख्या कवीची कविता कुणाला जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी दुखवू शकत नाही!
पडघम - साहित्यिक
नितिन भरत वाघ
  • दिनकर मनवर आणि त्यांचा कवितासंग्रह
  • Mon , 08 October 2018
  • पडघम साहित्यिक दिनकर मनवर Dinkar Manvar पाणी कसं अस्तं दृश्य नसलेल्या दृश्यात

‘पाणी हा शब्द फक्त एकदाच मला उच्चारू द्या

निव्वळ पाण्यासारखा...’

या ओळीनं जी कविता संपते, त्या कवितेवरून वाद निर्माण व्हावा, हे या कवितेचं दुर्दैव आणि भीषण विरोधाभास. कवी दिनकर मनवर यांच्या ‘पाणी कसं अस्तं’ या मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमात लागलेल्या कवितेवर, खरं तर फक्त एका ओळीवर काही लोकांनी आक्षेप घेतलेला आहे. या एका ओळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा मराठी साहित्य व्यवहारातील काही प्रश्नांना उबळ आली आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य, अश्लीलता वगैरे, या सगळ्या मतमतांतरांत मला पडायचं काही कारण नाही. फक्त या कवितेपुरतं किंवा ओळीपुरतं मला सीमित रहायचं आहे. दिनकर मनवर यांच्या कवितेवर मी प्रदीर्घ समीक्षा लेख लिहिला आहे, त्यांची कविता आधुनिकोत्तर आणि वर्तमान जागतिकीकरणाच्या संबंधात किती वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाची आहे, ते दाखवून दिले आहे. तसंच त्यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’चं (ज्या कवितासंग्रहात ‘पाणी कसं अस्तं’ ही कविता आहे) इंग्रजी भाषांतर (Between the lines: the undeciphered script of KhandavVan) केलेलं आहे. या निमित्तानं काही गोष्टींचं मी स्पष्टीकरण देऊ शकतो.

कोणत्याही कवितेचं अर्थनिर्णयन ही समष्टीवरची क्रिया असते, एक स्वत:पुरती तर दुसरी इतरांसाठी. हे अर्थनिर्णयन व्यक्ती कुठे उभी आहे त्या अनुषंगानं होत असतं. जागा बदलली की, अर्थ बदलतो, तेव्हा कवितेच्या एकाच अर्थावर येणं शक्य नसतं. परंतु समानतेच्या काही शक्यता निर्माण होतात आणि मान्य होतात आणि एक सामायिक विभाज्य कलाकृतीच्या संदर्भात प्राप्त होतो. त्यायोगे काहीएक अर्थनिर्णयन सर्वमान्य होतं. ज्या मुद्द्यांचा सामायिक घटक प्राप्त होत नाही आणि मतभेद निर्माण होतात, त्या भेदांवर चर्चा, स्पष्टीकरण करता येऊ शकतं.

‘पाणी’ हा विषय घेऊन दिनकर मनवर यांनी सामाजिक शोषणाच्या इतिहासाचा मोठा पटच त्यांच्या कवितांमधून मांडला आहे. भारतीय उपखंड काही भाग वगळता पाण्यासाठी कधीही दुर्भिक्ष्य नव्हता. बारमाही वाहणारे अनेक नद, नद्या भारतभर पसरलेल्या आहेत. जमिनीत पाणी आहे, असं असताना भारतीय समाजाच्या एका मोठ्या भागाला (अस्पृश्यांना) अनेक शतकं पाणी बहिष्कृत होतं.

पाण्यासारखी जीवनावश्यक गोष्ट, जी निसर्गानंच उपलब्ध करून दिली आहे, ती जेव्हा तहान भागवण्यापुरतीसुद्धा घेऊ दिली जात नाही, तेव्हा ‘पाणी’ हे निव्वळ ‘पाणी’ उरत नाही, तर ते माणसाला अस्पृश्यतेसारखं चिकटतं. पाणी स्वतंत्र अस्तित्व बनतं, ते वर्ग, जात, धर्म सगळं बनतं, पण पाणी काही लोकांसाठी ‘पाणी’ बनत नाही. मग या पाण्याला त्याच्या खऱ्या रूपाला शोधायचं कसं? ओळखायचं कसं? कोणत्या प्रतिमा किंवा दृष्टांतकं वापरली म्हणजे ‘पाणी कसं अस्तं’ ते कळेल? जे ओठांपर्यंत पोहोचूनही ओठांची तहान मिटवत नाही, ते पाणी कसं अस्तं? कोणत्याही संदर्भाशिवाय पाणी केवळ पाणीचं असू शकत नाही का?

माणसाच्या जगण्याचं ‘व्यवहारकारण’ पाण्याला का लागू केलंय? जी केवळ एक नैसर्गिक गोष्ट आहे. ‘पाणी वरचं खालचं झालं केव्हापास्नं, की कुणाच्या हात लावण्यानं ते कसं बाटतं?’ ‘बाटणं’ यासारखा पाण्याचा अपमान आणि अवमूल्यन करणारी कल्पना भारत वगळता जगात दुसरीकडे कुठेही नाही. जे मुळातच निर्मळ असतं, ज्याच्या नुसत्या स्पर्शानं सगळी पापं धुतली जातात, ते पाणी कसं बाटू शकतं? पाणी स्वत:तच इतकं पवित्र असतं की, कोणत्याही मरू शकणाऱ्या जीवमात्रास एका थेंबानंही जीवन देऊ शकतं. जे एक मूलभूत पंचतत्त्वं आहे, ते बाटतं कसं आणि जे बाटतं ते पाणी कसं असू शकतं? दिनकर मनवर यांनी या पाण्याच्या अस्तित्वरूपाचा वेध घेण्याचा प्रयत्न या कवितेत केला आहे. या शोधात पाणी कसं असू शकतं, याच्या प्रतिमा त्यांनी कल्पिल्या आहेत. कारण व्यवस्थेनं पाणी कसं अस्तं हे कवीला कळू दिलेलं नाहीये.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

याच कवितेत ‘अंगठा छाटल्यावर उडालेल्या रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर...’ असा पाण्याचा एक संदर्भ आहे. या एका ओळीत एकलव्याची सगळी वेदना पाण्याच्या रूपात भळाभळा व्हायला लागते. एकलव्याची ज्ञानाप्रती असलेली असोशी, त्याची निष्ठा, प्रामाणिकपणा, त्याची फसवणूक, त्याच्यावरचा अन्याय एका ओळीत प्रकट होतो. एकलव्यात इतका साधेभोळेपणा आहे की, आपल्याला फसवतायत याचीही त्याला जाणीव नाही. आपला शत्रू कोण, मित्र कोण? हे न समजण्याइतका भाबडा एकलव्य होता.

[हे खरंच आहे पण जेव्हा मी तर्कसंगत विचार करतो, तेव्हा एक पर्यायी आणि समांतर कथा आकार घेत जाते. जेव्हा द्रोणाचार्यानं त्याचा अंगठा मागितला तेव्हा एकलव्य एकटाच असेल का, अर्थातच नसेल. कारण तो राजपुत्र होता, त्याच्यासोबत किमान त्याचे मित्र तरी असतील. एखादा कोणी वयानं मोठा असेल. त्यानं समजावलं असेल? अंगठा ‘छाटण्या’पासून रोखलं असेल? एकलव्याला विरोध केला असेल? हा इतिहास अद्यापि उपलब्ध नाही. अंगठा छाटून देण्यापेक्षा मोठी शक्यता तर हीच आहे की, जरी एकलव्य एकटाच असेल तरी तो निकरानं लढला असेल आणि फसवून पकडला गेला असेल (उमाजी नाईक आणि तंट्या भिल ही आधुनिक उदाहरणं बघितली तर तीच शक्यता अधिक रास्त वाटते), जबरदस्तीनं त्याचा अंगठा ‘छाटून’ टाकला असेल. स्वत:चा क्रूरपणा झाकण्यासाठी त्यानं (न शिकलेल्या विद्येची) ‘गुरुदक्षिणा’ म्हणून आपला अंगठा दिला असं लिहून दिलं असेल. त्याचं पुढे काय झालं हे फारसं कळत नाही, पण तो शेवटी पुन्हा एकदाच युद्धात प्रकटतो. तुटलेला अंगठा घेऊन जेव्हा तो घरी गेला असेल, तेव्हा त्याच्या राजा असलेल्या वडिलांना, आईला काय वाटलं असेल? जर असेलच त्याला प्रेयसी किंवा बायको तर त्या बिचारीनं हा आघात कसा सहन केला असेल? एकलव्याच्या वडिलांच्या आक्रमणाच्या भीतीनं त्या परिसरातून द्रोणाचार्य पळून गेला असेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सध्या उपलब्ध नाहीत. हे मला पडलेले प्रश्न.]

आजही वर्तमानात आदिवासी एकलव्याहून वेगळे नाहीत. त्यांचा वापर किती, कसा आणि कोणकोणत्या पातळीवर होतोय याची त्यांना जाणीवच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पारंपरिक समूहांचं शोषण होण्याबद्दल जी भीती व्यक्त केली होती, ती आज प्रत्यक्षात उतरताना दिसतेय. बाबासाहेबांनी जी भीती काळजीपोटी पारंपरिक समूहांबद्दल व्यक्त केली होती, त्या विचारपूर्ण काळजीचा, चिंतनाचा वापर बाबासाहेबांबद्दल आदिवासी समूहात द्वेष पेरण्यासाठी केला जात आहे. त्यासाठी वाक्यांची, संदर्भांची मोडतोड करणं, अर्धवट तोडलेली वाक्य वापरणं, अशी नेहमीची हत्यारं वापरण्यात येत आहेत. दिनकर मनवर आपल्या या कवितेच्या माध्यमातून या समांतर आणि पर्यायी ‘दोन ओळींच्या दरम्यान’ असलेल्या इतिहासाला समोर आणतात. याच कवितेतली ही अत्यंत महत्त्वाची ओळ आक्षेपकर्त्यांच्या नजरेतून ‘नजरचुकीनं’ सुटली असावी. दिनकर मनवर यांना ‘एकलव्याची वेदना’ किती सहवेदना वाटते, ते या एका ओळीतून स्फटिकासारखी स्पष्ट कळते. एकलव्याहून वेगळा ते स्वत:ला समजतच नाही.  

आता ज्या ओळीबद्दल ‘आक्षेप’ घेतला आहे, त्या ओळीबद्दल थोडा विचार करू. त्याआधी ‘आदिवासी’ या शब्दाच्या अर्थाविषयी. इंग्रजीत आदिवासी या शब्दाचे दोन मुख्य अर्थ आहेत - Aboriginal (प्राचीन/काळवाचक) आणि Indigenous (स्थानिक). या दोन अर्थानं ‘आदिवासी’ हा शब्द वापरला जातो. जे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत, ते Aboriginal आणि कोणत्याही दुसऱ्या समूहाच्या वसाहतीकरणाआधीच्या काळापासून एखाद्या प्रदेशात वास्तव्यास आहेत ते Indigenous, थोडक्यात देशी.

भारतात अनुसूचित जमाती (Schedule tribes) या प्रवर्गात सर्व आदिवासींना समाविष्ट करण्यात आलेलं आहे, मात्र त्यांना ‘आदिवासी’ (Aboriginal या अर्थानं) संबोधन नाही, तर ‘प्राचीन पारंपरिक समूह’ (Primitive Ethnic group) असं म्हटलं आहे. शिवाय पारंपरिक समूह कोणाला म्हणावं याविषयी सांगितलं आहे. थोडक्यात ‘दलित’ या शब्दाला जसा प्रशासकीय अर्थ नाही तसाच ‘आदिवासी’ या शब्दालाही नाही, मात्र काही विशिष्ट वर्गाकडे नामनिर्देश व्हावा म्हणून या संज्ञा वापरल्या जातात. ज्या बहुतांशी साहित्यव्यवहारानं प्रसूत केलेल्या आहेत.

अनुसूचित जमातींच्या सूचीमध्ये एकूण ७०५ पारंपरिक समूहांचा समावेश केलेला आहे. यात काही ‘विशेष असुरक्षित पारंपरिक समूहां’चा (Particularly Vulnerable Tribal Group; PVTGs) समावेश आहे. पारंपरिक समूहांच्या सूचीत एखादा समूह समाविष्ट करण्यासाठी काही अलिखित निर्देश मान्य केलेले आहेत. त्यात प्राचीन वैशिष्ट्ये, भौगोलिक विलगता, मुख्य प्रवाहाहून भिन्न संस्कृती, इतर समूहांशी संपर्क करण्यात लाजाळूपणा, आर्थिकदृष्ट्या मागासलेपण इत्यादींचा समावेश होतो. अगदी संक्षेपात आदिवासी (खरं तर पारंपरिक समूह) या शब्दाशी संलग्न भारतीय माहिती दिली आहे. तर आता या कवितेत वापरलेला ‘आदिवासी’ हा शब्द कोणत्या अर्थानं वापरला आहे, तो तपासता येईल.

सर्वप्रथम या कवितेत हा शब्द मानववंशशास्त्रीय दृष्टीकोनातून नाही, तर ‘काळवाचक’ अर्थानं आलेला आहे, म्हणजे प्राचीन Aboriginal. या वादप्रकरणात ज्या वांशिक, जातीय, वर्ग किंवा समूहवाचक अर्थानं हा शब्द घेतला आहे, तसा तो मुळातच नाही. मानवी सभ्यतेच्या उत्क्रांतीच्या मूळस्वरूपाच्या जवळ असणारे, अनाघ्रात, अस्पर्श, कोणताही संसर्ग, नितळतेत दोष नसणारे आदिम या अर्थानं ‘ती’ ओळ आलेली आहे. संपूर्ण कवितेचा आशय लक्षात घेतला तर कोणत्याही वाचकाच्या सहज लक्षात येतं, तेव्हा अभ्यासकांना कळायला हरकत नाही. इथं कुणाच्या अस्मितांना किंवा भावनेला धक्का पोहोचवण्याचा हेतू असण्याचा काहीच संबंध येत नाही. हेतूचा प्रश्न कधी उद्भवला असता, जेव्हा खरोखरच वर म्हटल्याप्रमाणे भारतातील ७०५ पैकी कोणत्याही एका पारंपरिक समूहाच्या विशेष ओळखीचा (विशेष नामाचा) उल्लेख असता उदा., वारली, भिल, मुंडा, संथाल, कोरकू, कोकणी इत्यादी.

दिनकर मनवर यांच्या कवितेतील ओळीत ‘आदिवासी’ हा शब्द ‘पारंपरिक समूहवाचक’ या अर्थानं आलेला नसून ‘काळवाचक’ आहे हे स्पष्ट झालं आहेच. आता या कवितेत जी ओळ आहे, तिचा नेमका संदर्भ काय आहे ते पाहू. त्याआधी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. आदिवासींचे पारंपरिक समूह  केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर सगळ्या जगभर आहेत आणि त्या त्या ठिकाणच्या त्याबद्दलच्या व्याख्या व कल्पना स्पष्ट आहेत.

प्रशांत महासागरातील ताहिती (Tahiti) या फ्रेंच पॉलिनेशीयन, बेटांवर सुप्रसिद्ध पोस्ट-इंप्रेशनिष्ट चित्रकार पॉल गोगँ (Paul Gauguin; १८४८-१९०३) काही वर्षं जाऊन राहिला होता (१८९१-९३). त्याला मानवी अस्तित्वासंबंधी काही मूलभूत प्रश्नांचा विचार करायचा होता. उदा., ‘आपण कुठून आलो? आपण कोण आहोत? आपण कुठे चाललो?’ हे त्याचं एक विख्यात चित्रं. आधुनिक जगाशी अस्पर्श म्हणून अधिक निसर्गाच्या जवळ असणाऱ्या समाजाची त्यानं निवड केली. तिथं त्यानं ताहितीयन पारंपरिक समूहांच्या समाजजीवनाची अनेक चित्रं काढली, जी खूप प्रसिद्ध आहेत. त्या चित्रांचा संदर्भ मनवर यांच्या या ओळीला आहे (विशेषतः ‘दोन ताहितीयन स्त्रिया’ हे पेंटिंग, १८९९).

दिनकर मनवर हे केवळ कवीच नाहीत तर नावाजलेले चित्रकारही आहेत, ही माहिती अभ्यासक्रमातील कवीची ओळख या सदरात दिली असेलच. मनवर यांचा चित्रकलेचा अभ्यास आहे, चित्रकलेच्या सगळ्या महत्त्वाच्या चळवळींची, शैलींची त्यांना माहिती आहे. ते संदर्भ त्यांच्या कवितेत येणं अत्यंत साहजिकच आहे. व्यक्तीनं पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या अनेक गोष्टी नेणीवेत संचयीत होत असतात आणि कोणतीही कलाकृती स्वतंत्रपणे अवतरत नाही, तर अनेक इतर कलांचा समुच्चयांच्या संदर्भांसहित ती निर्माण होते. साधारणपणे ज्यांना कवितानिर्मितीची प्रक्रिया माहीत असते, त्यांना कळते कवितेत संदर्भ कसे अवतरतात!

आधी म्हटल्याप्रमाणे अनेक प्रतिमा, संदर्भ विचारात अमूर्त स्वरूपात रुतून बसलेले असतात आणि अचानक कधीतरी ते शब्दरूप किंवा चित्ररूप धारण करतात. कलाकृतीमधील बाह्यकलाकृतीच्या संदर्भांना आंतरसंहितात्मता (Inter-textuality) म्हणतात. साहित्यातील आंतरसंहितात्मता बऱ्याचदा अकॅडेमिक वादाचा मुद्दा असतात, म्हणजे साहित्यात आंतरसंहितात्मता असावी की नसावी. कारण आंतरसंहितेतले सगळेच संदर्भ वाचकास ज्ञात असतीलच असं नाही. आंतरसंहितात्मतेमुळे साहित्यकृतीचं आकलन, विश्लेषण संदर्भ न समजल्यानं बऱ्याचदा दुर्बोध आणि कठीण बनतं. कवितेच्याबाबतीत तर शब्दरूपात कोणत्या संदर्भात काय अवतरेल हे कोणीच सांगू शकत नाही. कारण कवितानिर्मितीच्या Tour de force मध्ये जे काही अवतरतं, त्यावर कवीचा कोणताही बांध रहात नाही, तो फक्त लिहितो.

दिनकर मनवर यांच्यासारखा चिंतनशील, गंभीर विचारी कवी जे काही लिहितो, तो त्याच्या विचारप्रक्रियेचा आणि चिंतनाचा भाग असतो. मनवरांसारख्या कवीची कविता ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदान’ मागण्याच्या वाटेवरची आहे. ती कविता कुणाला जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी दुखवू शकत नाही. जर त्यांच्या सगळ्या नाही, पण किमान काही कविता (अभ्यासक्रमाव्यतिरिक्त) वाचण्याची तसदी घेतली तर मला काय म्हणायचं आहे ते समजेल.

अश्लीलतेसंबंधात तळटीप : केवळ एका रंगाचा संबंध आणि संदर्भ ‘अश्लील’ वाटत असेल तर आपल्याला समाज म्हणून परिपक्व होण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे एवढंच म्हणता येईल.

अश्लीलतेसंबंधात (तळ) तळटीप : अश्लीलता कशाला म्हणायचं, हे जर समजून घ्यायचं असेल तर कै. भास्कर कुलकर्णी यांच्या ते वारली लोकांमध्ये जाऊन राहिले होते, त्या काळातल्या डायऱ्या वाचाव्यात.

.............................................................................................................................................

लेखक नितिन भरत वाघ कादंबरीकार व समीक्षक आहेत.

nitinbharatwagh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......