असली श्रीकृष्ण विरुद्ध नकली श्रीकृष्ण
कला-संस्कृती - कृष्णकथांजली
श्रीकृष्ण तनया
  • पौंड्रक वासुदेवाचं रामानंद सागर यांच्या ‘महाभारत’ मालिकेतील पात्रं
  • Sat , 06 October 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti कृष्णकथांजली KrushnaKathanjli पौंड्रक वासुदेव Paundrak Vasudeo श्रीकृष्ण Krishna

पुराणकाळात पौंड्रक नामक बलाढ्य राजा होऊन गेला. तो स्वतःला ‘पौंड्रक वासुदेव’ असं म्हणवून घेत असे. तो श्रीकृष्णाचा नित्य द्वेष करून इतर राजांना त्याच्याविरुद्ध चिथवत असे. श्रीकृष्णाची नेमानं शिव्या-शापांची लाखोली वाहून पूजा बांधत असे. काही लोक पौंड्रकाला मूर्ख समजत, तर काही त्याला प्रोत्साहन देऊन हरभर्‍याच्या झाडावर चढवत. चोराच्या उलट्या बोंबा, त्याप्रमाणे कृष्णाविषयी नाही त्या कंड्या पिकवून लोकांत स्वतःविषयी बढाया मारत असे. तो कृष्णाप्रमाणेच वेषभूषा करून मुगुटांत मोरपीस खोवत असे. दोन जास्तीचे नकली हात लावी व चारी हातांत शंख-चक्र-गदा व पद्म धारण करून सिंहासनावर बसत असे.

पौंड्रक प्रजेला म्हणे, ‘‘लोक हो, तो कालचा गवळ्याचा पोर धूर्त कोल्ह्यासारखा आहे. त्यानं माझं सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, नंदक तरवार व शारंग धनुष्य चोरलं. एवढंच नव्हे तर माझ्या पंचजन्य शंखावरही त्यानं डल्ला मारला आहे. माझं नावसुद्धा चोरलं ना! चोरलेल्या वस्तू घेऊन वासुदेव या नावानं तो उजळ माथ्यानं तो वावरतो आहे. बाळपणी तो दूध-दही-लोणी चोरून खात असे. मोठेपणी ही चोरायची सवय गेली म्हणता? छे; उलट माझा परम स्नेही नरकासुराला कपटानं ठार मारून त्यानं त्याच्या सोळा सहस्त्रावर वाग्दत्त वधू चोरून नेल्या. स्त्रीलंपट म्हणून त्याची ख्याती आहे, ती उगीच नव्हे. त्याला कधीतरी शासन करावंच लागेल. त्या कामी मला तुमचं सहाय्य हवं.’’ असं त्याचं वल्गनाप्रचुर भाषण ऐकून सुज्ञ राजांनी त्याला नावं ठेवली, तर मुर्खांनी त्याची तळी उचलून धरली.

एकदा नारदमुनी पृथ्वीतलावर भ्रमण करत असताना पौंड्रकाच्या राज्यात आले. राजानं त्यांचं यथोचित स्वागत व पूजा करून कृष्णनिंदेची तबकडी लावली. त्यानं मुनींना म्हटलं, ‘‘महर्षी, काहीही म्हणा, हा श्रीकृष्ण बिलंदर आहे. ना कशाची भीड ना चाड. मी तर त्याचा धिकारच करतो. आपण त्याचं गुणगान गात काय फिरता? आता तुम्ही त्रिभुवनांत मजविषयी यशाची द्वाही फिरवा. म्हणा, खरा वासुदेव पौंड्रकच आहे. बलवानांत श्रेष्ठ, दातृत्वांत अग्रेसर, कर्तृत्वांत सरस, असा पौंड्रकच आहे, असं तुम्ही सर्वांना म्हणजे इंद्रलोकी, ब्रह्मपुरी, नागलोकी व अन्य दिव्य सभांमध्ये सांगा. त्यांनाही कळू दे की, पौंड्रक ही काय चीज आहे ते! खरं सांगतो मुनीवर्य, माझं नाव, गाव, शील व शस्त्रं चोरणार्‍या त्या अंतर्बाह्य काळ्याला मी युद्धांत जिंकेन तेव्हाच मला शांती मिळेल.’’

ही सर्व मुक्ताफळं ऐकून देवर्षींना हसावं की रडावं हे कळेना. मुनी स्पष्ट वक्ते होते. सूज्ञ तसंच चुकणार्‍याला सन्मार्गावर आणणारे होते. ते चिपळ्या वाजवत म्हणाले, ‘‘नारायण, नारायण, पौंड्रका, मी जरी त्रिभुवनांत फिरत असलो तरी विष्णूची निंदा करायला मी असमर्थ आहे. माझी तशी इच्छाही नाही. पृथ्वी, स्वर्ग व पाताळ या तिनही लोकांचं रक्षण व पालन करणार्‍या जगन्नाथाला दूषणं देऊन पापाचा धनी होऊ मी इच्छित नाही. तुझा अंतःकाळ समीप आल्याची ही चिन्हं दिसत आहेत. त्याशिवाय तू विष्णूला नावं ठेवत नाहीस. तो विष्णूच तुझं गर्वहरण करेल. येऊ मी? नारायण, नारायण...!’’

नारदांचं वचन अर्थातच पौंड्रकाला रुचलं नाही. त्यानं त्यांना त्वरीत राज्यातून बाहेर जाण्यास सांगितलं. मुनींनी खांदे उडवले आणि हरी गुणगान करत, चिपळ्या वाजवत ते निघून गेले. पौंड्रकची त्यांना कीव आली. ते बदरीकाश्रमांत कृष्णाला भेटायला आले. त्यांनी पौंड्रकाचा सर्व वृत्तान्त कथन केला. कृष्णानं लौकरच पौंड्रकाच्या घमेंडीचा भेद करण्याचं ठरवलं. कृष्णानं पौंड्रकाला युद्धासाठी आव्हान दिलं. पौंड्रकाला तेच हवं होतं. त्या दुर्बल, नाटकी व गर्विष्ठ कृष्णाला शासन करण्याची संधी तो थोडाच दवडणार होता? कृष्ण द्वारकेत असून त्याला तिथंच अवेळी कोंडीत पकडावं असा कुटील विचार करून तो चतुरंग सेनेचा सागर घेऊन महासागरातील सुवर्णनगरीजवळ आला. तो मध्यरात्रीचा सुमार होता. सारी नगरी निर्धास्तपणे अंधाराचं तलम वस्त्र पांघरून निद्रिस्त झाली होती. त्या अंधारातही नगरीला जडवलेल्या नानाविध रत्नांचं तेज लाटांच्या मंद हेलकाव्यासरशी पाण्यात मिसळत होतं. पौंड्रकाला आव्हान दिलं असलं तरी सुवर्णनगरीचं वैभवशाली लेणं श्रीकृष्ण त्यावेळी बदरीक्षेत्रात तपस्येत मग्न होतं.

पौंड्रक महाराज चतुर्भुज होऊनच रथारूढ झाले होते. रथालाही चार अश्व होते आणि त्यांची नावंही कृष्णाच्या रथाच्या अश्वांचीच होती. म्हणजे सुग्रीव, सैनिक, शैब्य. कृष्णासारखा पितांबर व मोरपीस खोचलेला मुगुट धारण करूनच पौंड्रक ध्यान युद्धासाठी आलं होतं. त्याचा लोहमय रथ तोमर, धनुष्य-बाण, गदा, तरवार, भाले, मुद्गल यांनी खचाखच भरला होता. या शस्त्रास्त्रांपेक्षाही कृष्णाला मारण्याची तीव्र इच्छा पौंड्रकजवळ होती. शिवाय कृष्णद्वेष्टे राजेही आपल्या चतुरंग सेनेसह पौंड्रकला सामील झाले होते. कृष्णाला ठार मारण्याचं श्रेय प्रत्येकालाच हवं असल्यानं सर्व हिरिरीनं युद्धासाठी उत्सुक झाले होते.

पौंड्रकानं आपल्या स्नेही राजांना सांगितलं की, “माझ्या नावानं दुंदुंभी वाजवून त्या भित्र्याला कर देण्यास भाग पाडा. पौंड्रक वासुदेवाचा जयजयकार करून वार्ष्णेय वासुदेवाची निंदा नालस्ती करा.’’ ते ऐकून पौंड्रकाची मर्जी सांभाळण्यास लगेच काही सैनिक प्रवेशद्वाराजवळ जाऊन संदेश देण्याऐवजी लढूच लागले. द्वारकावासियांना जागं होण्याची त्यांनी संधीच दिली नाही. तथापि यादववीर सावधच होते. निषधपती एकलव्य पौंड्रकाच्या पक्षातून लढत होता. युद्धाची ठिणगी पडली.

सारण, हार्दिक्य, उद्धव, अक्रूर कवच घालून शस्त्रसज्ज झाले, पण एकलव्यानं सर्वांना बाणांनी विद्ध केलं. एकलव्यानं बलराम आणि सात्यकीला आव्हान दिलं. कृष्णाच्या गैरहजेरीत द्वारकेचं रक्षण करणं या सर्वांचंच कर्तव्य होतं. बलराम-सात्यकी शस्त्रास्त्रांसह रथारूढ झाले. एकाएकी नगरीतील सर्व दिप व मशाली विझल्या हा शरण येण्याचा संकेत आहे असं पौंड्रक पक्षाला वाटलं. त्यानं कृष्णाच्या राज्यांचे प्रासाद खणून त्यांना दासींसह कैद करण्याची आज्ञा केली. पहारी-कुदळीचे घाव तटबंदीवर बसू लागले. बलरामानं त्वेषानं शत्रुची पहिली फळी नेस्तनाबूत केली. एकलव्यानं जायबंदी केलेले वीर बलरामाच्या दर्शनानं हिरिरीनं शत्रूचा सामना करू लागले. बलरामानं एकदम मुसंडी मारली ती पौंड्रकासमोरच. त्याला पाहून कुत्सितपणे हसत पौंड्रक म्हणाला, ‘‘जा. त्या पळपुट्या कुष्णाला इकडे घेऊन ये. नथीतून तीर मारू नकोस म्हणावं. त्या स्त्रीलंपटाला व बायकांसमोर फुशारकी मारणार्‍या तुझ्या बंधूला मजसमोर आण. पौंड्रक काय चीज आहे ते बघ. बायकांच्या प्रासादात लपला असेल तो. खरा पुरुष असेल तर मैदानात ये.’’

पौंड्रकाच्या वल्गनांना झणझणीत उत्तर देऊन सात्यकीनं बाणांचा अविरत वर्षाव करून पौंड्रकचा सारथी व अश्व मारून रथही मोडीत काढला. सर्वांगात बाण घुसल्यामुळे पौंड्रक साळींदर प्राण्याप्रमाणे दिसू लागला. रथहीन झाल्यामुळे तो सात्यकीशी द्वंद्व युद्ध करू लागला. बलराम व एकलव्याचं शरसंधानही रंगत आणू लागलं. एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा नव्हता म्हणून युद्ध काय कमी तोलामोलाचं होतं म्हणता? मुळीच नाही. पण शेवटी बिचार्‍याचं बळ थोडं कमी पडलं व त्यानं माघार घेतली.

द्वारकेमध्ये युद्धाची धुमचक्री चालू असताना बदरीकाश्रमामध्ये कृष्णाला स्वस्थ बसवेना. त्यानं द्वारकेला जाण्याची इच्छा प्रगट करताच गरुड पुढे उभा ठाकला. पुष्पक विमानातून श्रीकृष्ण इच्छित स्थळी आला. द्वारका दृष्टीपथांत येताच त्यानं पंचजन्य उस्फूर्तपणे फुंकला. त्या दणदणीत ध्वनीमुळे दशदिशा कंपित झाल्या. वृष्णीवीर आनंदित झाले. कृष्णाच्या आगमनानेच त्यांच्यात अनोखं चैतन्य निर्माण झालं. कृष्णाला द्वारकेत सोडून गरुड इच्छित स्थळी गेला. कृष्ण रथावर आरूढ होताच सारथी दारुक रणांगणांत आला. श्रीकृष्णाला पाहताच शिकार्‍यानं भक्ष्याकडे झेप घ्यावी तद्वत पौंड्रक सात्यकीला सोडून कृष्णाच्या रोखानं धावला. वाटेत अक्रूरानं त्याच्यावर गदेचा प्रहार केला. तिकडे दुर्लक्ष करून पौंड्रक कृष्णाला म्हणाला, ‘‘बरा सापडलास, अरे कुलकलंका, मीच तो पौंड्रक वासुदेव बरं का. आता लौकरच तुला यमाचं घर दाखवतो. माझ्या चक्रानं तुझे राई राई एवढे तुकडे करून पशुपक्ष्यांना खाऊ घालतो. गदेनं तुझा चेंदामेंदा करून टाकतो. शारंगधनुनं तुझं काळं शरीर शतशः विदीर्ण करतो. हा शंख पाहिलास? याच्यापुढे तुझा तो तकलादू निष्प्रभ शंख तुच्छ आहे. माझ्याशी युद्ध तरी कर वा शरणागती पत्कर. मी तुला जीवदान देईन. तुझ्या स्त्रिया विधवा होऊ नयेत म्हणूनच केवळ मी तुजवर दया दाखवीन.’’

हे विखारी वाग्बाण पौंड्रक कृष्णाला मारत होता, पण त्यामुळे सात्यकी विद्ध होत होता. क्षणोक्षणी त्याच्या रागाचा पारा चढत होता. पौंड्रकाला मारण्यासाठी त्याचा शस्त्रसज्ज हात केव्हापासून शिवशिवत होता. तेव्हा कृष्णच त्याला हसून म्हणाला, ‘‘अरे सात्यकी, बोलू दे त्याला पाहिजे तितकं. होऊ दे त्याच्या मनासारखं. मनातील मळमळ रीती करू दे त्याला. मला बोलतो म्हणून तू क्लेश करून घेऊ नकोस.’’ एवढं बोलून कृष्ण पौंड्रकाकडे वळून म्हणाला, ‘‘हे पौंड्रका, मी घातकी व पातकी आहे, असे खुशाल म्हण. धेनूकासुराचा वध केला म्हणून गोहत्यारी व पुतनेचा वध केला म्हणून स्त्रीहत्यारी म्हण. तुला भाषणस्वातंत्र्य आहे. तुझे शंख-चक्र-गदा-धनुष्य व तलवार सर्वश्रेष्ठ व प्रभावी समज. चक्रधर, सारंगपाणी, गदाधर, पद्मपाणि इ. माझी नावं तुला व्यर्थ वाटू देत. पण एवढं लक्षात ठेव की, नसलेले गुण किंवा नावं अंगावर चिकटवून घेता येत नाहीत. त्याला तसंच सामर्थ्य व योग्यता लागते. माझ्या किरीटांत अनमोल रत्नांबरोबर नितांत सुंदर पक्ष्याचं पीस वागवणारी मी एकमेव व्यक्ती आहे. माझं नाव, वेष व अलंकार धारण करून नटलास. जास्तीचे दोन हात लावून सर्वत्र मिरवलास, पण त्या हातांत जीव नाही हे विसरलास. माझीच शस्त्रं गर्वानं बाळगलीस तरीही हे सर्वच देखावा स्वरूप आहे. चल. युद्धाला तयार हो. मला पराभूत करू नकोस, तर ठारच मारून दाखव.’’

श्रीकृष्णानं सर्वांसमक्ष दोष व दुर्गण पदरांत टाकल्यानं पौंड्रक शरमेनं काळाठिक्कर पडला. अपमानीत झाला. त्यानं उसनं अवसान गोळा केलं. सर्व शस्त्रं हाताशी आहेत याची खात्री केली. आपल्या पक्षातील सैनिकांना सावध केलं.

वार्ष्णेय व पौंड्रक या दोन वासुदेवांचं युद्ध सुरू झालं. पौंड्रकाचं नकली दोन हात हातघाईवर आले. कृष्णानं त्याचे सारथी व अश्व गारद केले. पौंड्रकानं त्वेषानं आपली ‘कौमोदकी’ गदा कृष्णावर फेकून मारली, पण नेम चुकून त्याच्या पक्षातील सैनिकाला ती लागून तो मृत झाला. त्याची सर्व ‘दैवी’ शस्त्रं कृष्णानं मोडीत काढली. अखेर पौंड्रकानं आपलं तीक्ष्ण धारांचं तथाकथित ‘सुदर्शन चक्र’ शंभर वेळा बोटावर फिरवून कृष्णावर फेकलं.

प्रत्युत्तर म्हणून कृष्णानं विराट रूप धारण करून आपलं सुदर्शन चक्र उजव्या हाताच्या तर्जनीवर पेललं व एकदाच फिरवून पौंड्रकाच्या दिशेनं फेकलं. हे चक्र विश्वकर्म्यानं सूर्यनारायणाला यंत्रावर तासून खाली पडलेल्या चुर्‍यापासून घडवलं होतं. अग्नीनारायणानं ते खांडवदाह प्रसंगी कृष्णाला दिलं होतं. कृष्णामुळे ते चक्र सु-दर्शन झालं, म्हणजे नेत्रांना व मनाला आनंद देणारं झालं. ते धारण केल्यामुळे वीजेप्रमाणे असलेल्या तेजामुळे अवघ्यांचं नेत्र दिपले व काहींना अंधत्व आलं.

पौंड्रकाला स्वतःच्या बचावाची संधी मिळाली नाही. रोंरावत आलेल्या चक्रानं आपलं काम चोख बजावलं. पौंड्रकाचे अहंकारी मस्तक आकाशाच्या पोकळीत फेकलं गेलं. रक्ताने लडबडलेलं सुदर्शन परतून कृष्णाच्या तर्जनीवर स्थिर होताच ते पूर्ववत निर्मळ झालं. पौंड्रकाच्या सैन्यात पळापळ झाली, पण कृष्णानं तिकडे दुर्लक्ष केलं. कारण त्याचं मुख्य लक्ष्य होतं पौंड्रक वासुदेव!

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ADITYA KORDE

Thu , 11 October 2018

हायला हे नक्की काय आहे? रूपक म्हणून वापरले असेल तर अंधुक संदर्भ तरी द्यायचे ....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......