अजूनकाही
‘अंधाधुन’ कसा आहे? तर तो त्याच्या नावासारखा! ज्यातील लयबद्ध स्वरूपात चित्रपटातील मध्यवर्ती पात्र, त्याच्या कामाचा संक्षिप्त परिचय आणि ‘अंदाधुंद’ या संज्ञेचा चित्रपटाशी असलेला संबंध दडलेला आहे. ‘अंधाधुन’ आणि त्यातील पात्रं अनिश्चित, स्वैर, बेपर्वाही आहेत. कुणाचीही तमा न बाळगणारी. महत्त्वाचं म्हणजे ही बेफिकिरी, अनियंत्रित प्रवृत्ती पात्रांची असली तरी चित्रपटाची नाही. कारण आपल्या क्राइम-थ्रिलर, निओ-न्वार चित्रपटांसाठी ओळखला जाणारा श्रीराम राघवन या अनिश्चिततेला इतक्या कुशलतेनं रचलेल्या नियंत्रित वातावरणात (किंबहुना विश्वात) वाढवतो की, त्याच्या मांडणीचं, त्याच्या दिग्दर्शकीय कसबाचं कौतुक करणं शब्दातीत होऊन बसतं. आणि आपल्याला एक ‘इन्स्टंट क्लासिक’ म्हणावासा चित्रपट पाहायला मिळतो.
आकाश (आयुष्मान खुराणा) हा एक अंध पियानोवादक असतो. अपघातानेच त्याची ओळख सोफीशी (राधिका आपटे) होऊन, तो तिचे वडील फ्रँकोच्या कॅफेमध्ये पियानिस्ट म्हणून काम सुरू करतो. ‘अंधाधुन’मधील ‘अंधा’ आकाश आहे, तर त्याच्या ब्लॅक अँड व्हाईट विश्वातील प्रेमाची ‘धुन’ सोफी आहे. प्रमोद सिन्हा (अनिल धवन) हा सत्तरच्या दशकातील बऱ्यापैकी नावाजलेला अभिनेता असतो. मात्र तो सध्या केवळ आपल्या व्यवसायाकडे लक्ष देत, आपल्या आधीच्या सोनेरी दिवसांच्या आठवणीत रममाण असतो. आपल्या गाण्यांच्या यू-ट्यूब व्हिडिओवरील प्रशंसेच्या कमेंट्स वाचून प्रसन्न होत असतो. सिमी (तब्बू) ही त्याची पत्नी. प्रमोद या कमेंट्स आणि आपले जुने चित्रपट सिमीला वारंवार दाखवतो. मात्र तिला त्यात विशेष रस आहे असं दिसत नाही. तो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. ती? तिच्याबाबत जरा शंकाच आहे.
प्रमोद हा ‘फ्रँकोज’मधील नेहमीचा ग्राहक. रेट्रो स्टाइल गाण्यांमध्ये रमणाऱ्या प्रमोदला पियानोवर अलवारपणे फिरणारी आकाशची बोटं आणि त्या पियानोमधून निर्माण होणाऱ्या ट्यून्स आकर्षित करतात. परिणामी या आणि इतरही अनेक पात्रांचे रस्ते एकत्र येतात. त्यांच्या या एकत्र येण्यातून ‘अंधाधुन’चं विश्व उभं राहतं. थोडक्यात, ‘योगायोग आणि परिणाम’ या दोन संकल्पनांवर तो उभा राहतो. त्यांना मोठं करतो, कल्पनांचे पंख फुटू देतो. आणि दिग्दर्शकानं नियंत्रितपणे तयार केलेल्या गोंधळाचं सार्थ दर्शन घडवतो.
‘अंधाधुन’मध्ये उणिवा तशा फारशा नाहीत. कारण लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, पार्श्वसंगीत ते प्रॉडक्शन डिझाईनपर्यंत सगळ्याच गोष्टी अपेक्षेहूनही अधिक परिणामकारक आहेत. चित्रपटाचा पूर्वार्ध आजवरच्या सर्वोत्कृष्ट पूर्वार्धांपैकी एक आहे, तर उत्तरार्ध समोर मांडलेल्या घटनांची गुंफण करत, समस्यांचं तितक्याच कौशल्यानं निराकरण करतो. परिणामी प्रश्नांची उत्तरं काय आहेत याहून अधिक महत्त्व ते प्रश्न कशा रीतीनं उभे केले आहेत याला मिळतं.
आयुष्मान आकाशचं पात्र उभं करत (पुन्हा एकदा अगदीच सहजतेनं) त्याला क्लासी, मिडास टच देतो. तब्बू कातिल आहे. मुळात ‘अंधाधुन’मधील बहुतांशी मध्यवर्ती पात्रं तशी ‘लाईकेबल’ नाहीतच. ती काहीशी ‘क्वेंटिन टॅरंटिनो’च्या चित्रपटातील पात्रांसारखी आहेत. ती रूढ अर्थानं प्रेम करावीत अशी नाहीत. त्यामुळे त्यांना तिरस्करणीय न बनू देणं ही संबंधित पात्रं साकारणारे कलाकार आणि दिग्दर्शक राघवनची किमया आहे. ज्यात राधिका आपटे, मानव वीज, झाकिर हुसैन, छाया कदम, अश्विनी काळसेकर हे लोकही तितकीच सुंदर साथ देतात.
पहिल्यांदा प्रमोदच्या घरात गेल्यापासूनच चित्रपटाच्या थक्क करणाऱ्या प्रॉडक्शन डिझाईनची कल्पना येते. जी नंतर येत जाणाऱ्या प्रत्येक दृश्यानंतर अधिकच परिणामकारक, समाधानकारक अनुभव देत जाते. के. यू. मोहननचा (आणि अतिरिक्त सिनेमॅटोग्राफर म्हणून क्रेडिट दिलेल्या राजीव रवीचाही) कॅमेरा राघवनच्या सिनेमॅटिक ऑर्केस्ट्रामध्ये आकाशच्या पियानोवर अलवारपणे फिरणाऱ्या बोटांइतक्याच अस्खलितरीत्या सफाईदारपणे फिरतो. तो आपल्याला दिग्दर्शकाच्या नजरेतून योग्य त्या वेळी गरजेचं असलेलं सर्व काही दाखवतो आणि लपवायचं आहे ते लपवतोही. हा कॅमेरा म्हणजे राघवनचा (त्याच्या अभिनेत्यांइतकाच महत्त्वाचा असलेला) हुकमाचा एक्का आहे. शिवाय ‘अंधाधुन’ व्हिज्युअली अनेक हिंदी-इंग्रजी (आणि इतरही भाषिक) चित्रपटांना नॉड देणाराही आहेच.
एका दृश्यात पार्किंग लॉटमधून बाहेर पडणाऱ्या गाडीकडे वरच्या मजल्यावरून पाहत तब्बूवर स्थिरावणारा आणि नंतर ती फ्रेममधून बाहेर पडल्यावरही एक-दोन मिनिटं तसाच राहतो. समोर पसरलेल्या काँक्रीटच्या जंगलाकडे बोट दाखवतो. तो वेळोवेळी प्रेक्षकाला अशाच प्रकारे श्वास घेण्याच्या जागा निर्माण करतो. सोबतच चित्रपटाच्या वैचारिक बाजूलाही भक्कम करतोच.
आणि आता अमित त्रिवेदी आणि ‘अंधाधुन’चा बॅकग्राउंड स्कोअर. हा स्कोअर नको तितका परफेक्ट आहे. तो एडगर राईटच्या सिनेमासारखा आहे. समोरील दृश्यांना मोठ्या गर्वानं साथ देणारा, त्यांच्या परिणामात भर घालून ‘दृकश्राव्य’ या शब्दाला न्याय देणारा. ‘अंधाधुन’च्या स्कोअरचं समीकरण म्हणजे त्यात ‘बीथोव्हन’ वाजत असतो आणि थांबतो तेव्हा ‘अमित त्रिवेदी’ सुरू होतो. दोघांचंही अस्तित्त्व खटकत नाही, ते एकमेकांना सप्रेम करायचा प्रयत्नही करत नाहीत. मोहननचा कॅमेरा राघवनला जितकी साथ देतो, तितक्याच म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं बीथोव्हन आणि त्रिवेदी आपापली कामं करतात. ‘अंधाधुन’मधील ‘धुन’ कानेंद्रियांना सुखावणारी आहे.
हा चित्रपट राघवनचा ‘सिनेमॅटिक ऑर्केस्ट्रा’ आहे. ‘क्वेंटिन टॅरंटिनो’ या दिग्दर्शकाला त्याच्या ‘दिग्दर्शन म्हणजे नक्की काय?’ या प्रश्नाच्या निमित्तानं ‘कान्स’ फिल्म फेस्टिव्हल दरम्यान ‘टेरी गिलियम’ या नव्वदच्या दशकात प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शकानं चित्रपट दिग्दर्शनाविषयी एक सल्ला दिला होता. तो म्हणजे, “दिग्दर्शक म्हणून तुझं काम काही फार अवघड नाही. तुला फक्त योग्य ती लोकं एकत्र आणून, त्यांच्याकडून हवं ते काम करवून घ्यायचं आहे. तुझी व्हिजन तुला त्यांना सांगत त्यांच्याकडून ती फ्रेम पडद्यावर आणायची आहे.” हीच बाब ऑर्केस्ट्रालाही लागू पडते. बाकी सगळे लोक आपापली इंस्ट्रुमेंट्स वाजवतात. मात्र कंडक्टर त्यांच्याकडून तेवढं काम करवून घेण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो. राघवन हा त्याच्या या सिनेमॅटिक ऑर्केस्ट्राचा कंडक्टर आहे. आणि तो त्याच्या कामात निपुण आहे, हे सांगणे न लगे!
राघवनचं हे सिनेमॅटिक विश्व गडद आहे. त्यातील विनोदाला कधी कारुण्याची, तर कधी उपहासाची झालर आहे. या विश्वातील पात्रं बऱ्याचदा नैतिक दुविधेला सामोरी जातात. त्यातून ती काही ना काही निर्णय घेतात, तर कधी निर्णय घेण्याच्या जबाबदारीपासून पळ काढतात. त्यांची ही दुविधा आणि तिचे परम्युटेशन-कॉम्बिनेशन प्रकारातील परिणाम त्यांना आणि अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींना अधिक क्लिष्ट बनवतात. हा क्लिष्टपणा त्यांना एक माणूस म्हणून जितका सदोष बनवतो, तितकाच त्यांना एक पात्र म्हणून दोषमुक्त बनवतो.
विरोधाभासी वाटणारं हे वाक्य ‘अंधाधुन’च्या तितक्याच विरोधाभासी विश्वाचं समर्पक विवेचन आहे. ‘अंधाधुन’ म्हणजे ब्लॅक कॉमेडीची ‘ला ला लँड’ आहे. ती गडद आहे, काव्यात्मक आहे आणि विनोदीही आहे.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment