अजूनकाही
‘Be the flame, not the moth,’ असं कॅसानोव्हा म्हणून गेलाय खरं. पण आपल्या मनाला नेहमीच दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाचं आकर्षण असतं. नाहीतर प्रेमात जीव देणाऱ्या मजनूचं. कारण आपल्या डोक्यात एखाद्या गोष्टीचा/माणसाचा/ध्येयाचा ध्यास घेऊन सर्वस्व अर्पण करणं किंवा मृत्यूला कवटाळणं हे सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस समजलं जातं. पण मृत्यू ही एक प्रकारची सुटकाच नसते का? सगळ्या चिंता, विवंचनापासूनचा शेवटचा सुटका मार्ग? मृत्यू कवटाळून सुटका करून घेण्यापेक्षा ध्येयासोबत जगणं सगळ्यात अवघड. रोज उशीखाली स्वप्नं ठेवून झोपायला जाणं आणि रात्रभर उशीखालच्या स्वप्नांना चाचपत रात्रभर जागं राहणं सगळ्यात अवघड. हे असं वर्षानुवर्षं जगणं कधीकधी रौरवाइतकंच भयानक असणार. पण जेव्हा ध्यासपूर्तीचा क्षण येतो, तेव्हा तो क्षण अलौकिक असणार. जवळजवळ मोक्ष मिळाल्यासारखा.
राही अनिल बर्वे इतकं हे चांगलं कुणाला माहीत असणार. ‘तुंबाड’ नावाच्या स्वप्नांचा वर्षानुवर्षं पाठलाग करत असताना अनेकदा तो तुटला, विखरून पडला. पण आज अनेक वर्षाच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक संघर्षानंतर ‘तुंबाड’ दिवसाचा प्रकाश पाहणार आहे. त्याच्याइतका आनंदी आत्मा आज अजून दुसरा कोणी नसेल.
महेश भट्टच एक माझं फेवरेट कोट आहे. मुळातच हिंदीमधून वाचण्यासारखं. “हर किसी के अंदर बिजली का एक नंगा तार झूल रहा होता है. कुछ कमनसीब उसको छू बैठते हैं और भयानक झटके से मर जाते हैं.” सेल्फ डिस्ट्रक्टिव (मराठी पर्यायी शब्द प्लिज?) असण्याची इतकी चांगली व्याख्या मी अजून दुसरी ऐकली नाही. प्रत्यक्ष आयुष्यात सेल्फ डिस्ट्रक्टिव असणारी चिक्कार उदाहरणं आहेत. महेश भट्ट हा स्वतःच एकेकाळी सेल्फ डिस्ट्रक्टिव होता. सतत दारूच्या नशेत लास असायचा. बायकांचं व्यसन तर होतंच. आलियाचा जन्म झाला आणि तो सावरला. आमूलाग्र बदलला. अनुराग कश्यप आणि पियुष मिश्रा ही अजून काही उदाहरणं. स्वतःला उदध्वस्त करून घेण्यात यांना काही तरी सॅडिस्ट आनंद मिळत असावा. हे सेल्फ डिस्ट्रक्टिव असणं कलाकार असण्याचं ‘बाय प्रॉडक्ट’ असावं. कलाकाराचं अस्थिर आयुष्य, अति संवेदनशीलता यांचं मिश्रण माणसाला आगीकडे झेपावण्यास प्रवृत्त करत असावं. राही अनिल बर्वे हा असाच अजून एक कलाकार.
अनिल बर्वे या सिद्धहस्त लेखकाचा मुलगा हीच आणि एवढीच राहीची ओळख कधीच नव्हती. तो पहिल्यापासूनच स्वयंप्रकाशित, पॉम्पस. वडिलांच्या फारशा जिव्हाळ्याच्या आठवणी नसल्या तरी, आपलं लिहिणं हे त्याच पोहऱ्यातून आलं आहे, याची पक्की जाणीव त्याला आहे. राहीला वाढवलं त्याच्या आईनं. राहीजवळ जे संचित आहे, ते त्याच्या आईचं. शाळेत असतानाच राहीला dyslexia होता. ‘तारे जमीन पर’मधल्या ईशान अवस्थीसारखा. त्याला आकडे कळायचे नाहीत. शब्दांची वळण कळायची नाहीत. वडिलांचं नाव कधी ‘अनिल’ लिहायचा तर कधी ‘अनील’. आपल्या बंदिस्त गंजलेल्या शिक्षणव्यवस्थेमध्ये हे महापापच की. पण राहीचं दृश्यांशी जवळच नातं होतं. शाळेत कधीच न रमलेला राही फोटोग्राफ्स, अॅनिमेशन, चित्र यांच्या जवळ गेला. राही व्यवसायानं अॅनिमेटर. एकदम यशस्वी. लहान वयातच इतका पैसा कमवला की, स्वतःची स्पोर्ट्सकार विकत घेतली. त्याच्या वयात यशस्वी असलेल्या इतर कुणाप्रमाणेच त्याचं जग पण स्त्रिया, गाड्या, अल्कोहोल भोवती फिरत होतं. मग त्याला फिल्ममेकिंगचा किडा चावला. म्हणजे आयुष्यभर राही दृश्यकलेशी नाळ जोडत राहिला.
तुला शब्दांपेक्षा visuals च्या माध्यमातून अभिव्यक्त व्हायला जास्त आवडत का? या प्रश्नावर त्याचं उत्तर आहे , “केव्हाही. आणि ते देखील फक्त फिल्मकॅमेऱ्यातून. शब्द फार सोपे असतात. कागदावर फार सहज उतरतात. सरसर एक अख्खं जग काही पानांत काही मिनिटांत जन्माला येतं. नुसता एक हात पुरतो. पण फिल्मरीलवर दृश्यभाषेत तेच जग परिणामकारकपणे उतरवणं महाकठीण. शेकडो-हजारो हात वापरावे लागतात. वर मिनिटांत नाही बनू शकत, वर्षं लागतात. पण जेव्हा निर्माण होतं, तेव्हा होणारा आनंद लिखाण कधीही देऊ शकत नाही.”
१९९३ साली राहीला त्याच्या एका मित्रानं नारायण धारपांची एक भयकथा किर्र रात्री नागझिऱ्याच्या जंगलात ऐकवली. ‘तुंबाड’चं बीज रोवलं गेलं ते इथं. राहीनं स्क्रिप्टचा पहिला draft आणि स्टोरी बोर्ड ९६-९७ लाच तयार केला होता. आपल्या व्यवसायात यश आणि पैसा मिळवून शेवटी राहीनं २००५ साली नोकरी सोडली, ‘तुंबाड’ बनवण्यासाठी. पण दुर्दैवाचे दशावतार कोपऱ्यात उभं राहून फिदीफिदी हसत होते. दरम्यान राहीनं ‘मांजा’ नावाची शॉर्ट फिल्म बनवली होती. स्वतः राही आता त्या फिल्मकडे फार तटस्थतेनं बघत असला तरी ‘मांजा’ ही एक अप्रतिम फिल्म होती. दस्तुरखुद्द डॅनी बॉयलनं ‘स्लमडॉग मिलेनियर’च्या डीव्हीडीमध्ये ती शॉर्ट फिल्म घेतली होती. तर ‘मांजा’च्या पुण्याईच्या बळावर ‘तुंबाड’ची जुळवाजुळव सुरू झाली. निर्माता पण मिळाला. नवाजुद्दीन सिद्दीकी मध्यवर्ती पात्र असणाऱ्या विनायकची भूमिका करणार होता, एक पैसा न घेता. पण खर्चाचं गणित जुळेना. शूटिंग स्टॉल झालं. प्रोड्युसर बाहेर पडला.
दरम्यानच्या काळात फक्त तीन वर्षं वाया गेली. पण ही तर सुरुवात होती. नंतर शहाना गोस्वामीच्या मध्यस्थीनं अनुराग कश्यप बोर्डवर आला. पण त्याच्या खिशात तरी कुठे पैसे होते? सगळ्या प्रॉडक्शन हाऊसची दार ठोठावायला सुरुवात झाली. पण एमबीए करून स्टुडिओमध्ये बसलेल्या लोकांना ‘तुंबाड’ म्हणजे काय आहे तेच कळत नव्हतं. हॉरर जॉनर म्हणजे काय याबद्दलच्या त्यांच्या कल्पना प्रचंड बाळबोध आणि मागासलेल्या होत्या.
राहीच्याच शब्दांत सांगायचं तर, “मला नेहमी कुतूहल वाटतं, की जवळपास सर्वच फिल्मेकर्स भय ही भावना किती क्षुद्र बनवतात! जीवांच्या बेसिक इंस्टिंक्ट्सपैकी खरं तर ती सर्वांत मोठी इंस्टिंक्ट आहे. सेक्स आणि भूकेपेक्षाही मोठी. आदिमानवाला फक्त त्याच्या भयानं भोवतालच्या धोक्यांपासून दूर ठेवलं व इथवर इव्होल्व्ह केलं. कारण प्रत्येक भयाच्या पुढे नेहमी एक नवा शोध लागत असतो. भय हा प्रेमाइतकाच असंख्य लेयर्समध्ये हाताळला जाऊ शकणारा, प्रेक्षकांना पापण्या देखील न मिटता पूर्ण गुंगवून ठेवू शकणारा गारुड सब्जेक्ट आहे, ज्याला जगभर दुर्दैवानं फक्त बिग्रेडमध्ये अथवा बिगबजेट भुताखेतांनी दचकवण्यात अडकवून ठेवलय. ‘let the right one in’, ‘the shining’, आणि ‘the sixth sense’ सोडल्यास चौथी उत्कृष्ट भयकलाकृती आठवू नये, हे दुर्दैव. ‘तुंबाड’मध्ये चिप थ्रिलस नाहीत. घडणारी प्रत्येक घटना ठामपणे कथेशी निगडित आहे. सर्वांत महत्त्वाचं- ‘तुंबाड’मध्ये भुतं माणसांना नाही, माणसं भुतांना घाबरवतात. ह्या एका ओळीत तुम्हाला ‘तुंबाड’चं वेगळेपण कळावं.”
व्यावसायिक आघाडीवर फरफट चालू असतानाच, वैयक्तिक आयुष्यात दोन मोठे आघात सोसावे लागले. डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे राहीला एका कानानं ठार बहिरेपण आलं. कानातून सतत रक्तस्त्राव व्हायचा. वेदना सहन न होऊन रस्त्यावरून तो भेलकांडत फिरायचा. दुसरा धक्का त्यापेक्षाही मोठा होता. आईला कॅन्सर असल्याचं निदान झालं. फारफार तर आई फक्त नऊ महिने जगेल असं डॉक्टरांनी सांगितलं. आईचा आजार तिला प्रचंड शारीरिक वेदना देणारा होता. आणि राहीला मानसिक. आर्थिक हलाखी चोरपावलांनी घरात घुसली होतीच. हा काळ भोवंडून टाकणारा होता. कणखर माणसाचा पण कणा मोडून काढणारा. अशा वेळेस आपण एकटे आहोत आणि मिसफिट आहोत, अशी भावना मनात रुजण्याची शक्यता असते.
पण यावर राहीचा टेक वेगळा आहे, “एकटेपण जितकं प्रवाहाच्या विरोधात पोहणाऱ्याला प्रत्येकाला जाणवतं, तितकंच मला ते जाणवतं. ना कमी ना जास्त. जोवर तुम्ही स्वतःचे दोस्त आहात, आणि एकांतातदेखील स्वतःसोबत मस्त वेळ घालवू शकता, तोवर ह्या मिसफिट असण्याचा खास त्रास होत नाही. नाहीतर गेली दहा वर्षं ‘तुंबाड’वर टिकून राहणं मला फार अवघड झालं असतं. Also there is a difference between being alone, and being lonely. mostly i stay alone. but i never feel lonely. मी मूळचा माणूसघाणा असल्यानं मला समाजात ‘मिसफिट’ असल्याचा खास त्रास होत नाही… गडबड तिथून सुरू होते, जेव्हा गर्दीचं लक्ष स्वतःकडे वळवायची इच्छा तुमचं जग व्यापतं. तू स्वतः देखील कफल्लक मिसफिट कलाकारांच्या केविलवाण्या attention seeking धडपडी पहिल्या असशील. तिथून पुढे त्यांचं जन्माचं एकटेपण निश्चित असतं.”
अनुराग कश्यपच्या मदतीनं राहीनं अनेक स्टुडियोजचे दरवाजे ठोठावले. सोनी इंडिया म्हणू नका, फॉक्स म्हणू नका, वायकॉम म्हणू नका. काही ठिकाणी तर औपचारिकता शिल्लक होती. आता शूटिंग सुरू होणारच असं वाटायला लागायचं. पण काहीतरी प्रॉब्लेम यायचे आणि फिल्म थांबायची. मग सोहम शाह (शीप ऑफ थिसीस फेम) बोर्डवर आला आणि एकदाच शूट सुरू झालं. सासवडच्या त्या अलौकिक सुंदर वाड्यामध्ये... दरम्यानच्या काळात राहीनं आईला गमावलं होतं. असहनीय शारीरिक वेदनांनी तिला तीळ तीळ झिजताना बघून. आईच्या मृत्यूनं राहीच्या मनात खरं तर, बरं झालं ती सुटली अशीच भावना होती. इकडची तिकडची कामं करून गरजेपुरती अर्थप्राप्ती चालू होती. आपल्याच क्षेत्रात कार्यरत राहिला असता तर हा पोरगा युरोपमधल्या कुठल्या तरी अॅनिमेशन स्टुडिओचा हेड राहिला असता. पण ‘जर-तर’ला अर्थ नसतो. सिनेमाच्या पडद्यावर पण आणि प्रत्यक्ष आयुष्यात पण. सिनेमाची स्क्रिप्ट अगोदरच लिहिली गेलेली असते. आयुष्याची स्क्रिप्ट आपणच लिहायचं असतं. कुठलेही regrets न ठेवता.
शेवटी फिल्म रिलीज करण्यासाठी अनुराग कश्यपचं मदतीला धावून आला. त्याच्या मदतीनं आनंद एल. रायपर्यंत पोहोचता आलं. रायनं फिल्म प्रदर्शित करण्याची तयारी दाखवली. राय म्हणजे सध्याचा ‘मिडास’ आहे. तो सध्या ज्याला स्पर्श करतोय त्याचं सोन होतं. ‘तुंबाड’चं बघूया काय होतंय.
थोडं ‘तुंबाड’बद्दल लिहायला हवं. आपल्याकडे सिनेमाचं वर्गीकरण करण्यासाठी कलात्मक सिनेमा आणि व्यवसायिक सिनेमा अशा ढोबळ श्रेणी वापरल्या जातात. ‘तुंबाड’ नेमका कशात बसतो? राही यावर सांगतो, “फक्त सामान्य प्रेक्षकांच्या आवडीनिवडीचा विचार करून त्यांना आवडेल असेच आणि इतकेच बनवण्याचा प्रयत्न long run मध्ये personal creativity ची पार वाताहत करतो, आणि प्रेक्षकांना पूर्णपणे तुच्छ लेखून त्यांचा जराही विचार न करता फक्त स्वतःला हवं तेच आणि तसंच बनवण्याचा अट्टाहास तोंडात चांदीचा चमचा नसला तर उपाशी मारतो. मणि कौल मला बळेबळे थोपटून घोरायला लावतो. आणि मणिरत्नम मेलोड्रामानं मेंदूचा लगदा करून मला थिएटरबाहेर पळवून लावतो. तेव्हा मी पूर्णपणे ह्या दोहोंपैकी कुठल्याच एका जगाचा नाही. तसाच ‘तुंबाड’ही नाही. ‘तुंबाड’ व्यवसाय आणि honest कलेचं Mixed breed अपत्य आहे. वेडंवाकडं निपजलंय कि राजबिंडं, ते बारा ऑक्टोबरला कळेल.”
मुख्य म्हणजे इतकी जबरदस्त हॉरर फिल्म बनवणाऱ्या राहीचा देवावर पण विश्वास नाही आणि भुताखेतांवर पण नाही. तो म्हणतो, “देव आणि भुतं ह्या भानगडी कल्पनेतच मजेशीर असतात असं मला वाटतं. मी विज्ञान-निसर्गाचा उपासक आहे. पण हे सारे प्रकार खरंच अस्तित्वात असते, तर फार मजा आली असती. सर्वांचं जगणं दसपटींनी मस्त झालं असतं. खिडकीतून कावळा आत आलाय, ब्रेड टाकून हाकला हे काही खास नाही, पण खिडकीतून मुंजा नाहीतर हडळ आत आलीय, झाडू घेऊन हाकला, हे नक्कीच थोडं खास असतं.” अशी त्याची फिलॉसॉफी.
‘तुंबाड’ येत्या बारा तारखेला प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा बघण्याची असंख्य कारणं आहेत. त्यापैकी एक कारण- जीवतोड संघर्ष. आईच्या जाण्यानंतर राही आता सडाफटिंग आहे. जादाचा संघर्ष करायला मोकळा. आयुष्याच्या क्यूबचे एका बाजूचे रंग तरी जुळून आले आहेत. आता तो जी.ए. कुलकर्णींच्या ‘विदूषक’ या अजरामर कथेवर चित्रपट बनवण्यासाठी जुळवाजुळव करत आहे. एका बड्या प्रॉडक्शन हाऊसनं त्यात रस दाखवला आहे. स्वतःच्याच असुरक्षितता, स्वार्थ, माणूसपणासोबत येणारे ईर्ष्या, मत्सर, occasional दुष्टपणा ह्या सगळ्या शत्रूंसोबत शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता आता तरी दिसत आहे. पण हा अविरत संघर्ष राहीला बरंच काही देऊन गेला, त्यापेक्षा बरंच काही घेऊन पण गेला असावा.
सगळं आयुष्य असं वाऱ्यावरची वरात बनलं असताना कलाकार मानसिकदृष्ट्या तगून कसा राहत असेल? मी हा कौशल इनामदारच्या ब्लॉगवर वाचलेला अप्रतिम किस्सा. चार्ली चॅप्लिनचा ‘लाइमलाइट’ नावाचा सिनेमा आहे. चॅप्लिनच्या मोजक्या बोलपटांपैकी एक. ‘लाइमलाइट’, अर्थात प्रकाशझोत. कार्व्हालो (चॅप्लिन) हा लोकांच्या विस्मृतीमध्ये गेलेला दारुडा पण महान विनोदवीर असतो. एका दृश्यात कार्व्हालो त्या कुणालातरी सांगतो की, त्याला रंगभूमीबद्दल प्रचंड घृणा आहे... मग दुलगेच काही वेळानं तो याच रंगभूमीबद्दल भरभरून बोलतो आणि समोरचा माणूस म्हणतो –
“I thought you hated the theatre.”
त्याच्यावर तो म्हणतो – “I hate the sight of blood, but it runs in my veins.”
जगातले बरेचसे संघर्ष मला वाटतं, या एकाच वाक्यात डिकोड होत असावेत. राही अनिल बर्वे आणि ‘तुंबाड’चं नातं काहीस असच असावं.
.............................................................................................................................................
लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Shrikant Agawane
Thu , 11 October 2018
आनंद आहे.