अजूनकाही
दिनकर मनवर हे आजचे एक महत्त्वाचे कवी आहेत. ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ आणि ‘अजून बरंच काही बाकी...’ हे त्यांचे कवितासंग्रह आहेत. याशिवाय त्यांच्या अनेक कविता नियतकालिकांतून प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवादही प्रकाशित झालेला आहे. ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहातील कवितांमधून त्यांची सूक्ष्म संवेदनशीलता जाणवते. जगातल्या सर्वसामान्य माणसांविषयीचा जिव्हाळा जाणवतो. सामान्य माणसांच्या दुःखांविषयी, त्यांच्यावर कोसळणाऱ्या आपत्तींविषयी ते आस्थेने लिहितात. त्यांच्या या कवितासंग्रहातील कवितांची भाषा तलस्पर्शी आहे आणि पारदर्शक आहे. त्या भाषेतून कवीची मानवतेविषयीची अपार माया जाणवते. सारी दुःखे, यातना, तिरस्कार, अपमान पचवून अत्यंत शांत झालेल्या माणसाची प्रगल्भता या कवितांतून स्रवत राहते. विशिष्ट समाजगटाला जी अवहेलना सोसावी लागते, मनुष्य असूनही बहिष्कृत व्हावे लागते, पदोपदी मानसिक छळ सोसावा लागतो, तिरस्कार वाट्याला येतो, अशा समाजगटातील व्यक्तीच्या साऱ्या यातना पचवून हा कवी अत्यंत प्रबुद्ध रीतीने आपली अभिव्यक्ती करतो. त्याच्या कवितेत कुणाही व्यक्तीविषयी, समाजगटाविषयी प्रतिकूल भावना नाहीत. अवतीभवतीच्या समाजस्थितीचे तो सूक्ष्म अवलोकन करतो आणि साऱ्यांच्याच दुःखांची अनुभूती तो घेतो. या दुःखांपासून ही माणसे कशी सुटतील, कधी मुक्त होतील याचा तो विचार करतो. ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या संग्रहातल्या पहिल्याच कवितेत भगवान बुद्धाचा संदर्भ आलेला आहे.
भगवान बुद्धाला दुःखातून बाहेर पडण्याची वाट सापडली, पण आपल्याला ती सापडत नसल्याची खंत कवी व्यक्त करतो.
या संग्रहातील पाण्याविषयीच्या कविता मराठी कवितेत अपूर्व अशा आहेत. पाणी हे प्रतीक आहे आणि कवीने या प्रतीकाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही सूचित केलेला आहे.
‘पोर्ट्रेट’, ‘पाणी कसं अस्तं’, ‘विशेषणं’, ‘व्याकरण’, ‘सूक्त’, ‘व्यवस्था’, ‘धर्म’, ‘सार्वजनिक थोडंच राहिलं आहे’, ‘थेंबभर पाण्यासाठी’, ‘सत्ता’, ‘जे पाणी वाहत होतं’, ‘सर्जन’, ‘उच्चार’, ‘साक्षात’, ‘अस्तित्व’, ‘शून्य’... या सर्व पाण्याविषयीच्या कविता आहेत.
आधुनिक दलित पुराकथांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर पाणी हे मिथक बनलेले आहे. पाणी हे नुसते पाणी कधीच नव्हते. त्यामागे राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक संदर्भ होते. कवीने या विविध कवितांमधून पाण्याचे हे विविध संदर्भ व्यक्त केलेले आहेत. ते व्यक्त करताना कवीची भाषा अत्यंत संयत अशी आहे. अत्यंत सुसंस्कृत आणि अनुभवांनी समृद्ध असलेल्या माणसाच्या भाषेत वंचितांविषयीचा जो जिव्हाळा असतो तो तर व्यक्त होतोच, पण तो जिव्हाळा व्यक्त करताना कुणाहीविषयी तिरस्कार व्यक्त करत नाही. दिनकर मनवर यांच्या कवितेचे हे वैशिष्टय़ आहे.
काही उदाहरणे देतो -
‘पोर्ट्रेट’ या कवितेत कवी सुरुवातीला म्हणतो,
पाण्या
पाठ करू नकोस माझ्याकडे
शेवटी तो म्हणतो,
पाण्या
माझ्या मायबापा
थांब थोडा वेळ माझ्यासाठी
मला तुझं पोर्ट्रेट काढायचं आहे
ज्या पाण्याने या व्यवस्थेत वंचितांकडे पाठ फिरवलेली असते, त्या पाण्याविषयी कवीने वरील उद्गार काढलेले आहेत. परंतु पाण्याने आपल्या दुर्दैवाने वा समाजसंकेतांच्या वर्चस्वामुळे पाठ फिरवलेलीच असते. ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेत ती वेदना आहे, पण विखार नाही. ज्या समाजगटाला सर्व प्रकारच्या पाण्यापासून दूर ठेवलं गेलेलं असतं, तो समाजगट पाणी कसं असतं हा प्रश्न विचारणारच.
दिनकर मनवर काय म्हणतात, त्यांच्या विचारण्याच्या भाषेत वेदना आहे की विखार आहे, हे त्यांच्याच शब्दांत समजतं. पाणी या शब्दातून ते येथे संस्कृतीमधल्या विसंगती दाखवतात आणि हे अत्यंत स्वाभाविक आहे. पाण्यासाठी अवलंबून राहावं लागणाऱ्या समाजाला पाणी असतं तरी कसं हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. दिनकर मनवरांची कविवृत्ती किती सभ्य आणि संयत आहे, हे हा प्रश्न विचारतानाही लक्षात येते. पाणी ही गोष्ट सर्वसामान्य माणसांना सामान्य वाटते. पण वंचितांना त्या गोष्टीचे खरे महत्त्व माहीत असते. पाण्यापासून दूर ठेवणाऱ्या समाजाचे, त्या संस्कृतीचे खरे स्वरूपही समजते. एक मोठा समाज पाण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून असलेल्या समाजाकडे कसे पाहतो हेही इथे दिसते. तळागाळातल्या, कष्ट करणाऱ्या, उपेक्षित, बहिष्कृत, रानावनातल्या समाजाकडे तथाकथित उच्चवर्णीय, उच्चवर्गीय समाज कसे पाहतो हेही कवीला दिसते. परंतु त्याचे सारे ध्यान पाण्याच्या खऱ्या स्वरूपाकडे असते. ते सर्वांसाठी असते, ते शुद्ध असते, ते कोमल असते, त्याला कुणाच्याही स्पर्शाचा विटाळ होत नसतो. पण समाजव्यवस्थेने पाण्यालाही निर्बंधांनी जखडून टाकले आहे. पाण्याच्या संदर्भात कवीच्या मनात असे वंचित समाज जागे होतात. त्यांनी याच समाजासाठी केलेले समर्पणही त्याच्या ध्यानात येते. ते स्वच्छ पाणी काळे झालेले त्याला दिसते. परंतु कवी व्यवस्थेवर आरोप करत नाही. त्याला त्या पाण्याकडे पाहून कष्टकऱ्यांची आठवण होते, जंगलात राहणाऱ्या निरागस लोकांची आठवण होते. पाणी राकट काळं असावं, जांभळं असावं असं त्याला वाटतं. या दोन्ही ठिकाणी कवीला वंचित, कष्टकरी, तथाकथित रानटी, मागासलेले वा तसे ठेवले गेलेले, या लोकांची आठवण होते. पाणी हे नुसतं पाणी राहतच नाही, पाणी या प्रतीकातून कवी या समाजरचनेचा उभा छेद घेतो.
पाथरवट आणि आदिवासी मुलगी हे वंचित आहेत, शोषित आहेत, त्यांच्यासाठी पाणी काय आहे?
‘काळं असावं पाणी कदाचित’ या ओळीतूनच कवी सुचवतो की कसे शोषण चाललेले आहे. आदिवासी पोरीचा जो उल्लेख येथे आहे तो शोषणाची बळी म्हणून आहे. बाकीचा सभ्य समाज कोणत्या दृष्टीतून त्यांच्याकडे बघतो हे कवीने येथे सुचवलेले आहे.
पुढच्या ओळींतूनही कवीने या समाजातील विसंगतींचे, विद्वेषाचे चित्रण केलेले आहे. याच कवितेतील ‘अंगठा छाटल्यावर उडालेल्या रक्ताच्या चिळकांडीसारखं’ या ओळीतही आदिवासींचा उल्लेख आहे. हा समाज वर्षानुवर्षे कसा शोषित आहे हेच कवी दाखवतो आहेत.
कविता समजून घ्यायला संवेदनशीलतेची गरज असते. केवळ कवितेविषयीच नव्हे माणसे समजून घेण्याची संवेदनशीलता हवी असते. दिनकर मनवर यांच्या प्रत्येक कवितेत शोषित, पीडित, वंचित माणसांविषयी प्रगाढ आस्था आहे. संशयातीत अशी कल्याणाची इच्छा आहे. वेदना निश्चितच आहे; पण कवी किती संयमाने लिहितो हे लक्षात घेण्यासारखे आहे. कवी एखाद्या बाणासारखा प्रश्न विचारतो -
‘पाणी स्पृश्य असतं की अस्पृश्य?’
या एका प्रश्नातून वंचितांचा समग्र इतिहास उभा राहतो.
कवी म्हणतो,
पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का
या वर्तमानात?
या प्रश्नाच्या मागे कवीच्या अंतरातली वेदनाच व्यक्त होते.
कवी आपल्या कवितेतून वंचित समाजगटाचा इतिहास व्यक्त करतो. जे अनुभवलेलं असतं, भोगलेलं असतं, ज्या वेदनेनं त्याला पोखरलेलं असतं, ते व्यक्त होतं. दिनकर मनवरांची कवी म्हणून इतकी प्रगल्भता आहे की त्यांच्या शब्दाशब्दांतून ती आपल्याला जाणवत राहते. पुढील ओळी पाहा -
हे महाकारुणिक पाण्या
तुझी कृपादृष्टी राहू दे निरंतर आम्हा पामरांवर
तू आईच्या स्तनातून स्रव
भागव आमच्या मुलांची भूक
तू ढगातून बरस
विझव आमच्या शेतांची तृष्णा
ज्यांना पाण्यापासून दूर ठेवलं जातं त्यांची वेदनाही कवी व्यक्त करतो.
पाण्याला डोळाभरून
पाहूही दिल्या जात नाही
पुन्हा थेंबभर पाण्यासाठी
वणवण भटकावं लागतं
‘पाणी’ या मिथकाचा इतका सर्वस्पर्शी उपयोग मराठीत तरी अपूर्व असाच आहे.
‘पाणी’ या एका प्रतीकातून आपल्या समाजव्यवस्थेचा जो वेध दिनकर मनवर यांनी घेतलेला आहे तो निःसंशय महत्त्वाचा आहे.
.............................................................................................................................................
लेखक वसंत आबाजी डहाके प्रसिद्ध कवी, समीक्षक आहेत.
vasantdahake@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment