डाव्यांचं अस्तित्व इतकं महत्त्वाचं आहे की, ते जर नाहीसं झालं, तर नव्यानं उभारावं लागेल!
ग्रंथनामा - झलक
सुहास परांजपे
  • ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा : इतिहास, आव्हानं आणि नवसंजीवनीच्या शक्यता’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि प्रफुल्ल बिडवई
  • Fri , 05 October 2018
  • ग्रंथनामा झलक भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा Bharatatil Davya Chalwalincha Magova प्रफुल्ल बिडवई Praful Bidwai दि फिनिक्स मोमेंट : चॅलेंजेस फेसिंग दि इंडिअन लेफ्ट The Phoenix Moment: Challenges Confronting the Indian Left मिलिंद चंपानेरकर Milind Champanerkar

ज्येष्ठ संपादक व अभ्यासक प्रफुल्ल बिडवई याच्या‘दि फिनिक्स मोमेंट : चॅलेंजेस फेसिंग दि इंडिअन लेफ्ट’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा : इतिहास, आव्हानं आणि नवसंजीवनीच्या शक्यता’ या नावानं नुकताचं रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. हा अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी केला असून त्याला ज्येष्ठ मार्क्सवादी अभ्यासक सुहास परांजपे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. बिडवई यांच्या पुस्तकाची बलस्थानं नेमकेपणानं उलगडणाऱ्या, त्याचा आवाका स्पष्ट करणऱ्या आणि पुस्तकाचं महत्त्व विशद करणाऱ्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश.

.............................................................................................................................................

प्रफुल्ल बिडवई याचं इंग्रजी पुस्तक ‘दि फिनिक्स मोमेंट : चॅलेंजेस फेसिंग दि इंडिअन लेफ्ट’ नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रथम प्रकाशित झालं. त्या पुस्तकावर ते खूप वर्षं काम करत होते आणि त्या पुस्तकाबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ते पुस्तक आलं. पुस्तकाची भरभरून प्रशंसा झाली. त्यावर अनेक परीक्षणं आली. पण हे सारं घडलं ते त्यांच्या पश्चात. पुस्तक प्रकाशित होण्याच्या काही महिने अगोदर, २३ जून २०१५ रोजी दुर्दैवानं त्यांचा अचानक आणि अकाली मृत्यू झाला. सदर पुस्तक ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा : इतिहास, आव्हानं आणि नवसंजीवनीच्या शक्यता’ म्हणजे याच इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद. आज बिडवई हयात असते तर त्यांना आपलं पुस्तक अनुवादित रूपात येत आहे, याचं खूप समाधान वाटलं असतं. पुस्तकाच्या निमित्तानं झालेल्या आणि होणाऱ्या चर्चेमध्ये त्यांनी नक्कीच मोलाची भर घातली असती. त्या संधीला आता आपण कायमचे मुकलो आहोत.

या पुस्तकाचं महत्त्व निर्विवाद आहे. डाव्यांपासून उजव्यांपर्यंत ज्यांनी ज्यांनी त्याबद्दल लिहिलं आहे, त्यांना त्यातील मतं पटली असोत वा नसोत, सर्वांना हे नक्कीच मान्य करावं लागलं आहे की, भारतातील कम्युनिस्ट चळवळीबद्दल किंवा पक्षांबद्दल आजपर्यंत जी पुस्तकं आली आहेत, त्यांमध्ये– समग्रपणे, सिद्धान्तांपासून ते कृती कार्यक्रमांपर्यंत, ऐतिहासिक आढाव्यापासून ते राजकीय विश्लेषणापर्यंत, संसदीय हस्तक्षेपापासून ते तळागाळातल्या कामगिरीपर्यंत आणि तात्कालिक यशापासून ते ऐतिहासिक योगदानापर्यंत– अशी सर्व प्रकारची वैशिष्ट्यं एकत्रपणे व लीलया हाताळणारं दुसरं कुठलंही पुस्तक या पुस्तकाच्या जवळपासदेखील येत नाही. ज्या पुस्तकाचा परिचय करून देणाऱ्या पानांवर इतिहासतज्ज्ञ रोमिला थापर, विचारवंत के. एन. पणिक्कर ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’चे भूतपूर्व संपादक राममनोहर रेड्डी आणि ‘ट्रान्सनॅशनल इन्स्टिट्यूट’च्या अध्यक्षा सुझन जॉर्ज अशा मान्यवरांचे प्रशंसापर उतारे दिलेले असतील, अशा पुस्तकाच्या महत्त्वाबद्दल वेगळं काही सांगायला नको!

पुस्तकाची रचना

पुस्तकाचा आवाका खूप मोठा आहे. असंसदीय कम्युनिस्ट चळवळींचा पुस्तकात आवश्यक तिथं उल्लेख असला, तरी पुस्तक बिडवईंनी पूर्णत: डाव्या पक्षांच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील वाटचालीवरच केंद्रित केलेलं आहे, हे ते आपल्याला आधीच स्पष्ट करतात. पुस्तकाचे तीन भाग पाडता येतात. पुस्तकाची पहिली तीन प्रकरणं पुस्तकाचा पहिला भाग मानता येईल. हा भाग ढोबळमानानं देशाच्या पातळीवरील संसदीय कम्युनिस्ट पक्षाच्या कामगिरीचा आणि इतिहासाचा मागोवा घेतो. पश्चिम बंगाल, केरळ व त्रिपुरा या डाव्यांच्या बालेकिल्ल्यांतील घडामोडींचा परामर्श घेणारी पुढची पाच प्रकरणं ही पुस्तकाचा दुसरा भाग मानता येतील. पुस्तकाची शेवटची तीन प्रकरणं राज्यपातळीवरून पुन्हा आपल्याला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जातात. इथंही बिडवईंचा आढावा सुरू राहतो, पण त्याची पद्धत बदलते. तो जास्त भविष्यवेधी बनतो. आता इतिहासाचा जो मागोवा घेतला जातो, तो त्यातले धडे घेऊन पुढे काय व कसं करता येईल यावर भर देणारा असतो. पार धुळीला मिळाल्यागत अवस्थ झालेल्या डाव्या चळवळीला जर ‘फिनिक्स पक्ष्या’प्रमाणे पुन्हा उभं राहायचं असेल तर तो मार्ग कसा असेल, याबद्दल मांडणी करून ते पुस्तक संपवतात.

पहिल्या भागातील पहिल्या प्रकरणात ते कम्युनिस्ट पक्षांचा उद्भव, त्यांनी मिळवलेलं यश आणि त्यांची बलस्थानं व मर्मस्थानं यांचा आढावा घेतात. कम्युनिस्ट पक्षांच्या जन्मापासून त्यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना केला, अनेक चुका केल्या, अनेक उलटीसुलटी, परस्परविरोधी वळणं घेतली आणि तरीही २००४पर्यंत त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रांत भरीव कामगिरी केली होती आणि १९९६ ते २००४च्या दरम्यान जनाधाराचा व प्रभावाचा उच्चांक गाठला होता. परंतु, कम्युनिस्ट पक्षांच्या त्रुटी त्यांना व त्यांच्या जनाधाराला आतून पोखरत होत्या. कम्युनिस्टांचा मूळ कल अशा त्रुटींबद्दल आत्मपरीक्षणाचा नव्हताच. त्यात जनाधाराचा उच्चांक गाठलेला. वास्तवाशी विसंगत असा एक खोटा आत्मविश्वास बळावला. त्यामुळे व्हायचं तेच झालं. त्यांची घसरण सुरू झाली आणि शेवटी २०१४पासून संसदीय राजकारणात त्यांचा पार धुव्वा उडाला. हे त्यांच्या विवेचनाचं सूत्र आहे.

दुसऱ्या प्रकरणात ते डाव्यांच्या व्यूहनीतीच्या चौकटीचा मागोवा घेतात आणि तिसऱ्या  प्रकरणात ते त्यांच्या मुख्यत: संसदीय कामगिरीचा आढावा घेतात. कॉमिन्टर्नचा वा स्टॅलिनवादाचा प्रभाव, दोन टप्प्यांतील क्रांतीची कल्पना व तिचे परिणाम ते दाखवून देतात. परंतु डाव्यांनी केलेल्या भरीव कामगिरीची नोंद करायलाही ते विसरत नाहीत. विशेषत: सांस्कृतिक क्षेत्रात. १९९६मध्ये ज्योती बसू यांना आघाडीने देऊ केलेलं पंतप्रधानपद नाकारणं, ही ते डाव्यांची ऐतिहासिक चूक मानतात. तसंच २००९ साली अणुकरारावरून त्यांनी काँग्रेसचा काढून घेतलेला पाठींबा हीसुद्धा ते तशाच प्रकारची चूक मानतात. दोन्ही वेळी राजकीय शक्तींचं संतुलन नाजूक होतं आणि एक धक्का या ना त्या दिशेनं दिल्यानं मोठे फरक पडण्याची संभावना होती. या दोन्ही प्रसंगी उजव्या शक्तींना जो फायदा झाला, तो कदाचित झाला नसता असं त्यांचं मत आहे.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात त्यांनी पश्चिम बंगाल व केरळ या राज्यांना प्रत्येकी दोन प्रकरणं व त्रिपुराला एक प्रकरण दिलं आहे. पश्चिम बंगाल व केरळ यांना वाहिलेल्या प्रत्येकी दोनपैकी पहिल्या प्रकरणात ते त्या त्या राज्यातील कामाची जी चढती कमान होती, तिचं वर्णन करतात, त्यामागच्या कारणांचा शोध घेतात, त्यातलं निश्चित योगदान पुढे आणतात. दुसऱ्या प्रकरणात त्या राज्यांतील घसरण, तिची स्थानीय वैशिष्ट्यं, देशपातळीवरील वैशिष्ट्यांशी त्यांचा असलेला संबंध अशा साऱ्यांची चर्चा करतात आणि तिथे केल्या गेलेल्या डाव्या राजकारणाची विश्लेषणात्मक व टीकात्मक मीमांसा करतात. लक्षणीय हे की, त्या त्या राज्यातील कम्युनिस्टांचं योगदान तसंच त्यांच्या त्रुटी याबाबतचं त्यांचं म्हणणं ते निरनिराळ्या क्षेत्रांतील माहिती व आकडेवारीच्या आधारे मांडतात.

दुसरं महत्त्वाचं असं की, ते कम्युनिस्ट पक्षांच्या कामगिरीची ही चर्चा पारंपरिक कम्युनिस्ट विचारांप्रमाणे फक्त राजकारण व अर्थकारण यांपुरती सीमित ठेवत नाहीत. समग्र विकासाच्या दृष्टीनं स्त्रिया, दलित, पर्यावरण, मानवी हक्क, अल्पसंख्याक इत्यादी सर्व सामाजिक पैलूंसह ते कामगिरीचा आढावा घेतात. मूळ इंग्रजी पुस्तकात त्रिपुराबाबतचं विश्लेषण परिशिष्टरूपात दिलेलं आहे (बहुधा, अकाली मृत्यू झाल्यानं बिडवई यांना त्यावर अधिक काम करून त्याला पूर्णाकार देण्याची संधी लाभली नसावी). परंतु, त्यातील माहिती व विश्लेषण मोलाचं असल्याने या मराठी अनुवादित पुस्तकात त्याचा स्वतंत्र प्रकरण म्हणूनच समावेश केला गेला आहे.

तिसऱ्या भागातील पहिल्या प्रकरणात ते राजकारण आणि अर्थकारण सोडून जे क्षेत्र उरतं, ज्याला स्थूलमानानं समाजकारण म्हणता येईल (तिथं राजकारण-अर्थकारण यांचा संदर्भ/संबंध नसतो असं नाही, पण मुख्य निर्देश त्यांच्यावर नसतो, इतकंच) त्यातील आव्हानांचा विचार करतात. स्त्रिया, दलित, पर्यावरण, मानवी हक्क, अल्पसंख्याक इत्यादी अनेक बाबतींतील आव्हानांचा ते विचार करतात. दुसऱ्या  प्रकरणात डाव्यांनी गमावलेल्या संधींबद्दल ते बोलतात व त्यातून काय धडे घ्यायचे त्याची चर्चा करतात. आणि शेवटच्या प्रकरणात या बिकट परिस्थितीतून बाहेर पडायचं तर काय आवश्यक आहे याबद्दल मांडणी करून पुस्तक संपवतात.

पुस्तकाची वैशिष्ट्यं

पुस्तकाची अनेक वैशिष्ट्यं आहेत. मला जाणवलेली एक साधीशी गोष्ट अशी आहे की, पुस्तकातील अनेकानेक संदर्भ व उतारे हे सर्वसाधारणपणे, प्रकाशात नसलेल्या घटना किंवा माहिती पुढे आणतात. स्वातंत्र्याच्या पूर्वीची बंगालमधील ‘तेभागा चळवळ’ व त्यानंतरचं डाव्यांचं ‘जमीन बळकाव’ आंदोलन यांचा एकीकडे नक्षलबारीशी आणि दुसरीकडे, बंगालमधील जमीनसुधारणांच्या यशाशी व स्वरूपाशी कसा संबंध आहे हे ते दाखवतात. केरळमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात डावे हे समाजजीवनात किती खोलवर रुजलेले होते, हे फारच थोड्यांना माहीत असेल. तेलंगणच्या लढ्याला एका बाजूला निजाम आणि दुसरया  बाजूला स्वतंत्र भारताच्या फौजांना कसं तोंड द्यावं लागलं, हे कितीजणांना, विशेषत: तरुण मंडळींना, अगदी कार्यकर्त्यांना, माहीत असेल याबद्दल शंकाच आहे. किंवा केरळमधील आणि तमिळनाडूमधील गरीब कुटुंबांसाठी दिलेल्या एकंदर सामाजिक सुरक्षेच्या सेवांची पातळी ही जीवनवेतनाच्या निम्मी आहे, हेही आपल्याला नव्यानं कळतं; निदान मला तरी हे नवं होतं. सुंदरबन भागातील ‘मारीचझाँपी’चं नावही कुणाला माहीत नसेल, मग तिथे झालेल्या नरसंहाराची माहिती कशी असेल? किंवा केरळमध्ये ‘पीपल्स प्लॅन’ मोहिमेमार्फत तळागाळातून गावपातळीवर नियोजन करायचा जो अभूतपूर्व आणि व्यापक प्रयत्न झाला, तो किती यशस्वी झाला व ई.एम.एस. नम्बुद्रीपाद यांच्यासारख्या नेत्याचा पाठिंबा असूनही तो का सोडून देण्यात आला, त्याबद्दलही माहिती नसते; किंवा कानन देवन आणि कमानी या उद्योगांची नावंच कुणाला माहीत नसतील तर त्यांना हे बुडीत गेलेले उद्योग कामगारांनी ताब्यात घेऊन अनेक वर्षं यशस्वीपणे चालवले आहेत, हे तरी कसं माहीत असणार? तात्पर्य काय, तर या पुस्तकात भारतातील डाव्यांच्या वाटचालीबद्दल, पक्ष-कारकीर्दीबद्दल फार महत्त्वाची, तपशीलवार माहिती व संदर्भ आहेत.

यामागे बिडवईंचे प्रचंड परिश्रम आहेत. या पुस्तकावर गेली अनेक वर्षं त्यांचं काम चालू होतं. एकीकडे त्यांची इतर पुस्तकं येत होती आणि दुसरीकडे त्यांचं या पुस्तकावरचं काम अविरत चालू होतं. सहाएक वर्षांपूर्वी आम्ही मुंबईत भेटलो आणि ‘मागोवा’तील दिवसांबद्दल बोलत होतो. त्यांनी हाताशी एक छोटीशी वही ठेवली होती आणि त्यात ते बारकावे टिपून ठेवत होते. काही काळानं आम्ही २०१४च्या सुरुवातीला पुन्हा भेटलो. ‘मागोवा’ पाक्षिकाच्या काळातला, आता अमेरिकेत स्थायिक झालेला विनोद मुबाई, मी आणि बिडवई– आमची भेट बिडवई यांच्या घरीच झाली होती. जवळजवळ सारा दिवस आम्ही एकत्र घालवला. येणाऱ्या निवडणुकीची सावली आमच्या भेटीवर पडली होती. त्यातला अर्धा वेळ ते त्यांच्या या पुस्तकाबद्दल बोलत होते. त्यांच्या पुस्तकानं आता आकार घेतला होता. माहिती गोळा करताना त्यांना आलेले अनेक अनुभव, चर्चा यांचे किस्से ते सांगत होते. त्यांना एक खंतही होती की, पुस्तक लवकर संपायला हवं होतं. पण त्यांची त्यांनी निवडलेल्या विषयाप्रती एक सचोटी होती. त्या विषयाबद्दल पुरेशी आणि खात्रीशीर माहिती मिळालेली आहे याबद्दल त्यांचं समाधान होणं सर्वांत महत्त्वाचं असे. त्यामुळे हे पुस्तक पूर्णत्वास पोहोचणं लांबलेलं होतं.

यांतून एका बाजूला त्यांचे प्रचंड परिश्रम दिसून येतातच, पण कुठल्याही अभ्यासकासाठी हे त्यांचं पुस्तक एक महत्त्वाचा स्रोत-संग्रह ठरू शकेल. एखाद्या अभ्यासकाला कम्युनिस्ट पक्षांबद्दल अभ्यासाला सुरुवात करायची असेल, तर त्याला बिडवईंच्या पुस्तकापासून सुरुवात कर असं बिनदिक्कत सांगावं! 

हा एक फार मोठा आवाका होता आणि तो कवेत घेण्याचा प्रयत्न करणं, हे मोठं धाडसाचं काम होतं; ते त्यांनी बव्हंशी यशस्वीपणे पेललं आहे. ते पेलताना त्यांना सतत आपलं लक्ष्य समोर ठेवावं लागलेलं होतं. त्यातून पुस्तकाला एक विशिष्ट आकार आलेला आहे. तो जर वाचकानं लक्षात घेतला नाही, तर पुस्तक समजून घेण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे एक सूचना इथं करावीशी वाटते. प्रत्येक प्रकरण (किंवा भाग) ही यशाची चढती कमान व नंतरची घसरण यांभोवती गुंफलेलं आहे. हा प्रवास सर्व प्रकरणांना आंतरिक आकार देतो. त्यामुळे अनेक गोष्टींची नवनव्या संदर्भात पुनरुक्ती होते. इथंच धोक्याचा इशारा द्यावासा वाटतो– वाचकानं आपलं सारं लक्ष केवळ अंतिम निष्कर्षांवर केंद्रित करून चालणार नाही. संपूर्ण पुस्तकात या निष्कर्षांना सतत पुष्टी मिळत जाते, पण त्यांना नव-नवे पैलू जोडले जातात, निरनिराळ्या गोष्टींना महत्त्व येतं, त्यांच्यातलं संतुलन बदलतं. या सर्व गोष्टींबद्दल जागरूकता जर आपण दाखवली, तर मात्र या गोष्टी केवळ पुनरुक्ती ठरत नाहीत. बिडवईंशी आपला धागा जुळतो आणि हा लेखक-वाचक सांधा जुळणं हेच शेवटी पुस्तकासाठी महत्त्वाचं असतं.

बिडवईंचं वेगळेपण

संसदीय डाव्या पक्षांवर उजवीकडून व डावीकडून, दोन्ही बाजूनं टीका होत असते. दोन्हीकडचे जहाल/अतिजहाल प्रवाह त्यांना प्रगतीतील किंवा क्रांतीतील अडथळा, बऱ्याचदा प्रमुख अडथळा मानतात. त्या न्यायाने ते डाव्यांवर शत्रुपक्षावर केलेल्या टीकेसारखी टीका करतात. बिडवईदेखील डाव्यांवर टीका करतात. हातचे न राखता सडेतोड टीका करतात. परंतु त्यांच्या टीकेचा पोत वेगळा आहे. त्यांना संसदेत डावे हवे आहेत, इतकंच नव्हे, तर त्यांना डाव्यांचे संसदेतील अवास्तव भक्कम व सशक्त असणं हे देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं वाटतं. किती कठीण परिस्थितीत त्यांना काम करावं लागलं; त्यांना उपलब्ध असलेलं वैचारिक साहित्य, सैद्धांतिक चर्चा यांचे स्रोत किती सीमित होते याची त्यांना जाणीव आहे. डाव्यांच्या जीवननिष्ठेबद्दल, त्यांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल त्यांना आदर आहे. त्यांच्या टीकेत जळफळ व संताप नाही, तर खंत आहे, दु:ख आहे. स्पष्ट व सडेतोड असली तरी ती भ्रातृभावानं केलेली टीका आहे.

सर्वजण बिडवई यांना त्यांना मुख्यत: त्यांच्या पत्रकारितेमुळे आणि विश्लेषणात्मक लिखाणामुळे ओळखतात. परंतु, या भ्रातृभावाची मुळं बिडवईंच्या पूर्वायुष्यात आहेत. ते स्वत:बद्दल फार कमी बोलतात. परंतु, या पुस्तकाच्या त्यांच्या प्रस्तावनेत त्यांनी त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल ओझरता उल्लेख केला आहे. या पुस्तकाची मुळं तिथं आहेत. तो बराचसा काळ आम्ही एकत्र घालवलेला आहे– सहकारी म्हणून, कॉम्रेड म्हणून. या काळातल्या बिडवईंना मी जवळून पाहिलेलं आहे. ते कम्युनिस्ट बनले, पूर्णवेळ कार्यकर्ता बनले ते आम्हासोबतच. आमच्या राजकीय वाटा कालांतरानं वेगळ्या झाल्या, पण आमचं सौहार्द तसंच राहिलं. त्या काळात त्यांनी सर्व प्रकारच्या डाव्यांबरोबर काम केलेलं आहे. तळागाळात, आदिवासी भागात, कामगारांत काम केलेला तो कार्यकर्ता त्यांच्या सतत सोबत राहिलेला आहे. हे पुस्तक जितकं बिडवई या पत्रकाराचं आणि एका जिज्ञासू विश्लेषकाचं आहे, तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त ते बिडवई या कार्यकर्त्यांचं आहे. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात त्यांच्यातला हा कार्यकर्ता पुढे येतो. विचारांची, टीकेची परिणती ही शेवटी कृतीत, कृतीसाठी मार्गदर्शनात होणं आवश्यक आहे. त्या घडीला, जेव्हढी, जशी आपली समज असेल त्याआधारे पुढे कसं जायचं हे ठरवणं महत्त्वाचं आहे. कृतीपर्यंत न आणता विचार आणि टीका सोडून देणं हे आरामखुर्चीतल्या विचारवंताचं लक्षण आहे, कार्यकर्त्यांचं नव्हे, या जाणिवेतून त्यांनी ते प्रकरण लिहिलं आहे.

‘न्यू लेफ्ट’च्या दिशेनं  

‘काय करावं?’ याचा शोध घेणाऱ्या या शेवटच्या प्रकरणाला बिडवई नाव देतात– ‘न्यू-लेफ्टच्या दिशेनं...' हे लक्षात घेतलं पाहिजे की, इथं त्यांना ‘न्यू लेफ्ट’ या नावानं एखादा नवं-डावा पक्ष अभिप्रेत नाही. त्यांना नव्या विचारांवर व नव्या आचारांवर आधारलेला डावा समूह अपेक्षित आहे. हा समूह निर्माण होण्याचं व चालू राहण्याचं साधन आहे एक प्रक्रिया. जिला लोकांच्या मागण्यांची एक सनद म्हणता येईल. अशी सनद निर्माण करणं, ती सुधारणं, अमलात आणणं यासाठी संसदीय-असंसदीय डाव्यांमध्ये चालणारी एक संवादप्रक्रिया त्यांना अभिप्रेत आहे. यातून उभा राहिलेला डावा समूह म्हणजे बिडवइंना अभिप्रेत असणारी न्यू लेफ्ट. स्वत:चा सवतासुभा स्थापणारा ‘न्यू लेफ्ट’ पक्ष नव्हे.

या संवादप्रक्रियेसाठी ते एक पंचसूत्री मांडतात. बिडवई त्याला पाच अक्ष म्हणतात, परंतु सध्या मी त्यांना सूत्रं म्हणणं पसंत करेन. त्यांची थोडी चर्चा मला इथं करावीशी वाटते. पहिलं सूत्र आहे ते या व्यवस्थेच्या वर्चस्वाला (हेगेमनीला) आव्हान देणारं प्रतिवर्चस्व (काऊंटर हेगेमनी) निर्माण करणं. या दोन्ही इटालियन कम्युनिस्ट ग्राम्सीशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना आहेत. पारंपरिक विचार हा अर्थकारण, वर्ग व त्यांवर आधारलेलं, अंतिमत: शस्त्रबळावर उभं असलेलं राज्य एव्हड्या परिप्रेक्ष्यातच शासनसत्तेचं मर्म पाहतो. वर्चस्व ही संकल्पना त्यापलीकडे जाते. शस्त्रबळावर आधारलेल्या राज्यसंस्थेच्या अंगांखेरीज जे सारं आर्थिक-सामाजिक क्षेत्र आहे त्यात शस्त्रबळाशिवाय जे राज्यकर्त्या प्रभुत्व निर्माण होतं, ज्याचा लोक ‘स्वेच्छेनं’ स्वीकार करतात, त्या प्रभुत्वाला स्थूलमानानं वर्चस्व (हेगेमनी) असं वेगळं नाव देता येतं. पुस्तकात ते या अर्थाने वापरलेलं आहे. महत्त्वाचं हे की, भांडवली समाज सुशासित असतो तो प्रामुख्यानं वर्चस्वाच्या आधारावर, त्याला अडथळा आला तरच राज्यसंस्थेचं दमन कार्यान्वित होतं.

बिडवई (आणि अनेक नवे विचारवंत) असं मांडतात की, फक्त शासनसंस्था उलथून टाकणं इतकंच नव्हे, तर त्याहीआधी समाजात या वर्चस्वाच्या विरोधी प्रतिवर्चस्व निर्माण करणं हेसुद्धा डाव्या, क्रांतिकारक प्रवाहांसाठी महत्त्वाचं आहे.

असं म्हटलं की, कार्याची व्याप्ती व स्वरूप बदलतं.  अर्थकारण, समाजकारण सारं त्यात येऊ लागतं. दलित, स्त्रिया, अल्पसंख्याक, मानवी हक्क यांसारख्या गोष्टींना वेगळं महत्त्व प्राप्त होतं. वैचारिक परिवेषाला वेगळं महत्त्व येतं. या सर्वाला मिळून आपण जर नागरी समाज म्हटलं तर या नागरी समाजातील भांडवली वर्चस्वाला विरोध करणारं प्रतिवर्चस्व प्रस्थापित करणं महत्त्वाचं असतं. याची वेगळी जाणीव होऊन नव्या विचार-आचारांद्वारे, नव्या धोरणांद्वारे, चळवळींद्वारे प्रतिवर्चस्व निर्माण होणं हे पहिलं सूत्र ठरतं.

पुढे जाण्याअगोदर वर्चस्व आणि प्रतिवर्चस्व या गोष्टींकडे जरा पुन्हा वळूया.

पारंपरिक डाव्यांना, विशेषत: संसदीय डाव्यांना, प्रतिवर्चस्ववादी नसल्याच्या टीकेचा त्यांच्या दृष्टीने रास्त असा राग येतो. त्यांना समाजकारणाचं भान नव्हतं किंवा यांनी समाजकारण कधी केलं नाही असा ते या टीकेचा अर्थ काढतात. काही वेळा टीकाकारही या अर्थानं त्या शब्दाचा वापर करतात. पण हे चुकीचं आहे. या टीकेचा तसा अर्थ होत नाही. बिडवईंच्या टीकेचाही नाही. त्यांनी उलट या क्षेत्रातलं डाव्यांचं योगदान पुढे आणलं आहे, मान्य केलं आहे. प्रश्न तो नाही.

यासाठी आपण एक साधं उदाहरण घेऊ. वाहतूक व्यवस्थेचं उदाहरण घेऊ. पारंपरिक कम्युनिस्टांनी वाहतुकीचे दर कमी व्हावेत यासाठी आंदोलनं केली नाहीत का? केली. पण वाहतूक व्यवस्था कशी असावी? तिची रचना कशी असावी? ती लोकानुनयी असावी का वाहनानुनयी असावी? लोकांसाठी, गरिबांसाठी असणारी वाहतूक व्यवस्था कशी वेगळी असेल? प्रचलित वाहतूक व्यवस्थेबद्दलची जी समज आज भांडवली विचारांनी रूढ केलेली आहे, त्यात ती परवडण्याजोगी असावी याच्या पलीकडे त्या कल्पनांना आव्हान देणाऱ्या वाहतूक व्यवस्थेबद्दलची मांडणी करायचा प्रयत्न केला का? या पर्यायी संकल्पना घेऊन त्यामागे जनमत उभं केलं का? हा प्रश्न आहे. भांडवली कल्पनांच्या वर्चस्वाला टक्कर देणाऱ्या संकल्पना, पर्याय उभे करणं, ते जनमानसात रुजणं व त्याभोवती सशक्त कृती होणं हे प्रतिवर्चस्व झालं. आणि पारंपरिक डाव्या पक्षांबाबत हेच म्हणावं लागतं की, त्यांच्या काही सभासदांच्या व्यक्तिगत कार्याचा सन्माननीय अपवाद वगळता, या अंगानं पारंपरिक डाव्या पक्षांनी कधी विचार केला नाही. आणि तसं न होण्यात, हे सारं पुढील समाजवादी टप्प्याचं काम आहे, त्यात आत्ता पडण्यात अर्थ नाही. या दोन टप्प्यांच्या क्रांतीच्या संकल्पनेचा जरूर मोठा हात आहे.

दुसरं सूत्र हे एका वेगळ्या प्रकारच्या अर्थकारणाचं सूत्र आहे. नेहमीच्या वेतनाच्या मु्द्द्यांखेरीज यात मूलगामी जमीनसुधारणा, सामूहिक शेती, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, वृद्धांचं पेन्शन व इतर हक्क, किमान अन्नसुरक्षा, वनाधिकार, असंघटित कामगारांचा प्रश्न, विषमतेचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांचा समावेश होतो. यातील अनेक बाबतीत चर्चा सुरूही आहेत, पण त्यात काही नव्या दिशांची बिडवई चर्चा करतात.

तिसरं सूत्र आहे ज्याला स्थानिक किंवा सूक्ष्म वरील बाबी म्हणता येतील अशा गोष्टींचं. यात, ग्राम पंचायत, नगरपालिका, आणि लोकांच्या, विशेषत: गरिबांच्या दैनंदिन जीवनासाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न येतात. यात अनेक बाबींचा ते समावेश करतात. नित्याच्या नागरी सेवांशिवाय स्थानिक वायू व जल प्रदूषण, कचरया च व्यवस्था, सर्वांच्या आटोक्यातल्या शैक्षणिक व आरोग्य सेवा या बाबतीतल्या नव्या पर्यायांचा ते थोडक्यात इथं उल्लेख करतात.

चौथं सूत्र आहे ते लोक व त्यांचं प्रतिनिधित्व करणारे पक्ष यांच्यातील व पक्षापक्षांतील संबंधांबद्दल. त्यात त्यांचा भर ‘अग्रदूतवादा’पासून (‘व्हॅनर्गाडिझम’पासून) दूर राहण्याबद्दल आहे. अग्रदूतवादानुसार शेवटी कुठलाही वर्ग, विशेषत: कामगारवर्ग आणि सर्वसाधारणपणे कुठलाही सामाजिक घटक सर्वच्या सर्व कृतीत उतरत नाही, किंवा क्रांतिकारक नसतो. त्यातील फक्त ‘पुढारलेला घटक’ हा अग्रदूत असतो असं मानून त्या अग्रदूतालाच महत्त्व दिलं जातं. आता या पुढारलेल्याकिंवा क्रांतिकारक घटकात कुणा-कुणाचा समावेश करायचा हे कोण ठरवणार? तर ते असो. पण याचा परिणाम पक्ष व वर्ग यांच्या संबंधांवरही होतो आणि पक्षांतर्गत संबंधांवरही होतो. याची परिणती पुढे अग्रदूतांचा अग्रदूत क्रांतिकारक पक्ष, क्रांतिकारक पक्षाचा अग्रदूत पक्षाची मध्यवर्ती समिती, तिचा अग्रदूत म्हणजे पॉलिटब्यूरो आणि पॉलिट ब्यूरोचा अंतिम अग्रदूत म्हणजे महासचिव स्टॅलिन असे सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आपण पाहिलं आहे. हे सर्व लोकशाही केंद्रातित्वाच्या (‘डेमॉक्रॅटिक सेंट्रलिझम’च्या) नावेच झालं आहे, हे विसरून चालणार नाही. अग्रदूतवादाचा परिणाम पक्षा-पक्षांमधील संबंधांवरही होतो. प्रत्येक अग्रदूतवादी पक्ष स्वत:ला अग्रदूत आणि इतरांना विचारानं मागास मानत असतो! अशा समजामुळे एकत्र येण्यातील अडचणींची कल्पना सहज करता येईल. यामुळेच सम-भावाच्या चर्चेला व मतभेदांना योग्य तो अवकाश पक्षांतर्गत व पक्षा-पक्षांमध्ये असला पाहिजे, असा बिडवईंचा आग्रह आहे.   

बिडवईंचं पाचवं सूत्र आंतरराष्ट्रीयतेचं आहे. कॉमिन्टर्नच्या काळात आंतरराष्ट्रीयतेचा अर्थ ‘सोव्हिएत युनियन’चं हित असाच होत गेला आणि त्या कटु अनुभवाची छाया या संकल्पनेवर पडली आहे. परंतु बिडवईंचा अगदी पूर्वीपासून या सूत्राबद्दलचा आग्रह राहिला आहे. त्यांच्या दृष्टीनं याचे दोन प्रकारचे महत्त्वाचे पैलू आहेत. राष्ट्रवादाच्या संकीर्ण संकल्पनांचा त्याग करणं हा त्याचा पहिला पैलू आहे. दुसरीकडे दुनियाभरच्या श्रमिकांच्यामध्ये भ्रातृभाव निर्माण होणं, त्यांच्यातही संवादप्रक्रिया सुरू राहणं आणि परस्पर पाठिंबा व साहाय्य राहणं, एकमेकांपासून शिकणं हा त्याचा दुसरा पैलू आहे. निरनिराळ्या क्षेत्रांतील उदाहरणं देतानादेखील त्यांनी अनेक देशांमधील अशा प्रकारच्या महत्त्वाच्या प्रयत्नांचा दाखला पुस्तकात जागोजागी दिलेला आहे. एकीकडे भारतातील वैशिष्ट्यपूर्ण पैलूंना भिडणारं सिद्धांतन उभं करण्यासाठी बिडवई हाक देत असले तरी त्यांनी कधी तथाकथित देशीवादाचा पुरस्कार केला नाही. ते मुळापासून आंतरराष्ट्रीयवादी होते व राहिले.

संवादासाठी, पुनर्रचनेसाठी अनुकूल काळ?

त्यांचं हे पुस्तक आता मराठीत येत आहे ही एक महत्त्वाची घटना आहे. महाराष्ट्राला, खरं म्हणजे महाराष्ट्रातील अभिजनांना, इथं जन्मलेल्या सर्व प्रसिद्ध व्यक्तींवर अधिकार सांगण्याची हौस असते. तसा प्रयत्न त्यांनी कधी बिडवईंबाबत केला नाही आणि केला असता तर त्याला सर्वांत पहिला विरोध त्यांनी स्वत: केला असता! बिडवईंवर मराठीपण थोपणं त्यांना कठीण गेलं असतं. असो. परंतु ही वस्तुस्थिती आहे की, त्यांचा जन्म महाराष्ट्रात झालेला होता, त्यांची मातृभाषा मराठी होती, ते अस्खलित मराठी बोलत आणि त्यांना हे पुस्तक मराठीत आलेलं पाहून नक्कीच विशेष आनंद झाला असता. ते मराठीतच नव्हे, तर अन्य भारतीय भाषांमध्येही उपलब्ध होणं महत्त्वाचं आहे.

आजच्या घडीला हे महत्त्व अनेकपटींनी वाढलं आहे. बिडवईंच्या पुस्तकात एक आशावाद आहे. इतकी कठोर टीका करूनही त्यांची अपेक्षा होती की, काहीतरी नवं आता घडू शकेल. आणि हे वाटतं तितकं विसंगत नाही. आपल्याला आपल्या भवतालाची एकच बाजू दिसते आहे. त्याला दुसरीही बाजू आहे. उजव्या प्रतिगामी शक्तींनी सत्ता काबीज केलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या कालखंडात जरी डाव्यांमुळे पूर्णपणे प्रतिवर्चस्व निर्माण झालेलं नसलं तरी भांडवली विचारपोतडीतील सर्वांत उजव्या व ‘फॅसिस्ट’ प्रवाहांना दूर ठेवून या वर्चस्वाचा कल डावीकडे ठेवण्यात त्यांना यश आलेलं होतं. आज सत्तेत असलेल्या ‘फॅसिस्ट’ शक्ती तिचा वापर करून या प्रतिवर्चस्वाच्या सर्व खुणा नष्ट करण्यात गुंतलेल्या आहेत. डाव्यांची शक्ती, त्यांचे बालेकिल्ले विखुरले गेले आहेत. पण हीच वेळही आहे. डाव्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पूर्वीच्या पद्धती सोडून देऊन नव्या पद्धतीने एकत्र येण्याला, संवाद करण्याला अनुकूल काळ आहे. एका अर्थानं, नवं काही केल्यानं गमावण्यासारखं आता काही राहिलेलं नाही, बिडवईंच्या चालीवर म्हणायचं झालं तर, हाच ‘फिनिक्सचा क्षण’ आहे. डाव्यांचं अस्तित्व इतकं महत्त्वाचं आहे की ते जर नाहीसं झालं, तर त्याची नव्यानं कल्पना करून ते उभारावं लागेल. मराठीत हे पुस्तक आल्यानं जर मराठी चर्चाविश्वात त्याभोवती चर्चा सुरू होण्यास, आणि त्याआधारे बिडवईंना अभिप्रेत असलेली संवादप्रक्रिया घडून येण्यास मदत होत असेल, तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 08 October 2018

काय हो सुहास परांजपे, तुम्ही म्हणता की महाराष्ट्रातील अभिजनांना, इथं जन्मलेल्या सर्व प्रसिद्ध व्यक्तींवर अधिकार सांगण्याची हौस असते. आयशप्पत, कोणी सांगितलं तुम्हाला हे? मी महाराष्ट्रीय अभिजन आहे. मला प्रसिद्ध व्यक्तींवर केवळ मराठी भाषिक आहेत म्हणून अधिकार सांगायला आवडंत नाही. आणि जरी आवडंत असलं तरी प्रफुल बिडवाई सारख्या देशतुच्छकाशी भाषिक सलगी दाखवलीही नसती. त्याचं काय आहे की भाषा माणसांना आपसांत जोडते. माणसामाणसांना जोडणारे नेमके असे अनेक धागे कम्युनिस्टांना तोडायचे आहेत. भारताचं एकसंध वस्त्र उसवून त्याजागी 'फोर्सेस ऑफ प्रॉडक्शन' आणि 'रिलेशन्स ऑफ प्रॉडक्शन' असली मटेरियालिस्टिक भंकस आणायची आहे. हे भारतात अजिबात शक्य नाही. आणि संतांच्या मराठमोळ्या भूमीत तर सर्वथैव अशक्यच ! बाकी, बिडवाई यांचं विश्लेषण अचूक असेलही. पण त्यांची आंतरराष्ट्रीयवादाची भूमिका जी आहे ती निव्वळ बकवास आहे. एक उदाहरण देतो. नाझींना पराभूत केलं ते रशियाने. सोव्हियेतांनी नव्हे. स्टालिनने दुसऱ्या महायुद्धाच्या काळांत कम्युनिस्ट इंटरनॅशनल ( = कॉमिंटर्न ) चक्क बंद ठेवलं होतं. पुढे १९४३ साली चक्क विसर्जित केलं. नाझींशी लढला तो रशियाचा राष्ट्रवाद आणि श्रेय मात्र उपटलं ते स्टालिनने. डाव्यांचा आंतरराष्ट्रीयवाद संधीसाधू आहे. आज इतकं पुरे. बाकीची लक्तरं सवडीनं काढेन. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......