अजूनकाही
‘मी हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिस्ती आहे, पारशी आहे....’ असं म. गांधींनी जाहीर केलं, तेव्हा महंमद अली जीना म्हणाले होते की- ‘हे फक्त हिंदूच म्हणू शकतो’! अनेक वर्षांपासून सतत बदल स्वीकारत आलेली हिंदू संस्कृती आजही ‘सर्वधर्मसमभाव’, ‘सहिष्णुता’, ‘इतर धर्मातील मूल्यांचा आदर करत’ आली आहे. आणि म्हणूनच एक समृद्ध भारतीय व्यवस्था म्हणून ती जगासमोर उभी राहते. म्हणूनच अलीकडच्या काळात हिंदू धर्मातील कट्टरवाद वाढत असताना आपण राष्ट्रीयत्वावर कोणत्याही धर्माचा स्टॅम्प लावणं कसं घातक आहे, हे आपण शेजारील राष्ट्रावरून समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळेच नेहरू-आंबेडकरांनी भारताला ‘हिंदू पाकिस्तान’ होण्यापासून वाचवलं आणि ते तसं यापुढेही वाचवलं गेला तरच ही भारतीय समाजरचना टिकून राहू शकते. त्यामुळे हिंदू म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे काय? आणि हिंदुत्ववाद म्हणजे काय? हे समजून घेणं गरजेचं आहे. अशा वेळी समोर येतं शशी थरूर यांचं ‘Why I am a Hindu’ हे नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक.
‘हिंदू’ असणं हे जगणं आहे. ज्यानं त्यानं आपला ‘स्व’ शोधण्याची पद्धत आहे. प्रत्येकाला आपलं स्वतःचं ‘सत्य’ शोधण्याची शक्ती म्हणजे हिंदू असणं. हिंदू असणं हे आपल्यात असणं गरजेचं आहे, समाजात नाही. त्यामुळेच ‘हिंदुत्व’ स्वीकारता येत नाही, कारण ते एक जगणं असल्यामुळे आत्मसात करावं लागतं. कुणाला तरी ब्रेड खायला देऊन, त्याची सेवा करून धर्म स्वीकारायला लावणं, या गोष्टीला केवळ विवेकानंदांचाच विरोध नव्हता, गांधींचादेखील होता. जर सर्व धर्म सारखे असं जग मानत असेल तर मग धर्मांतरण करण्याची ओढ का? यातून हेच दिसतं की, केवळ हिंदूच सर्व धर्म समान मानतो, म्हणून तो धर्मप्रसाराच्या भानगडीत पडत नाही.
हिंदू असण्याला कोणतीही नेमकी नियमावली नाही. तुम्ही ख्रिस्ती असाल तर तुम्हाला येशू मानावा लागतो, मुस्लिम असाल तर अल्लाह, बुद्ध असाल तर पंचशील… प्रत्येक धर्माची एक नियमित व्याख्या आणि त्याचं पवित्र पुस्तक आहे. पण हिंदूंनी नेमक्या कुठल्याही एका ग्रंथाला श्रेष्ठ मानलं असं दिसत नाही. किंवा केवळ रामाची वा कृष्णाची पूजा केली पाहिजे असंही काही बंधन हिंदू धर्मात नाही. ३३ कोटी देव असल्यानंतर नेमका एक देव कुणी का मानावा! कोणी जगन्नाथ, महादेव, बालाजी, गणपती मानतील किंवा कुणी बुद्ध, महावीर, मुस्लिम दर्ग्याला/पीराला मानलं किंवा नास्तिकता स्वीकारली तरी धर्म भ्रष्ट होत नाही आणि कुणी धर्मातून बेदखलही करत नाही. नास्तिक असणं वा चार्वाक स्वीकारणं हे ‘हिंदू स्कूल ऑफ थॉट्स’चंच वैशिष्ट्य आहे. यातूनच हिंदूंमधील ‘सर्वधर्मसमभाव’ आणि त्यातील सहिष्णुता लक्षात येते.
हिंदू धर्मातील सतीप्रथा, केशवपण या वाईट प्रथा सुधारणावादी हिंदूंनी बंद केल्या. अशा अनेक चुकीच्या पद्धतींना हिंदू सतत सुधारण्याचा प्रयत्न करत आले आहेत. हिंदू हा चिकित्सेसाठी/सुधारणांसाठी खुला धर्म आहे. इतर धर्मात चिकित्सेला वाव नाही. तसंच हिंदू धर्मातील अनेक तत्त्वमूल्यं ही बुद्ध व जैन धर्मातून घेतली गेली आहेत. उदा. गो-हत्या किंवा बीफ खाणं ‘ऋग्वेदा’मध्ये योग्य मानलं आहे. त्यामुळेच वैदिक काळात ब्राह्मणांकडून गायींच्या आहुत्या दिल्या जात. नंतर बुद्ध धर्माचं अहिंसा तत्त्वज्ञान योग्य वाटू लागल्यानंतर हिंदू धर्म गो-हत्या बंद करून शाकाहारी तत्त्वाकडे झुकला. आणि पुन्हा लोक हिंदुत्वाकडे जाऊ लागले.
व्यवसायाच्या आधारावर निर्माण झालेल्या जाती आजही घट्ट आहेत, कारण जातीव्यवस्था ही वाईट व्यवस्था असली असली तरी ती हिंदू समाज नियमित पाळताना दिसतो. जातीअंतर्गत विवाह करताना, जातीच्या परंपरा स्वाभिमानानं स्वीकारताना दिसतो. जातीव्यवस्था स्वीकारणं गुन्हा आहे असं कुणास वाटत नाही, पण जातीभेद करणं, द्वेष करणं हे वाईट आहे हे कुणीही मान्य करेल. ‘ऑनर किलिंग’चं कुणीही विवेकवादी हिंदू समर्थन करणार नाही. जाती नष्ट व्हाव्यात ही इच्छा नक्कीच सुधारणवाद्यांची राहिलीय, मग ते बसवेश्वर असतील, भक्ती परंपरा असेल. हिंदू धर्माचा नेहमीच जातींसंदर्भात सुधारणावादी दृष्टिकोन राहिला आहे.
हिंदू-मुस्लिम समाजात नेहमीच सांस्कृतिक सुसंवाद राहिला आहे. अनेक हिंदू हे पीर दर्गा मानताना आढळतात. संत कबीर हे मुस्लिम असले तरी त्यांची हिंदू भक्तीपरंपरेत मोलाची कामगिरी आहे. त्यामुळे हिंदू परंपरेत त्यांचं स्थान अढळ आहे. तसंच तिरुपती बालाजीची दुसरी बायको पत्नी नानचिरा ही मुस्लिम आहे असं मानलं जातं. अर्थात यावरून वाद आहे. पण तिला मुस्लिम मानलं जाणं आणि स्वीकारलंदेखील जाणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. वाराणसीमध्ये हिंदू पोशाख निर्मिती मुस्लिम समाज करतो, अवधचे नवाब ‘रामलीला’ कार्यक्रमाचं आयोजन पूर्वीपासून करत आहेत. अकबरानं राणा प्रताप यांच्यावर हल्ला केला, तेव्हा त्याच्या दलाचे प्रमुख ‘मानसिंग’ होते, तर राणा प्रताप यांच्या दलाचे मुख्य ‘हकीम खान सूर’ हे होते. शिवाजी महाराजांवर आक्रमण करणारा ‘जयसिंग’ होता आणि त्यांचे अनेक मावळे मुस्लिम होते. असे अनेक हिंदू-मुस्लिम संवादाचे दाखले देता येतात. त्यातून हिंदू-मुस्लिम सामंजस्य लक्षात येतं. यातून ‘मूळ हिंदुत्व’ आणि ‘राजकारणनिर्मित आजचं हिंदुत्व’ यात फरक करता येतो. त्याला आपण ‘संघीय हिंदुत्ववाद’ म्हणूनही ओळखतो.
आजचा हिंदुत्ववाद राजकीय महत्त्वाकांक्षेतून निर्माण झाला आहे. कारण ‘संघीय हिंदुत्व’ हे सावरकर, उपाध्याय आणि गोळवलकर असं गोल गोल फिरतं, पण विवेकानंदांनी जे हिंदुत्व जगभर पोहचवलं तिथवर पोहचू शकलेलं नाही. त्यांची केवळ प्रतिमा तेवढी हिंदुत्ववाद्यांनी उचलली. सावरकर गोहत्या समर्थक होते, हे हिंदुत्ववादी नेहमी लपवत आले. सोयीस्कर पद्धतीनं सावरकर-गोळवलकर आणि उपाध्याय असा हिंदुत्वाच्या नावावर खेळ करत आले. पुढे बाबरी मशिदीचा विध्वंस ते गोहत्या बंदी असे वाद निर्माण करत ‘असहिष्णू हिंदुत्व’ निर्माण करत आले. ‘कुराण’ सापडलं तर त्याचा सन्मान करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाचं रूप बदलण्याचे प्रयत्न होऊ लागले. आणि ‘हिंदुत्व म्हणजे गायीचं रक्षण करणं’ हीच व्याख्या हिंदुत्ववादी करू लागले.
या सर्व असहिष्णुतेला प्रतिसाद उत्तर भारतातून मिळत असल्याचं आपण पाहतो आहोत. पण दक्षिणेत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बीफ आयात करण्याची भाषा करतात. केरळमधील एकमेव भाजप आमदारदेखील बीफच्या बाजूनं बोलताना दिसतात. भारतात भूगोलानुरूप भूमिका स्वीकारल्या जातात, हे यावरून लक्षात येतं. अशा अनेक बाबी वेगवेगळ्या पद्धतीनं जोपासणारा समाज ‘समान नागरी’ तत्त्वात कसा बसेल किंवा एकजिनसी कसा होईल, याचा विचार हिंदुत्ववाद्यांनी करायला हवा. गायीची हत्या करू नये हे गांधींचंदेखील मत होतं. घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेलं गो-वंश वा पशुपालनाच्या संवर्धनाची जबाबदारी राज्य शासनानं उचलावी, हे तत्त्व पर्यावरणाला धरून आहे, धर्माला नव्हे, हे समजून घेणं गरजेचं आहे. कुणी गो-हत्या केली किंवा बीफ खाल्लं तर त्याला मारण्याचा हक्क घटना कुणाला देत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
वर्षानुवर्षं दलितांनी मेलेली गुरं-ढोरं ओढून त्यांपासून चामडी तयार केली, तेव्हा कुणी त्यांची हत्या केली नाही, पण अलीकडे गुजरातमध्ये गायीची चामडी करणाऱ्या युवकाची हत्या झाली. अखलाख आजच्या काळातच कसा काय मारला जाऊ लागला? गो माता पवित्र आहे म्हणून मेलेल्या गायीचं कुणा सवर्णानं शाही थाटात दहन केलं? गोमातेची सेवा आजवर दलितांनी केली, सवर्णांनी नाही, हे वास्तव आहे.
‘Why I am a Hindu’ हे शशी थरूर यांचं पुस्तक सद्यपरिस्थितीत हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद या तीन गोष्टींवर उचित प्रकाश टाकणारं आहे. ‘माझं हिंदुत्व’, ‘राजकीय हिंदुत्व’ आणि ‘पाठीमागील हिंदुत्व’ या तीन भागात विभागलेलं हे पुस्तक आजच्या घडीला ‘भारतीयत्व’ समजून घेण्यासाठी मार्गदर्शक आहे. एकही मुस्लिम नियुक्त खासदार नसलेला पक्ष सत्तेवर येणं, बीफ खाणाऱ्याच्या कत्तली होणं, दलितांवरील अत्याचार, हिंदुत्व उभं करण्यात व्यस्त असलेल्या ‘राजकीय हिंदुत्वा’ची व्याख्या ही मूलतः कशी देशविरोधी आहे आणि विविधतेत समृद्धतता असलेल्या देशात एकजिनसी समाज (समान नागरी कायदा) निर्माण करण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न सुरू आहेत, ते कसे भारतीय लोकशाहीला घातक ठरणारे आहेत, हे थरुर यांचं हे पुस्तक स्पष्ट करतं. हिंदू धर्म व समाज समजावून घेण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. भाजपच्या ‘हिंदुत्ववादा’ला उघडं पाडत मूळ ‘सहिष्णू हिंदू’ म्हणजे काय आहे, हे समजावून सांगण्यात शशी थरूर यशस्वी झाले आहेत. म्हणूनच ते म्हणतात - “मी हिंदू आहे, मी भारतीय आहे, पण मी ‘हिंदू भारतीय’ नाही.”
.............................................................................................................................................
लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.
advbaabar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 08 October 2018
बाबरबुवा, सावरकरांनी गोहत्येचं समर्थन नक्की कुठे केलंय? उगीच काहीतरी ठोकून देताय होय! बाकी, विवेकानंदांचं हिंदुत्व आणि गोळवलकरांचं हिंदुत्व वेगळं असायलाच हवंय. तुम्ही अभ्यास केलाय का दोघांचाही? नसेल केला तर करून या. सुरुवात कुठनं करायची ते सांगतो. विवेकानंदांचा जन्म इ.स. १८६३ चा व मृत्यू १९०२ चा. त्यानंतर गोळवलकरांचा जन्म झाला तो १९०६ साली आणि मृत्यू १९७३ साली. आता कळलं दोघांचं हिंदुत्व का वेगळं आहे ते? अभ्यास करोनी प्रकटावे. सध्या इतकं पुरे. आपला नम्र, -गामा पैलवान