वसंत गुर्जरानंतर ‘मला(ही) भेटले गांधीजी’!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 03 October 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi वसंत गुर्जर Vasant Gurjar गांधी मला भेटला Gandhi Mala Bhetla संघ RSS भाजप BJP काँग्रेस Congress अण्णा हजारे Anna Hajare

वसंत दत्तात्रेय गुर्जर नावाच्या बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्याला

गांधीजी भेटले. गुर्जर कवी असल्यानं त्यांनी ही भेट

‘गांधी मला भेटला’ या शीर्षकानं कवितेतून मांडली.

त्यांच्या चळवळ्या मित्रांनी ती ‘पोस्टर पोएट्री’ म्हणून छापली.

 

पुढे बँकेच्या वार्षिकात छापण्याचा मोह वार्षिकाच्या

संपादकांना झाला. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ही ‘गंमत’ 

वाचून बाजूला ठेवली. पण राष्ट्रवादी म्हणजे

हिंदू राष्ट्रवादी संघटनेला गांधींना असं एकेरीत संबोधणं

अशिष्ट वाटलं! गांधी ‘विचार’ न पटणाऱ्यांचा हा गांधी आदर

थेट कोर्टात गेला. अगदी सुप्रीम कोर्टात गेला. यात बरीच

वर्षं गेली. सुप्रीम कोर्टालाही या गुर्जर (आडनावाच्या) कवीचा

हा काव्यप्रताप अशिष्ट वाटला. राष्ट्रपिता असा एकेरीत आणाल

तर खबरदार वगैरे म्हणत दम दिला. कवी असला तरी बॉम्बे पोर्ट ट्रस्टचा

कर्मचारी असल्यानं कवी आणि संपादक आधीच माफी मागून

मोकळे झाले होते. निव्वळ दमबाजीवर कोर्टप्रकरण संपलं.

तेव्हा कवी आणि संपादकांच्या खांद्यांवर हात टाकून कोर्टातून

बाहेर पडताना मी गांधीजींना पाहिलं होतं.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

त्यानंतर थेट ते मला काल स्वत:च्या १५०व्या वाढदिवशी

राजघाटावर दिसले. राजघाटावरच्या सन्माननीय गर्दीपासून

दूर बसलेले ते मला दिसले. मी जवळ गेलो. १५० वर्षाचा वड

दिसावा तसे दिसले. शेजारी बसत मी म्हटलं, ओळखलंच नाही

तुम्हाला! तुमचा तो प्रसिद्ध चष्मा नाही डोळ्यांवर. डोळ्यांवर

हाताची सावली धरत, मला निरखून बघत, हसून म्हणाले,

‘स्वच्छ भारत’ योजनेसाठी घेऊन गेले. माहीत नाही का तुला?

वर मिश्किलपणे म्हणाले, पंचा नेला नाही धुवायला हे माझं नशीब!

 

१५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! मी म्हटलं. त्यावर

पुन्हा हसून ते म्हणाले, वाढदिवस शरीराचा. आपल्याला कसलं

आलंय वय मित्रा! आजच्या दिवसापुरतं शरीर उधार घेतलंय

शोभायात्रेतल्या एकाकडून. बाकी आत्मा भटकाच. पितृपक्ष चालू

असून आणि हिंदू राष्ट्रवाल्यांचं राज्य असून नुस्ती फुलं वाहताहेत.

कुणीच एक ‘फळ’ म्हणून ठेवत नाही समाधीवर.

मी म्हणालो, कावळ्याच्या शरीरात शिरून जेवून घ्या पोटभर.

त्यावर गांधी म्हणाले, ही कल्पना वाईट नाही. पण आज भूक नाही.

 

भूक नाही? वाढदिवसाला? केक आणू? थोडेसे वैतागून म्हणाले, तो तर

मी १५ ऑगस्ट ४७लाही खाल्ला नाही. ते तिकडे शेतकरी आलेत

मागण्या घेऊन. तर तिथला बंदोबस्त पाहून मला वाटलं, हे भारत

सरकारचे आहेत का ब्रिटिश सोल्जर? नि:शस्त्र, शांततापूर्ण, सत्याग्रह

करणाऱ्यांना असे बॅरिकेड लावून अडवलं. का? तर माझ्या वाढदिवसाचे

हे सरकारी सोहळे चाललेत त्याला डाग लागू नये. म्हणून त्यांना

राजधानीत येऊनच दिलं नाही. अरे ब्रिटिशसुद्धा चर्चेसाठी आम्हाला

इंग्लंडात बोलवत आणि या देशाचा शेतकरी देशाच्या राजधानीत येऊ

शकत नाही, स्वातंत्र्यानंतर सत्तराव्या वर्षांत? तुला सांगतो, जगातलं

कुठलंही सरकार, असं बळाचा वापरत करतं ते मला शक्तीमान न वाटता

भेकडे, भेदरट वाटतं. बिनचष्म्याच्या डोळ्यात अंगार पेटला.

 

गांधीजींना घेऊन मी महाराष्ट्र सदनात जायचा विचार करत होतो.

ते म्हणाले, हरकत नाही. पण मी जरा दुसरं शरीर बघतो. असं

 म्हणून काही क्षणात ते एका म्हातारीच्या शरीरानं आले आणि म्हणाले,

चल! खादीच्या साडीतली कस्तुरबाच वाटली मला. तसं म्हटलं तर गाधी

सुखावून म्हणाले, बा म्हणत असेल मेल्यावर तरी सोडा मला! सदनाचं

वैभव बघून गांधी म्हणाले, श्रीमंत महाराष्ट्र सदन!

 

जेवणानंतर यमुनातीरी मूळ अवतारात येत म्हणाले, अरे ते

‘मी नथुराम बोलतोय’ नाटकाचे प्रयोग चालू आहेत का महाराष्ट्रात?

नाटकाचे प्रयोग थांबलेत, पण ‘नथुरामां’चे प्रयोग चालू आहेत.

ते दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेशबद्दल माहितीच असेल

तुम्हाला. खिन्न होऊन गांधी म्हणाले, मला वाटलं विचार विरोध

माणूस मारून करायचा ते माझ्यानंतर संपेल. स्वतंत्र देशात, लोक

अधिक अभ्यासू, प्रगल्भ आणि सहिष्णू होतील. नाही. त्यांना तोडत

मी म्हणालो, उलट तुम्हाला मारणारी विचारसरणी आता अधिक

आक्रमक व हिंसक झालीय. ‘अहिंसा’ हा विनोदाचा विषय झालाय.

रक्ताची तहान लागलीय देशात सध्या.

 

‘स्वच्छ भारता’साठी माझा चष्मा नेला तेव्हा मला वाटलं होतं,

ते निव्वळ रस्ते, इमारती, नाही तर दृष्टीही स्वच्छ करून घेतील.

त्या कुणा हिंदी विडंबन कवीनं चांगलं वर्णन केलं त्या चष्म्याचं-

जहाँ स्वच्छ है वहाँ भारत नहीं, जहाँ भारत हे वहाँ स्वच्छ नाही.

गांधी पुन्हा बोलू लागले-

 

गांधी घराण्याचा उद्धार होतो तेव्हा मला हसू येतं रे! गांधी जरा

सैलावत म्हणाले, म्हणजे बघ, इंदिरेला फिरोज आवडला. तिला लग्नच

करायचं होतं. पण जवाहरला ते पसंत नव्हतं! शेवटी मी समजावलं त्याला.

आणखी एक केलं मी. फिरोज दारूवालाचं, फिरोज गांधी केलं. अशी

ती नेहरूची गांधी झाली. आजच्या मुलींसारखी ‘इंदिरा नेहरू’ किंवा

‘इंदिरा नेहरू-गांधी’ असं लावायची पद्धत नव्हती तेव्हा. असं ते गांधी

कुटुंब तयार झालं. माझं स्वत:चं कुटुंब सत्तेत नाहीच! आणि त्या

जवाहरवर किती राग तो! त्याचं नामोनिशाण पुसायला निघालेत माझा

आणि वल्लभभाईंचा जयजयकार करत. म्हणजे यांना ना इतिहास कळाला

ना नेहरू, गांधी, पटेल.

 

नंतर माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, बरं तुला एक

सांगतो. आपण भेटलो, बोललो यावर त्या वसंतासारखी

कविता वगैरे लिहू नकोस. लिहिलीस तरी आन्नासारखा

एकेरीत उल्लेख करू नको. दिवस वाईट आहेत. एका रात्रीत

मला नोटेसकट नाहीसं केलं तर तुझं काय करतील!

 

त्या रात्री काय वाटलं तुम्हाला? मी उत्साहात येत विचारलं

नोटबंदीवर मला काय वाटणार? माझ्या इच्छेनं काही होतं?

नोटेवर मी आलो तेव्हा मला वाटलं आपण ती राणी, पंचम जॉर्ज

वगैरेसारखं चलनावर यायला हा लढा दिला होता? काळा पैसा

आणि मी दोघं एकत्रच बाद होणार होतो. प्रत्यक्षात मी एकटाच

बाद झालो. मिळेल त्या दारानं काळा पैसा दोन हजाराची गुलाबी

साडी नेसून पुन्हा नाचायला लागला की! आता गुजरात आणि

वर्धा इथं दारूबंदी आहे, हे सांगताच लोक गालात हसतात. यातच

सगळं आलं. ‘सत्य’ ही फारच कठीण गोष्ट आहे. माझ्या विचारांचा

पाया त्यात आहे. असा चष्मा, भजनं, झाडू आणि घोषणांत नाही.

 

पण आता वर्षभर तुमचा १५०वा वाढदिवस साजरा होणार आहे

शिवाय त्यातच निवडणुकाही येताहेत. आता दोन्ही प्रमुख पक्षांनी

तुम्हाला ताब्यात घेतलंय. सेवाग्रामात काय घडलं पाहिलंच असेल

तुम्ही. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे, तुम्ही राष्ट्रपिता आहात. तुमच्यावर

केवळ काँग्रेसची मालकी नाही. गांधी विचार सर्वांचा आहे. उलट

सत्ता गेल्यावर काँग्रेसला गांधी नि सेवाग्राम आठवलंय.

 

यावर एक दीर्घ श्वास सोडत गांधी म्हणाले, सेवाग्राम, ठिकठिकाणची

गांधी भवनं आणि खादीतले गांधीवादी यांना काही लोक ‘गांधींच्या

विधवा’ म्हणतात ते बरोबर आहे. वास्तू, वस्तू यात मी नाही. मला

तिथून बाहेर काढून दूरवर पोहचवणं अभिप्रेत होतं, आहे.

 

हे आजचे सत्ताधारी मला राष्ट्रपिता म्हणून माझे विचार

सर्वांचे म्हणतात, तेव्हा मला जरा दचकायला होतं. कारण परवा

तीन दिवस मी भागवतांना ऐकलंय! काय म्हणता? मी आश्चर्यानं

विचारलं. एका स्वयंसेवकाच्या शरीरात शिरलो आणि बसलो!

जिथं जायचं तर स्वयंसेवकाचेच शरीर लागणार होतं. कारण तीन

दिवस मुकाट बसायचं तर ते त्यातूनच जमणार होतं!

 

आता मला सांग हे लोक म्हणतात माझा विचार अंगीकारणार.

पण त्या कार्यक्रमात ते भागवत म्हणाले गुरुजींचं विचारधन

संपादित करून पुनर्प्रकाशित करणार! म्हणजे हे गुरुजींचे विचार

दुरुस्त करणार! मला नाही पटलं ते. गुरू असला तरी तो गुण-

दोषासह स्वीकारावा. उद्या माझे सत्याचे, ब्रह्मचर्याचे प्रयोग

कुणी संपादित करून मला ‘बेदाम’ दाखवायचा प्रयत्न केला तर

मला नाही चालणार! आणि माझ्या कुणा शिष्यानं असं दुरुस्त

करायचा प्रयत्न केला तर तो शिष्य कसला, तो ‘सत्याचा’ मारेकरी

वाटेल मला. त्यामुळे ‘संघ’ मला आपलंसं करायचा प्रयत्नो करतो

तेव्हा मला माहीत असतं, मी जवळ करायला ठीक, पचायला कठीण.

तसंही त्यांना सोयीचं तेवढं घ्यायची सवय आहेच. जसा निव्वळ चष्मा!

 

मग हे तुम्ही सगळं भागवतांना सांगितलं का नाही बाजूला घेऊन?

वेड्या! मी स्वयंसेवकाच्या शरीरात होतो आणि संघात प्रश्न विचारत

नाहीत! आम्ही दोघांनी एकमेकांना टाळी दिली.

 

हळूहळू रात्र होत गेली. मला भूक लागली. गांधी रात्री फळं नी दूध

यावर आजही राहतात. मी म्हटलं आत्म्याला भूक लागते?

ते म्हणाले, शरीराला लागते आणि मी शरीरं वापरतो.

 

मध्यंतरी मी काही मुसलमान आणि दलितांच्या शरीरातून

वावरलो आणि अमानुषपणा काय असतो हे अनुभवलं.

आजही तोच विद्वेष, तीच वर्चस्ववादी मानसिकता आणि

काय ते देशद्रोही आणि नक्षलवादी वगैरे. तो सगळा

हैदोस बघून, अनुभवून वाटलं भगतसिंगाचं शरीर घेऊन

पार्लमेंटच उडवावं! तुला सांगतो डॉ. आंबेडकर हा माझ्यापेक्षा

ग्रेट माणूस. त्यांनी ठरविल्याप्रमाणे ते हिंदू धर्मीय म्हणून

महानिर्वाणाला गेले नाहीत. त्यांनी बुद्ध धम्माचा जो स्वीकार

केला ना, त्यामुळे हा देश अखंड राहिला. हिंदुस्थानची गंगा जमनी

संस्कृती राहिली. सहिष्णूतेची, परिवर्तनाची परंपरा कायम राहिली.

हिंदू राष्ट्राचं विद्वेषी स्वप्न पाहणाऱ्यांना हे कळत नाही की जर का

बाबासाहेबांनी इस्लाम स्वीकारला असता तर आज या सर्वांना

पाकिस्तानी हिंदुस्थानात राहावं लागलं असतं. यांना काय कळणार

रे गांधी, नेहरू, पटेल, सुभाष, आंबेडकर आणि विवेकानंदही?

हे कुठल्या लढाईत होते? यांनी कसलं समर्पण दिलं?

 

शेवटी एका ठिकाणी टेकत म्हणाले, येत्या वर्षभरात मी लिहिलेलं

पाठ्यक्रमात बदल न करता आणून दाखवावं यांनी. राष्ट्रपिता म्हणे!

 

निरोपाच्या वेळी विचारलं, आता कुठे जाणार? पापणी लवायच्या

आत म्हणाले, पाकिस्तानात! माझ्या विचारांना तिकडेच जा म्हणतात

ना हल्ली! असं म्हणून झपाझपा ते दिसेनासे झाले.

...............................................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Ram Jagtap

Thu , 04 October 2018

@ rajesh m - चला, अखेर तुम्हाला "आत्मसाक्षात्कार" झाला म्हणायचा, हेही नसे थोडके! अशीच तुमची विदवता झळाळत राहो!


rajesh m

Thu , 04 October 2018

सर, आपण आपल्या संकेतस्थळाची काळजी जमली तर घ्या, आमच्या स्क्रझोफेनियाची फिकीर करू नका. आफल्यालाच बहुधा अशा मानसिक आजाराची लागण झालेली असावी. असो. इत्यलम.


Ram Jagtap

Thu , 04 October 2018

@ rajesh m - जगात आपणच तेवढे विद्वान या भ्रमातून लवकर बरे व्हा! नाहीतर स्किझोफ्रेनिया होईल तुम्हाला. तुमच्या आधी गुर्जर यांच्या जवळच्या व्यक्तीने काही तपशील चुकले असल्याचे लक्षात आणून दिले होते. दरम्यान माझ्याही लक्षात आले. लेख संपादित करताना कुणीही संपादक प्रत्येक वेळी प्रत्येक fact चेक करू शकत नाही. अनेकदा तेव्हा त्याच्या ते लक्षातही येत नाही. नंतर येते. पण हे तुमच्यासारख्या स्वयंघोषित कुठून समजणार! उचलली जीभ लावली टाळ्याला असा तुमच्यासारख्याचा एकून धंदा असतो.


rajesh m

Thu , 04 October 2018

वा रे वा! आपल्या चुकीची मोकळेपणाने कबुली देणे तर दूरच. समोरच्या व्यक्तीलाच उद्धट/उर्मट अशी बिरुदे लावण्यात आपल्याला समाधान लाभत असेल, तर उत्तम आहे! माझ्या कॉमेन्टमधील सर्व उल्लेख लेखाविषयीचे मतप्रदर्शन करणारे होते. आपल्याला मात्र वैयक्तिक शेरेबाजी करण्यात अधिक रस असल्याचे दिसते. यावरून खरे तर आपल्यालाच सार्वजनिक सभ्यतेचे भान नसल्याचे दिसते. लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी संपादकीय संस्कार करण्याचे भान नसलेल्या व्यक्तीने इतके आक्रमक होणे म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार असेच म्हणावे लागेल. या निमित्ताने आपले या संकेतस्थळावरील काही लेख वाचले. त्यावरून प्रतिक्रिया देण्याचा माझा निर्णयच चुकीचा असल्याचे आता वाटते आहे. आपली वृत्ती पोकळ पवित्रे घेण्याची दिसते आहे. अशी मनोवृत्ती निंदनीय आहे. एका लेखावर संबंधित वाचकाने उल्लेख केला आहे की, आपले लेखन म्हणजे आपल्याच शब्दप्रयोगाप्रमाणे हिताची प्रायव्हेट लिमिटेड स्वरूपाचे असते. एकमेकांची पाठ थोपटून घेणारी कंपूशाही असल्यावर माणसाला असा फाजील आत्मविश्वास येतो. आपल्याला यात समाधान मिळत असावे. असो.


Ram Jagtap

Thu , 04 October 2018

@rajesh m - ज्या व्यक्तीला आपल्या मर्यादा आणि सार्वजनिक सभ्यतेचे किमान संकेत कळत नाहीत, तिने नैतिकतेच्या गमज्या करू नयेत.


rajesh m

Thu , 04 October 2018

चुका तुमच्याही लक्षात आल्या होत्या असे असेल, तर आपण त्या लेख प्रसिद्ध करायच्या आधी दुरुस्त करायला हव्या होत्या. नंतर मखलाशी करण्यात काय हशील. माझ्या प्रतिक्रियेची दखल न घेतली तरी चालले असते. दुरुस्ती केल्याची औपचारिक टीप करणे, संपादकीय नैतिकतेला धरून असते. असो. आपले सोंग आपल्यापाशी. शुभेच्छा.


Ram Jagtap

Thu , 04 October 2018

@ rajesh m - जगात आपणच तेवढे विद्वान आहोत या भ्रमातून तुम्ही कधी बाहेर येणार? तुमच्या कितीतरी आधी त्या चुका इतरांच्याही लक्षात आल्या होत्या (आणि त्यांनी त्या आम्हाला नम्रपणे कळवल्याही.) आणि माझ्याही. त्यातील ज्यांची खात्री पटली तेवढ्याच दुरुस्त केल्या आहेत. माणूस विद्येने नम्र होतो, उर्मट/उद्धट होत नाही. पण तुम्ही बहुधा याला अपवाद दिसता. आधी मर्यादा आणि सभयता पाळून लिहायला शिका.


rajesh m

Thu , 04 October 2018

माझ्या प्रतिक्रियांनंतर योग्य बदल वरील लेखात केलेला दिसतो आहे. संपादक महाशयांना वाचकांनी सुचवलेल्या दुरुस्त करताना त्या सूचनेची औपचारिक दखल घेण्याइतकी सभ्यता दिसत नाही. संजय पवार यांनाही अशी दखल घेऊन उचित प्रतिसाद द्यावा वाटला नाही, यावरून त्यांचा लेखकराव झाल्याचे स्पष्ट होते. असो. अक्षरनामावर आता पुन्हा येणे नाही.


rajesh m

Wed , 03 October 2018

त्याचबरोबर या खटल्यात कवीने माफी मागितलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा खटला कनिष्ठ न्यायालयाकडे पुन्हा वर्ग केला आहे. यासंबंधीच्या बातम्या पवारांनी एकदा शांतपणे वाचाव्यात. बेताल लेख लिहिण्यापेक्षा थोडे स्वतःचे वाचन वाढवावे. परंतु, असे होणार नाही. आम्ही साधे जीवन जगणारे वाचक आणि हे लेखकराव, त्यामुळे हे असे उथळ तारे तोडतच राहाणार.


rajesh m

Wed , 03 October 2018

वसंत दत्तात्रेय गुर्जर बँकेत नोकरीला नव्हते. आपल्या कर्मचाऱ्याची कविता बँकेने प्रकाशित केली, असे हे प्रकरण नाही. असो. कवितेवर खटला दाखल करणारे हिंदुत्ववादी ढोंगी आणि हिंसक आहेत. परंतु पुरेशी माहिती न घेता अनेकदा उथळ चुका करणारे संजय पवार कोणतीही सकारात्मक कृती करत नसून हिंदुत्ववादी ढोंगाला सोईची स्पेस वाढवत आहेत. असो. आता पवार यांनी लिहिलेली वरील संहिता कविता आहे, असे मानून त्यात आलेला गुर्जर कवी गुर्जरपेक्षा भिन्न आहे, असे मानून घ्यायचे असल्यास आपले आपल्याला लखलाभ. या पूर्वी खैरलांजीवरील लेखातही पवार यांनी पीडितांची नावे चुकविली होती, गुन्ह्याच्या स्वरूपाबाबतही त्यांचे अज्ञान असल्याचे तेव्हा निदर्शनास आले होते. अशा प्रकारच्या लिखाणाने उजव्या विचारसरणीच्या ढोंगी प्रचारकांचे फावते.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......