कविता महाजन : आमचा दादामाणूस
पडघम - साहित्यिक
धनंजय चिंचोलीकर
  • कविता महाजन (५ सप्टेंबर १९६७ - २७ सप्टेंबर २०१८)
  • Sat , 29 September 2018
  • पडघम साहित्यिक कविता महाजन Kavita Mahajan

तिचा फोन येतो. ‘ऐसी अक्षरे’चा विषय असतो. तिचा फोन म्हणजे तासाभराची फुरसत असते. विषय बोलून झाल्यावर मग ती तिच्या नव्या कामांविषयी, प्रकल्पांविषयी काहीकाही सांगत राहते. आपण ऐकत राहतो. अधूनमधून एखादा प्रश्न विचारतो. तोही विषय संपल्यावर मग गाडी नेहमीच्या विषयावर येते. त्याला जोडूनच ती दोन-पाच शिव्याही आपल्याला हासडते. आपण हसून घेतो.

गेल्या दहा वर्षांत आपल्यात आणि तिच्यात जो काय प्रत्यक्ष आणि फोनवर संवाद झालेला असतो, त्यात एक विषय हमखास असतो. ती म्हणत असते, ‘अरे, बाकी खूप झालं, आता कादंबरी लिही रे.’ मग आपण नेहमीचं ठरलेलं उत्तर देतो, ‘कविता, मला एवढं दीर्घ पल्ल्याचं लिहिणं शक्य नाही. माझी तेवढी कुवत नाही.’ मग त्यावर ती म्हणते, ‘ठिकै, चल, कादंबरीलेखनावर मी तुझी कार्यशाळा घेते. काही टीप्स देते. भेट एकदा. बस्स!’  त्यानंतर प्रत्यक्ष भेटीही होतात. कधी राजहंसच्या कार्यालयात, कधी श्याम देशपांडेंच्या घरी. प्रत्यक्ष भेटीत तर झाडाझडतीच होते. 

तर मग या वेळेसच्या गप्पात आपण जरा विषयांतर करायचा प्रयत्न करतो. गंभीर आवाज काढत म्हणतो, ‘कविता तुझ्याबद्दलचं एक डेंजर गुपित कळलंय मला. वाईट याचं वाटतं की, तू हे आमच्यापासून लपवून ठेवलंस. कुणालाच कळू दिलं नाहीस. ऐकूनच धाप लागलीये मला तर.’ 

ती म्हणते, ‘कोणतं रे? जरा मलाही कळू दे.’

आपण म्हणतो, ‘मला असं कळलंय की, तुला चार हात आहेत. एका हातानं तू चित्र काढतेस, दुसऱ्या हातानं कविता लिहितेस, तिसऱ्या हातानं तुझं कादंबरी लेखन चालू असतं. चौथ्या हात अनुवाद करत असतो. शिवाय हे चालू असताना तू एकाजागी नसतेसच. तुझे पाय प्रवासात असतात आणि तोंडानं कुणाला तरी रेसिपी डिक्टेट करत असतेस. आम्हाला प्रश्न असा पडतोय की, एवढं काय काय करूनही तू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह कशी असतेस?’ 

ती खळखळून हसते. मग म्हणते, ‘तुझ्यातला बबऱ्या बोलतोय का रे हे? किमान त्याला तरी कादंबरी लिहायला सांग.’

खरं तर कवितानं ज्या परिस्थितीत, ज्या ताकदीनं, जेवढं काही काम केलेलं आहे, त्यासाठी चार हातही अपुरे होते. 

...............................................................................................................................................................

तिच्याशी झालेल्या त्या शेवटच्या गप्पातला तिच्या खळखळून हसण्याचा तुकडा आता आपल्या डोक्यात घुमत असतो. तिनं जपून ठेवलेला मराठवाडी टोन राहून राहून आठवत राहतो.

...............................................................................................................................................................

‘बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी’ या आपल्या पुस्तकानंतर खऱ्या अर्थानं तिच्याशी ओळख झालेली असते. एके दिवशी तिचा फोन येतो. पहिल्यांदाच. नंबर अनोळखी असतो. आपण उचलतो. तिकडून ती आपलं नाव सांगते आणि लगेच बोलायलाही सुरू करते. पुस्तकातल्या कितीतरी तुकड्यांबद्दल. वाचून खूप हसल्याबद्दल. डिट्टेलवार. रसरसून. नंतर भाषेबद्दल. त्यातल्याच ‘कुचुंद्या’ शब्दाबद्दल. तिला कुतूहल असतं, या लेखनात आंध्र-मराठवाडा बॉर्डरवरचा हा शब्द आला कसा? औरंगाबादकडे तर हा शब्द नाही. मग आपण सांगत राहतो त्या शब्दाची इवलीशी गोष्ट. बायकोचं आजोळ तिकडचं, बोधनचं. सासूसोबत आलेत काही शब्द तिकडचे. ते वापरण्याचा मोह आवरत नाही मग. ‘पिप्पी’ हा शब्दही तसाच, तिकडून आलेला. ती हसते. 

‘कुचुंद्या’ शब्दाशी तिचं भावनिक नातं असतं. तिनं अगदी लहानपणी कधीतरी तो शब्द ऐकलेला. इतक्या दिवसानंतर तो भेटल्यानं ती आनंदून गेल्याचं सांगते. त्या शब्दानं तिच्या आठवणी जाग्या होतात. आपलं आणि तिचं मग असं शब्दाचं नातं बनतं. खरं तर ‘कुचुंद्या’ हा शब्द गॉसिप / लावालावीसाठी वापरला जातो, पण तोच शब्द आपल्याला मैत्रीसाठी उपयोगाला येतो. अमूक एका शब्दाच्या अर्थापेक्षा त्याचं खूप वर्षानंतर भेटणं हे कुणीतरी जिव्हाळ्याचा आप्त भेटण्यासारखं असतं, हे आपल्याला कळायला लागतं. तिच्या आनंदण्यानं आपण भारावून जातो.

खरं तर हा पहिलाच फोन असतो. तिचं नाव मोठं असतं. आपण बुजलेलो असतो. नुसतंच ऐकत असतो. तिला ते कळतं. ती बोलतं करायचा प्रयत्न करते. आपण गडबडतो. शेवटी ती गमतीनं म्हणते, ‘मी आता तुझी ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर. इकडे तुझ्या पुस्तकाचा डंका पिटणार. बघ जरा मानधन वगैरे देणार असशील तर.’ आणि मग खळाळून हसते. आपणही हसून बघतो.

पुढे मग भेटी-फोन होत राहतात. आपली भीड चेपत जाते. तिच्याशी खेचणं-खिदळणं सुरू होतं. आपलं काही वाचनात आलं की, तिचा फोन येत राहतो. आपण बोलत राहतो. मग कधीतरी गप्पागप्पात ती कादंबरीचं बोलते आणि प्रत्येक वेळी टोचत राहते. आपण हसून जिरवतो. 

कधीतरी आपण फेसबुकवर येतो. ती असतेच तिथं. मग रोजच होत राहते भेट. तिचा हक्काचा एक लाईक आपण गृहित धरलेला असतो. कधी कॉमेंटही. ती त्याला चुकत नाही. लिहिणाऱ्याच्या आयुष्यात असतात असे काहीजण की, लिहिताना त्यांना काय वाटेल याचा विचार येतो. अशा काही चेहऱ्यांत मग कविताही असते. तिच्या सूचना असतात अधूनमधून. चिंकीची पोस्ट वाचून ती म्हणते, ‘तू मुलांसाठी का लिहीत नाहीस? चिंकी आणि झाड असं काही लिही.’ आपण म्हणतो, ‘कविता, छोट्यांसाठी लिहिणं अवघडै. भाषेवर फार कमांड पाहिजे.’ मग ती आपल्याला जोयानाचं सांगते. आणि यथावकाश ‘नाही नाही’ म्हणतो म्हणून चार शिव्याही हासडते.

आपल्याला ताप आलेला असतो. काहीतरी विचित्र आठवत राहतं. यथावकाश आपण तापातल्या ग्लानीवर पोस्ट टाकतो. त्यावर तिची कॉमेंट येते, ‘आमच्याही घरी हेच सुरू आहे. काल संध्याकाळी माझं थोडं उतरलं आणि दिशाला चढलं. सणकून ताप, भ्रम, भासावळी. घरात माणसं फिरताहेत, सावल्याच सावल्या... असं काहीही सुरू होतं... आहे. संपावं लवकर.’ आपल्याला ‘भासावळी’ शब्द प्रचंड आवडतो. तोच रुतूनच बसतो मनात, भयानक. त्यातल्या शेवटच्या वाक्याकडे आपलं लक्षच जात नाही. ‘संपावं लवकर’ असं संपत असतं लवकर? 

...............................................................................................................................................................

दोन दिवस जातात आणि लक्षात येतं, कविताच दिसत नाहीयेय फेसबुकवर? कामात एवढी गढलीये? तिला शोधतो आपण. कुठे दिसते आहे काय? नाही दिसत. तिचीही पोस्ट नसते. असेल, येईल...

आपण निवांत लवंडलेलो आणि कविता गेल्याचा फोन येतो. ऐकून हादरून जातो. काही क्षण काही कळतच नाही. नकळत फेसबुक उघडू पाहतो, खात्रीसाठी; पण हिंमत होत नाही. तिचा तिथं कायमचा वावर. आज ती नसणार. चुकून तिची एखादी पोस्ट मात्र दिसत राहणार. शिवाय तिच्या नसण्याच्या बातम्यांनी आणि भावपूर्ण श्रद्धांजलीनं सगळ्या वॉल भरून असणार. पण मग हिंमतीनं उघडतो आपण फेसबुक. अजून सगळीकडे बातमी पोहोचलेली नसते; पण चाहुल लागलेली दिसत असते. तसं वाटायला लागतं. पेपर उद्या येणार असतात, टीव्ही आपण बघत नाही. फोनवरच्या बातमीवर आपण जाणूनबुजून विश्वास ठेवत नाही. मग यथावकाश कुणीतरी पोस्ट टाकतं, ती गेल्याची. वाचल्यावर दाटून येतं. हातपाय गळाल्यागत होतं.

माणूस गेलं की, बरंच काही हमसून हमसून आठवायला लागतं, जे एरवी कधी आपल्याला आठवतही नसतं. आपल्याशी संबंधित गोष्टी तर झरझर समोरून जायला लागतात. आपणच गेल्याचं वाटत राहतं आपल्याला. जोरजोरात रडावं वाटतं. मग आपण फेसबुकचाच सहारा घेतो. तिच्याविषयी दिसेल त्या पोस्टवर सॅड टाकत सुटतो. जरा हलकं वाटतंय असं वाटायला लागतं; पण तसंही नसतं. आजूबाजूची माणसं कमीकमी होत असताना दु:खात सामील व्हायला, दु:ख शेअर करायला आणि स्वत:चीच समजूत घालायला सध्याच्या काळात सोशल मीडियाच आपल्याला सहारा असतो. त्याच्याच खांद्यावर डोकं टेकवून आपण हुंदके देतो.

मग आपल्याला वाटतं दोन ओळी लिहाव्यात. आपणही लिहितो. कविताची आपल्या मनातली इमेज अशी असते की, तिच्याबद्दल कुणी असं गळे काढलेलं तिला आवडलं नसतं. मग आपण फारच नाटकी वगैरे आहोत असं आपल्यालाच वाटायला लागतं. दरम्यान, तिच्या मृत्युपत्राची गोष्ट कळते. मग आणखीच भयाण होतो आपण. माणूस एवढा पुढचा विचार करू शकतो?

आणि नंतर फेसबुकवर कविताच्या आठवणींचा ओघ सुरू होतो. त्यात आपण वाहून जातो. तऱ्हेतऱ्हेच्या आठवणी, प्रसंग, फोटो. आपल्याला चकित व्हायला होतं. ही बया एवढं प्रचंड काम करत होती, लिहीत होती आणि पुन्हा प्रत्येकाशी एवढी मैत्री ठेवत होती. एवढ्या लोकांशी तासतासभर बोलत होती तर लिहीत कधी होती? केवढे लोक जपले होते तिनं. बरं नुसतीच मैत्री नाही, त्याच्यासंबंधातल्या साऱ्या गोष्टींची चौकशी. अजून तर आणखी खूप काही काही लिहून यायचंय. आहे तेच वाचून थरारून जातो आहोत आपण. 

आळंदीच्या संमेलनाच्या काळात तिचा एक लेख वाचलेला असतो आपण- ‘आम्ही लाचारांच्या फौजा.’ सलाम असतो आपला तिच्या त्या बेधडक लिहिण्याला. कंपूशाहीनं बरबटलेल्या आपल्या साहित्यकारणासगट साऱ्यांवर आसूड असतो त्यात. हे लिहिण्याची कुवत कवितातच असते. कविता आपली दादामाणूस असते! 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......