अजूनकाही
शरत कटारिया दिग्दर्शित ‘दम लगा के हैश्शा’ने (२०१५) भारतीय चित्रपटप्रेमींना चकित केलं होतं. त्याला केवळ नव्वदच्या दशकात वाढलेल्या पिढीचा नॉस्टॅल्जिया इतकंसं कारण नव्हतं. तर त्यानं मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबाकडे, (बहुतांशी वेळा) त्यातील चार वेगवेगळ्या दिशांना तोंड असलेल्या स्वभाव असणाऱ्या सदस्यांकडे ज्या नजरेनं पाहिलं होतं, जे बारकावे टिपले होते, ते त्या आश्चर्याचं मुख्य कारण होतं. कारण फार अपवादानंच कुठल्याही वर्गाचं इतकं चपखल चित्रण होतं. त्याचा मांडणी पाहता तो अपघाती नव्हता हे तर स्पष्ट होतंच. आता ‘सुई धागा’नं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे, इतकंच.
मौजी (वरून धवन) हा शिलाई मशीनच्या दुकानातील कामगार असतो. आपल्या बापाच्या धाकामुळे (आणि सदर कामातील अपयशामुळे) उदरनिर्वाह करण्याचा, शिवणकामाचा आपला वडिलोपार्जित व्यवसाय न करता नोकरी करत असतो. ममता (अनुष्का शर्मा) या आपल्या पत्नीशी लग्न झाल्यापासून जागेअभावी हातात हात घ्यायचीही बोंब असते. सकाळची सुरुवात बापाच्या (रघुबीर यादव) शिव्या खाण्यापासून होते. दिवस मालकाच्या मुलाकडून आपलं हसू करवून घेण्यात जातो. एवढं सगळं असूनही तो ‘सब बढिया है’ हे आपलं ब्रीदवाक्य मानत, चेहऱ्यावर स्मित ठेवून वावरत असतो. अब ऐसा कॅरेक्टर हो तो कैसे ना उससे प्यार हो?
‘सब बढिया’ असणाऱ्या त्याच्या आयुष्यात समस्या निर्माण होते त्याच्या आणि ममताच्या स्वाभिमानामुळे, खासकरून ममतामुळे. मालकाचा मुलगा, प्रशांतच्या लग्नात त्याच्यासोबत झालेला दुर्व्यवहार पाहून ममता दुखावते. हे दुःख स्वतःसाठी नसलं तरी आपल्या नवऱ्याच्या विनाकारण होत असलेल्या अपमानाबाबत अधिक असतं. ती कुठल्याही परिस्थितीत, कशीही राहू, जगू शकते. मौजीच्या पाठीशी उभी राहू शकते. मात्र त्याचा अपमान सहन करू शकत नाही. ती ‘अनकंडिशनल लव्ह’ या संज्ञेचं (किंबहुना अखंड भारतीय स्त्री जमातीचं) मूर्तीमंत उदाहरण असतं. ती मौजीची ‘पार्टनर इन क्राईम’ असते.
मौजीचे वडीलही पूर्वी टेलर होते. मात्र त्यातील अपयशानं म्हणा किंवा आर्थिक टंचाईमुळे म्हणा, पण ते नोकरीकडे वळाले. त्यामुळे तेही त्यांच्या मते योग्यच आहेत. आर्थिक अस्थैर्य असलेल्या व्यवसायापेक्षा त्यांना नोकरी अधिक चांगली वाटत असेल यात नवल नाही. त्यातही पुन्हा माणूस विरुद्ध मशीन युगात तर शिवणकामासारख्या व्यवसायाबाबत तर हे अस्थैर्य अधिकच.
मौजीची आई (यामिनी दास) एकीकडे भारतीय स्त्रियांचे क्लिशे घेऊन समोर वावरते आणि दुसरीकडे त्यांना फाटा देते. म्हणजे नवऱ्याला आणि मुलाला एकापाठोपाठ एक चहाचे कप देत असताना, हृदयविकाराचा झटका आल्यावरही हातातील पातेलं बाजूला न ठेवणारी ‘ती’ मालिका पाहत नाही, त्या पाहताना रडत नाही. मालिका पाहताना रडतो तो तिचा पती. आणि त्याच्याकडून तिला रस नसणाऱ्या मालिकांचा धावता आढावा घेते ती ‘ती’. मात्र ती आजारी पडल्यावर संपूर्ण घराचं चक्र बिघडणं तिच्या कुटुंबाचा कणा असण्याचं द्योतक आहे. ‘सुई-धागा’ असाच आहे. एकाच वेळी पारंपरिक आणि अपारंपरिक गोष्टी करणारा.
आपल्या स्वाभिमानापायी, ममताच्या रूपातून स्वतःच्या मनातील आवाजाला मूर्त रूप मिळाल्यावर मौजी नोकरी सोडतो. पुढे बरेच खाचखळगे, कौटुंबिक समस्यांतून जात तो काहीशा अपेक्षित असलेल्या ठिकाणी येऊन पोचतो. मात्र या अपेक्षित कथानकात दिग्दर्शकीय दूरदृष्टी आणि अलवारपणे फिरणारा कॅमेरा या गोष्टी एरवी साध्या वाटणाऱ्या कथानकात अनपेक्षित इनपुट्स देतात. ज्यामुळे ते अधिक परिणामकारकपणे, अधिक सिनेमॅटिकली आपल्यापर्यंत पोचते.
धवन ‘ऑक्टोबर’नंतर पुन्हा एकदा विश्वासार्ह परफॉर्मन्स देतो. अनुष्का धवनहून अधिक प्रभावी ठरते. प्रत्येक यशानंतर तिच्या चेहऱ्यावर उमटणारं हास्य आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवत असेल तर ती प्रभावी असणार यात नवल नाही. रघुबीर यादव आणि यामिनी दास दोघंही प्रभावी आहेत. अनु मलिक वरून ग्रोव्हर आणि शरत कटारिया या दोघांसोबत लल्लनटाप काम करतो. टायटल साँग आणि इतरही गाणी मनात रेंगाळणारी आहेत.
‘सुई-धागा’ अनेक गोष्टी बारकाईनं टिपतो आणि मुख्य म्हणजे अंमलात आणतो. चित्रपटात मौजीच्या खांद्याला खांदा लावून चालणारी ममता त्याचा आतला आवाज आहे. त्याला (सुरुवातीला) घरातून मिळणारा विश्वासाचा, प्रेरणेचा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे श्रेयनामावलीत आपलं नाव आधी न येण्याचं अघटित घडू नये म्हणून एकत्र काम न करणारे सुपरस्टार्स पाहिलेल्या आणि असलेल्या या इंडस्ट्रीत ‘सुई-धागा’ अनुष्काचं नाव धवनच्या आधी समोर आणतो. कदाचित तिथेच त्यानं अर्धी बाजी मारलेली असते.
‘नायिका चालताना नायकाच्या मागे पडली आहे’ असं दृश्य इतर चित्रपटांमध्ये कसं दिसलं असतं? उत्तर साधं आहे - ‘दोघंही एकापाठोपाठ एक चालताना दिसतील अशा प्रकारे चित्रण करावं’. पण नाही. दिग्दर्शक कटारिया आणि सिनेमॅटोग्राफर अनिल मेहता असं करणार नाहीत. ते दोघे नायकाला पुढे जाताना दाखवतील, मग नायिकेच्या झपाझप पुढे पडणाऱ्या पावलांचा समांतरपणे मागोवा घेत; कॅमेरा ती नायकाच्या सोबतीला येईपर्यंत तिच्या बरोबरीनं चालवतील. दृश्य साधं आहे, अर्थ गहन आहे. स्त्री सक्षमीकरण किंवा स्त्री-पुरुष समानता यांसाठी याहून परिणामकारक दृश्य काय असेल!
‘सुई-धागा’ हा छोट्या छोट्या गोष्टी परिणामकारकपणे आणि सूक्ष्मपणे टिपण्याचा तरल प्रकार आहे. यात उणीवा नाहीत असा नाही. कारण लेखनाच्या दृष्टीनं उत्तरार्ध पूर्वार्धाहून कमजोर आहे. तो नक्कीच अधिक प्रभावी होऊ शकला असता. अर्थात तरीही तो भावनिक आवाहन करण्यात यशस्वी ठरत असेल तर त्यात उणीवा शोधण्याची विशेष गरज नाही. गरज आहे ती त्यातील बारकावे टिपण्याची.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment