अजूनकाही
१. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जानेवारी आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतच्या कालावधीत घेतल्या जाव्यात, यासाठी भाजप आग्रही; यामागे केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा उठवण्याची रणनीती.
स्वाभाविक आहे. देशभक्तीच्या घोड्यावर बसवलेले लोक आता घोडं काळ्या पैशाच्या मैदानातून कॅशलेस समाजाच्या निबिड अरण्यात घुसू लागल्यामुळे पटापट उतरू लागले आहेत… काहीतरी भारी घडणार आहे, या समजुतीची नशा त्यांच्या डोक्यातून उतरली, तर ते मतपेटीतून काहीतरी भलतंच घडवतील! ……………………….
२. देशात २०१४ साली झालेल्या ४,८९,४०० अपघातांच्या संख्येत वाढ होऊन २०१५ साली ५,०१,४२३ इतकी झाली. २०११ व २०१३ च्या दरम्यान रस्ते अपघात, त्यातील जखमींची व मृतांची संख्या यात घट झाली होती, मात्र २०१४ सालापासून ती पुन्हा वाढली आहे.
हे आकडे भक्तजनांपर्यंत जाऊ देऊ नका. नाहीतर ते व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर पाहा पाहा, २०१४पासून केवढी प्रगती झाली, असे ढोल वाजवायला सुरुवात करतील. त्यांना कुठेही वाढलेले आकडे दिसले की, ‘अच्छे दिन’ आल्याचा साक्षात्कार होतो! आकडे कसले आहेत, हे पाहण्याची तसदी ते घेतीलच, याची खात्री नाही.
……………………….
३. तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी त्या राज्यात स्वस्त दरात न्याहारी व भोजन देणारी अम्मा उपाहारगृहे, दहा रुपयांत अम्मा मिनरल वॉटर, सर्व प्रमुख हॉस्पिटलांमध्ये स्वस्त दरात औषधं देणारी फार्मसी, नवजात अर्भकांसाठी मोफत बेबी किट, १४ रुपये किलोने मीठ, गरिबांसाठी स्वस्त सिमेंट, बचतगटांना स्मार्ट मोबाइल, गरीब महिलांना अम्मा मिक्सर, वाजवी दराने सिनेमे दाखवणारे थिएटर, दूरचित्रवाणी वाहिनी, विवाह कार्यालय, बी बियाणं, कॉलसेंटर, मुलींना सायकल, मुलांना शाळेचं दप्तर, पुस्तकं, गणवेश, ११ लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉप, अम्मा जिम्नॅशियम एवढ्या कल्याणकारी योजना चालवल्या होत्या.
या राज्यात 'शिवाजी, द बॉस'सारखा सिनेमा का तयार होतो, लोक अम्मा गेल्यानंतर आत्महत्या का करतात आणि अम्मांच्या पश्चात राज्याच्या राजकारणातली पोकळी भरून काढण्यासाठी रजनीकांतच्या नावाची चर्चा का होते, हे आपोआपच कळून जातं ना या माहितीवरून?
……………………….
४. राहुल गांधी यांना राष्ट्रगीत गाताना पाहायचं आहे; त्यांना राष्ट्रगीतातले शब्द पाठ नसतील, अशी शंका आहे. : अनुपम खेर.
आम्हालाही राष्ट्रीय चारित्र्यवान संघटनेच्या मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकलेला पाहायचाय, आमच्या अकाउंटमध्ये प्रत्येकी १५ लाख रुपये जमा झालेले पाहायचे आहेत आणि मुख्य म्हणजे जर तोंड उघडलं तर आचरटपणाच सुचत असेल, तर काहीही न बोलता गप्प बसलेला अनुपम खेरही पाहायचाय.
……………………….
५. कानपूरमध्ये एका महिलेला नोटाबंदीमुळे बँकेबाहेर लागलेल्या रांगेतच मूल झालं… तिने त्याचं नाव ‘खजांचीनाथ’ असं नाव ठेवलं आहे…
या काळात जी बाळं जन्माला येतील, त्यांची नावं गुलाबो, पिंकेश, कॅशियर, टेलर (Teller), मॅनेजर, रखवालदार, प्यून कुमार अशीच ठेवली जातील आणि ही बाळं जन्मजात 'क्यू'ट आहेत, असं म्हटलं जाईल. आईवडिलांना आपला मुलगा डॉक्टर-इंजीनियर बनण्यापेक्षा क्लार्क-कॅशियर बनावा, असंच वाटू लागेल. हा खजांचीनाथ मोठा होण्याच्या आत त्याच्या आईला पैसे मिळालेले असावेत, हीच शुभेच्छा.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nilesh Sindamkar
Wed , 07 December 2016
रोज रोज इतकं चांगलं कसं काय सुचतं तुम्हाला देव जाणे... !!!