अजूनकाही
अलीकडे ‘किंग्समन’सारख्या चित्रपट मालिकांमधून हेरपट या जगभर प्रसिद्ध असलेल्या चित्रपट प्रकारातील पारंपरिक, अतर्क्य गोष्टींवर उपहास साधण्याची लाट आलेली आहे. ‘जॉनी इंग्लिश’ या स्पुफ प्रकारातील जुना आणि मूळ हेरापटांइतकाच नावाजलेला खेळाडू आहे. ‘जॉनी इंग्लिश स्ट्राइक्स अगेन’ हा याच चित्रपटमालिकेतील तिसरा भाग. जो तिच्या (आणि रोवन अॅटकिन्सनच्या) फॅन्सना अपेक्षित असलेल्या मार्गांनी प्रवास करत, प्रेक्षकाला शेवटपर्यंत श्वास घ्यायची घ्यायची मुभा न देता, एकापाठोपाठ एक गैरसमज, हेरपटांमधील पारंपरिक गोष्टींची खिल्ली उडवणारा स्वीकारार्ह चित्रपट ठरतो. हा ‘लाफ आऊट लाऊड’ दृश्यांची रांग लावत, अधिकाधिक मनोरंजन करण्यासाठी कटिबद्ध असलेला चित्रपट आहे. ज्यात तो यशस्वी होत असल्याने तक्रार करायला विशेष जागा उरत नाही.
‘एमआय ७’वर झालेल्या सायबर अॅटॅकद्वारे या गुप्तहेर संस्थेत कार्यरत असलेल्या सर्व एजंट्सचा डेटा लीक करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचं आणि परिणामी ‘एमआय ७’चं भवितव्य टांगणीला लागलं आहे. परिणामी हे प्रकरण हाताळायला, संस्थेच्या माजी, सध्या अकार्यरत असलेल्या एजंट्सना पाचारण करण्यात आलेलं आहे. साहजिकच त्यात ‘जॉनी इंग्लिश’ (रोवन अॅटकिन्सन) हे नावही आहेच.
एका शाळेत भूगोलाचा शिक्षक असलेला एजंट इंग्लिश आपल्या पूर्वाश्रमीच्या नोकरीत येताक्षणीच त्याच्या कुप्रसिद्ध करामतींना, गोंधळाला सुरुवात करतो. सोबतीला त्याचा विश्वासू सहकारी, जेरेमी बफ (बेन मिलर) आहेच.
‘जॉनी इंग्लिश स्ट्राइक्स अगेन’ची मूलभूत गोष्ट किंवा खरं तर त्यातील खलनायकाची संकल्पना ‘किंग्समन : द सिक्रेट सर्व्हिस’ (२०१४) या ‘किंग्समन’ चित्रपट मालिकेतील पहिल्या प्रकरणामधील व्हॅलेंटाईनशी समांतर आहे. ती म्हणजे - सरकारी पातळीवरील मदतीच्या (किंवा दगाबाजीच्या) निमित्तानं, तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं जग काबीज करणं. त्यामुळे जुन्याच गोष्टीचं नवीन (आणि कथानकाच्या पातळीवर काहीसे अपरिणामकारक) सादरीकरण ही भावना निर्माण होणं साहजिक आहे.
मात्र या चित्रपट मालिकेचा भर मूळ कथानकावर तसा कमीच असतो. त्याऐवजी लहान (एकत्र गुंफलेल्या) स्किट्ससारखी भासणारी दृश्यांची मांडणी असं त्याचं स्वरूप असतं. त्यामुळे कथानक प्रभावी नाही, हे कितीही खरं असलं तरी त्याकडे विशेष लक्ष द्यावं असं वाटत नाही.
सदर चित्रपट मालिकेतील विनोद हा अॅटकिन्सनियन प्रकारातील विनोद आहे. जो मि. बीन, अॅटकिन्सनच्या स्टँड अप कॉमेडी शोमधील ‘फिजिकल कॉमेडी’वर बेतलेला आहे. ज्याला हेरपटांमधील बुद्धिमान आणि विरेचित नायकांच्या अतर्क्य, अशक्यप्राय अशा कामगिरीवरील उपहासाचं स्वरूप दिलेलं आहे. गेल्या चारेक दशकांतील आपल्या कारकीर्दीत अॅटकिन्सननं त्याचं फिजिकल कॉमेडी प्रकारातील वर्चस्व राखून ठेवलेलं आहे. सदर चित्रपटही बहुतांशी वेळा यावरच अवलंबून राहतो. ज्यामुळे आधीच्या दोन चित्रपटांमध्ये असलेलं धक्कातंत्र (आणि विनोदी लेखन) इथं वापरून वापरून रटाळ झाल्यानं म्हणाव्या अशा प्रकारे काम करत नाही. दृश्यांची मांडणी इतकी साधी आहे की, आपल्याला समोर येणाऱ्या विनोदाचा दोनेक मिनिटं आधीच अंदाज आलेला असतो. आपण त्यावर (पुढे जाऊन खऱ्या ठरणाऱ्या) तर्काच्या आधारे आधीच हसलेलो असतो. तरीही अॅटकिन्सन-मिलर या जोडगोळीमुळे ‘जॉनी इंग्लिश स्ट्राइक्स अगेन’ सहन करावा लागला, असं म्हणायची वेळ येत नाही. कारण जवळपास अर्ध्या दशकानंतर त्यांचा पडद्यावरील वावर सुखावणारा आणि काही अनपेक्षित जागांमध्ये विनोद निर्माण करणारा आहे.
ओल्गा आणि एमा थॉमसन तशा विशेष नसलेल्या भूमिकांमध्ये दिसतात. तसंही अॅटकिन्सन-मिलर केंद्रस्थानी बॅटिंग करत असताना बाकीचे तसे बाजूलाच पडतात. इव्हन खलनायकही नामोल्लेख करण्यापुरता राहतो. फक्त आठवण येते ती ‘जॉनी इंग्लिश रिबॉर्न’मधील रोजमंड पाईक आणि डॅनियल कलुया या दोघांची.
हा मनात संमिश्र भावना निर्माण करणारा चित्रपट आहे. म्हणजे खरं तर यातील दृश्यांनी समाधान होत नाही. कारण आपल्या परिचयाचा इंग्लिश (आणि अॅटकिन्सन) याहून अधिक परिणामकारक काम करू शकतो याची आपल्याला खात्री असते. लेखक-दिग्दर्शक मात्र त्याला हवा तसा आशय देत नाहीत. ज्यामुळे तो केवळ स्वीकारार्ह ठरतो.
बाकी या मालिकेतील या नवीन भागाची गरज होती का, याचं उत्तर तसं ‘नाही’ असंच आहे. मात्र ‘ट्रान्सफॉर्मर्स ५’ किंवा ‘मिशन इम्पॉसिबल ६’ येत असताना आणखी एक बरा म्हणावासा ‘जॉनी इंग्लिश’ही आला तर विशेष फरक पडत नाहीच.
आफ्टर ऑल, हू डजन्ट लव्ह अ पेचेक?
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment