सर्वोच्च, स्वागतार्हही!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • सर्वोच्च न्यायालयाने व्याभिचार, आधार, नोकरीतील बढती आणि समलैंगिकतेविषयी एेतिहासिक असे निकाल दिले आहेत
  • Sat , 29 September 2018
  • पडघम देशकारण सर्वोच्च न्यायालय Supreme Court व्याभिचार Adultery विवाहबाह्य संबंध Extramarital Affair समलैंगिकता Homosexuality नोकरीतील बढतीत आरक्षण Reservation in Promotion आधार Aadhaar

देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या विरोधात कथित बंड पुकारून मोठं वादळ उभं केल्याचा आव आणि त्यात राजकीय तेल ओतलं जाण्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. त्याच सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं गेल्या आठवड्यात काही महत्त्वपूर्ण निवाडे दिले आहेत. एवढंच नाही तर तत्पूर्वी त्या कथित बंडात सहभागी झालेल्या एकाची आपला उत्तराधिकारी म्हणून शिफारस त्याच सरन्यायाधीशांनी केलेली आहे. हे निवाडे आणि ती शिफारस लक्षात घेता, त्या कथित बंडाची हवा फुसकी होती, तसंच त्या बंडाच्या सुप्त राजकीय हेतूंबद्दल, तेव्हा उपस्थित झालेल्या काही शंकांवर शिक्कामोर्तब झालेलं आहे.

न्याययंत्रणेची विश्वासार्हता, पावित्र्य, नि:क्षपातीपणा केवळ काहींच्या हाती सुरक्षित असून न्यायनिवाडा करणारे इतर सर्व सरकारचे बाहुले झालेले आहेत आणि या खटल्यांच्या निवाड्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं वातावरण निर्माण करणाऱ्यांचा या शिफारस व निवाड्यांमुळे मुखभंग झाला आहे. पुढच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करताना सेवाज्येष्ठता डावलली जाणार, हा काँग्रेसच्या काही वकील नेत्यांकडून झालेला कांगावा तर भीतीपोटीच होता, असंही आता म्हणता येईल, कारण अशी ‘डावला-डावली’ कशी करतात, हे काँग्रेसला चांगलं ठाऊक असल्यानंच त्यांच्या पोटात हा भीतीचा गोळा उठला असावा.     

‘आधार’ची वैधता आणि शासकीय सेवातील बढत्यात आरक्षणाच्या संदर्भात नुकतेच आलेले सर्वोच्च न्यायालयीन निवाडे कोणाही संवेदनशील न्यायाधीशाकडून जसे अपेक्षित होते, तसेच आले आहेत. त्या निवाड्यांच्या संदर्भात ज्या प्रतिक्रिया राजकीय पक्षांकडून आलेल्या आहेत, त्या फार काही गंभीरपणे घेण्याच्या लायकीच्या नाहीत. कारण आपल्या देशातील सर्वच राजकीय पक्षांत सत्तेत असताना आणि नसताना कसं बेताल वागायचं या संदर्भात राष्ट्रीय मतैक्य आहे!

याचं चपखल उदाहरण वस्तू आणि सेवा कराचं आहे. जीएसटीची तयारी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील युपीएच्या काळात झाली, त्या करप्रणालीचा तो किचकट महामसुदाही त्याच काळात तयार झाला आणि तो अंमलात आणण्यास तेव्हा विरोधी पक्षात असणार्‍या भाजपनं ठाम विरोध केला. जीएसटीची आकारणी सरळ आणि सुलभ असावी अशी तेव्हा भाजपची मागणी होती. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेत आल्यावर विरोधी पक्षात असतानाचा विरोध बासनात गुंडाळून ठेवून भाजपनं जीएसटी लागू केला आणि सत्तेतून विरोधी पक्षात आलेल्या काँग्रेसनं त्याला विरोध केला. जीएसटीची आकारणी सरळ आणि सुलभ असावी अशी आता काँग्रेसची मागणी आहे! आपल्या  देशातील राजकीय पक्षांना त्यांचा राजकीय अजेंडाच कसा महत्त्वाचा आहे, याचं हे मासलेवाईक उदाहरण आहे. त्यामुळे आधार आणि बढत्यातील आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचा ‘राजकीय बाणा’ सोडला नाही, यात आश्चर्य काहीच नव्हतं.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा पोलिसात किंवा तो खटला न्यायालयात दाखल असलेल्या म्हणजे कलंकित असलेल्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात यावी, सबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश, समलैंगिकता आणि व्यभिचाराच्या पुनर्व्याखेच्या संदर्भात अशात सर्वोच्च न्यायालयाकडून आलेले निवाडे ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण आहेत. जास्त महत्त्वाचं म्हणजे ते देताना न्यायसंस्थेनं समतेला न्याय्य झुकतं माप देण्याचं दाखवलेलं भान फारच प्रशंसनीय आहे, यात शंकाच नाही. संसद ‘कायदे मंडळ’ आहे म्हणूनच संसदेला डावलून कलंकित उमेदवारांना निवडणूक लढवण्यास मनाई करण्यासंबंधी थेट आदेश देण्याचं टाळण्याचा जो समंजसपणा सर्वोच्च न्यायालयानं दाखवला, त्यामुळे संसद विरुद्ध न्याययंत्रणा हा संभाव्य संघर्ष टाळला, ते मला तरी फारच भावलं.

मात्र असं करताना कलंकित उमेदवार हा लोकशाहीला लागलेला रोग असल्याचं सुनावण्याचा परखडपणाही न्यायालयाकडून दाखवला गेला, तसंच त्या संदर्भात कायदा करण्याचं काम संसदेचं असल्याचं स्पष्टपणे सूचित केलं गेलं आहे. कायदे मंडळ कायदे करणार, ते लोकांनी पाळावे, नाही पाळले तर प्रशासनानं त्यावर नजर ठेवावी आणि कायदे न पाळणाऱ्यांना न्यायालयानं शिक्षा करावी, अशी आपल्या देशातील कारभाराची ढोबळमानानं रचना आहे. त्यात कायदे मंडळ सर्वोच्च आहे, पण त्याचं कोणतंही भान विशेषत: मराठी-इंग्रजी प्रकाश वृत्तवाहिन्यांना नव्हतं. ‘सर्वोच्च न्यायालयाचे संसदेला आदेश’ , ‘...संसदेला निर्देश’ अशा हेडलाईन्स वाहिन्यांनी चालवल्या आणि बौद्धिक तोकडेपणा सिद्ध केला.

एखाद्या तज्ज्ञाचा अपवाद वगळता झालेल्या चर्चांमध्ये सहभागी होणारेही सुमारच होते. एका महाभागानं तर आता आपण ‘नर आणि मादीकडे जातो आहोत’, असा निष्कर्ष काढला. त्या चर्चांमध्ये, विशेषत: समलैंगिकता आणि विवाहबाह्य संबंधांना मान्यता मिळाल्यानं जणू काही भारतीय समाजावर फार मोठा अनाचारी आघातच झालेला असल्याचा काढला गेलेला तो बेसूर होता.     

समलैंगिकतेला मान्यता आणि विवाहबाह्य संबंधांचा मी पुरस्कर्ता नाही, पण विरोधक तर मुळीच नाही. कारण वैयक्तिक (सार्वजनिक नव्हे!) पातळीवर प्रत्येकाला हवं तसं जगण्याचा अधिकार मला मान्य आहे. समलैंगिकतेला मान्यता आणि विवाहबाह्य संबंध गुन्हा न ठरवण्याचे निवाडे तथाकथित संस्कृती रक्षकांना अर्थातच रुचणारे नाहीत. ‘जे मला मान्य नाही, ते संस्कृतीत बसत नाही’ असा बचाव करणारी आपल्या समाजाची आणि त्यातही कथित संस्कृती रक्षकांची रोगट मानसिकता आहे. या मानसिकतेलाच हे संस्कृती रक्षक नैतिकता आणि समाज मान्यता समजतात, हे तर घोर अज्ञानच आहे.

या संदर्भात केंद्र सरकारच्या वतीनं जे काही म्हणणं न्यायालयासमोर मांडण्यात आलं, त्यातून ही रोगट मानसिकता पुन्हा एकदा समोर आलेली आहेच. खरं तर, वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला त्याच्या मर्जीनुसार जगण्याचा अधिकार आहेच आणि तेच त्याचं स्वातंत्र्य आहे. संस्कृती रक्षकांनी मात्र त्यावर नैतिक/अनैतिक, नैसर्गिक/अनैसर्गिक असे स्टॅम्प मारलेले असून परदेश प्रवासासाठी जसे व्हिसाचे मारलेले अधिकृत स्टॅम्प ग्राह्य धरले जातात, तसेच संस्कृती रक्षकांचे स्टॅम्प समाजाने मान्य करावे, असा अनाठायी आग्रह कायमच केला जातो. समानता आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा तो संकोच असल्याची भूमिका सातत्याने काही मंडळींकडून मांडली जात आहे, मात्र त्याकडे अनैतिक किंवा संस्कृतीबाह्य असं म्हणून दुर्लक्ष केलं गेलं.

न्यायालयीन पातळीवर ही एक प्रदीर्घ लढाई होती आणि त्यात अखेर सर्वच स्तरावर समानता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारांचा विजय झालेला आहे. त्यांच्या म्हणण्याला सर्वोच्च न्यायालयानं कायदेशीर कोंदणच आता मिळवून दिलेलं आहे. या निवाड्यांमुळे मानवी जगण्यातील नैसर्गिकतेचा तोल ढळेल, संपूर्ण समाजात अनाचार माजेल, अनैतिकता पसरेल असं समजणं हा शुद्ध भाबडेपणा तरी आहे किंवा प्रचंड ढोंगीपणा तरी.

आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, कीर्तन-प्रवचन करून/ऐकून कोणताच समाज पूर्णपणे संत-सज्जन होत नसतो आणि कीर्तन-प्रवचन न करता/ऐकता पूर्ण समाज कधीच बदफैलीही होत नसतो. काही मोजके जण यापूर्वीही समलैंगिक होते आणि समाजात काही प्रमाणात विवाहबाह्य संबंध ठेवणारे होतेच. त्यामुळे या संपूर्ण समाजाची नैतिकता रसातळाला पोहोचलेली नव्हती आणि समाजाचा तोलही बिघडलेला नव्हता. त्यामुळे या निवाड्यांमुळे समाजाच्या जगण्यात सामूहिक स्तरावर काही मोठ्ठे बदल होणार आहेत किंवा अनाचार माजणार आहे, ही भीती व्यर्थ आहे. स्त्री-पुरुष संबंधांकडे कोणत्या तरी दूषित नैतिक/अनैतिकतेच्या नजरेतून बघणारांनी एकदा ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ हा ग्रंथ वाचावा म्हणजे स्त्री-पुरुष संबंधांच्या संदर्भात त्यांचे समज किती भ्रामक आहेत, हे त्यांना समजेल.  

हाजी अली दर्गा असो की सबरीमला मंदिर; कोणत्याही जाती-धर्माच्या कोणत्याही प्रार्थना स्थळी किंवा मंदिरात स्त्रियांना प्रवेश न देण्यात ज्यांना कुणाला नैतिकता, समानता आणि पावित्र्य दिसत असेल ते लोक माणूस म्हणवण्याच्या किमान लायकीचे तरी आहेत का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आपण प्रत्येक स्त्रीची अप्रतिष्ठा करतो आहोत. जिच्या उदरातून आपला जन्म झालाय त्या आईची अवहेलना करतोय... हे आपण विसरतो आहोत. उद्या एखाद्या मंदिरात जर पुरुषांना प्रवेश बंदी केली वर्चस्वाचे लढे किती तीव्र होतील? खरं तर, या आणि मंदिर प्रवेशाचे असे आणि कोणतेही प्रश्न न्यायालयाकडे न जाऊ देता त्या-त्या पातळीवरच सुटले असते, तर सर्वार्थानं हा समाज सुसंस्कृत, पुरोगामी, प्रगत आणि समता मानणारा आहे, हे सिद्ध झालं असतं.  

हे निवाडे तसं तर बरेच उशीरा आलेले आहेत, पण आले ते धाडसानं आले आणि ते समतेचा गजर करत आलेले आहेत. हे सर्व स्वागतार्ह निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलेले असल्यानं आता तरी या विषयांवरील अ-संस्कृत चर्चा थांबतील अशी अपेक्षा बाळगणं व्यर्थ ठरू नये.  

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 04 October 2018

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर! मी संस्कृतीरक्षक आहे. तुम्ही म्हणता की : >> या निवाड्यांमुळे मानवी जगण्यातील नैसर्गिकतेचा तोल ढळेल, संपूर्ण समाजात अनाचार माजेल, अनैतिकता पसरेल असं समजणं हा शुद्ध भाबडेपणा तरी आहे किंवा प्रचंड ढोंगीपणा तरी. >> इथे एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं. ते म्हणजे वायमर जर्मनीत १९२० नंतर समलैंगिक पुरुषांची अक्षरश: नरकपुरी माजली होती. हिटलरने त्यांना गोळा करून यमसदनी धाडलं. त्यामुळे सामान्य जर्मन माणसाचा हिटलरला पाठींबा लाभायला मदत झाली. मी इंग्लंडमध्ये जिथे राहतो ते ब्रायटन नामे ठिकाण गे लोकांचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहे. गे पुरुषाचे आरोग्याचे प्रश्न बरेच जटील असतात. जरा इथे नजर टाका : https://www.mayoclinic.org/healthy-lifestyle/adult-health/in-depth/health-issues-for-gay-men/art-20047107 . माझ्यासारखे संस्कृतीरक्षक उगीच बडबड करीत नाहीयेत. यासंबंधी अधिक माहिती इथे मिळेल : https://www.maayboli.com/node/47299?page=4#comment-3006689 आपला नम्र, -गामा पैलवान


Gamma Pailvan

Wed , 03 October 2018

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर! बायकांना पाळीच्या काळात मंदिरांत प्रवेश निषिद्ध असण्यामागे कारण आहे. माखलेल्या बुडाने कोणी देवळात जात नाही. अवयव स्वच्छ करून आंघोळ करून नंतरच जायचं असतं. तद्वत पाळी संपली की नहान करून शुचिर्भूत होऊन जायला हरकत नाही. प्रौढ मनुष्य मलमूत्र विसर्जनाचा वेग आवरून दर्शनास जाऊ शकतो. परंतु एकदा का पाळी सुरू झाली की ती संपेपर्यंत तिचा वेग आवरून धरता येत नाही. म्हणून ती संपेपर्यंत वाट पहायची असते. पुरुषी मनोवृत्ती वगैरे सरळ थोतांड आहे. पटंत असेल तर पटवून घ्या अन्यथा सोडून द्या. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......