अजूनकाही
पाच सप्टेंबर हा कविता महाजन यांचा वाढदिवस. त्या दिवशी त्यांच्या फेसबुक वॉलवर त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी, चाहत्यांनी त्यांना नेहमीप्रमाणे भरभरून शुभेच्छा दिल्या. या दिवशी त्यांनी वयाची एकावन्न वर्षं पूर्ण करून ५२व्या वर्षांत पर्दापण केलं. त्यांचे चाहते भरपूर. त्यामुळे वाढदिवसांच्या शुभेच्छांचा सिलसिला ६ सप्टेंबरलाही चालू राहिला.
पण वाढदिवसाच्या दिवशी महाजन यांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्यांनी पाच सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास एक फेसबुक पोस्ट टाकली – “थंडीताप, सर्दी, अॅलर्जेटिक खोकला यांमुळे झोपून आहे. फोन घेणे, मेसेजला उत्तर देणे जमत नाहीये. गैरसमज नसावा. आशीर्वाद, शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.”
नुकत्याच त्या वसईहून पुण्याला, कोथरुडला शिफ्ट झाल्या होत्या.
१३ सप्टेंबरला त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली :
“आकृती पॅकर्स अँड मुव्हर्स या कंपनीकडून आम्ही वसईहून पुण्याला घरातलं सगळं सामान शिफ्ट केलं. अनुभव अत्यंत वाईट होता. पॅकिंग मटेरियल कमी आणणे, पॅकिंग व्यवस्थित न करणे, आगाऊ रक्कम दिलेली असताना देखील निघण्याआधी गेटवर संपूर्ण रक्कम चुकती केल्याशिवाय ट्रक इथून निघणार नाही असे भांडण करणे, पोचल्यावर अधिक पैसे मागून कटकट करणे वगैरे प्रकार तर झालेच; खेरीज सगळं सामान लावत आल्यावर ध्यानात आलं की, एक मोठा बॉक्स गायब झालेला दिसतोय. घरातून घेतला होता आणि सामान उतरवून घेताना ट्रकमध्ये काही राहिलेलं नाही हेही तपासलं होतं. नेमक्या त्या खोक्यात काही दुर्मिळ महागडी पुस्तकं आणि काही मूल्यवान वस्तू (केवळ पुस्तकं नव्हे, त्यात चांदीचा गणपती होता. पुरस्कारांची मानचिन्हे होती आणि सँडविच मेकरसारख्या किचनमधील काही वस्तूही होत्या.) होत्या. कंपनीला फोन केला तर उडवाउडवीची उत्तरं दिली जाताहेत.”
वरील पोस्ट लिहिल्यानंतर काही तासांनी त्यांनी दुसरी पोस्ट लिहिली :
“एकेक फोन करण्याची तसदी माझ्यासाठी घेणार का?
Aakruti Movers And Packers या कंपनीत 093217 67688 किंवा 09152756582 या नंबरवर फोन करून एक प्रश्न पुढचे काही दिवस आपल्या सोयीच्या वेळेत विचारायचा :
‘तुमच्या कंपनीकडून कविता महाजन यांचे वसई-पुणे शिफ्टिंगमध्ये दुर्मिळ पुस्तके व मूल्यवान वस्तू (केवळ पुस्तकं नव्हे, त्यात चांदीचा गणपती होता. पुरस्कारांची मानचिन्हे होती आणि सँडविच मेकर सारख्या किचनमधील काही वस्तूही होत्या.) असलेले सामान गहाळ झाले असल्याचे फेसबुकवर वाचले. ते ड्रायव्हरने चोरले असावे. कंपनी याबाबत काय अॅक्शन घेणार आहे? नुकसान कसे भरून देणार? की पोलीस तक्रार करायची?’ ”
१९ सप्टेंबरला त्यांचे एक आवडते आणि हिंदीतील प्रसिद्ध कवी विष्णू खरे यांचं निधन झालं. तेव्हा त्यांनी लिहिलं :
“विष्णू खरे यांच्या भेटीचा योग दोनदाच आला. मात्र फोनवर संवाद होत राहिला. अनेक आठवणी आहेत, मात्र आज अजून लिहिण्याची ताकद नाही. लिहीन कधीतरी... अखेर आता आठवणीच शिल्लक आहेत.
आदरांजली....”
दिवसभर विष्णू खरे यांच्याविषयीच्या फेसबुकवरील प्रतिक्रिया वाचून त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे २० सप्टेंबरला नवीन फेसबुक पोस्ट लिहिली :
“माणसं गेली की, उत्सुकतेने ढीगभर काव्यात्म श्रद्धांजल्या वाहणारे आपण...
जी माणसं हयात आहेत त्यांच्यासाठी कधी, कुठे आणि किती असतो?
उत्सुकतेचं भाषिक कवच काढून फेकलं तर आत काय सापडतं? दुटप्पीपणा सापडला तर आपण स्वत:चं काय करतो?”
याच म्हणजे २० सप्टेंबर रोजीच त्यांनी दुसरी फेसबुक पोस्ट लिहिली :
“नवी जागा अजून मानवत नाहीये.
ताप उलटून आला, तो जोमदारपणे. भ्रम भासावळी घेऊन आला. घरात माणसं फिरताना दिसू लागली आणि अजून काय काय. ग्लानीत किती काय बडबडले हे लेकच जाणे.
काल संध्याकाळी जरा उठून बसले आणि पाहते तर लेकीला तसाच ताप.
पुन्हा डॉक्टरचं दार गाठलं.
थोडं काम केलं उठतबसत, पण डोकं चालत नाहीये.
ताप उतरावेत आणि लवकर सुरू व्हावं रुटीन. कामं वाट पाहताहेत.”
… आणि काल २७ सप्टेंबर रोजी रात्री बातमी आली की, कविता महाजन यांचं पुण्यात निधन झालं.
तेव्हा त्यांच्या चाहत्यांचा, मित्र-मैत्रिणींचा इतकंच काय परगावी असलेल्या त्यांच्या नातेवाईकांचाही त्यावर चटकन विश्वास बसला नसावा.
पण टीव्हीवर स्कोल चालत होता, नंतर ब्रेकिंग न्यूज सुरू झाली.
दरम्यानच्या काळात व्हॉटसअॅपवरून मॅसेजेस फिरू लागले.
मुग्धा कर्णिक यांनी फेसबुक पोस्ट लिहिली.
बातमी हळूहळू कन्फर्म होत गेली.
गेले काही दिवस त्या आजारी होत्या. पण त्यांची ट्रीटमेंट चालू होती. गोळ्या-औषधं त्या घेत होत्या.
त्यामुळे आजार अचानक इतका हाताबाहेर जाईल आणि त्याची परिणती अशी होईल असं त्यांच्या जवळच्यांपैकी कुणालाच वाटलं नव्हतं.
परवा त्यांचा खोकला वाढला. त्यात न्यूमोनिया झाला.
त्यात ब्लड प्रेशर वाढलं.
त्यांना जवलच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं.
डॉक्टरांनी प्रकृती गंभीर झाली असल्याचं सांगून दुसऱ्या हॉस्टिटलला न्यायला सांगितलं.
तिथं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलं.
पुढचे ४८ तास त्यांची प्रकृती चितेंची आहे असं डॉक्टरांनी सांगितलं.
ते ४८ तास उलटायच्या आतच त्यांचं निधन झालं.
हे असं इतकं अकल्पित, धक्कादायक काही पचवायची आपली मानसिकता नसते.
कविता महाजन यांच्या मुलीची, नातेवाईकांची, मित्र-मैत्रिणींची नसणार,
तशीच त्यांच्या चाहत्यांचीही.
कविता महाजन घरी-दारी आणि फेसबुकवरही सडेतोड, परखड आणि कणखर म्हणूनच प्रसिद्ध होत्या.
कुठल्याही परिस्थितीचा सामना त्या खंबीरपणे करत.
पैसासाठी त्यांना पाककृतीची पुस्तकं लिहायला लागली, मुलांचीही पुस्तकं त्यांनी त्यातूनच लिहिली.
पण त्यांचं सर्जनशील लेखन चालू होतं.
नवी कादंबरी आकार घेत होती.
नव्या पुस्तकांचे कितीतरी विषय तयार होते.
काही अर्धेमुर्धे, काही जवळपास पूर्ण, तर काही काहींना सुरुवात केलेली होती.
संपादनाचं काम चालू होतं.
नव्या घराचं शिफ्टिंग झाल्यामुळे घर लावणंही चालू होतं.
त्या मराठीतल्या बंडखोर, धाडसी, निर्भीड, परखड, सडेतोड, कणखर, खंबीर लेखिका असल्या म्हणून काय झालं?
नुसत्या सेलिब्रेटी स्टेटसनं निदान मराठीमध्ये तरी लेखकाचं पोट भरत नाही.
त्याला केवळ लेखनावर सुखा-समाधानात राहता येत नाही.
पोटापाण्यासाठी पैसे कमवावे लागतात.
त्यासाठी लेखनाशिवायची कामं करावी लागतात.
बाई लेखिका असली तरी तिला घरातली कामं करावीच लागतात.
कशातून म्हणजे कशातूनच कविता महाजन यांची सुटका नव्हती.
त्यामुळेच सततच्या आजारपणातूनही त्यांना कायमस्वरूपी सुट्टी घेता येत नव्हतीच.
तरीही त्या डगमगलेल्या नव्हत्या. हताश झालेल्या नव्हत्या.
येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा खंबीरपणे सामना करत होत्या.
जमेल तेव्हा आणि जमले तिथे कणखरपणे वागत, बोलत, लिहीत होत्या.
मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारत होत्या.
लेखनप्रकल्प पूर्ण करायचा प्रयत्न करत होत्या.
आणि हे असं सगळं जगणं जगत असताना मृत्यू नावाच्या क्रूर गोष्टीनं त्यांना गाठलं.
आता कविता महाजन नाहीत.
त्यांच्या नसण्याचे धक्के अनेकांना आज, उद्या, परवा, तेरवा…
येते काही दिवस बसत राहतील.
आयुष्यात त्यांनी अनेकांना धक्के दिले,
आडवं आलेल्याला सरळ केलं.
नडू पाहणाऱ्याला आडवं केलं.
रूढी, संकेत, परंपरांना फाट्यावर मारलं.
जे वाटतं, ते स्पष्टपणे लिहील. बोललं. सांगितलं.
बिनधास्त, बेफिकीरपणाने वागल्या, जगल्या.
आणि आता अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या.
वयाच्या पन्नाशीत एक दमदार कवयित्री, समर्थ कादंबरीकार, उत्तम संपादक असलेली लेखिका अशी अचानक निघून जाते…
तेव्हा नुकसान तर होतंच.
कुटुंबाचं-नातेवाईकांचं, मित्र-मैत्रिणींचं होतं. मराठी साहित्याचं. चाहत्यांचं.
कविता महाजन यांचं लेखन केवळ त्यांच्या धाडसी, बंडखोर आणि प्रयोगशीलतेपुरतं मर्यादित नाही.
सगळ्या बऱ्या-वाईटाची जबाबदारी शिरावर घेऊन, सतत थरथरणाऱ्या जमिनीवर खमकेपणानं वावरणाऱ्या, जगणाऱ्या कविता महाजन यांच्यासारख्या लेखिकेची जिविषा आणि जिगिषा तेवढीच नसते.
ती मानवी जगणं कवेत घेऊन पुढे जाऊ पाहणारी असते.
सच्चेपणानं, प्रामाणिकपणानं जगण्याचा पहाड फोडू पाहणारी असते.
कविता महाजन शेवटपर्यंत हेच करत होत्या.
त्यांच्या कवितेतून, कादंबऱ्यांतून हीच प्रेरणा त्यांच्या वाचकांनाही मिळत राहील.
.............................................................................................................................................
कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/author/26/Kavita-Mahajan
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment