‘तत्पुरुषां’च्या कवितांपैकी चार कविता
ग्रंथनामा - झलक
कविता महाजन
  • कविता महाजन (५ सप्टेंबर १९६७ - २७ सप्टेंबर २०१८)
  • Fri , 28 September 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक कविता महाजन Kavita Mahajan तत्पुरुष Tatpurush

‘तत्पुरुष’ हा कविता महाजन यांचा पहिला कवितासंग्रह. स्त्री-पुरुष संबंधांचं अनेक पातळ्यांवरचं व्याकरण या संग्रहात व्यक्त झालं आहे. स्त्री-पुरुष संबंधांतील द्वंद्व समास सर्जनशील न होता दुर्दैवानं ‘तत्पुरुषी’ होतो. त्यामुळे या संग्रहाचं नाव ‘तत्पुरुष’ आहे. काही पुरुष सत्पुरुष असतात, पण बरेचसे ‘तत्पुरुष’च असतात. त्या ‘तत्पुरुषां’च्या कवितांपैकी या चार कविता.

...............................................................................................................................................................

१. तशी एखादी कविता

कदाचित

मी कधीच लिहून शकणार नाही तुझ्यासाठी

कवितेची एखादी चटक चमकदार ओळ

धारदार शब्दांची,

जी काळ्याभोर विजेसारखी लखाखेल

शुभ्र कागदाच्या अवकाशागत

तुझ्या हृदयात,

उजळवून टाकेल आसपासचे लख्ख भान.

तुझ्या भरभरून देणाऱ्या मनाला

ज्ञात नसेल अभावांची ती जमीन

जिथे उगवू शकते फक्त कविताच

मृगजळाच्या शिंपडणीतून

आणि वाढत जाते

भ्रमांचे, भासांचे टेकू घेऊन.

तू तर अंथरलं आहेस तुझं स्वत्व

सर्वदूर हिरवळीसारखं

माझ्या भूत-वर्तमान-भविष्यावर…

जगण्याच्या नव्या मातीत

नेऊन रुजवली आहेस माझी मलूल मुळं.

देठादेठांतून वाहू लागेल आता हिरवं रक्त,

माना टाकलेल्या जाणिवांची पाकळ्या न् पानं

पुन्हा ताठ करतील कणा,

तरारून येईल कसब.

तरीही मी

लिहून शकणार नाही तुझ्यासाठी कृतज्ञता

कणवेची ओंजळ ओतून जाणाऱ्या

हातांसाठी लिहावी तशी.

मी लिहू शकणार नाही आभार

जे मोजून दाखवतं अंतर

माणसामाणसातलं.

मी लिहू शकणार नाही लोभ

आसक्ती अभिलाषा

निदान तोपर्यंत

जोपर्यंत तू माझ्यासाठी बनणार नाहीस

केवळ एक भास,

तुझं प्रेम एक संभ्रम माझ्या मनाचा

आणि तुझं अस्तित्व एक निखळ कल्पना.

तोपर्यंत

लिहू शकणार नाही मी तुझ्यासाठी

तशी एखादी कविता

तू माझं वास्तव आहेस.

...............................................................................................................................................................

२. शृंगार

ठसठशीत कुंकवासाठी एक कुयरी,

निरी उकलण्यापुरतीतरी एक चिरी,

काळ्याभोर मण्यांचं मंगळसूत्र,

गच्च हातभर काकणं.

कुड्या कानाची पाळी ओघळतील अशा,

नीट बोलूही न देणारी नथ,

सारा शृंगार काटोकाट जमला आहे.

पायांतील साखळ्याच तेवढ्या जरा

हलक्या वाटतात मालक

पहा ना

त्या घालून चालताही येतंय मला…

...............................................................................................................................................................

३. माझंच

मुलीसाठी आणली आहे एक बाहुली :

तोंडातील बूच काढताच ती रडू लागते

कळवळून टाकणाऱ्या आवाजात;

लाल होतात तिची कानशिलं.

तिच्या छातीतील सेल संपेपर्यंतच

पेटणार आहेत कानातील लाल दिवे

आणि उमटू शकणार आहे रडणं

-हे ठाऊक आहे मला.

घरात कुणी नसतं तेव्हा

मी तिला तळहातावर घेते

तिच्या तोंडातलं बूच काढून

ऐकत राहते रडणं.

-माझंच असल्यासारखं.

...............................................................................................................................................................

४. उरलेली गोष्ट

आजकाल मुलीला येतो कंटाळा

त्याच त्याच गोष्टींचा;

मग बदलून टाकते ती पात्रं, स्थळं.

आणि गोष्ट होते नवी.

वाघोबाच्या तावडीतून निसटून

भोपळ्यात बसून जाणाऱ्या म्हातारीची

गोष्ट मी सांगत होते तेव्हाही तिनं असंच

अडवलं मला.

सांगू लागली स्वत:च

तीच गोष्ट नवी निराळी करून :

म्हातारी निघाली लेकीकडे

आणि तिला आडवं आलं घर.

म्हणालं : थांब मी तुला खातो.

म्हातारी म्हणाली :

लेकीकडे जाईन, लठ्ठमुठ्ठ होईन

मग तू मला खा.

मुलगी म्हणाली, आई,

आता उरलेली गोष्ट तू सांग.

निश्वास टाकत हसून मी सांगू लागले गोष्ट पुढे.

म्हातारी म्हणाली :

लेकीकडे जाईन, लठ्ठमुठ्ठ होईन

मग तू मला खा.

पण घर म्हणालं :

तावडीतून निसटून जाऊ द्यायला

मी थोडीच वाघोबा आहे?

तो जनावर होता

मी तर घर आहे.

.............................................................................................................................................

कविता महाजन यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/author/26/Kavita-Mahajan

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ramesh singh

Fri , 28 September 2018

श्रद्धांजली.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......