अजूनकाही
मरम अल – मसरी या सीरियन कवयित्री आहेत. त्यांचा जन्म १९६२ सालचा. अरेबिकमधील सशक्त कवयित्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत.
१९८२ मध्ये त्यांनी फ्रान्समध्ये स्थलांतर केलं. अगदी लहानपणापासूनच त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली. ‘अ रेड चेरी ऑन ए व्हाईट टाईल्ड फ्लोअर’ हा त्यांचा संग्रह १९९७ साली प्रसिद्ध झाला. हा संग्रह ट्युनिशियन मिनिस्ट्री ऑफ कल्चर यांनी प्रसिद्ध केला. कारण सीरियामधील प्रकाशकांना त्या कविता अश्लील वाटल्या होत्या. या पुस्तकाचा स्पॅनिश भाषेत अनुवाद झाला आणि तो खूप गाजला. यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. त्याचबरोबर त्याची इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत भाषांतरं झाली. आणि जागतिक स्तरावर त्यांना प्रसिद्धी मिळाली.
त्यांच्या ‘अ रेड चेरी ऑन ए व्हाईट टाईल्ड फ्लोअर’, ‘बेअरफूट सोल्स’, ‘फ्रीडम, शी कम्स नेकेड’ आणि ‘आय लुक अॅट यु’ या चार कवितासंग्रहातील निवडक कवितांचा कृष्णा किंबहुने यांनी केलेला अनुवाद ‘मरम अल मसरी : निवडक कविता’ या पुस्तकात समाविष्ट केला आहे.
सीरिया या देशात गेली अनेक दशकं अशांतता आणि गोंधळाची परिस्थिती आहे. सततची युद्धजन्य परिस्थिती, राजकीय आणि लष्करी उठाव, नागरी युद्ध यांनी त्यांचा इतिहास भरून राहिला आहे. इस्लामिक मूलतत्त्ववाद, समाजवादी लोकशाहीच्या नावाखाली असलेली १९७०पासून असद पितापुत्रांची हुकूमशाही राजवट, त्यांनी केलेले अनन्वित अत्याचार, या सर्व गोष्टींमुळे त्यांचा इतिहास सदैव अस्वस्थ आणि अशांत राहिला आहे. माणसाच्या जगण्याचीच काही शाश्वती नाही, तर स्त्रियांची परिस्थिती काय असेल याची कल्पना केलेलीच बरी.
सर्वसामान्य माणसाला साधं सरळ जगणं माहितीच नाही जणू. लहान मुलांचं जग तर करपूनच गेलेलं. त्यांच्या भावविश्वात हसणं, निर्भर जगणं नाहीच मुळी. सगळी कोवळीक हरपून गेलेली. खेळण्यांनी खेळण्याच्या वयात त्यांची गाठ पडते ती बंदुका, गोळीबार, बॉम्ब या गोष्टींशी. या भीषण वास्तवाचा सामना गेल्या कित्येक दशकातल्या मुलांना करावा लागला आहे.
स्त्रियांची परिस्थिती बिकटच आहे. इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारांनी त्यांच्या समग्र आयुष्यालाच व्यापून टाकलं आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर अपरिमित बंधनं आहेत. मोकळेपणानं श्वास घेणं हेच कठीण आहे.
डोळ्यासमोर सतत होणारे गोळीबार, कत्तली, अत्याचार, वाहणारे रक्ताचे पाट, अन्नधान्याचा तुटवडा, प्राथमिक सोयींसुविधांचा अभाव या अशा काळोखी, दुःस्वप्नवजा वातावरणात या कवयित्रीची जडणघडण झाली. आणि त्याचा समग्र परिपाक त्यांच्या कवितांमधून उफाळून येतो. अशा निराशेनं भरलेल्या उद्वेगजनक वातावरणातदेखील त्यांची कविता नुसतीच टिकून राहिली नाही, तर तिला धार येत गेली. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतदेखील त्यांची संवेदनाशीलता टिकून राहिली आणि ती कवितेच्या रूपात व्यक्त झाली, ही एक आश्चर्याचीच गोष्ट आहे.
त्यांच्या कवितेची भाषा साधी सरळ आहे. त्यांची शैली अनलंकृत आहे. रोजच्या जगण्यातल्या प्रतिमांनी त्यांची कविता साकार होते आणि त्यातून या जगण्यातलं दाहक नग्न वास्तव अतिशय प्रभावीपणे त्या प्रतिमित करतात आणि संवेदनांमधील सूक्ष्म नाट्याचा वेध घेतात.
स्त्रियांचं म्हणून एक भावविश्व असतं. त्यांच्या कवितांचं ते एक प्रमुख सूत्र आहे. स्त्रीच्या भावभावना, शारीर भूक, वासना, उन्माद आणि ते व्यक्त करता येऊ न शकणारी सामाजिक बंधनं, लग्नसंबंधांतलं एकसुरी, बळजबरीचं हतबल जगणं, यांचं थेट, धाडसी, अनलंकृत प्रकटीकरण त्यांच्या कवितेत होतं.
त्या म्हणतात, ‘या कविता अरेबिक वाचकांसाठी नाहीत, कारण त्यांना त्या पटणार, भिडणार नाहीत, कारण त्यांची जडणघडणच वेगळ्या प्रकारची आहे.’
काहीएक अपराध नसताना लहान मुलांना जे आयुष्य सिरियात भोगावं लागतं आहे, त्याचं अत्यंत संवेदनशील चित्रण हे त्यांच्या कवितांचं दुसरं प्रमुख सूत्र आहे. बॉम्बस्फोटात तुटलेले, रक्ताच्या चिखलात मरून पडलेले आई-वडील बघणं, धुमश्चक्री चालू असता पावासाठी रांगेत उभं राहणं, त्या बापड्या मुलांच्या नशिबी आलं आहे. त्याचं प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या कवितेत होतं.
स्वातंत्र्य हे त्यांच्या कवितांचं तिसरं प्रमुख सूत्र. पण हे स्वातंत्र्य कोणापासून ही संभ्रमित अवस्थाही दिसून येते. राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, आविष्काराचं स्वातंत्र्य, स्त्रीचं स्वातंत्र्य अशा स्वातंत्र्याच्या अनेक परी त्यांच्या कवितात दृगोच्चर होतात.
या अशा निराशाजनक, झाकोळलेल्या, खिन्न, उदध्वस्त वातावरणात असलेली स्वप्नं हे त्यांच्या कवितांचं चौथं सूत्र. ही स्वप्नं लहान आहेत, वैयक्तिक सुखाची आहेत, शांत-समाधानी जीवनाची आहेत. तर काही मोठी आहेत. देशाच्या स्वातंत्र्याची, जुलमी राजवटीपासूनच्या मुक्ततेची, सुटकेची आहेत. ही स्वप्नंच त्या नागरिकांचा मोठा आधार आहे. त्या वातावरणात जगून, तगून राहण्याचा तो एक मार्ग आहे. हा आशावादी सूरच त्यांना जगण्याचं बळ प्राप्त करून देतो.
माणसं परागंदा होताहेत. स्थलांतर करताहेत. आपली जन्मभूमी सोडून जाणं त्यांच्या नशिबी येतंय. बाहेरच्या जगातही त्यांना नीट थारा मिळतोय असं नाही. तिथंही उपेक्षा, अवहेलना, तिरस्कार, संशय, दुय्यम वागणूक त्यांच्या वाट्याला येत आहे. तरीही जगण्यासाठी तोच एक उपाय उरल्यानंतर ती अपरिहार्य होताहेत. या स्थलांतरितांची वेदना हे पाचवं सूत्र आहे.
त्या स्वतः परदेशी स्थलांतरित झाल्या. पण त्यांचा भाऊ मात्र सीरियातच राहिला. त्याची एक कविता या संग्रहात आहे. त्यात या द्वंद्वाचं प्रत्ययकारी चित्रण आलं आहे.
मराठी वाचकाला या प्रकारचं वास्तव पूर्णतः अपरिचित आहे. काही पुस्तकं आणि सिनेमे यांच्या माध्यमातून काहींना त्याची तोंडओळख असेल. म्हणून या कवयित्रीची निवड करणं यातच कृष्णा किंबहुने यांची संवेदनाशीलता दिसून येते. अशा प्रकारच्या कवितांचा अनुवाद करून त्यांनी मराठी कवितेला समृद्ध केलं आहे. याबद्दल कृष्णा किंबहुने यांचं अभिनंदन.
कवितांचा अनुवाद ही अतिशय कठीण गोष्ट असते. मूळ संहितेतील अर्थवलयं नीट उमगून अनुवाद करावा लागतो. शिवाय ही सांस्कृतिक, सामाजिक परिस्थिती अतिशय वेगळी आणि भिन्न आहे. ही आणखी अडचणीची गोष्ट आहे. कृष्णा किंबहुने यांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेललं आहे. त्यांचा अनुवाद अतिशय सुभग झाला आहे. कवितांची लयही त्यांनी सांभाळली आहे.
एका सशक्त कृतीचा सशक्त अनुवाद केल्याबद्दल कृष्णा किंबहुने यांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
.............................................................................................................................................
मरम अल मसरी : निवडक कविता - अनुवाद कृष्णा किंबहुने
शब्द पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १५० रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4586/Maram-Al-Masri-:-Nivdak-Kavita
.............................................................................................................................................
लेखक आनंद थत्ते मराठी-इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अनुवादक आहेत.
thatte.anand7@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ramesh singh
Fri , 28 September 2018
सर, मूळ कवितांचा आशय आणि अनुवाद यांबद्दल आपण लिहिलेली मते निश्चितच उपयुक्त ठरतील, परंतु त्यांना कवितांचीही प्रातिनिधिक जोड देणे उचित ठरले असते. कवितेच्या आशयाचे आपले वर्णन देण्याऐवजी कवितेतीह काही उदाहरणे उर्द्धृत करणे अधिक उचित ठरले असते. तरीही, आपण या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!