त्यांच्या ‘अम्मा’ होत्या, पण इतरांच्या ‘कैकयी’ नव्हत्या!
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • जयललिता : २४ फेब्रुवारी १९४८ – ५ डिसेंबर २०१६
  • Tue , 06 December 2016
  • जयललिता Jayalalithaa मुख्यमंत्री Chief Minister of Tamil Nadu एआयएडीएमके AIADMK India Anna Dravida Munnetra Kazhagam

तमिळनाडूतील जनतेमध्ये सिनेमाचे वेड सर्वश्रुत आहे. एम.जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता यांच्यापासून अनेक नेत्यांनी आधी सिनेमांमध्ये भूमिका करून जनमानसांत लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ते राजकारणात आले. तिथे त्यांनी लोकानुनयी राजकारण करून जनमानसांत आपले स्थान घट्ट केले. त्यामुळे त्यांचा फॅन-क्लब विस्तारला आणि व्होट बँकही. जयललिता या त्यांपैकीच एक.  

१९८०नंतर भारतीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचा आणि त्यांच्या प्रभावाचा मोठ्या प्रमाणावर उदय झाला. या पक्षांनी सत्तासमतोलाच्या नव्या राजकारणाला सुरुवात केली. त्यातून ‘प्रदेशाभिमान आणि राज्याचा विकास यांचा पुरस्कार करण्यात काहीही गैर नाही’, हे नवं तत्त्व भारतीय राजकारणात प्रस्थापित झालं. प्रादेशिक असूनही राष्ट्रीय प्रश्नांबद्दल भूमिका घेणं, राष्ट्रीय राजकारणात सहभागी होणं या गोष्टी या पक्षांकडून केल्या जाऊ लागल्या. प्रसंगी आघाड्यांचं सरकार असल्यामुळे या प्रादेशिक पक्षांनी केंद्र सरकारमध्ये सहभागी होऊन वेळप्रसंगी हवं ते पदरात पाडून घेणं, अडमुठेपणा-हटवादी भूमिका घेणं, केंद्र सरकारची अडवणूक करणं अशा विविध गोष्टी करायला सुरुवात केली. जयललिता यांचं राजकारणही यांपासून वेगळं नव्हतं. वाजपेयी सरकारमध्ये त्या सहभागी झाल्या, पण वाजपेयी सरकारला त्यांच्या सतत नाकदुऱ्या काढाव्या लागल्या.

‘द्रविड मुनेत्र कळघम’ या पक्षाची स्थापना १९४९मध्येच झाली. पेरियार यांच्यानंतर या पक्षाची धुरा सत्तरच्या दशकात करुणानिधी यांच्याकडे आली. त्यांनी या पक्षाची घडी बसवली. पक्षात त्यांनी जान आणली, तरी पक्ष पातळीवरील भ्रष्टाचाराला त्यांना आवर घालता आला नाही. पुढे करुणानिधी यांनी आपले घनिष्ठ मित्र आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार अभिनेते एम.जी.रामचंद्रन यांना पक्षात आणले. आमदार केले. पुढे अण्णा दुराई यांच्या निधनानंतर करुणानिधी यांना मुख्यमंत्री बनवण्यातही एमजीआर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण राजकीय महत्त्वाकांक्षेने पुढे घात केला. एमजीआर-करुणानिधी यांच्यातील संबंध विकोपाला गेले. शेवटी एमजीआर यांना पक्षातून काढून टाकले गेले. परंतु एमजीआर यांचं व्यक्तिमत्त्व करिश्मा असलेलं होतं. महिलावर्गामध्ये त्यांची लोकप्रियता मोठी होती. १८ ऑक्टोबर १९७२ रोजी एमजीआर यांनी एडीएमके हा नवीन पक्ष स्थापन केला. तेव्हा त्या पक्षालाही तमिळनाडूमध्ये लोकप्रियता मिळाली. एमजीआर मुख्यमंत्री झाले.

या एमजीआर यांनी चित्रपटामध्ये त्यांची हिरॉईन म्हणून काम करणाऱ्या जयललिता यांना राजकारणात आणलं. इंग्रजी कादंबऱ्या वाचणारी, दक्षिणेतील अभिनेत्रींच्या तुलनेत अतिशय सुंदर असलेली ही तरुणी एमजीआर यांचा प्रेमविषयही होती. त्यामुळे त्यांचा राजकारण प्रवेश सुकर झाला. एमजीआर यांनी जयललिता यांचं इंग्रजी चांगलं असल्यामुळे त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. त्यांनी पक्षाचे प्रचार सचिवही बनवले. पण नंतर त्यांना पक्षातूनच इतका विरोध जाला की, एमजीआर यांनी त्यांना या पदावरून हटवावं लागलं. एमजीआर यांच्या निधनानंतर एडीएमके या पक्षात दोन गट पडले. एक एमजीआर यांच्या पत्नीच्या बाजूचा आणि दुसरा जयललिता यांचा. त्यात एमजीआर यांच्या राजकीय वारस आपणच आहोत असं जयललिता यांनी जाहीर केलं. नंतर त्यांनाही पक्षातून बाहेर पडावं लागलं. जयललिता यांनी ऑल इंडिया अण्णा दुराई द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाची स्थापना केली. पण त्यांनी लोकानुनयी राजकारणाचा एमजीआर यांचाच कित्ता गिरवला. शालेय विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण मोफत, टुथ पावडरपासून चप्पलांपर्यंत गरिबांसाठी अनेक मोफत योजना राबवून एमजीआर यांनी लोकप्रियता मिळवली होती. जयललिता यांनीही तोच क्रम अजून वाढत्या प्रमाणात चालू ठेवला. १९९१मध्ये जयललिता पहिल्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. तेव्हा त्यांचं वय ४० होतं. त्यानंतर त्या २००१, २००२ आणि २०११मध्ये मुख्यमंत्री झाल्या. या चारही टर्ममध्ये त्यांनी तांदूळ, सांबार मसाला, मिक्सर, ग्राइंडर, टीव्ही संच अशा अनेक वस्तू जर्वसामान्य जनतेला मोफत दिल्या. त्यामुळे तमिळनाडूतील जनतेच्या त्या ‘अम्मा’ झाल्या.

द्रविड मुनेत्र कळघमचे संस्थापक पेरियार यांनी ब्राह्मणद्वेष केला. हिंदूधर्मातील पुरोहितशाही, कर्मकांड यांच्यावर प्रच्छन्न टीका केली. पण जन्माने ब्राह्मण असलेल्या जयललिता यांनी मंदिरांमध्ये जाऊन पूजा-अर्चा करणं, मंदिरांना भेटवस्तू, मदत देणं या गोष्टी जाहीरपणे केल्या. त्यांनी हिंदुत्ववादी भाजपबरोबर युतीही केली. त्यामुळे या दोन गोष्टी त्यांनी पेरियार यांच्या परंपरेला फाटा देणाऱ्या केल्या असे मानले जाते. मात्र लोकप्रिय, लोकानुनयी, विभुतीपूजा या पद्धतीचे राजकारण करणाऱ्या जयललिता यांनी तमिळनाडूमध्ये महिला सक्षमीकरणावरही भर दिला. त्यांनी ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांवर नेले. महिलांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देऊन त्यांना विधानसभेत आमदार केले. त्यामुळेच त्या तमिळनाडूमधील सर्वसामान्य महिलांच्या आणि पुरुषांच्याही ‘अम्मा’ झाल्या.

पण या अम्मांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी कधी दिल्लीत जाऊन पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली नाही. किंबहुना दक्षिणेतील राजकीय नेत्यांनाच पंतप्रधानपदाची फारशी ओढ नसते ( ती उत्तरेत मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते). त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात स्वत:ची विश्वासार्हता त्यांनी कधी पणाला लावावी लागली नाही. मात्र त्यांचे राष्ट्रीय राजकारण हे हेनमीच हटवादी, अडेलतट्टूपणाचे राहिले आहे. भारतीय राजकारणात अशा आडमुठ्या भूमिका घेतल्याशिवाय निभावही लागत नाही. पण पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा न बाळगल्याने त्यांचा शरद पवार झाला नाही आणि नीतीशकुमारही. त्या कायम प्रादेशिक नेत्याच राहिल्या. त्यांना स्वत:लाही याची पुरेपूर कल्पना होती. किंबहुना हे त्यांनी समजून-उमजून केलेलं राजकारण असावं. त्यामुळे राज्यातली त्यांची लोकप्रियता अबाधित राहिली आणि दिल्लीतील कुणाला त्यांनी कधी गृहीत धरू दिले नाही.

जयललिता खूप चांगल्या वाचक होत्या. चित्रपटसृष्टीत असल्यापासून त्या इंग्रजी कथा-कादंबऱ्यांचे वाचन करत होत्या. ती त्यांची सवय शेवटपर्यंत टिकून होती. त्यांचे इंग्रजी अतिशय चांगले होते. त्यांचे दुसरे प्रेम होते क्रिकेटवर. नवाब पतौडी आणि नरी काँट्रॅक्टर हे त्यांचे आवडते क्रिकेटपटू होते. इतके की, त्या त्यांच्या प्रेमात होत्या. पण त्यांनी जसे एमजीआर यांच्याशी कधी लग्न केले नाही, तसेच पतौडी किंवा काँट्रॅक्टर यांच्याशीही केले नाही. पण एकट्या बाईला संपत्तीचा मोह नसतो, हे मात्र निदान त्यांच्याबाबतीत तरी त्यांनी खरे नसल्याचे सिद्ध करून दाखवले. त्यांची बेनामी स्थावर संपत्ती प्रचंड आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर त्यांच्या जिवश्च-कंठश्च मैत्रिणीनेच विषप्रयोग केल्याचे सिद्ध झाले होते. पण त्यातून त्यांना तेव्हा नरेंद्र मोदी यांनी वाचवले. जयललिता यांच्याकडे दोन हजार एकर जमीन, ३० किलो सोने, चप्पल-बुटांचे काहीशे जोड आणि १२ हजार साड्या, हा केवळ भारतातीलच नाहीतर जगभरातील प्रसारमाध्यमांचा विषय झाला होता. ही सर्व संपत्ती सरकारजमा झाल्यानंतर त्यांनी काही काळ कुठलाही सोन्याचा दागिना अंगावर घालणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. ती २०१२पर्यंत पाळलीही . त्यानंतर त्या दोन बांगड्या घालू लागल्या. खरं तर त्यांच्यासारख्या पौराणिकसदृश्य चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीला, आईपासून अभिनयाचा वारसा मिळालेल्या मुलीला दाग-दागिन्यांची अतोनात आवड असणं स्वाभाविक होतं. पण त्यांचा निग्रह इतका दांडगा होता की, त्यांनी एकदा एकादी गोष्ट ठरवली की, त्या ती शेवटपर्यंत पाळत असत.

एक गोष्ट मात्र जयललिता यांना कधीच करता आली नाही. ती म्हणजे, तमिळी जनतेने आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांची जी विभूतीपूजा मांडली, त्याला त्यांनी कधीही विरोध केला नाही. जनमानसाच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा हा त्यांचा शौक चित्रपटसृष्टीतून आला असावा. तसाच तो त्यांचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असणाऱ्या एमजीआर यांच्याकडूनही आला असावा.

आता अम्मा यांच्यानंतर तमिळनाडूचा मुख्यमंत्री कोण आणि त्यांच्या पक्षाचा उत्तराधिकारी कोण, याची चर्चा सर्वाधिक केली जाईल. मुख्यमंत्रीपदी काल रात्रीच दीड वाजताच जयललिता यांचे विश्वासू सहकारी ओ. पन्नीरसेल्वम यांची निवड करण्यात आली आहे. जयललिता बेनामी संपत्तीच्या प्रकरणात तुरुंगात असताना त्यांचे छायाचित्र समोर ठेवून हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या पन्नीरसेल्वम यांना त्यांच्या निष्ठेचे फळ मिळाले खरे, पण त्यांची कसोटी आता सुरू झाली आहे. पक्ष आणि सत्ता या दोन्हीवर त्यांना पकड मिळवता येईल की नाही यासाठी थोडा काळ जाऊ द्यावा लागेल. पण हेही तितकेच खरे की, तमिळनाडूमधील जनतेला करिश्मा असलेला नेता लागतो. तो पन्नीरसेल्वम यांच्याकडे नाही. त्यामुळे जयललिता यांच्यानंतर त्यांच्या पक्षाचे, त्यांच्या पद्धतीच्या लोकानुनयी राजकारणाचे काय होणार, हे औत्सुक्याचे राहणार आहे.

त्यांचा आणि त्यांच्या पूर्वसुरींचा प्रवास पाहिला, तर मोठ्या झाडाच्या सावलीत वाढलेले झाडच नंतर सर्वसर्वा होते. त्यासाठी गारुड करणारे, करिश्मा असणारे व्यक्तिमत्त्व असावे लागते. तशांची संख्या तमिळनाडूच्या चित्रपटसृष्टीत काही कमी नाही. त्यातील काही राजकारणातही आहेत. राजकारण आणि सिनेमा ज्या राज्यात हातात हात घालून जातात, तिथे कधीही कुठलाही चमत्कार होऊ शकतो.

आता शेवटचा मुद्दा जयललिता यांच्या पद्धतीचे राजकारण भारतीय लोकशाहीला तारक की मारक? केवळ जयललिता यांचाच विचार करायचा झाला, तर त्यांच्या राजकारणाचे प्रभावक्षेत्र हे फक्त त्यांचे राज्य होते. पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षाच नसल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात त्यांनी स्वत:ला कधीही घोडेबाजारात लोटले नाही. दुसरे लोकानुनयी का असेना, पण जनसामान्यांचा विचार केला. विभूतीपूजा हा काही एकट्या तमिळनाडूमधील राजकारणाच्या मानगुटीवर बसलेला समंध नाही. तो अखिल भारतीय राजकारणाच्याच मानगुटीवर बसलेला समंध आहे. प्रादेशिक पक्षाला आपल्या मर्यादेत राहून चांगले काम करता येते, याचे उदाहरण म्हणूनही जयललिता यांच्याकडे पाहता येईल. त्यांच्या पद्धतीचे राजकारण मात्र लोकशाहीला फारसे मारक ठरू शकत नाही. त्याचा अधिक चांगल्या प्रकारे वापर केला गेला, तर ते तारकही ठरू शकते. त्यामुळे जयललिता यांना विनाकारण खलनायक म्हणून रंगवण्याचे कारण नाही. त्या स्वत:ही भ्रष्ट होत्या आणि त्यांचा पक्षही भ्रष्टाचारी आहे. पण करुणानिधी यांच्यासारखं गुंडगिरीचं राजकारण त्यांनी केलं नाही. त्या नायक नव्हत्या, आदर्श नव्हत्या, पण त्या सुषमा स्वराज, ममता बॅनर्जी, मायावती, वृंदा कारत यांच्यासारख्या आक्रस्ताळ्या नव्हत्या. त्यांना आपल्या मर्यादा चांगल्या प्रकारे माहीत होत्या. त्यामुळे त्या मर्यादांमध्ये सामर्थ्याची हवा भरून त्याचा त्यांनी कधी फुगा फुगवला नाही. त्यामुळे त्या तमिळनाडूमधील जनतेच्या ‘अम्मा’ असल्या तरी, इतरांनी त्यांच्याकडे ‘कैकयी’ म्हणून पाहण्याचीही गरज नाही.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारतीय जनतेने ‘एनडीए आघाडी’ला सत्ता दिली, पण तिचा हर्षोन्माद व्हावा, अशी दिली नाही आणि ‘इंडिया आघाडी’ला विरोधी पक्षात बसवले, पण हर्षोन्माद व्हावा, इतकी मोठी आघाडी दिली!

२०२४ची लोकसभा निवडणूक ही १९७७नंतरची सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे, असे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. ते ‘रायटिंग ऑन वॉल’ होते, हेही भारतीय जनतेने मोदींना स्पष्टपणे बजावले आहे. ते मोदी कितपत गांभीर्याने घेतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच. मोदी आणि भाजपनेते ‘चार सौ पार’चा जयघोष करत राहिले, पण भाजपला अपेक्षित बहुमतही मिळालेले नाही, हेही नसे थोडके.......