अजूनकाही
सत्तेचा वापर करून आपले आणि आपल्या आप्तेष्टांचे उखळ पांढरे करून घेण्याची पद्धत ही काही नवी संकल्पना नाही. व्यक्तीगत हित साधण्यासाठी पदाचा, सत्तेचा करिश्मा वापरल्या गेला त्याच क्षणी सार्वजनिक जीवनातील नीतीमत्ता संपुष्टात येत असते. कारण सार्वजनिक कल्याणासाठी भूषवत असलेल्या सत्तेचा, पदाचा वा विशेषाधिकाराचा वापर व्यक्तीगत कारणांसाठी करणे हाच मुळात भ्रष्टाचार असतो. ‘तळे राखेल तो पाणी चाखेल’ असे संबोधून त्यावर पडदा टाकला जातो हा झाला या अनाचाराचा निर्लज्ज कळस. हा सत्तेचा गैरवापर असतो.
वैध मार्गाने अथवा नीतीविषयक, नियमावलीस छेद न देता, चौकटीत राहून आपापल्या महत्त्वाकांक्षा सिद्धीस निर्माण करण्यास कुठलीच व्यवस्था हरकत घेत नसते. या स्वप्नपूर्तीसाठी सार्वजनिक व्यवहारातील नियम, शिष्टाचार, संकेत, सार्वजनिक हितसंबंध अशा सर्वांना हरताळ फासला जाणे, हा गुन्हा मानला जातो. हे असे गुन्हे प्रत्येक वेळी कायद्याच्या कक्षेत सिद्ध होतीलच असे नव्हे.
व्यक्तीगत स्वार्थासाठी व्यवस्थेतील सर्वच नीतीनियमांना हरताळ फासला जाणाऱ्या व्यक्ती कमी- अधिक प्रमाणात सर्वत्र असतात. या प्रवृत्तीचा शिरकाव राजकीय प्रवाहात झाला की, राजकारणाचे काय होते ते आपण सध्या जगभरात पाहतोच आहोत. व्यवस्थेच्या प्रत्येक संरचनेने आपल्या निष्पक्ष प्रचलनासाठी काही स्वतंत्र मार्ग, नियमावली केलेली असते. आपल्या वाटचालीच्या दिशा, मर्यादा अधोरेखित केलेल्या असतात. ‘डु’ज आणि ‘डोंट्स’ची बंधने घातलेली असतात. एवढे सगळे असूनही या संस्थात्मक रचनांचा बाजार होत असतो. ही वाताहात कशामुळे होते? या सर्व संरचना पोखरल्या जातात.
व्यक्तीगत हित साधणे पाप नाहीच. पण ते साधण्यासाठी नीती, नियम, कायदा पायदळी तुडवणे व प्रसंगी इतरांच्या हितांचा बळी देणे पापच नव्हे तर गुन्हाही आहे. हे गुन्हे करण्यासाठी राजकीय सत्ता राबवता आली तर ‘सोने पे सुहागा’ ठरते. मग या अनाचाराला धरबंद राहत नाही. गुन्हेगारांचे राजकीयीकरण आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी चढाओढीने होत जातात. समाज, राजकीय भाष्यकारांना हे खूप पूर्वीपासून उमगलेले आहे, अगदी प्राचीनतम काळापासून.
...............................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
..............................................................................................................................................................
ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोला वाटायचे की, राजा हा तत्त्वचिंतक, तत्त्वज्ञ असायला हवा. सार्वजनिक स्थावर व संसाधनांवर सामूहिक मालकी असावी. त्याला बिचायाला कुठे ठाऊक होते, त्याच्या विचाराचा असा उलट अन्वयार्थ काढला जाईल म्हणून? सर्व स्थावर, संसाधनांवर स्वार्थी मंडळींची सामूहिक मालकी आहेच ना आताही! प्लेटोचेच काय अगदी भारतीय इतिहासातही राजसत्तेला धर्माचे अधिष्ठान असल्याचे दाखले मिळतात. राजाने कारभार कसा करावा, याबद्दल विशिष्ट आग्रह धरलेले आढळतात. राज्यकारभार करताना नीतीची, धर्माची चाड बाळगावी असा आग्रह धरणारे ऋषीमुनी त्या राजदरबारात असण्याचे औचित्यच मुळात हे होते.
इथे सत्ता आणि धर्म यांचा परस्परसंबंधांचा प्रवास वेगळा आहे. राजसत्तेने धर्माचे अधिष्ठान मानायचे ते कुठल्या विशिष्ट धर्मसंकल्पनांसाठी नव्हे, तर राजाला त्याचा राजधर्म, नीतीनियम पाळता यायला हवा म्हणून. राज्य कारभारादरम्यान अहंभाव, स्वार्थ, संकुचिततेला थारा मिळू नये म्हणून हा धर्मदंड त्याच्या समोर असायचा. दरबारातील धर्मप्रतीके विरक्ती, वैराग्य, मोह सोडण्यासाठी होते. हा झाला इतिहास.
आज धर्मच ठाऊक नसलेले भोंदू पदरी बाळगण्याएवढी चतुराई राजकीय प्रवाहात आलेली आहे. राजकीय प्रवहास नैतिक वळण देण्याएवढी प्रज्ञा अंगी नसलेल्या दांभिक बाजारबुणग्यांची जत्रा केवळ सत्तेची फळे चाखण्यासाठीची धडपड झाली आहे. त्याचे आणखी पुढे काय होणार आहे, याची कल्पना आहेच आपल्याला. राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी संसदेने कायदा करावा, असे न्यायव्यवस्था सांगते आहे. यामुळे लोकशाहीच्या मुळावर घाव घातले जाताहेत, हेसुद्धा न्यायालय नमूद करते आहे.
आपली पात्रता, अनुभव नियमात बसत नसतानाही मोक्याचे प्रशासकीय पद बळकावण्यात आपण काही गैर करतो आहोत असे न वाटणारा सरकारी नोकर आणि लोकप्रतिनिधित्वाचा गैरवापर करत पाच पिढ्यांची माया कमावणारा नेता हे दोघेही सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराचे, गुन्हेगारीकरणाचे सारखेच वाहक आहेत. याबाबतचे दोषारोपण ही बाब थोडीशी नाजूक आहे. कारण आपल्या व्यवस्थेत अशा दुष्प्रवृत्ती फोफावू देणारे, त्या अनिर्बंध होत चालल्याचे दिसूनही शांत, स्वस्थ बसलेले व्यवस्थेचे अविभाज्य घटक असणारे आपण सगळेच त्या पापाचे धनी आहोत.
स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार निवडून देण्याचे कष्ट मतदार म्हणून आपल्याला नको आहेत. या मानसिकतेचा अचूक अंदाज बांधणारे राजकीय पक्षही तसा प्रयत्न करत नाहीत. निवडून येण्यासाठी सगळे काही असणारा सर्वदोषकुलोत्पन्न उमेदवार देऊन ते मोकळे होतात. सार्वजनिक व्यवहारातील स्वच्छता आणि पारदर्शकता घरी ठेवत आपणही त्याच्या नसलेल्या कर्तृत्वाचे गोडवे गात मतदान करून मोकळे होतो, पूर्वजांचे श्राद्ध उरकल्यासारखे! स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीला राजकारण कसे कळणार नाही का?
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment