अजूनकाही
२०१३ साली महाराष्ट्रातल्या राळेगणसिद्धी येथून अण्णा हजारेंना दिल्लीच्या रामलीला मैदानावर नेऊन बसवणाऱ्या प्रमुख लोकांपैकी अरविंद केजरीवाल यांनी योगेंद्र यादवांसह अनेकांना घेऊन ‘आम आदमी पार्टी’ स्थापन केली. निवडणुका लढवून दिल्ली विधानसभा जिंकली. याच दरम्यान ‘मैं अन्ना’ ही टोपी फिरवून भाजपचं कमळ हातात घेत ‘क्रेन’ बेदी म्हणजेच किरण बेदी निवडणुकीत उतरल्या आणि पराभूतही झाल्या. भाजपनं त्यांना राज्यपालपद देऊन तूर्तास तरी राजकारणाबाहेर ठेवलं. बाबा रामदेव यांनी पतंजली उद्योग सुरू करून थेट अंबानींशीच स्पर्धा सुरू केलीय. बाबा आता ‘पोलिटिकली करेक्ट’ बोलायला लागलेत. योगेंद्र यादव वगैरे मंडळींनी लवकरच ‘आप’मधून बाहेर पडत वेगळी चूल मांडली. शाजिया इल्मी भाजपवासी झाल्या. अलीकडेच आशुतोष आणि आशिष खेतान यांनी राजकारण संन्यास घेतला.
या सर्व लोकांनी ज्या लोकपालसाठी रान उठवलं होतं, ते तर आता चर्चेतही नाही. २०१४नंतर मध्येच जाग आल्यासारखे अण्णा परत जंतरमंतरवर आले, पण यावेळी ना सनई चौघडे होते, ना भरजरी मंडप की २४ तास रसोई. देशात भ्रष्टाचार समूळ उखडल्यामुळे अण्णांना विषय राहिला नाही. यावेळी माध्यमांनीही आपल्या ओबी व्हॅन पार्किंग लॉटमधून बाहेरही काढल्या नाहीत. कुठे पूर आला, आग लागली, कुणी गटारात पडलं किंवा सलमान खान किंवा कुणी बाबा, बापू आत-बाहेर गेला, तर ओबी व्हॅन जातात. पारदर्शक आणि स्वच्छ सरकार असल्यानं खरं तर अण्णांची गोची झालीय. आणि एकदा राष्ट्रीय पातळीवरचं आंदोलन केल्यावर एकनाथ खडसे वगैरेसारखं प्रकरण दमानिया बाईंना पुरेसं असल्यानं अण्णा त्यावर फार काही बोलले नाहीत. विश्वंभर चौधरींसारखे मात्र खरोखरच गोंधळात सापडले. भाजप काय, काँग्रेस काय कुणाबद्दल बोलणार ते? ‘आप’नं आशेला लावून निराशा केली आणि फक्त दिल्लीच सांभाळली!
जवळपास चार वर्षं निघून गेल्यावर आता विरोधाचा खडा सूर राहुल गांधी लावताहेत. मात्र त्यात पक्षापेक्षा त्यांचा स्वत:चा अजेंडा आहे. २०१४ साली मोदींनी त्यांना ‘शहजादा’ ते ‘पप्पू’ म्हणून आपला प्रतिस्पर्धी बघा किती अर्धवटराव आहे, असं सिद्ध करण्यावर भर दिला, ‘परिवारवाद’, ‘माँ बेटे की सरकार’ असं करत टार्गेट गांधी फॅमिली राहिल हे पाहिलं. राहुल गांधी आता मोदींचीच नीती मोदींवर उलटवताहेत. तेही सरकार, भाजप यापेक्षा मोदी आणि अमित शहा यांनाच टार्गेट करताहेत. आणि त्यांच्यात बऱ्यापैकी आत्मविश्वासही दिसतो. संसदेतील गळाभेटीनंतर राहुल गांधींनी पक्ष्याचा डोळा हेच लक्ष्य ठेवल्यासारखं मोदींवर अक्षरक्ष: दिवस-रात्र हल्ला चढवण्याचं धोरण ठेवलंय. विजय मल्ल्या, निरव मोदी प्रकरणानंतर घसरता रुपया, वाढते इंधन दर आणि राफेल करार यावरून ‘देश का चौकीदार चोर है’ असा थेट वार केलाय. हे विधान तसं धाडसी. कारण देशाच्या पंतप्रधानाला चोर म्हणतोय हा माणूस असा गळा भाजपनं काढलाय. पण मनमोहन सिंगांना ‘मनमौन सिंग’ ते ‘निकम्मा’ म्हणण्यापर्यंत मजल मारलेल्या भाजपला तसा पदाच्या प्रतिष्ठेचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. शिवाय राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना अर्ध्या मंत्रिमंडळाला जो थयथयाट करावा लागतोय, त्यातून चर्चा भारत-पाकिस्तान अशी नेण्याचा रडीचा डाव भाजप खेळतंय. बादरायण संबंध जोडणं हे तर भाजपचं वैशिष्ट्यच.
...............................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
...............................................................................................................................................................
थोडक्यात राहुल गांधी, राज ठाकरे, अधूनमधून शिवसेना; एनडीटीव्ही, ‘वायर’, ‘अक्षरनामा’, ‘दस्तक’ वगैरेंसारखी वेबपोर्टल वगळता २०१३चा आवाज कुठे दिसत नाही, ऐकू येत नाही. इतर राजकीय पक्षही सावध पवित्र्यात दिसतात. त्यांनी निवडणुकांची तयारी सुरू केलीय.
आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय, टु-जी स्पेक्ट्रम, कोळसा खाणी लिलाव यांसारख्या सामान्य माणसाच्या थेट जीवनावर कसलाच परिणाम न करणाऱ्या गोष्टीवर देशभर गदारोळ उडवणारे अण्णा, जंतरमंतर मेणबत्तीवाले, तिरंगेवाले सगळे २०१४नंतर बिघडलेलं सामाजिक वातावरण, गोरक्षकांचा हैदोस, लव्ह जिहाद, मंत्री, आमदार, खासदार यांसह पंतप्रधानांची अवैज्ञानिक विधानं यावर प्रतिक्रिया देत नाहीएत. निर्भयासाठी रस्त्यावर उतरलेले आज ‘भारतात स्त्रिया असुरक्षित’ हा जागतिक निष्कर्ष जाहीर होऊनही आणि रोजच्या बातम्या वाचून, पाहूनही गप्प? नोटबंदी ते इंधन दरवाढ, पर्यायानं महागाई वाढ होऊनही कुठूनही एक ‘ब्र’ नाही. ‘मनमौनसिंग’ म्हणून मजाक उडवणारे प्रधानसेवक बनलेत. केरळला पूर आला, हे खिशात हात घालायला तयार नाहीत. आता पेट्रोल ९० रुपये, डिझेल ८० रुपये. उत्तर भारतात पुरात सगळं वाहून जातंय आणि प्रधानसेवक सिक्कीमच्या नव्या विमानतळाचं उदघाटन करायला जातात आणि निसर्गसौंदर्याचे फोटो ट्विट करतात! आणि तरीही सार कसं शांत शांत?
हे सरकार केवळ चोर, त्यांच्या सरदारांचं नाही, तर ७० वर्षांतील सर्वांत धर्मांध, असंवेदनशील आणि दिवाळखोर सरकार आहे. या सरकारला ‘कर’ लावण्याचा भस्म्या रोग झालाय. उद्योगपती मित्रांसाठी देशाचं जल, जंगल, जमीन देऊन झाली, दळणवळण यंत्रणा देऊन झाली. शिक्षणाचं आंदण देऊन झालं, आता बँका त्यांच्यासाठी होमहवनात द्याव्यात तशा देणं चालू आहे.
आणि २०१३-१४च्या त्या बोलक्या वर्गाची वाचा बसलीय. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत हा वर्ग फारसं काही बिघडलं नाहीए असं दाखवत ऑनलाईन शॉपिंग करतोय. विविध वाहिन्यावरचे रिअॅलिटी शो आणि मालिका बघतोय. रांगा लावून इट आऊट एन्जॉय करतोय. वीकेंडला जवळपासचे निसर्ग बघून येतोय किंवा थेट परदेश पर्यटन करतोय. जोरजोरात ओरडणारे कर्णकर्कश वृत्तनिवेदक त्यांनी जगण्याचा एक भाग करून घेतलाय. देशभक्ती, देशप्रेम, धर्मप्रेम, जातिभिमान याच्या नवनव्या व्याख्या तयार होताहेत. सोशल मीडियावर संस्कृती रक्षण-संवर्धन म्हणून शिमग्यांच्या सोंग्याला लाज आणतील अशी तथाकथित पारंपरिक वस्त्रप्रावरणं वगैरे घालून मातृभाषेचा वाक्यागणिक मुडदा पाडत फिदीफिदी हसत लोक ‘कल्चरली एन्रीच’ होताहेत. हा सगळा प्रकार ‘केविलवाणे’ या एकाच सदरात मोडू शकतो. त्याला जोडून अभिमान गीताचं रडगाणं म्हणजे तर सांस्कृतिक उच्छाद!
हेच सर्व २०१३-१४मध्ये जे गळे काढत होते, भगवी उपरणी घालून बैलगाड्या चालवत होते. रस्त्यावर फतकल मारून दगडाच्या चुलींवर भाकरी थापत होते. रेल्वे फलाटांची उंची मोजत होते. गुंतवणूकदारांना टोपी लावणाऱ्यांसाठी गळ्याच्या शिरा ताणत होते. मेट्रोचं भाडं वाढलं तर रूळावर झोपत होते. घोटाळेबाजांसाठी तुरुंगाच्या तारखा सांगत होते.
ते सर्व कुठे गेले? गंमत म्हणजे तेव्हाही अभ्यासपूर्ण बोलणारे आताही अभ्यासपूर्णच बोलत आहेत. आता त्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम, अमेरिका-इराण संबंध, शेअर बाजारातली मंदी, रुपयाचा कोसळता मनोरा याबद्दल खूपच अर्थशास्त्रीय आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यात बोलायचं असतं. ‘जगात कुठल्याही विमानतळावर आता भारतीय म्हणून ताठ मानेनं उभं राहता येतं’ असं प्रधानसेवक सांगत असतात. तुमचा रुपया ही तुमची इभ्रत असते, असं हेच पूर्वी म्हणत. मग आता इभ्रतीचं काय झालं?
प्रसिद्धीलोलूप नाही तर प्रसिद्धीसाठी किळसवाणी ‘लत’ या सरकारला लागलीय. जगभर युद्धविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालू असताना बुद्ध, महावीर, कबीर, गांधींचा भारत विसरून यांना छटाक भर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे डिमडिम वाजवावेसे वाटतात! त्यासाठी शिक्षण खात्याला दावणीला बांधून शौर्याचे पोवाडे गायचे, ही कल्पनाच मुळी दरिद्री! कारण मुळात ‘सर्जिकल स्ट्राईक’ ही एक ग्रुप कारवाई असते. जी जशास तसं उत्तर म्हणून असली तरी ती आंतरराष्ट्रीय करारमदारांना चकवून करायची गोष्ट असते. त्याची वाच्यता न करणं यातच खरं युद्धनीती कौशल्य असतं. पण बोलभांड सरकारला बहुधा शिशुवयात केलेलं संचलन आठवलं असावं.
प्रसिद्धीसाठी या सरकारनं केलेला खर्च म्हणजे उधळपट्टी आहे. याच पक्षाचे इतर पक्षांसोबतचं सरकार केंद्रात व महाराष्ट्रातही होतं. त्या काळात केंद्रीय पातळीवर समझौता एक्सप्रेस, आग्रा परिषद, बस यात्रा झाल्या. ‘काश्मिरियत’ हा शब्द जन्माला आला. पण या सर्वांचे इव्हेंट नाही झाले. कारगील व पोखरणवर माफक फलकबाजी झाली. बस्स! जागोजागी मेळे लागले नाही की वाजपेयींनी भाषणांची माळ लावली नाही. महाराष्ट्रात ५५ उड्डाणपूल आणि मुंबई-पूणे एक्सप्रेस वे तयार झाला. तेव्हाही इव्हेंट झाले नाहीत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचं नामकरणही नंतरच्या काळात कधीतरी झालं. पण आता भुयारी मेट्रोसाठी एक बोगदा खणला तर लगेच त्याचं साग्रसंगीत साजरेपण! कशाकरिता ही घाई? या उठसूठ प्रसिद्धी, लोकार्पण आणि भूमीपूजन यातून बिंबवायचंय काय? मागच्या वेळी मंत्रालयाबाहेर स्थिर भावफलक होता आणि आता रोज बदलणारे पेट्रोल-डिझलेचे भाव आणि रुपयाचं अवमूल्यन.
पण याचा अर्थ हा वर्ग सोडून कुणीच बोलत नाहीए, लिहीत नाहीए किंवा काही प्रसारित करत नाहीए? बोलताहेत. शेतकरी, अंगणवाडी सेविका, शेतमजूर, आदिवासी, अल्पस्वल्प उरलेले कामगारही बोलताहेत. पण ते पुढे पोहचवलं जात नाहीए. जे पोहचवू पाहतात ते विकासविरोधी, देशद्रोही, विघ्नसंतोषी, पाक हस्तक आणि आता माओवादी, शहरी नक्षलावदी!
सर्वंकष सत्तेविरोधात ‘ब्र’ काढणाऱ्यांचं अशा प्रकारे झुंडीनं हनन केलं जातं की, ते बघूनही कुणा एकाची जीभ तोंडातल्या तोंडात फिरत असेल, तीही दगड व्हावी. एक भयानक हिंस्त्रपण जाणवतं. एक दबावही जाणवतो. चाललंय ते बरं नाही हेही कळतंय, पण मनाच्या आतल्या कोपऱ्यातल्या एका हिंदू राष्ट्राचा कोपरा मुसलमानांना धडा आणि काँग्रेसचं सर्वधर्मसमभाव गाडणं यासाठी सर्व दुसऱ्या जागा, कोपरे तो बोलका वर्ग ‘स स्स’सुद्धा न करता सहन करतोय?
अरुण कोलटकर यांची ‘चरित्र’ नवाची अप्रतिम कविता आहे. त्यातली एक ओळ एकेकाळच्या बोलक्या वर्गासाठी अगदी चपखल बसते.
‘पायात बूट सरकवून चांभार म्हणाला
घालून घालून सैल होईल, घालून घालून!’
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Thu , 27 September 2018
Sanjay Pawar
Wed , 26 September 2018
ह्मह्मह्म
Alka Gadgil
Wed , 26 September 2018
'ते' सगळे लोक बुलेट ट्रेनने जपानला गेले आहेत