अजूनकाही
तमिळ चित्रपटांमधील सुपरस्टार अभिनेत्री ते तमिळनाडूचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या जयललिता यांचा ६८ वर्षांचा प्रवास काहीसा अदभुत म्हणावा असाच होता. वैयक्तिक आयुष्य वादळी, भ्रष्टाचाराचे आरोप, सुडाचे राजकारण, दुराग्रह-हटवादी भूमिका आणि अतिशय लोकानुनयी निर्णय यांमुळे जयललिता सतत चर्चेत राहिल्या. त्यांचा हा प्रवास काही छायाचित्रांचा माध्यमांतून......
जयललिता या उत्तम नृत्यक होत्या. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती. मोहिनीअट्टम, कथक आणि मनिपुरी हे नृत्यप्रकारही त्यांना चांगल्या प्रकारे अवगत होते. याशिवाय त्या कर्नाटकी संगीतही शिकल्या होत्या. त्यांच्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी गाणीही गायिली आहेत.
जयललिता या बिनबाह्यांचं पोलकं घालणाऱ्या आणि धबधब्याखाली नाचणाऱ्या पहिल्या तमिळ नायिका मानल्या जातात.
वयाच्या १५व्या पंधराव्या वर्षापासून त्यांच्या आईच्या आग्रहामुळे त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या चित्रपटाला ‘केवळ प्रौढांसाठी’ असे सर्टिफिकेट मिळाले. पण त्यांचा हा पहिला चित्रपट त्यांना सिनेमागृहामध्ये जाऊन पाहता आला नाही, कारण त्या तेव्हा प्रौढ नव्हत्या. जयललिता यांनी ८५ तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. त्यातील ८० चित्रपट सुपरहिट ठरले. याशिवाय त्यांनी २८ तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले. इज्जत या एकमेव हिंदी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले आहे.
तमिळ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, राजकीय नेते आणि तमिळनाडूचे तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले मरुधुर गोपालन रामचंद्रन (एमजीआर) यांच्यासोबत जयललिता यांनी अनेक चित्रपट केले. ते सुपरहिट ठरले. पुढे रामचंद्रन राजकारणात गेले, तेव्हा त्यांनी जयललिता यांचाही राजकारणात प्रवेश करवला. १८ ऑक्टोबर १९७२ रोजी एमजीआर यांनी एडीएमके हा नवीन पक्ष स्थापन केला. पुढे एमजीआर आणि जयललिता यांच्या संबंधांमध्ये अनेक चढ-उतार आले. एमजीआर यांनी जयललिता यांचं इंग्रजी चांगलं असल्यामुळे त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. त्यांनी पक्षाचे प्रचार सचिवही बनवले. पण नंतर त्यांना पक्षातूनच इतका विरोध जाला की, एमजीआर यांनी त्यांना या पदावरून हटवावं लागलं.
१४० चित्रपटांमध्ये अभिनय केला. ८ वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. एक वेळ राज्यसभेवर नियुक्ती झाली आणि चार वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या.
१९९१मध्ये जयललिता पहिल्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. तेव्हा त्यांचं वय ४० होतं. त्यानंतर त्या २००१, २००२ आणि २०११मध्ये मुख्यमंत्री झाल्या.
१९७२साली तामिळनाडू सरकारने जयललिता यांना त्यांच्या कला, नृत्य आणि चित्रपट या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल कलाईमामानी या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
जयललिता यांच्याकडे दोन हजार एकर जमीन, ३० किलो सोने आणि १२ हजार साड्या होत्या. ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या जनरल सेक्रेटरी असलेल्या जयललिता यांनी त्यांचे समर्थक ‘अम्मा’ (आई) आणि ‘पुराथ्ची थालैवी’ (क्रांतिकारी नेता) म्हणत.
एक सक्षम नेत्या मानल्या जात. त्यांचे मंत्री त्यांच्यासमोर उभे राहताना थरथर कापत. आपल्या मंत्र्यांनाही त्या फारशा भेटत नसत.
ग्राइंडर, मिक्सर, तांदूळ यांसारख्या वस्तू जनसामान्यांना मोफत वाटण्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment