अजूनकाही
जमावाच्या सहभागानं हत्या घडते आहे, शेकडो बघे या ‘देखाव्याचा’ आनंद घेत उभे आहेत, आणखी हजारो लोक समाजमाध्यमांवर ही घटना चवीनं बघतायत, हे आपल्या आजच्या काळातलं सडकनाटकाचं बदललेलं स्वरूप आहे. आता सडकनाटक म्हणजे हेच. भारतभरातले रस्ते हे आज या क्रूर आणि रक्तरंजित खेळाची उत्साही मौज लुटण्याचे मुक्त रंगमंच बनलेले आहेत.
आपण नव्यानंच एक हिंसक राष्ट्र बनलेलो आहोत असा याचा अर्थ मुळीच नाही. हिंसानाट्य आधीही घडत होतंच, फक्त ज्या मंचांवर ते घडत होतं, ते मंच लोकदृष्टीपासून दूर होते आणि ते नाट्य घडवणारे नटही अधिकृत मान्यताप्राप्त होते. उदा. पोलीस वा लष्कर. त्या नाटकात प्रेक्षक म्हणून सर्वांना मुक्त प्रवेश नसे. ईशान्य भारत, काश्मीर, मध्य भारतातील जंगलं या सर्व ठिकाणी असणाऱ्या ‘अल्पसंख्याकांविरुद्ध’ गेली अनेक दशकं हे राष्ट्राचे ठेकेदार बेफामपणे वागतच आले होते. बेदरकारपणे शस्त्र वापरून त्यांनी हिंसेची उच्चतम पातळी गाठलेली होती. पण या घटनांचं मुख्य धारेतील माध्यमांमध्ये वा समाजमाध्यमांमध्ये कुठलंही विश्वासार्ह वार्तांकन होत नसल्यामुळे, सरकारच्या कृष्ण्कृत्यांचे अस्फुट पडसाद तेवढे आपल्या कानांवर पडत होते.
सर्वसाधारण नागरिक या सर्व हिंसेला ‘सुशासनाचा अपरिहार्य साइड इफेक्ट म्हणून उडवून लावतो. ‘नागरिकांनी शांततेत राहण्याकरता राष्ट्रानं निर्दयपणे हिंसक होणं गरजेचं आहे’ ही घातक जाणीव आज आपल्या समाजमानसात खोलवर रुजलेली आहे. ही मन:स्थिती लोकशाहीसाठी अत्यंत विषारी असूनही आज ती लोकशाहीचा एक अपरिहार्य निकष बनून गेलेली आहे.
पोलीसदेखील त्यांच्या वाट्याला आलेली कायदा रक्षकाची नव्हे, तर कायदा मोडणाऱ्या माणसाची नाट्यमय भूमिका आनंदानं बजावताना दिसतात. वर्दीधारी माणसं संशयितांविरुद्ध छळाच्या ज्या अधिकाधिक प्रगत पद्धती वापरतात, त्या कळून जनतेला एक असुरी आनंद मिळताना दिसतो. अर्थात हे सर्व लोकदृष्टीपासून दूर, जवळ जवळ यमपुरी बनलेल्या पोलीस चौक्यांमध्ये घडत असतं. हे जेव्हा रस्त्यांवर घडतं, तेव्हा आपण त्याची छायाचित्रं पाहतो. पण ती छायाचित्रं ‘police operating line’च्या मागून काढलेली असतात. त्यातून आपल्याला ती घटना फक्त पोलिसांच्या दृष्टिकोनातून दिसते. पोलिसांकडून होणाऱ्या छळाची सर्वांत प्रभावी छायाचित्रं कृष्ण मुरारी किशन या छायाचित्रकारानं काढली आहेत. ही छायाचित्रं त्यानं ८० च्या दशकात बिहारमध्ये काढलेली आहेत. कायदेरक्षकांकडून होणारा शस्त्रांचा मुक्त वापर, त्यांना उन्मादावास्थेत असणाऱ्या तरुणांकडून मिळणारं सहर्ष प्रोत्साहन, याचं रक्त गोठवणारं चित्र आपल्याला या छायाचित्रांमधून दिसतं. ही छायाचित्रं जणू भारतीय समाजाच्या भीषण भविष्याची नांदीच होते असं आता वाटतं.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
नियोजनबद्ध हत्या
‘Encounter’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या हत्यांशी तर आपण परिचित आहोतच. यात अर्थातच आपल्या डोळ्यांदेखत काही घडत नाही, पण जे घडलेलं आहे त्याचं रसभरीत वर्णन मात्र आपल्यासमोर पेश केलं जातं. घटना घडून गेल्यानंतरची नियोजनबद्ध दृश्यं आपण पाहतो. या दृश्यांत आपल्याला व्यक्ती किंवा समूह दिसतात. त्यांना ‘दहशतवादी’ किंवा ‘नक्षलवादी’ किंवा ‘धोकादायक’ गुंड म्हटलेलं असतं. या घटनांची वारंवारता सध्याच्या काळात वाढलेली आहे. जणू सर्व निर्दय लोक आपलं कल्याणकारी राज्य उलथवण्याचा कट करत आहेत, असं चित्र सध्याच्या काळात उदयाला आलेलं आहे. या हत्या ‘शासनमान्य क्रौर्य’ या गटात मोडतात. पण जरा नीट विचार केला तर हीदेखील अधिकृत परवानगी मिळालेल्या जमावहत्येचीच उदाहरणं आहेत, हे लक्षात येतं. आणि जर हे लक्षात येत नसेल तर आपण एका भ्रामक जगात जगतो आहोत.
सर्वसामान्य मनावर हिंसेच्या उन्मादाचे संस्कार हे लोकप्रिय माध्यमांद्वारे होतात. आपला सवंग सिनेमा त्याच्या अनेकभाषी अवतारांद्वारे हेच तर काम करतो. खाकी वर्दीतील नायकाच्या पशुवत वागण्यावर टाळ्या पिटण्याची आणि नायकानं न्यायाचा एक घटनाबाह्य मसीहा होणं, या गोष्टीची भलामण करण्याची संधी आपल्याला या सिनेमांद्वारे मिळते. उदा. मल्याळम सिनेमा. यातले हाणामारीचे प्रसंग उबग यावा इतके अप्रासंगिक असतात. त्यात कसलंही औचित्य नसतं. आणि अशा प्रसंगात मामुटी किंवा मोहनलाल हे आमचे नायक कायम एकटे असून ते संपूर्ण गँगला लोळवतात आणि प्रत्येकाचा कोथळा काढतात. यातली उल्लेखनीय गोष्ट अशी की, हे हाणामारीचे प्रसंग कृत्रिमरीत्या लांबवले जातात. यामुळे हिरो खलनायकाला एका मिनिटात पंधरा-वीस वेळा बुकलून काढतो आहे असं दिसतं. आपला हिरो एका माणसाला क्रूरपणे मारतो आहे, त्याची हत्या करतो आहे, तरीही तो नैतिकदृष्ट्या उच्च असल्यामुळे ती हत्या कायदेशीरच आहे, हे वाटून मग त्या हिंसेत एक विकृत सुख प्रेक्षक मिळवत असतो.
हत्येच्या कायदेशीरपणाच्या अधिकाराची आज घसरण झालेली आहे. तो अधिकार नायकाकडून आज प्रेक्षकांकडे आलेला आहे. कालचे प्रेक्षक आज कोणतीही शरम न बाळगता नट झालेले आहेत. त्यांना सामूहिक उन्मादाची आणि समाजमाध्यमांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या खोट्या उद्रेकाची सबळ साथ मिळते आहे. सत्य विकृत करण्याच्या व सत्याचा अपलाप करण्याच्या समाजमाध्यमांच्या क्षमतेबद्दल तर बोलायलाच नको. शिवाय यात एक बेजबाबदार अनामिकता असतेच.
सेल्फीयुग
पण हे इतकं सोपं नाही. आजच्या सेल्फीयुगातल्या माणसाला या रस्तानाटकात नुसता अभिनय करायचा नाही आहे. आपणच अभिनय केला हे दाखवायचंदेखील आहे. आपल्या पात्राचं नाही तर आपलं दर्शन घडवायचं आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांत ज्या ७० हून अधिक जमावहत्येच्या घटना घडल्या, त्यात बहुसंख्य वेळी हल्लेखोरांनीच त्या स्वत: समाजमाध्यमांवर टाकलेल्या आहेत. Roland Barthes या बुर्झ्वा वर्गाचं वर्णन ‘कोणाहीपेक्षा स्वत:ला प्राधान्य देणारा’ असं करतो. हे वर्णन सार्थ आहे. आजच्या जमावाच्या मागे राजकारण नसून आत्ममग्नता आहे.
हे सगळं २००२ मध्ये सुरू झालं असं आपण म्हणू शकतोच. गुजरात दंगलीतल्या जाळपोळीच्या, लुटीच्या, बलात्काराच्या घटना जमावाद्वारे मुद्दाम चित्रित केल्या गेल्या. नंतर बराच काळ या घटना जनतेच्या करमणुकीखातर व्हिडीओ लायब्ररीजमध्ये ठेवलेल्या होत्या. या चित्रित केलेल्या घटना साक्षी मानून दोषींवर कधीही कोणतीही कारवाई झाली नाही, ही गोष्ट आपल्या राष्ट्राची मन:स्थिती दाखवून देण्यास पुरेशी आहे.
मुसलमान, दलित, शिक्षणतज्ज्ञ, कार्यकर्ते झाल्यानंतर आता हे जमाव वेगळीकडे वळलेले आहेत. स्वत:ला अधिक प्रकाशात आणणारी आणि थेटपणे भीती पसरवण्यात मदत करणारी टार्गेटस ते आता निवडत आहेत. उदा. ८० वर्षीय वयोवृद्ध स्वामी अग्निवेशांवर झालेला भ्याड हल्ला. विरोधी आवाजांची आम्ही गय करणार नाही, मग भले ते भगवे वस्त्रधारी का असेनात, असा स्पष्ट संदेश यातून दिला गेला. हाही एका योजनेचाच भाग होता.
स्वामी अग्निवेशांना मी गेली ४० वर्षं ओळखतो आहे. १९८४मध्ये शीखांच्या विरुद्ध झालेल्या हिंसाचाराला प्रत्युत्तर म्हणून एका नागरिक एकता मंचाची आम्ही स्थापना केली होती. आम्ही दिल्लीत एका शांतता पदयात्रेवर होतो. त्यावेळी एक क्षुब्ध जमाव शस्त्र आणि पेट्रोल कॅन घेऊन आमच्यावर चालून आला. त्या दिवशी अचानकपणे स्वामी अग्निवेश तिथं आले आणि आम्ही व तो जमाव यांच्यामध्ये उभे राहिले. ते जर नसते तर त्या जमावानं आमची कत्तल केली असती.
त्या दिवशी त्यांच्या भगव्या वस्त्रांनी आम्हाला वाचवलं. आज परिस्थिती वेगळी आहे. आजच्या या सडक नाटकाच्या क्रौर्यातून ही भगवी वस्त्रं स्वत:लादेखील वाचवू शकत नाहीत. जमाव सज्ज आहेत. कुठलाही शहाणपणाचा कायदा या आग्यावेताळांना रोखू शकत नाहीये. आपल्या रस्त्यांवर होणाऱ्या या हिंसेच्या मूर्ख पण कल्पक सादरीकरणासाठी आपण आता तयार राहिलं पाहिजे.
.............................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख ‘हिंदू’ या वर्तमानपत्रात २१ जुलै २०१८ रोजी प्रसिद्ध झाला आहे. मूळ लेखासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
अनुवाद : ओंकार गोवर्धन
govardhanomkar30@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Alka Gadgil
Mon , 24 September 2018
रस्ते क्रूर खरेच. Cattle trading band केल्यामुळे पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी बैल आणि गाई सोडून दिल्या आहेत. ही गुरं रस्त्यांंवर फिरतात, त्यांचे सतत अपघात होतात, म्रुत्यु होतात. शेतात घुसतात पिकांचं नुकसान करतात. शेतकर्यांनी शेती सोडून दिली आहे कारण कुंपण घालणे परवडत नाही. ही गुरं दिनवाणेपणे इकडे तिकडे फिरतात, त्या त्यातल्या अनेकांना जखमा झालेल्या असतात. त्यांना कोणी वाली नाही. फार वाईट वाटतं.