अजूनकाही
‘कमरेचे सोडले अन् डोक्याला गुंडाळले’ की कोणाचेही हसूच होत असते. असे हास्यास्पद प्रकार भारतीय जनतेला येत्या वर्षभर तरी पहावयास मिळणार आहेत. या असल्या विनोदी अंकांची सुरुवात एव्हाना झालेली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीला फारसा अवधी राहिलेला नाही. सर्वसामान्य जनतेला काय मतदानाच्या केवळ आठच दिवस अगोदर मतदान प्रक्रियेत गुंतायचे असते. पण राजकीय पक्षांना आणि संभाव्य नेत्यांना वर्ष, सव्वा वर्ष आधी उमेदवार व्हावेसे लागते.
थोडक्यात काय तर राजकीय पक्षांनी महानाट्याची तयारी सुरू केली आहे. या लोकसभेपूर्वी दोन-तीन राज्यांत विधानसभा लढती व्हावयाच्या आहेत; पण मुख्य भर हा लोकसभेवरच राहणार आहे. स्थानिक पातळीवर थेट संपर्क प्रस्थापित करण्यापासून ते घराघरांत प्रचारपत्रकांचा रतीब घालण्यापर्यंतची कामे सुरू केली जातील. ती नेहमीच्या पद्धतीने आणि गतीने होत राहतील. पण तत्पूर्वी राजकीय पक्षांकडून मैदानात उतरण्यापूर्वी जी सर्कस करण्यात येत आहे, त्याने येत्या काळात जनतेच्या नशिबी असे हास्याचे फवारे उडाल्याचे अनुभवण्यास मिळणार आहेत.
सत्ता मिळवण्यासाठी कालच्या प्रतिस्पर्ध्यांना मित्रयादीत समाविष्ट करून घेण्यासाठी ज्या शाब्दिक कवायती सुरू आहेत, त्यातून या संभाव्य नाट्यपंचकाची कल्पना रसिकांना आलेली आहे. सगळेच राजकीय पक्ष एका माळेचे मणी आहेत, सत्तेसाठी वखवखलेले आहेत, हे जनतेला पुरते ठाऊक आहे. पण तरीही सर्व राजकीय पक्षांकडून मूल्याधिष्ठित राजकारणाचा जो गाजावाजा केला जात आहे, त्याने होत असलेल्या करमणुकीचा लाभ त्याला गमवायचा नाही.
एखादा नेता ज्या विचारसरणीचा असतो, त्याच विचारसरणीचा त्याचा पक्ष असतो, हा सरळ साधा हिशेबही जनतेला उलटा करून शिकवला जात आहे. पक्षाचा संस्थापक प्रमुख आणि पक्ष यांची विचारसरणी वेगवेगळी कशी काय असते बुवा? प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या विधानामुळे सार्वजनिक जीवनातील मूल्याधिष्ठित वाटचालीला नवाच आयाम मिळाला आहे.
.............................................................................................................................................
रविशकुमार या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
राजकीय पक्ष आणि मूल्याधिष्ठित राजकारण यांचा परस्परसंबंध नसतो, हे सर्वविदित आहे. ज्या क्षणी जो मुद्दा प्रकाशझोतात झळकावेल, ज्यामुळे चर्चा होत राहतील, जनमानसात पडसाद उमटतील असे मुद्दे उकरून काढत वाटचाल करण्याची राजकीय पक्षांची रीत जवळपास सर्वच राजकीय नेत्यांनी कमी-अधिक प्रमाणात वापरून झालेली आहे. आताही त्यात बदल झालेला नाही. हे सगळे मतदात्यांना ठाऊक नाही, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. ‘ये जो पब्लिक है, ये सब जानती है’ हे नेत्यांनाही ज्ञात असते. ते केवळ जनसमूहाच्या अल्पकाळच्या स्मृतीवर भरोसा ठेवून असतात. कधीकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे अखिलेश यादव आणि मायावती सत्तेसाठी ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’ म्हणत एकत्र येतात, हे एकच उदाहरण बोलके ठरावे.
राजकीय प्रवासादरम्यान ठेवायची लवचीकता हे एक तत्त्व म्हणून मान्य केले तरी जनाची नव्हे, तर मनाची म्हणून तरी काही पायाभूत तत्त्वं अबाधित राखली जाणे जनतेला अपेक्षित असते. पण एकदा निखळ सत्ताप्राप्ती हेच एकमेव ध्येय म्हणून स्वीकारले जाते, तेव्हा अशा लोकांसाठी कसलाच विधिनिषेध गम्य ठरत नाही. धर्मनिरपेक्ष, पुरोगामी मित्रांसोबत हातमिळवणीच्या हकाट्या पिटून सत्तेच्या पावसातले चार थेंब चाखण्याची क्षुधा केविलवाणी असते.
आता कोण पुरोगामी आहे, कोण धर्मनिरपेक्ष आहे अशा प्रश्नांना उत्तरे सापडणे तरी शक्य आहे का? रंग बदलण्यात सरड्यावर मात करणाऱ्या राजकीय आखाड्यात आपला मूळ रंग राखून असणारा सापडणे हे मृगजळाचा शोध घेण्यासारखे आहे. सतत सत्तेच्या छायेत वावरलेले शरद पवार धर्मनिरपेक्ष आणि त्यांचा राष्ट्रवादी मात्र धर्मांध कसा ठरतो? इथे प्रकाश आंबेडकरांना नेमके काय सुचवायचे आहे? ते एकाच वेळी एमआयएम आणि काँग्रेसला एकत्र येण्याची साद घालताहेत. ती साद कशासाठी, तर भाजप आणि शिवसेना यांना पर्याय म्हणून.
गत सहा महिन्यांत अशा काय घडामोडी घडल्या आहेत की, त्यांना शरद पवारांना व्यक्तिश: धर्मनिरपेक्ष असल्याचा आणि त्यांचा पक्ष तसा नसल्याचा साक्षात्कार झालेला आहे. बरे, भाजप आणि सेनेचा पाडाव करण्यासाठी जर ते धर्मनिरपेक्ष मित्रांना एकत्र आणत असतील, तर एमआयएमला सोबत घेऊन कोणती धर्मनिरपेक्षता साधली जाणार आहे? प्रकाश आंबेडकरांना एमआयएम हा सेनेच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करणारा पक्ष कसा काय या महाआघाडीत चालू शकतो? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्या काँग्रेसला अशा आघाडीत सहभागी व्हायचे आहे का, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. काँग्रेससाठी एमआयएम आणि सेना एकाच पारड्यातील साथीदार आहेत. म्हणजे किमान काँग्रेसच्या पारंपरिक मतदाराला तरी तसे वाटते.
शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी हे जनतेसाठी संवेदनशील मुद्दे विरोधी पक्षांना निवडणुका जिंकण्यासाठी पुरेसे वाटत नाही, तोवर त्यांच्याकडून ‘समविचारी’ या घासून गुळगुळीत संकल्पनेच्या आघाड्या उभारल्या जातील, पण विरोधकांच्या या कृतीमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनातल्या मूल्याधिष्ठित राजकारणाच्या आशा-अपेक्षा मनातच जिरवल्या जात आहेत, हे दु:खद वास्तव आहे. त्याची चिंता येथे आहे तरी कोणाला?
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Manoj Patil
Sat , 22 September 2018
RAM JAGTAP, Why do you allow this kind of man to write on AKSHARNAMA ...... Kahihi lihito ha manus ........Read his view on SWARA BHASKAR and KEJRIWAL........ I think AKSHARNAMA has some fantastic writers Like PARIMAL, WAGLE, PAWAR...... Then What you guys need him for. And most irritating is he writes twice, thrice a week ........................ R u Kidding us................. (Reader Who at least visits once AKSHARNAMA)