बदले, बदले राहुल गांधी नजर आते हैं!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • राहुल गांधी यांच्या विविध भावमुद्रा
  • Sat , 22 September 2018
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi काँग्रेस Congress भाजप BJP

२०१४च्या निवडणुकीचे पडघम २०१३मध्ये वाजायला सुरुवात झाल्यापासून ते भाजपचं सरकार सत्तारूढ होईपर्यंत मी दिल्लीत होतो. याच काळात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड झाली, राजकीय क्षितिजावर अस्ताला जाताना लालकृष्ण अडवाणी यांची झालेली  फडफड, काँग्रेसचा दारुण पराभव बघता आलेला होता. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या काही सभांचं वृत्तसंकलन करण्याची संधी त्या काळात मिळाली. त्या सर्वच सभांत नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय टीका करण्यासोबतच राहुल गांधी यांची यथेच्छ टिंगल करत. यथेच्छ टिंगल आणि टवाळी करताना नरेंद्र मोदी कधीच राहुल गांधी यांचं नाव घेत नसत, तर त्यांचा उल्लेख ‘शहजादा’ करत आणि सभेत उपहासाची एक मोठी लकेर कशी उमटत असे, हेही त्या काळात अनेकदा अनुभवायला मिळालं आहे. त्या काळात नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहुल गांधी अगदीच फिके पडत असत. खरं सांगायचं तर अनावेशी, नवखे व केविलवाणे वाटत असत. नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहुल गांधी पार निष्प्रभ ठरल्याचं चित्र त्या काळात होतं.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजला सुरुवात झालेली असताना मात्र परिस्थिती किती बदलली आहे ते बघा! २०१४मध्ये नवखे आणि केविलवाणे वाटणारे राहुल गांधी आता त्याच नरेंद्र मोदी यांच्यावर आवेशानं तुटून पडताना दिसत आहेत. तेव्हाचा तो केविलवाणेपणा, नवखेपणा राहुल गांधी यांनी बासनात गुंडाळून जणू काही वळचणीला  कायमचा लटकवून टाकला आहे, असं सध्याचं बदललेलं चित्र आहे आणि ते काँग्रेसला नवसंजीवनी देणारं ठरलेलं आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी राहुल गांधी यांचा पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर अभिषेक झाला, तेव्हा दुपारी चार वाजता करावयाच्या भाषणाची तालीम ते सुमारे तीन तास करत होते, अशी चर्चा तेव्हा काँग्रेस आणि काँग्रेसच्या गोटात वावरणार्‍या मीडियातील अनेक सहकार्‍यांत होती. त्यांचं तेव्हाचं भाषण वक्तृत्व शैली म्हणून फार काही प्रभावी नव्हतं, हे खरं असलं तरी त्यातील कळकळ किमान थेट भिडणारी होती. त्या संदर्भात तेव्हा मी लिहिलंही होतं. त्यांच्या भाषणात तरुणांना संधी देण्याचा मुद्दा आग्रही होता आणि त्यावर बोलत असतानाच शशी थरुर (त्याच पावसाळी रात्री त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमय निधनाची बातमी आली होती!) त्यांच्या नियोजित आसनाकडे व्यासपीठाच्या समोरून जात होते. ते हेरून राहुल गांधी ‘यानी कौन कहता है हमारी पार्टी में जवान नहीं हैं?’हा जो पंच टाकला होता आणि त्याला कसा तुफान प्रतिसाद मिळाला होता, ते अजूनही स्मरणात आहे. तो पंच अनुभवताना राहुल गांधी आज ना उद्या नरेंद्र मोदी यांचा हिशेब सव्याज फेडतील याची खात्री किमान मला तरी पटलेली होती. त्या खात्रीला आलेल्या फुलांचा बहर सध्या राहुल गांधी यांच्या भाषणात आणि टीकास्त्रात दिसतो. त्याच्या दरवळानं भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि भक्त घायाळ झाल्याचं दिसतं आहे. ‘बदले बदले मेरे सरकार नजर आते है...’ या हिंदी चित्रपट गीताच्या चालीवर ‘बदले, बदले राहुल गांधी नजर आते है...’ असं म्हणण्यासारखी ही स्थिती आहे.

.............................................................................................................................................

रविशकुमार या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

तेव्हा राहुल गांधी यांच्यात नेता आणि पदाधिकारी आशा दोन्ही पातळ्यांवर असलेला नवखेपणा पूर्ण ओसरलेला आहे. ‘गांधी’ असल्यानं या पक्षाचे तारणहार आपणच आहोत या विश्वासाचा त्यांच्यात तेव्हा असलेला अभाव आता जाणवत नाहीये. या शतकाच्या पहिल्या १२-१३ वर्षांत राजकारणाबद्दल राहुल गांधी फार काही गंभीर आहेत, असं कधी त्यांच्या उक्ती आणि कृतीतून जाणवत नव्हतं. आता मात्र राजकारणाच्या रणभूमीवर राहुल गांधी पाय भक्कम रोऊन उभे आणि होणारा वार परतवण्यासाठी सज्ज असल्याचं. शिवाय वार नेमका कोणावर, कसा आणि केव्हा करायचा याचं भानही त्यांना आल्याचं दिसू लागलेलं आहे. ‘आम्हाला भाजपसारखं द्वेषानं नाही तर प्रेमानं राजकारण करायचं आहे’, हा राहुल गांधी यांनी लगावलेला वार नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्वच नेते-कार्यकर्ते आणि भक्तांच्या वर्मी लागलेला आहे. लोकसभेत अविश्वास ठरावाच्या चर्चेच्या वेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेलं ‘स्यू मोटो’ आलिंगन (मलाही आवडलेलं नाही!) केवळ चर्चेचा विषय ठरलेलं नाही, तर त्यामुळे नेते आणि भक्त गांगरून गेलेले आहेत, हे मान्य करायलाच हवं. एकंदरीत या चार-साडेचार वर्षांत स्वत:ला राहुल गांधी यांनी चांगलं ‘ग्रुम’ केलंय, हे सहज लक्षात येतं आहे.

पक्षांतर्गत स्वत:ची टीम उभी करण्यात राहुल गांधी यांना या चार-साडेचार वर्षांत चांगलं यश आलेलं आहे. एका रात्रीत कोणत्याच देशव्यापी आणि लोकशाहीवादी पक्षाचा चेहरा बदलता येत नसतो. लोकशाही प्रक्रियेत आणि काँग्रेससारख्या वेगवेगळ्या जात-धर्म-भाषा-संस्कृतीचं कडबोळं असणार्‍या पक्षात तर ‘फेस लिफ्टिंग’ क्रांती नव्हे तर उत्क्रांतीच्या मार्गानेच करावी लागते. ते करण्यात राहुल गांधी आता बर्‍यापैकी यशस्वी झालेले आहेत. त्या प्रयत्नांना आलेलं यश प्रथम गुजरात निवडणुकीत दिसलं आहे. नंतर लगेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी देशव्यापी काँग्रेस पक्षानं मुंगी एवढाही जीव नसणार्‍या जनता दलासमोर नमतं घेण्याची भूमिका स्वीकारली आणि घाईघाईनं सत्तारूढ झालेल्या भाजपला चांगला धडा शिकवला आहे. त्यातून विरोधी पक्षांच्या आघाडीचं नेतृत्व काँग्रेसकडे (पक्षी : राहुल गांधी!) चालत आलेलं आहे. विरोधी आघाडीला बहुमत मिळालं तर भावी पंतप्रधान राहुल गांधीच असतील हे खुंटा हलवून बळकट करण्याचा मुत्सद्दीपणाही काँग्रेसनं दाखवला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या ‘अरे’ला सणसणीत ‘कारे’ म्हणून आव्हान देण्याचं धाडस काँग्रेस पक्षात सर्व स्तरात निर्माण झालेलं आहे. येणार्‍या चार राज्यांच्या विधानसभा तसंच लोकसभा निवडणुकांत खरी लढाई काँग्रेस विरुद्ध भाजपला सोबतच नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीही लढली जाणार आहे, हे आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे.

अर्थात ही केवळ सुरुवात आहे. खर्‍या लढाईला अजून तोंड फुटायचं आहे. येत्या विधानसभा निवडणुकात जागा वाटप सुरळीत झालं, तर काँग्रेससाठी लोकसभा निवडणुकीचा मार्ग अधिक गुळगुळीत आणि प्रशस्त होणार आहे, पण हे सगळं अगदीच सुरळीत पार पडेल असं वाटत नाही. कारण पक्षातले बाजूला सारलेले ‘बनचुके’ आणि ‘बेरकी’ निमूटपणे गप्प बसण्याच्या वृत्तीचे नाहीत. आतून पोखरत राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. पक्षाबाहेरच्या मायावती यांनी आधीच वेगळा सूर आळवला आहे. मुलायमसिंह, शरद पवार, ममता बॅनर्जी, अजित जोगी, मोडीत निघालेले लालूप्रसाद ही नेते मंडळी सरळ मार्गानं नव्हे तर वाकड्या वाटेनं चालण्यात माहीर असल्याचा पूर्वेतिहास आहे. मनाविरुद्ध घडलं तर आपल्याच उमेदवारांना धूळ चाळण्यात ते तरबेज आहेत.

हार्दिक पटेल काय गुंताडा ऐन वेळी करेल याची कोणतीही शाश्वती नाही. अरविंद केजरीवाल यांची ख्याती काही राजकीय समंजसपणा दाखवण्याची नाही. ओडीशात नवीन पटनाईक यांनी पत्ते अजून उघड केलेले नाहीत आणि बिहारमध्ये नितीशकुमार भाजपसोबत गेलेले आहेत. आंध्र आणि तेलंगणात परिस्थिती डामाडौल आहे. लोकसभेच्या जवळजवळ ३५० जागा नेमक्या याच नेत्यांच्या प्रभाव क्षेत्रात येतात. उत्तर प्रदेश, बिहार, ओडीशा, गुजरात, महाराष्ट्र, तामीळनाडू,  बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि केरळ ही ती राज्ये आहेत. या राज्यांवरच आता लक्ष केंद्रित करण्याची वेळ आलेली आहे आणि तेच खरं आव्हानही आहे. म्हणूनच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ही राहुल गांधी यांच्यासाठी लोकसभेची रंगीत तालीम आहे.

राहुल गांधी यांनी सुरुवात आणि आतापर्यंतची तयारी तर नक्कीच चांगली केलेली आहे. त्यांच्यात झालेले हे बदल कोणत्याही सुदृढ लोकशाहीसाठी शुभसंकेत देणारे आहेत. बदलेल्या राहुल गांधी यांच्यासमोरची पुढील परीक्षा आणखी कठीण आहे. ती परीक्षा ते बहुमत मिळवून उत्तीर्ण होणार का त्याबद्दल आजच भाकीत करणं उतावीळपणाचं ठरेल. मात्र त्याबद्दल उत्सुकता नक्कीच निर्माण झालेली आहे. 

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......