अजूनकाही
एखाद्या चित्रपटातील एखाद्या पात्राच्या कथनाला जेव्हा फ्लॅशबॅकपासून सुरुवात होते, तेव्हाच त्यातील उणीवा स्पष्टपणे जाणवायला लागतात. कारण मुख्य प्रवाहातील बऱ्याचशा कमर्शियल चित्रपटांना आधीच सुसंगतपणाचं वावडं असतं. परिणामी फ्लॅशबॅक कधी वापरावा आणि कधी टाळावा याचा आडाखा त्यांना बांधता येत नाही. त्यामुळे अनेक बऱ्या-वाईट बॉलिवुड आणि अगदी हॉलिवुड चित्रपटांमध्ये गरज नसतानाही फ्लॅशबॅक दिसून येतात.
‘बत्ती गुल मीटर चालू’मध्येही अशाच प्रकारचा, चित्रपटातील मूळ कथानकाला समांतरपणे चालणारा फ्लॅशबॅक आहे. तो दोन व्यक्तींच्या आपापसातील संवादाच्या माध्यमातून चित्रपटातील घटना सांगतो. तसं पहायला गेल्यास हा काही मोठा खटकणारा मुद्दा नसायला हवा. मात्र इथं त्याचा दोन्ही व्यक्तींचा प्रत्यक्ष घटनाक्रमाशी आणि एकूण कथानकाशी काहीच संबंध नाही. ज्यामुळे त्यांच्या संभाषणाद्वारे पुढे जाणाऱ्या कथेत जेव्हा मुख्य पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यातील, इतर कुणाला माहीत नसाव्यात अशा घटनांचे संदर्भ यायला लागतात, तेव्हा चित्रपटाच्या कथाकथनाची ही शैली खटकते. कारण चित्रपटातील मूळ कथानक हे काही ‘गँग्स ऑफ वासेपूर’वजा एपिक गाथा नाही की, ती सर्वांनाच माहीत असेल.
दुसरं म्हणजे कथन करणाऱ्या दोन्ही व्यक्ती उत्तराखंडमध्ये प्रवास करत असलेल्या कुठल्याही इतर सर्वसामान्य व्यक्तींसारख्याच आहेत. त्यामुळे त्यांना कथानकातील आणि मध्यवर्ती पात्रांच्या आयुष्यातील संदर्भ आणि बारीकसारीक तपशील माहीत असायचं कारण नाही.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
आता कुणी म्हणेल की, कमर्शियल चित्रपटाकडे एवढं बारीक आणि गंभीररित्या का पहायचं? का पाहू नये? कारण आपण जर चांगल्या चित्रपटाचं कौतुक करत असताना त्यातील बारीक चुकाही अधोरेखित करत असू, तर शेवटी प्रेक्षकांच्या माथी मारल्या जाणाऱ्या सामान्य चित्रपटांकडेही तितक्याच सूक्ष्मपणे का पाहू नये? शेवटी दोन्हीही प्रकारचे चित्रपट ही एकाच माध्यमाची, एकाच चित्रपटसृष्टीची बायप्रॉडक्ट्स आहेत.
बरं, याखेरीज हा समांतर ट्रॅक ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात का दाखवला जातो याचंही तार्किक कारण कळणं अवघड आहे. या ब्लॅक अँड व्हाईट ट्रॅकमधील दोन्ही लोक कुठल्यातरी ऐतिहासिक, जणू काही जग बदलवून टाकणाऱ्या घटनेवर बोलत असतात. ती घटना सुशील कुमार पंत ऊर्फ एसके (शाहिद कपूर), सुंदर मोहन त्रिपाठी (दिव्येंदु शर्मा) आणि ललिता नौटियाल (श्रद्धा कपूर) या तिघांभोवती फिरणारी आहे. हे तिघंही लहानपणापासून एकत्र वाढलेले, उत्तराखंडमध्ये राहणारे जिगरी मित्र. सर्व काही सुरळीत असणाऱ्या त्यांच्या आयुष्यात आणि गावात फक्त एकच समस्या आहे. ती म्हणजे लोडशेडिंगची. चित्रपटाचा संपूर्ण पूर्वार्ध त्याविषयी वारंवार बोलत, बल्ब, टीव्ही आणि वीज पुरवणारी कंपनी यांना शिव्या घालण्यात; तसंच या तिघांमधील प्रेमाच्या त्रिकोणाची उभारणी करण्यात जातो.
आणि तसं का करू नये म्हणा! कारण ‘एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते’ ही बॉलिवुडचीच तर शिकवण आहे! या प्रेमप्रकरणाचा घाट घालून, सहनशक्तीचा अंत पाहून झाल्यावर चित्रपट मूळ विषयाकडे वळतो. आणि हो, या प्रेमाच्या गुजगोष्टींच्या दरम्यानच्या काळात सुंदरनं एक प्रिंटिंग प्रेस सुरू केलेली असते. उमदा जवान आहे, तारुण्याच्या बहरात नि मुलीच्या प्रेमात आहे. मग त्यानं व्यवसाय का सुरू करू नये? त्यानं काय करायचं ते करावं, आपल्याला काय!
फक्त या सगळ्या प्रकारात काही निरीक्षणं नोंदवावीशी वाटतात. पहिलं म्हणजे गावात वीजेचा तुटवडा असताना कोण प्रिटिंग प्रेस नामक हत्ती का पोसण्याचा विचार करेल? दुसरं म्हणजे या तिघांमधील प्रेमत्रिकोणावरील उपाय काय, तर ललिता ऊर्फ नॉटीनं दोघांसोबत आलटून-पालटून एक-एक आठवडा घालवून निवड करण्याचं ठरवणं? आता एवढे सगळे अतरंगी पराक्रम केले आहेत, तर हेही का करू नये म्हणा!
आणि हीच या चित्रपटाची खरी समस्या आहे. तो सगळं काही कॅज्युअली घेऊन, ‘हे’ केलंच आहे, तर ‘तो’ही प्रकार का करू नये, अशा आविर्भावात समोर येतो. ज्यामुळे एकापाठोपाठ एक हास्यास्पद दृश्यांची रांग लागत जाते. ज्यातून एरवी भावशून्य चेहरा घेऊन वावरणारे मध्यवर्ती भूमिकांमधील कलाकार अशक्य रीतीनं लाऊड अभिनय करत, आधीच न्यूनतम कलात्मक, सिनेमॅटिक मूल्यं असलेल्या या चित्रपटाच्या एकूण परिणामाला अधिकच खालावून ठेवतात. अधूनमधून ‘उडता पंजाब’सारख्या चित्रपटांमधून चमकून जाणारा शाहिदही लाऊड अभिनय आणि तर्क, वास्तविकता यांचा स्पर्शही नसलेले संवाद यांच्यामुळे आपल्या फिल्मोग्राफीत आणखी एका सुमार चित्रपटाची भर घालतो. हेच थोड्याफार प्रमाणात शर्मालाही लागू पडतं. श्रद्धा कपूर पुन्हा एकदा सुमार अभिनय, एखाद्या भाषेचा लहेजा कसा असू नये याचे नवीन मापदंड निर्माण करते. यामी गौतम दृश्याला सूट न होणारे भाव चेहऱ्यावर घेऊन वावरत राहते. फरिदा जलाल, सुधीर पांडे, अतुल श्रीवास्तव, ब्रिजेंद्र काला वगैरे लोकही अतिशय फ्लॅट परफॉर्मन्स देतात. कारण मुळातच ते डिरेक्टर्स अॅक्टर आहेत. त्यामुळे ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ देणाऱ्या नारायण सिंगकडून या सर्व लोकांकडून चांगले परफॉर्मन्स काढून घेण्याची अपेक्षा ठेवणं तसं चूकच आहे.
विपुल रावल, सिद्धार्थ सिंग आणि गरिमा वहाल यांनी बहुधा सदर चित्रपटाची पटकथा लिहिण्यापूर्वी ‘जॉली एलएलबी’ चित्रपट मालिकेची पारायणं केली असावीत. कारण दर थोड्या वेळानं त्यातील दृश्यांना आणि ट्विस्ट्सना साध्यर्म्य असलेली दृश्यं लिहिणं म्हणजे सोपं काम नाहीच! मात्र हे करताना ते दोघं एक मूलभूत गोष्ट विसरतात. ती म्हणजे त्यांच्या लेखनसामर्थ्याची मर्यादा आणि पोहोच. कारण ही दृश्यं प्रसिद्ध चित्रपटांचे सुमार रिप-ऑफ्स वगळता इतर काहीच देत नाहीत. उत्तरार्धातील कोर्टरूम ड्रामा (खिक) म्हणजे संवाद कसे असू नयेत याचं परिमाण आहेत. (हो, पण तरीही हे संवाद ‘हेट स्टोरी ४’ची पातळी गाठत नाहीत. पुन्हा तसे संवाद ऐकणं बहुधा भारतीय प्रेक्षकांच्या भाग्यातच नसावं. जळ्ळं मेलं त्यांचं नशीब!) याखेरीज ‘ठहरना’ची रूपं - ठहरा, ठहरे, ठहरी यांचा वापर; आणि दर दुसऱ्या वाक्याच्या शेवटी ‘बल’ जोडणं या गोष्टींच्या वापरालाच उत्तराखंडमधील भाषा बनवणं हाही यातील संवादांचा उपयोग म्हणता येईल. ‘रेस ३’मधील ‘ब्रो’ शब्दाच्या त्रासदायक ठरणाऱ्या अतिवापराचा आदर्श समोर ठेवत यात ‘बल’च्या रूपात त्याची जागा घेतली जाते.
दृश्यसातत्य वगैरे गोष्टी दिग्दर्शक सिंगच्या खिजगणतीतही नसाव्यात. मुळात आपल्याला काय दाखवायचं आहे हेही ठरलेलं नसावं. कारण न्यायालयातलं दृश्य अचानक बॅकग्राऊंड बदलून सुंदरच्या (की एसके? जाऊद्या. व्हू केअर्स!) घरातील बनतं किंवा वीज कंपनीच्या एका अधिकाऱ्याचं लाच खाताना पेन-कॅमवर शूट केलेलं अपेक्षित असलेलं दृश्य अचानक बदलतं. दिग्दर्शक त्याच्या दृश्यसातत्यातील चुका, स्वतः एडिटर आहोत असा (गैर)समज आणि मुख्य म्हणजे स्वतःकडे दिग्दर्शकीय कौशल्य असल्याचा समज, अशा सर्व समजांच्या इन्सेप्शनवजा दिवास्वप्नांमुळे प्रेक्षकाला धक्का देतो. पण हाय रे त्याचं कौशल्य! कारण हा धक्का सकारात्मक नाही. बट देन अगेन, व्हू केअर्स!
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Sat , 22 September 2018
चित्रपट कसाही असो पण तुमची वाक्य रचना फार गोधळाची आहे हो म्हणजे उदा, "गावात वीजेचा सदानकदा तुटवडा असताना कोण प्रिटिंग प्रेस नामक, वीजेची कायम गरज भासणारा पांढरा हत्ती का पोसण्याचा विचार का करेल? "किंवा "एखाद्या चित्रपटामध्ये जेव्हा त्यातील एखाद्या पात्राचं कथन किंवा घटनेच्या स्वतंत्र अशा फ्लॅशबॅकपासून सुरुवात होते, तिथूनच त्यातील उणीवा स्पष्टपणे जाणवायला सुरुवात होते. "माझ्या Cognitive abilities फार मर्यादित आहेत हे मान्य पण अनेक वेळा वाचून अर्थ बोध झाला नाही पण who cares?