कालौघात एखादा उत्सव मूळ हेतूपासून कसा दूर जातो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणेशोत्सव!
पडघम - सांस्कृतिक
बाळासाहेब राजे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 20 September 2018
  • पडघम सांस्कृतिक गणपती Ganpati गणेश Ganesh गणेशोत्सव Ganeshotsav

हवाहवासा श्रावण आणि त्याला उत्सवांचं कोंदण! श्रावण संपूच नये असं आपल्याला वाटतं. श्रावण अनेक उत्सव घेऊन येतो, वसुंधराही स्वतः निसर्गाच्या उत्सवात चिंब न्हात असते. शेतकऱ्यांचा मित्र सर्प, त्याचं ऋण नागपंचमी हा सण साजरा करून व्यक्त केलं जातं. रत्नाकराला श्रीफळ अर्पण करून पुढील काळात आमच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस, अशी प्रार्थना कोळी बांधव करतात. बहीण-भावाच्या पवित्र नात्याला आणखी घट्ट बंधात बांधण्याचं काम रक्षाबंधन हा सण करतो. श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, पोळा असे सण साजरे करत असताना, त्यांचा आनंद घेत असताना श्रावण कधी संपला हे कळलंच नाही.

श्रावणाची धामधूम संपताच भाद्रपद आला. या महिन्यातला सर्वांत मोठा उत्सव म्हणजे गणेश उत्सव! भारतातील महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि ओरिसा या राज्यांत गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारताबाहेरही ब्रिटन, अमेरिका, फिजी, सिंगापूर, नेपाळ, मलेशिया, कॅनडा, ब्रह्मदेश, त्रिनिनाद, टोबॅगो अशा देशांत हा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो. बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नहर्ता गणपती आपल्याला प्रथम पूज्य आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी देवघरातील गणपती घराच्या बाहेर आणला. हेतू एकच होता, असंघटित जनसमुदायाला एकत्र करणं, अन्यायाची जाणीव करून देणं आणि पारतंत्र्याच्या शृंखला तोडून टाकणं. लोकमान्य टिळकांचं विचारी नेतृत्व तत्कालीन समाजाला स्वातंत्र्याचे ध्येयनिष्ठ भक्त बनवून गेले. जो हेतू मनी बाळगून टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता, तो हेतू सफल झाला, हे पाहून लोकमान्य टिळक कृत्यकृत्य झाले असावेत, हे मात्र १०० टक्के खरं!

उभ्या महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेनं, भक्तिभावानं आणि उत्साहानं साजरा केला जातो. अनेक सन्माननीय गणेश मंडळं व्याख्यानमालांचं आयोजन करून समाजप्रबोधनाचं कार्य करतात. पौराणिक वा जिवंत देखावे सादर करून रंजनातून प्रबोधन केलं जातं. जलप्रदूषणावरील देखावा या समस्येचं गांभीर्य कोणतेही उपदेशाचे डोस न पाजता प्रेक्षकांना सहजपणे पटवून देऊ शकतो. कॉलेजला असताना आम्ही मिरज-सांगलीतील गणपती व सामाजिक संदेश देणारे देखावे पाहण्यासाठी रात्रभर मनसोक्त भटकंती करायचो. इथल्या गणेश मंडळांनी देखाव्यासाठी निवडलेल्या विषयांवर आम्ही चर्चा करायचो, वाद घालायचो, यातून विचारमंथन होत असे. अनेक गणेश मंडळं विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात. लहान मुलांत वा मोठ्यांत दडलेला कलाकार यातून सापडतो, तो हरवू नये याची काळजी ही गणेश मंडळं घेतात, ही उल्लेखनीय बाब आहे. रक्तदान, अन्नदान, गरजूंना मोफत कपडे वाटप व औषध वाटप करणाऱ्या मंडळांची संख्याही खूप आहे.

.............................................................................................................................................

रविशकुमार या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

मात्र टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला गालबोट लागतं की काय, अशी शंका येण्याजोगं वातावरण तुमच्या माझ्या आसपास तयार झालं आहे, हे एक-दोन वर्षांपूर्वी घडलेल्या दोन प्रसंगावरून लक्षात येईल.

प्रसंग पहिला. आमच्या गल्लीत (ही गल्ली तुमचीही असू शकते.) एक गणेश मंडळ आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर कार्यकारी मंडळही आहे त्यांचं. अध्यक्ष होण्यासाठीही म्हणे त्यांच्यात भांडणं लागली होती. तर ही मंडळी खरी भक्त आहे गणपतीची. जमेल तिथून, जमेल तेवढी आणि जमेल त्या पद्धतीनं यांनी वर्गणी वसूल (‘वसूल’ या शब्दावरचा आमचा विश्वास या मंडळींनी वाढवला आहे.) करून श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. सकाळ-संध्याकाळ होणारी आरती मांगल्याची, पावित्र्याची अनुभूती देत होती.

माझे एक मित्र आहेत, वयानं व अधिकारानेही मोठे आहेत माझ्याहून. त्यांनी पाच अंकी रकमेची देणगी दिली आहे या मंडळाला, यामागे त्यांची श्रद्धा असेल वा मोठमोठ्यानं केल्या जाणाऱ्या देणगीदारांच्या नावाच्या घोषणा त्यांना सुखावत असाव्यात. आम्ही दोघंही फेरफटका मारण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडलो. सायंकाळच्या वेळचं चित्र मात्र मांगल्य व पावित्र्य या संकल्पनांना जोराचा धक्का देणारं होतं. गणपतीच्या पुढ्यात ‘बाई वाड्यावर या’, ‘तुझी चिमणी उडाली भुर्र’ यांसारख्या बिभत्स गाण्यांवर ‘झिंग झिंग झिंगाट’ होऊन नृत्य करताना तरुणाई दिसली. आम्ही दोघंही अस्वस्थ झालो नि आम्ही तिथून काढता पाय घेतला. माझे मित्र शांत होते, संथपणे पावलं टाकत मी त्यांना म्हणालो, “का हो? अशी गाणी ऐकून गणपतीला काय वाटत असेल?” मित्रांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळलं आणि ते पुटपुटले, “मी या मंडळाला दिलेली पाच अंकी वर्गणी वाया गेली. याऐवजी मी एखाद्या गरजूला ही रक्कम दिली असती तर त्याची गरज भागली असती आणि मलाही समाधान लाभलं असतं.” या वर्षी ते काय करणार आहेत, हे त्यांनी न सांगताच मला कळलं होतं.

प्रसंग दुसरा. वैयक्तिक कामासाठी एका शाळेत गेलो होतो, दिवस अनंत चतुर्दशीचा. वर्गणी मागण्यासाठी अनेक कार्यकर्ते येत होते. येणाऱ्या प्रत्येकाला ११०० रुपये दिले जात होते, रीतसर पावतीही घेतली जात होती. मला नवल वाटलं. यांच्या गावात गणपती तरी किती आहेत? तिथले शिक्षक म्हणाले, “आमच्या गावात सोळा-सतरा गणपती आहेत, आम्ही कुणातही भेदभाव करत नाही. प्रत्येक मंडळाला ११०० रुपये देणगी देतो.” ‘शाळेला गावाचा आधार असावा, गावाला शाळेचा अभिमान वाटावा,’ हे भिंतीवरील वाक्य वाचत वाचत मी गुरुजींना म्हणालो, “तुमची श्रद्धा खूप मोठी आहे, पण हीच रक्कम विद्यार्थ्यांसाठी वापरली असती तर आणखी बरं झालं असतं, असं तुम्हाला वाटत नाही का? किंवा एखाद्या मंडळानं तुमची शाळा दत्तक घ्यावी असा प्रस्ताव तुम्ही का सुचवत नाहीत एखाद्या मंडळाकडे?” ते म्हणाले, “तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आम्हालाही अगदी असंच वाटतं. पण एक अडचण आहे, आम्हाला याच गावात नोकरी करायची आहे, म्हणून आम्ही कुणालाही नकार देऊ शकत नाही,” या उत्तरानं मीही निरुत्तर झालो.

ध्वनीप्रदूषण हे मानवी आरोग्यांसाठी अपायकारक असते. खासकरून लहान बालकांसाठी, वयोवृद्धांसाठी, आजारी व्यक्तींसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तरी या समस्येवर विचार करायला हवा. डीजे वा तत्सम अनावश्यक बाबींवरील खर्च वाचवून वाचनालयं उभी करता येतील का, याचा विचार करायला हवा, विद्येची देवता श्री गणेशाला हे नक्कीच आवडेल. डीजेच्या कर्णकर्कश आवाजात, मध्यरात्रीपर्यंत (कधी कधी मध्यरात्र उलटून पहाटेपर्यंत) धांगडधिंगा करत बाप्पाचं विसर्जन होतं. खरं म्हणजे गणपतीही कंटाळत असेल, असल्या धुडगूस घालणाऱ्यांच्या कोंडवाड्यात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यालाही हायसं वाटत असेल.

एखादा चांगला उत्सव कालौघात आपल्या मूळ हेतूपासून कसा दूर जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणेशोत्सव. (या वाक्याला अनेक सन्माननीय अपवाद आहेत.) ‘एक गाव एक गणपती’ ही आदर्श संकल्पना सार्वत्रिक व्हायला हवी, ती सार्वत्रिक करण्यासाठी तरुणांनीच पुढाकार घेतला पाहिजे. प्राप्त वर्गणीचा वापर गरजूंना मदत करण्यासाठी व्हावा. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत असलं तरी ते शेवटपर्यंत नष्ट होत नाही, यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. याचा परिणाम पाण्यातील सजीवांवर व ते पाणी पिणाऱ्यावरही होत असतो. असं काही विपरीत घडू नये यासाठी मातीच्या मूर्तींचा वापर व्हायला हवा.

गणेशोत्सव साजरा करताना बाप्पाला आणि टिळकांना काय वाटेल याचाही विचार करायला हवा. एखाद्या देशाचं भविष्य सांगणं खूप सोप्पं आहे. मला तुमच्या तरुणांच्या ओठावरील गाणी सांगा, मी लगेच तुमच्या देशाचं भविष्य सांगेन, असं एका विचारवंतानं म्हटलं आहे. आपण निदान ओठावरची गाणी तरी चांगली ठेवूयात. बघा जमलं तर.

हे गणराया, पुढच्या वर्षी लवकर ये आणि येताना आमच्यासाठी अधिकची बुद्धी आण.

.............................................................................................................................................

लेखक बाळासाहेब राजे ग्रामीण भवतालाची स्पंदनं टिपणारे मुक्त लेखक आहेत.

spraje27@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......