आपले दु:ख कशात आहे हे पक्के ठाऊक असूनही जन ठायी ठायी का तुंबतो?
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 19 September 2018
  • पडघम देशकारण सत्ता राजकारण Politics

अपेक्षाभंगाचे दु:ख पचवण्याची एक अमाप शक्ती भारतीय जनमानसात वास्तव्य करून राहिली आहे. त्याशिवायच का गत अनेक दशकांपासून हा जनांचा प्रवाहो असा अखंडितपणे चालतो आहे? अतृप्ततेच्या, अपूर्णतेच्या रिंगणाचे अभेद्य कवच भेदण्यासाठी सतत एक रिंगण आखतो आहे. गेल्या दिवसांतल्या जखमांवर इतिहासप्रसिद्ध हळद भरून नव्या ठेचांसाठी सिद्ध होतो आहे. हीच व्यथा इथल्या प्रत्येकाची आणि प्रत्येकाचा समावेश असणाऱ्या जनसमूहाचीपण आहे. आज कसा का मावळेना पण उद्याचा दिवस आपला आहे या मनातल्या दुर्दम्य आकांक्षेसह तो वाटचाल करतो आहे. आजचा दिवस मावळलेल्या कालसारखाच होता का त्याहूनही अधिक बेसुरा हे ठरवण्याची त्याची पद्धत कोणती? हे मात्र त्याचे त्यालाच ठाऊक आहे. कधीतरी आपली पहाट उजाडेल अन आशा-अपेक्षांचे रूपांतर वास्तवात झालेले अनुभवता येईल. या दिवसाची वाट पाहण्याखेरीज आपल्या हाती काहीच नाही, अशी निराशा, हतबलता असणे स्वाभाविक असले तरी या विशाल जनसमूहाच्या मनात आणखीही बरेचसे साचलेले आहे सुप्तपणे. जे प्रकट होणे, अभिव्यक्त होणे दुर्मीळ, दुर्लभ आहे.

उष:कालाच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या नशिबी कितीही काळरात्री आल्या तरी ते आशेचा पाठलाग करणे सोडत नाहीत, ही खरोखरीच सुखावह बाब आहे. कारण हाच समष्टीचा स्थायीभाव आहे. कदाचित तोच चराचरसृष्टीचाही अलिखित संकेत असावा. या सगळ्यांत समूहाच्या सोशिकतेची, सहनशीलतेची दखल मात्र घ्यायलाच हवी. आपल्या जगण्यातले रडे विसरून आशा-अपेक्षांचे प्रतिबिंब प्रत्यक्षात उतरेल कधीतरी या अपेक्षेवर जनसामान्यांचा प्रवास सुरू आहे निरंतर. या आजवरच्या वाटचालीत त्याच्या पदरी किती सुखाचे अन् किती दु:खाचे क्षण आले याची गणती त्याची त्यालाच ठाऊक! पण तरीही तो चालतोच आहे त्याच्या नशिबी आलेले सगळे देहभोग भोगण्यासाठी, आपल्या आकांक्षांची पूर्तता होईल या आकांक्षेसह. पदरी अपेक्षाभंग आला तरी पुन्हा नव्या अपेक्षाभंगाचे खुल्या मनाने स्वागत करण्यासाठी. या सर्व प्रवासात त्याने निर्माण केलेली राजकीय चौकटही अशीच वाटचाल करत आलेली आहे. एक माणूस, एक व्यक्ती म्हणून जगण्यासाठी जे-जे हवे ते मिळवण्याची त्याची स्वत:ची धडपड सुरूच आहे कायम. पण त्यात अडसर नकोत अथवा ते दूर करण्यासाठी त्याने ही आवरणे रचली आहेत सभोवती.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

व्यक्ती व व्यक्तीसमूहाच्या कल्याणासाठी त्याने आपले भाऊबंद पाठवलेत या व्यवस्था संचलनाच्या चौकटीत. पण तिथेही आजवर त्याच्या पदरी केवळ घोर निराशाच का येत आहे? कधी त्याच्या दारिद्र्याचे निर्मूलन केले जाणार असल्याचा आभास निर्माण केला जातो, तर कधी त्याच्या पदरी स्वस्तात धान्य मिळणार असल्याच्या वावड्या उठवल्या जातात. कधी कोणी त्याची गरिबी हटवण्याची ग्वाही देत असतो, तर कधी कोणी त्याच्या नशिबात ‘अच्छे दिन’ आणणार असल्याचा देखावा करतो. हे सगळे आभास आहेत हे त्याला उमगलेलेही असते. हे देखावे गणपतीसमोर, गौराईसमोरच्या देखाव्यासारखेच असतात काही क्षण मनाला उभारी देणारे. त्याच्या स्वप्नांची आरास मांडली जाते प्रत्येक वेळी नव्याने. पण त्याच्या वेदनांचे मूळ मात्र काही केल्या सापडत नाही. कारण ते शोधायचे नसतेच मुळी कोणाला! त्याच्या आजारावर उपचार होताहेत, त्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे, हा आभास त्याच्या मनात निर्माण करून द्यावयाचा असतो सगळ्यांना. त्याच्या वेदना हेच तर राज्यकर्त्यांचे खेळते भांडवल असते. मग त्याही शासकाच्या आणि प्रशासनाच्या हिशेबानुसार बदलत जातात. ‘ज्याचे दुखणे त्यालाच ठाऊक’ हे जळजळीत सत्य नाकारून सत्तेच्या भुकेल्या लोकांकडून त्याच्या वेदनांचा असा खुल्लम खुल्ला बाजार मांडला जातो निर्लज्जपणे. 

बिचारा नागरिक त्याला मिळत असलेल्या रुपयांत आपले भागत नाही म्हणून तळमळत असतो. त्याची चूल ज्यावर पेटते त्या इंधनाचे, पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडतात. त्याला मिळत असणारा रुपयाही आता परवडत नाही, ही त्याची व्यथा रुपया घसरूनही तो वधारला असे सांगणाऱ्यांना कधी कळतच नाही. त्याचेच प्रश्न, दु:ख आणि वेदना त्याच्याचसमोर अशा रीतीने पेश केल्या जातात की, त्यालाही प्रश्न पडतो स्वत:च्या सुखासीनतेबद्दल! इतर सगळे गतप्राण झालेले असताना तो जिवंत आहे, याचे समाधान साजरे करण्याचा सरकारचा सल्ला त्याला आवडतो अन् तो गुमान पुन्हा सगळं सहन करायला सज्ज होतो. राग येतो कधी कधी त्यालाही; पण तोवर फार उशीर झालेला असतो. कारण त्याच्यासमोर आणखी कोणीतरी झगझगीत, चकचकीत स्वप्नांचे, अपेक्षांचे नवे तोरण बांधून नाचवत येतो डोळ्यांसमोर. मग हा संतप्त जनसमूह पुन्हा शांत होतो आणि वाट पाहतो की, यावेळी तरी आपल्या भाळी निराशा येणार नाही म्हणून.

आपले दु:ख कशात आहे हे पक्के ठाऊक असूनही जन ठायी ठायी का तुंबतो? कारण त्याच्या तुंबण्यातच अनेकांचे हित सामावलेले असते. जनसामान्यांच्या स्वप्नांवर सत्तेचे संचित हाती असलेल्यांना मनसोक्त चरायला एवढे आवडायला लागते की, ही बाग आपली नव्हे याचाही विसर पडत जातो. त्याच्या स्वप्नांच्या आशेवर आपल्यातलेच अनेक जण अमाप सुखी झालेले त्याने अनुभवलेले असतेही. सत्तेच्या कैफात त्यांच्या भूमिका बदलतात, याचा प्रत्ययही त्याला पदोपदी येत असतो. या आशा-अपेक्षांचे गाठोडे मानगुटीवर घेऊन झालेली फसवणूक मुकाटपणे सोसत तो चालत राहतो पुन्हा नव्या अपेक्षाभंगाकडे. कारण त्याच्यासाठी सारेच गाव तोतयांचे असते.

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......