६ डिसेंबरला मुंबईबाहेर जाण्याची गरज नाही!
सदर - चैत्यभू'मी'तला 'मी'!
कीर्तिकुमार शिंदे​
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • Tue , 06 December 2016
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर. Babasaheb Ambedkar चैत्यभूमी Chaitya Bhoomi ६ डिसेंबर 6 December

"अरे, आज-उद्या सहा डिसेंबर आहे. शिवाजी पार्कला किंवा दादरला जायलाच नको", असं बोलणारी माणसं आता कमी व्हायला लागली आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गेल्या ६० वर्षांपासून दर वर्षी लाखोंच्या संख्येने 'भीमाचे अनुयायी' दादर परिसरात या दिवशी येतात, चैत्यभूमीजवळ शांतपणे रांगेत उभे राहून आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रतिमेपुढे नतमस्तक होतात, आणि तितक्याच शांतपणे पुन्हा आपापल्या घरी परततात, हे आता सर्वांनाच मान्य करावं लागलंय. 'मान्य करावं लागलंय' असं म्हणतोय, कारण सहा डिसेंबरच्या या अनोख्या एकत्रीकरणाला कोणी कितीही नाकं मुरडली, तरी ते अविरतपणे सुरूच राहणार आहे. अनेकांनी हे वास्तव आता स्वीकारलं आहे; पण या स्वीकाराला आणखी एक व्यावहारिक बाजू आहे. ती म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून चैत्यभूमी परिसरातल्या सुधारत गेलेल्या व्यवस्थापनाची. 

चैत्यभूमीचं दैनंदिन व्यवस्थापन 'बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेमार्फत केलं जातं, पण सहा डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जेव्हा लाखो लोक येतात, तेव्हाचं व्यवस्थापन मुंबई महानगरपालिका प्रशासन करतं. फारसं कुणाला माहित नसेल, पण दर वर्षी तब्बल दोन-तीन महिने आधीपासूनच या व्यवस्थापनाची आखणी सुरू होते. महापालिकेच्या आयुक्तांच्या थेट देखरेखीखाली संभाव्य आव्हानांचा आढावा घेतला जातो. त्यानुसार टप्प्याटप्प्याने काय काय नियोजन करावं लागेल, याचं सविस्तर वेळापत्रक बनवलं जातं. गेल्या वर्षीचं उदाहरण घेऊ. चैत्यभूमीला येणार्‍या लाखो लोकांना चांगल्या सेवा-सुविधा पुरवता याव्यात, यासाठी मुंबई महानगरपालिकेचे २००हून जास्त अधिकारी आणि (सफाई, मलनिस्सारण, जलपुरवठा आदी विभागांतील) सहा हजारांहून अधिक कर्मचारी सहा डिसेंबरच्या पूर्वतयारीसाठी राबले होते. जसजसा सहा डिसेंबर हा दिवस जवळ येतो, तसतसे त्यांच्या कामाचे तास वाढत जातात, आणि डिसेंबर उजाडल्यावर तर चैत्यभूमी परिसरात २४ तास युद्धपातळीवर काम केलं जातं.

कोपर्डी बलात्काराच्या घटनेनंतर अॅट्रॉसिटी-विरोधात राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाने काढलेले लाखांचे मूक मोर्चे आणि मुंबई-ठाणे-पुणे-नाशिक-नागपूर यांसारख्या महापालिका आणि पंजाब-उत्तर प्रदेश इथल्या निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर यंदा चैत्यभूमीवर दलितांचा प्रचंड जनसागर लोटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच यंदा सहा डिसेंबरच्या आधी तीन तारखेला शनिवार आणि चार तारखेला रविवार आल्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्येच दीड-दोन लाख लोक चैत्यभूमीला येऊन गेले आहेत. एरवी जी गर्दी पाच डिसेंबरला दिसते, त्याहून जास्त गर्दी यंदा शनिवारी- रविवारी तीन-चार तारखेलाच अनुभवायला मिळाली. आता इतक्या प्रचंड संख्येने येणार्‍या गर्दीचं व्यवस्थापन करणं म्हणजे निश्चितच साधी सोपी गोष्ट नाही. तिथे खरोखरच 'पाहिजे जातीचे' !

सर्वांत आधी वाहतुकीचा विचार करू या. बाबासाहेबांच्या अनुयायांना चैत्यभूमीवर येताना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेने ११ रेल्वेगाड्यांची विशेष सोय केली आहे. या सर्वच्या सर्व ११ रेल्वेगाड्या अनारक्षित असणार आहेत. याशिवाय सहा डिसेंबरला मुंबई उपनगरीय लोकलच्या १२ विशेष फेर्‍या सोडण्यात येणार आहेत. मुंबईकरांच्या सोयीसाठी बेस्टसुद्धा अतिरिक्त ५० बसेस चालवणार आहे. वैयक्तिक गाड्या किंवा बसेस, टेम्पो करून येणार्‍यांसाठी शिवाजी पार्कच्या पुढे (माहीमच्या दिशेने) असलेली जागा पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. 

मिळेल त्या वाहनाने किंवा अगदी पायपीट करतही लोकं इथे पोहोचतातच. त्यानंतरचं सर्वांत मुख्य आव्हान परिसरात स्वच्छता राखण्याचं असतं. शनिवारी रात्री चैत्यभूमी परिसरात मित्रांसोबत फिरत असताना 'लाईट ऑफ इंडिया' या इराणी रेस्टॉरंटसमोरच मी एक मोठं टँकरसदृश वाहन पाहिलं. या वाहनातून एक भलामोठा पाईप गटारात सोडला होता. तिथे काम करणार्‍या पालिका कर्मचार्‍यांना विचारलं, ''हे काय चाललंय?'' तर ते म्हणाले, ''गटारातली सगळी घाण, प्लास्टिक, दगड-धोंडे आम्ही बाहेर काढतो आहोत. त्यामुळे गटारात फक्त पाणी राहतं, आणि कचरा-मैला गटाराद्वारे समुद्रापर्यंत वाहून नेण्यात काही अडचणी निर्माण होत नाहीत.'' दादर परिसरातल्या सर्व गटारांची अशी अंतर्बाह्य स्वच्छता करण्यात आली आहे. 

इथे येणार्‍या कुणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून पालिका प्रशासन खरोखरच झटताना दिसतं. प्रशासन खुल्या दिलाने बजावत असलेल्या या उत्कृष्ट कामगिरीचं कौतुक करायलाच हवं. लाखो लोकांना नैसर्गिक विधी करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी चैत्यभूमी परिसरात २०० फिरती शौचालयं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तितकीच स्नानगृहंही आहेत. शिवाय, २६० तात्पुरती स्वच्छतागृहं आहेत, ती वेगळीच. पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल ३२० नळजोडण्या (तात्पुरत्या) दिल्या आहेत. टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा आणखी वेगळा विषय आहे. 

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क मैदानात २५ हजार चौरस फूट मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. विश्रांतीसाठी, भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्या आहेत (हे करताना मैदानातल्या क्रिकेट खेळपट्ट्यांना अजिबात धक्का लागणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे). ३५० ट्यूबलाईट्स, २३० हॅलोजन्स आणि ५० पेडेस्टंट पंख्यांसह मोबाईल चार्जिंगसाठी तब्बल ३०० चार्जिंग पाईंट्ससुद्धा पालिका प्रशासनाने सज्ज ठेवले आहेत. 

सुरक्षेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ५० क्लोज सर्किट टीव्ही, ४४ मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर्स, ६० हॅंडहेल्ड मेट डिटेक्टर शिवाजी पार्क मैदानात बसवण्यात आले आहेत. परिसरातल्या बंदोबस्तासाठी मुंबई पोलीस दलातले १५०० पोलीस, २०० अधिकारी आणि आरपीएफ किंवा दंगल नियंत्रण पथकासारख्या दलांच्या अनेक तुकड्या दोन दिवसांपूर्वीच इथे दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनीच स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे अडीच हजार 'सैनिक'ही गर्दीचं व्यवस्थापन करण्यात पोलिसांना सहकार्य करत असतात. तरीही एखादा अनुचित प्रकार घडलाच, तर गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलिसांचं पाण्याचा मारा करणारं 'वरुण' वाहन इथे सज्ज आहेच. यंदा प्रथमच चैत्यभूमी परिसरावर दोन ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे पोलिस लक्ष ठेवणार आहेत. शिवाजी पार्क मैदान चोहो बाजूंनी पत्र्यांनी बंदिस्त करण्यात आल्याचंही दिसतं आहे, पण तसं का केलं आहे, हे अद्याप मला समजू शकलेलं नाही. 

कोणाची तब्येत अचानक बिघडली, तर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी ११ रुग्णवाहिका पालिकेने सज्ज ठेवल्या आहेत. बेस्टचे ५० डॉक्टर्स चैत्यभूमी परिसरात 'ऑन ड्यूटी' तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, स्वेच्छेने इथे येऊन रुग्णांची तपासणी करणारे, मोफत चष्मे वाटणारे किंवा औषधं देणारे शंभरएक डॉक्टर चैत्यभूमी परिसरात वेगवेगळ्या स्टॉल्सवर असतातच. त्यातले बहुतांश डॉक्टर दलित समाजातलेच असतात. 

या संपूर्ण नियोजनाच्या केंद्रस्थानी मुंबई महानगरपालिकेची प्रशासकीय व्यवस्था कार्य करत असते. या व्यवस्थेला मंत्रालय, मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष, वाहतूक पोलीस, बेस्ट वाहतूक नियंत्रण कक्ष (कुलाबा), बेस्ट वाहतूक नियंत्रण कक्ष (वडाळा), विद्युत पुरवठा (बेस्ट), नागरी सुरक्षा दल, होमगार्ड मुख्यालय, पश्चिम रेल्वे चर्चगेट, पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल, मध्य रेल्वे नियंत्रण कक्ष, दूरदर्शन, आकाशवाणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती, दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे डॉ. आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) यांच्यासह अनेक आंबेडकरी विचारांनी प्रेरित ज्ञात-अज्ञात संस्था, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते अशा अक्षरश: हजारो लोकांचं सहकार्य लाभत असतं. या सर्वांच्या सहकार्याशिवाय महापरिनिर्वाण दिनाच्या व्यवस्थापनाचं 'भीमधनुष्य' पेलणं कुणालाही केवळ अशक्य आहे! 

पूर्वी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कचा परिसर सहा डिसेंबरनंतर पूर्ववत व्हायला, स्वच्छ व्हायला किमान तीन-चार दिवस लागायचे. म्हणून इथले अनेक जण या गर्दीला नाक मुरडून मुंबईबाहेर जाऊन राहायचे, पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सात डिसेंबरला सकाळी मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्कवर येणार्‍यांना कचराच दिसत नाही. त्यामुळे सहा-सात डिसेंबरला आता मुंबईबाहेर जाण्याचा प्रश्न येतोच कुठे! 

 

लेखक नवता बुक वर्ल्डचे संचालक आहेत.

shinde.kirtikumar@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......