साहित्य व्यवहारातला उपेक्षित कावळा : निमित्त : ‘बलुतं’ची चाळिशी
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • ‘बलुतं’ची षांताराम पवार यांनी केलेली दोन मुखपृष्ठं
  • Tue , 18 September 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar बलुतं दया पवार षांताराम पवार

कालच्या रविवारी ‘बलुतं’ या दया पवार यांच्या आत्मकथनाला ४० वर्षं पूर्ण झाल्या निमित्तानं अनेक लेख प्रसिद्ध झालेत. २० सप्टेंबरला त्यावर एक कार्यक्रमही मुंबईत आयोजित केला आहे.

प्रसिद्ध झालेल्या सर्वच लेखांसोबत ‘बलुतं’ची दोन किंवा एक मुखपृष्ठ दया पवारांचा (बहुधा ८७ सालचाच!) फोटो प्रसिद्ध केलाय. जे काही चार-दोन लेख वाचनात आले, त्यात ‘बलुतं’, दया पवार, दलित आत्मकथनं, दलित जीवन, जातिव्यवस्था, साहित्यातील बदल अशा अनेक विषयांना स्पर्श केला गेला. पण कुठेही ‘बलुतं’च्या दोन मुखपृष्ठासंबंधी एक ओळ(ही) माझ्यातरी वाचनात आली नाही.

७८ साली ‘बलुतं’ प्रकाशित झालं. आजवर सहा आवृत्त्या व वीसच्या वर पुनर्मुद्रणं झालीत. पहिल्यापासून ग्रंथालीच ‘बलुतं’चं प्रकाशन, आवृत्ती आणि पुनर्मुद्रण करतेय.

गोधडीचं कृष्णधवल चित्र असलेलं मुखपृष्ठ प्रथम प्रकाशनापासून अनेक वर्षं होतं. मध्यंतरी कुठल्या तरी पुस्तक प्रदर्शनात ‘बलुतं’ नवीन मुखपृष्ठासह पाहायला मिळालं. यावेळी मुखपृष्ठ रंगीत झालेलं. चित्र व अक्षरं बघताच ओळखलं हे षांताराम पवार असणार! होरा खरा निघाला! चित्र साधंच आहे. तळाशी पाणी असलेल्या घड्यात एक एक दगड टाकून पाणी वर काढणाऱ्या कावळ्याची गोष्ट आपल्याला शाळेपासून परिचित. इथं कावळा तेच करताना दिसतोय. मात्र घडा दुभंगलेला, तडा गेलेला आहे. मोजक्या रंगातलं चित्र ‘बलुतं’चा आशय सेकंदात पोहचवतं. पण मुखपृष्ठाची चर्चा कोण करणार?

आज ‘बलुतं’कार दया पवार आपल्यात नाहीत आणि त्याचे मुखपृष्ठकार षांताराम पवारही मागच्याच महिन्यात कुंचला खाली ठेवून गेले.

पवार सर (षांताराम पवार) गेल्यानंतर लिहिलेल्या लेखात या चाळीस वर्षांतल्या दोन मुखपृष्ठासंबंधी एक ओळ लिहिली होती. आता ‘बलुतं’ची चाळीशी अधोरेखित करताना एक चित्रकार म्हणून या दोन मुखपृष्ठासंबंधी थोडं विस्तारानं.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘बलुतं’ प्रकाशित झालं त्या वर्षी जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये मी चौथ्या-पाचव्या वर्षांत होतो. पवार सर बहुधा तेव्हा स्वेच्छानिवृत्ती घेऊन गेले असावेत. ग्रंथाली वाचक चळवळीविषयी फारशी माहिती नव्हती. दया पवारांशी ओळख झाली होती, पण ती वेगळ्याच संदर्भात. त्यावेळी ते नाटकाच्या सेन्सॉर बोर्डवर होते. आणि कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेसाठी मी लिहिलेली एकांकिका सेन्सॉर करून घ्यायची होती. सेन्सॉरचं ऑफिस तेव्हा मागेच आझाद मैदानात होतं. ‘प्रक्रिये’तून जायला वेळ लागला असता. पेंटिंगला असलेला माझा मित्र उमेश अहिरे म्हणाला- ‘आपण दयाकडे जाऊ!’ त्या वेळी ते चर्चगेटला रेल्वे ऑफिसमध्ये कामाला होते. ‘बलुतं’ तेव्हा नुकतंच प्रसिद्ध झालं होतं. पण त्या भेटीत आम्ही ‘बलुतं’वर नाही तर नामदेव ढसाळांवर बोललो. दलित, पँथर, दलित साहित्य, अनियतकालिकांची चळवळ, ढाले-ढसाळ-कोलटकर-नेमाडे-शहाणे यांच्याबाबत. कळण्याचा, वाचनाचा तो काळ होता. दया पवार त्यातलेच एक हे कळलं.

पुढे ‘मटा’मध्ये पुलं.चा ‘बलुतं’वरचा लेख रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला. या विस्तृत लेखानं ‘मटा’सहित इतर पांढरपेशी वर्गासाठी पुलंचा हा लेख औत्सुक्यपूर्ण ठरला आणि ‘बलुतं’ चर्चेत आलं. या लेखातच मी मुखपृष्ठासंबंधी वाचलं होतं. आणि त्याला दिलेली दाद वाचली. पुलंनी ‘बलुतं’चा धक्का मुखपृष्ठापासून सुरू होतो म्हणत मुखपृष्ठाचं विस्तृत विश्लेषण केलंय, पण चित्रकाराचं नाव लिहायला तेही विसरले!

ग्रंथालीचे दिनकर गांगल आणि षांताराम पवार (त्यावेळी ते शांताराम पवार असंच लिहीत) यांची दोस्ती बहुधा बोरीबंदरपासूनची असावी. कारण षांताराम पवार जे.जे.मध्ये आणि दिनकर गांगल ‘मटा’त म्हणजे टाइम्सच्या इमारतीत. दोन्ही इमारतींमध्ये फक्त अंजुमन इस्लामची शाळा. पवार सरांची रेखाचित्रं ‘मटा’ दिवाळी अंकात येत असत. याशिवाय पवार सरांचा नाटक, कविता यांतला रस पाहता ‘मटा’वाले, सर आणि पुढे ग्रंथालीवाले यांची दोस्ती जमली नसती तरच नवल.

‘बलुतं’च्या मुखपृष्ठाची कहाणी नंतर कधीतरी ऐकली, वाचली. कुठे ते आणि केव्हा ते आठवत नाही. त्यावेळी पवार सर दादरच्या अलीकडे नायगावमध्ये राहायचे. त्यांना गोधडीची कल्पना सुचल्यावर गांगलांना (कदाचित दया पवारांनीही) घेऊन नायगाव बीडीडी चाळीचा परिसर पालथा घातला. शेकडो गोधड्या पाहिल्या. या एकूणच प्रोसेसविषयी कुणीच तपशीलात काही लिहून ठेवलेलं नाही. असेल तर वाचनात नाही. दुसरा कुणी असता तर दोन गोधड्या पाहून एक निवडून त्याचा फोटो काढून ‘छापा हे’ म्हणून दिला असता. पण मुखपृष्ठ कृष्णधवल असणार तेव्हा प्रत्यक्ष डोळ्याला दिसणाऱ्या गोधडीचे रंग कृष्णधवल झाल्यावर कसे दिसतील याचा विचार करत सरांनी गोंधड्यामागून गोधड्या उपसल्या असणार. मुखपृष्ठ कृष्णधवल करण्यात आर्थिक विचार होता की, ‘स्मृति’ म्हणून त्या कृष्णधवल ठेवल्या हे सर, गांगल आणि दया पवारांनाच माहीत. पण या त्रिकुटानं एका अजरामर मुखपृष्ठाची भर मराठी पुस्तकविश्वात घातली हे मात्र नक्की.

‘बलुतं’च्या दुसऱ्या आवृत्तीतच पुलंचा तो प्रसिद्ध लेख पुनर्मुद्रित केलाय. त्यात पुलंनी मुखपृष्ठाबद्दल लिहिलंय ते जिज्ञासूंनी जरूर वाचावं. पुलंनी गोधडीमागचं तर्कशास्त्र त्यांच्या पद्धतीनं अचूक मांडलंय. आणि ते कुणालाही पटावं असंच आहे.

दुसऱ्या आवृत्तीचं चित्र, पवारांचा आवडता कावळा घेऊन आलंय. पवार सरांच्या आकृत्या, त्यांचं रेंडरिंग (रंगलेपन अथवा काळ्या शाई, रंगाचा दणकट आणि सौम्य वापर) हे इतकं असतं की, त्यात कसल्याच अधिक-उण्याची गरज भासत नाही. सर चित्रपटसृष्टीत असते तर उत्तम छायाचित्रकार, पटकथा लेखक किंवा संकलक झाले असते.

या दुसऱ्या आवृत्तीच्या चित्रातला कावळा त्यांनी ज्या पद्धतीनं चितारलाय, तो खास षांताराम टच. खालच्या घड्याला, दुभंगलेल्या दोन भागांपैकी एकाला मातीचा रंग, तर दुसरा भाग भगवा! पुन्हा त्या भंगल्याची कड मातीच्या रंगातल्या काळ्या छटेनं काळवंडलेली. वरवर पाहता वस्तू तुटल्यावर कडा झाकोळतात तसं वाटेल. पण सरांनी भगव्याची ही काळी किनार अधोरेखित केलीय. कारण बाकी भगवा बेदाग आहे. याउलट मातकट भाग काळवंडलाय. अवघ्या तीन रंगात सरांनी इथलं जातिवास्तव जुन्याच रूपक कथेतून उभं केलंय. सोबत त्यांचा ट्रेडमार्क असलेली कॅलिग्राफी. ही अक्षरं कुणाला वाटेल, अशी काय लिहिलीत किंवा लिहिलीत नेहमीप्रमाणे! पण नाही. सरांचा त्यांच्या आकाराबद्दल, चित्रात कुठे, कशी असावीत याबद्दल भि.भि.चे आग्रह असत. चित्रातली पांढरी जागासुद्धा ते नीट चितारत.

‘बलुतं’च्या चाळीशी निमित्तानं सरांना आणि दया पवारांना अभिवादन. पण या निमित्तानं मराठी साहित्य व्यवहारावर जरा चार-दोन फटकारे…

खरं तर मराठी प्रकाशन व्यवसायात तरी मुखपृष्ठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही दिल्ली किंवा कलकत्ता येथील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुस्तकमेळ्यात गेलात ना, तर तुम्हाला ही गोष्ट जाणवेल. भारतीय भाषांत मराठी पुस्तकाची निर्मिती ही नेहमीच श्रीमंत वाटावी अशी देखणी व श्रीमंत असते. यासाठी अनेकदा पुरस्कारही मिळालेत.

पण मराठी साहित्य व प्रकाशनविश्वानं मुखपृष्ठ, रेखाचित्र करणारे चित्रकार; पुस्तकाची मांडणी करणारे मांडणीकार (लेआऊट आर्टिस्ट) यांना कायम उपेक्षित ठेवलंय. ‘बलुतं’च्या दुसऱ्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर असणारा कावळा म्हणजे हे मुखपृष्ठ व मांडणीकार!

चित्रपटसृष्टीत जेवढा लेखक उपेक्षित, तितकाच प्रकाशनविश्वात चित्रकार! लेखक, प्रकाशक, अगदी मुद्रकांसाठीही पुरस्कार आहेत. पण मुखपृष्ठकरासाठी आहे कुठला पुरस्कार? काही वर्षांपूर्वी एका संस्थेनं असा पुरस्कार सुरू केला होता. पण लवकरच तो उपक्रम थांबला. राष्ट्रीय पुरस्कार असतो, पण त्यासाठी योग्य वेळी प्रवेशिका पाठवणं वगैरे प्रकाशक करतच नाहीत. मात्र साहित्यातल्या इतर सन्मानांच्या प्रवेशिका, शिफारशी (आणि पुढचं सगळे) ते अगदी लक्ष घालून करतात, पण हे विसरतात!

चित्रकाराचं मानधन हा आणखीनच गहन विषय. कुठलाही आकडा सांगा, टेबलापलीकडून प्रतिक्षिप्त क्रियेसारखा ‘एवढे?’ असा प्रश्न येणार! याला जोडून ‘आमचे ते…कसे विचारतही नाहीत. पम काम चोख आणि वेळेवर!’ (ही कलंदर चित्रकारांना जाता जाता मारलेली चपराक) त्यातही पुन्हा ‘आता तो काही तुमच्याएवढा प्रतिभावान नाही, पण काम भागतं’ असं म्हणून त्या वक्तशीर माणसालाही जागा दाखवून देणार!

पुस्तकाच्या मांडणी, टाईप, कागद यांबाबत मोजकेच प्रकाशक ‘जागरूक’ व आणखी मोजके ‘प्रयोगशील’ असतात.

मुळगावकर, दलाल, पत्की, गोरे, वसंत सरवटे, शि. द. फडणीस, बाळ ठाकूर, षांताराम पवार, सुभाष अवचट, भ. मा. परसावळे, श्रीधर अंभोरे, चंद्रमोहन कुलकर्णी, रविमुकुल, धनंजय गोवर्धने, विनय राजोपाध्ये, जयंत ताडफळे, अनिल उपळेकर, श्याम देशपांडे याशिवाय दै. ‘लोकसत्ता’मधील नीलेश जाधव, दै. ‘लोकमत’चे विवेक, प्रदीप म्हापसेकर, पुंडलिक वझे, विवेक मेहेत्रे, रघुवीर कुल, दत्ता पाडेकर, सुहास बहुलकर, प्रभाकर कोलते, अशी भली मोठी पलटण आहे. पण यापैकी मुखपृष्ठकार, पुस्तक मांडणीकार म्हणून किती जणांना गौरवलंय?

नाट्य-सिनेपरीक्षणात जसं ‘तांत्रिक अंगे चोख, प्रकाश, नेपथ्य योग्य वेशभूषा यथोचित’ लिहितात, तसंच पुस्तक परीक्षणात ‘मुखपृष्ठ वेधक, आकर्षक, अर्थपूर्ण’ (याचा अर्थ नेमका अर्थ ‘न कळलेला असणं’!) अशा दोन शब्दांत वासलात. मध्यंतरी परीक्षणात मुखपृष्ठाविषयी लिहिलं जायचं. परीक्षणाशेवटी तपशीलात लेखक, प्रकाशक, किंमत या जोडीनं ‘मुखपृष्ठ’ असंही मधूनच येतं. पण ते आवश्यक सदरात नाही.

इतक्या वर्षांच्या पसाऱ्यात पद्मा सहस्त्रबुद्धे वगळता स्त्री मुखपृष्ठकार का नाहीत, याचा साहित्य, प्रकाशनविश्वानं जसा विचार केला नाही, तसाच स्त्रीवाद्यांनीही!

थोडक्यात साहित्य व्यवहारात मुखपृष्ठकार ‘कावळ्या’सम आहे. ‘संकेत’ म्हणून (सांगावा, पिंड) जसा जगण्यात ‘कावळा’ लागतो, तसा पुस्तक जगतात तो संकेत म्हणून(च) आहे. त्याला ‘मोरा’ची सोडा, ‘पोपटा’चीही जागा मिळत नाही.

बलुतंच्या कावळ्यामुळे हे एवढं तरी मांडता आलं!

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

ramesh singh

Wed , 19 September 2018

उत्तम विश्लेषण केले आहे. संजय पवार यांचे लेखन सर्वसाधारणपणे वेगळा दृष्टिकोन देणारे नसते. ढोबळ मानाने आधी अनेकदा आळवलेला सूर ते आळवतात, त्यात स्वतःचे वेगळे विश्लेषण नसते, ना स्वतःचा काही वेगळा दृष्टिकोन असतो. परंतु या लेखात मात्र त्यांनी चित्रकलेच्या अंगाने सामाजिक भाष्य करणाऱ्या एका मर्मभेदी मुखपृष्ठाचे चांगले विवेचन केले आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......