‘SEMINAR’ मासिकामधील या लेखाचे मराठीकरण करावेसे वाटले ते एवढ्यासाठी की, ‘हिंदुत्वा’चे राजकारण आपल्या देशात घडवले जात असताना हा हिंदू धर्म खरा नाही, याची पाळेमुळे हिंसा, हुकूमशाहीत आहेत, असे म्हणणारा सश्रद्ध हिंदू आवाज बहुसंख्येने उठायला हवा होता, तो उठला नाही, याबद्दल विचारमंथन व्हावे, कृती व्हावी म्हणून!
या लेखातील विश्लेषण अनेक मुद्द्यांनर मान्य नसतानाही तो महत्त्वाचा वाटला. हिंदू धर्माच्या चौकटीतील चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि जातींची उतरंड, त्यातून निर्माण होणारा लिंगभेद आणि जागतिकीकरणाच्या लाटेत या सर्व संदर्भात निर्माण होणाऱ्या संपत्ती साधनसामग्रीच्या न्याय्य वाटपाचा मुद्दा, हे सारे प्रश्न या लेखात आले नाहीत. संस्कृतीच्या पायाखाली जागतिकीकरणाचे अर्थकारण आहे, हे विसरणे चूक होईल. प्रगत पाश्चात्त्य देशांत राहणाऱ्या भारतातील हिंदूंना जाणवणारे पेच, हा संदर्भही या लेखाची पार्श्वभूमी म्हणून लक्षात घेतला पाहिजे. या प्रश्नांचा अत्यंत खोलवर विचार समग्र समाजाच्या दृष्टीने व्हायला हवा.
– अनुवादक विद्युत भागवत
.............................................................................................................................................
तुम्ही कधी ‘हिंदू डावे’ किंवा ‘डावे हिंदू’ असा शब्दप्रयोग ऐकला आहे का? उजव्या हिंदूंबद्दल खूप पुस्तके, निबंध लिहिले गेले आणि आता ‘हिंदू उजवे’ (Hindu Right) हा शब्दप्रयोग सर्रास वापरला जातो. जगात फक्त हिंदू हा एकच धर्म असा आहे, की ज्यामध्ये उजवे असतात; पण डावे मात्र नसतात आणि याचे कोणाला आश्चर्यही वाटत नाही. युरोप, अमेरिका, कॅनडा आणि दक्षिण अमेरिकी देश यांमध्ये धर्मनिरपेक्ष उजवे आणि डावे असतात, तर ख्रिश्चन उजवे आणि डावे असतात. जेव्हा कॅथलिक सनातनी गर्भपात वा समलिंगी व्यवहारांविरोधात उभे राहतात, तेव्हा या दोन्ही गटांना भरभक्कम पाठिंबा देणारे सनातन्यांविरुद्ध आवाज उठवणारे कॅथलिक डावे गट असतात. ‘डिग्निटी’ नावाची गे कॅथलिक मंडळींची संघटना आहे. इतकेच नाही, तर प्रत्येक प्रमुख प्रॉटेस्टंट पंथामध्ये डावे, उजवे गट आहेत.
संघटित ख्रिस्ती स्त्रीवादाची परंपरा थेट एकोणिसाव्या शतकापर्यंत शोधता येते. सुरुवातीचे कितीतरी स्त्रीवादी लेखन वाचले, तर स्त्रीवादाची ती नांदी आहे असे वाटते. आजघडीला तेथे धर्मनिरपेक्ष – म्हणजे निरीश्वरवादी किंवा अज्ञेयवादी डावे गट सहजपणे धार्मिक वा धर्मवादी डाव्यांबरोबर सहकार्याने काम करतात, संघटना बांधतात. डाव्या मोर्चामध्ये दोघांची उपस्थिती ठळकपणे जाणवते. असेच बहुतांश इस्लामी देशांमध्ये मुसलमान उजवे आणि मुसलमान डावे दिसतात.
भारतात मात्र संघटित हिंदू डावे जवळजवळ नाहीतच (स्वामी अग्निवेश हे एकटेच याला अपवाद आहेत; पण कोणीही त्यांना जनसामान्यांचे प्रतिनिधी मानत नाही.). याचा अर्थ कसा लावायचा? असे का होते? याचा अर्थ असा आहे का, की भारतात हिंदू धर्माचे पालन करणारे डावे नाहीतच; पण हे मुळीच खरे नाही. कलकत्त्यातील कम्युनिस्ट मंडळी ऐन लढाई\संघर्षाच्या काळातही दुर्गापूजा आली, की त्या सोहळ्यासाठी गटागटाने स्थलांतरित होत. मला स्वत:ला दिल्ली विद्यापीठातील असे मार्क्सवादी अभ्यासक माहीत आहेत, की जे आपल्या घरामध्ये अत्यंत निष्ठावान हिंदू म्हणून वावरत. नित्यनियमाने उपासतापास, पूजाअर्चाही करत; परंतु हा त्यांच्या आयुष्याचा भाग सावर्जनिक जीवनात सैद्धान्तिक मांडणी करताना किंवा संघटना बांधताना अदृश्य आणि मूकच राहत असे. आपले धर्मविषयक चिंतन आणि डावा विचार यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतातील विचारवंतांची नावे बोटावर मोजण्याइतकीच जेमतेम घेता येतील. आशिष नंदी आणि रामचंद्र गुहा ही त्यांपैकीच दोन नावे अशी आहेत, की ज्यांनी आपल्या विचारांची सांगड हिंदू धर्माशी घालण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात मुद्दा असा, की भारतातील काही डावे निरीश्वरवादी वा अज्ञेयवादी असले तरी बरेचसे तसे नसतात. तरीही वरवर पाहता सर्व जण जणू काही धर्मनिरपेक्ष आहेत, असे भासते. असे का?
काही मानववंशशास्त्रज्ञांनी ख्रिस्ती संस्कृतीच्या ‘गिल्ट’ (अपराधी) संस्कृतीच्या तुलनेत भारतीय संस्कृतीला ‘शेम’ (शरम\भीड) संस्कृतीच्या कप्प्यात घातले आहे. याचा अर्थ असा, की भारतीय समाजात अनैतिक न मानली गेलेली वर्तणूकसुद्धा शरमेची मानली जाते. उदा. विवाहित जोडप्याने लैंगिक सुख घेणे, हे अनैतिक मानले जात नसले, तरी सार्वजनिक ठिकाणी उघडपणे शारीरिक जवळीक वा लगट करणे किंवा लैंगिक जीवनाची चर्चा करणे मात्र शरमेचे मानले जाते. अशा रीतीने अनेक वेळा व्यवहारात भिन्न प्रकारे वागण्याची मुभा असली तरी त्याविषयी बोलले जात नाही. वेगवेगळ्या गटा, प्रांतांनुसार कशाला बेशरमपणा मानायचे, हे भिन्नपणे ठरते. भारतातील समूह वा गट फक्त एका विशिष्ट समाजात जन्म घेतला म्हणून आकारास आले नाहीत, तर जीवनाविषयी समान दृष्टिकोन असणे यातूनही समूह बनतात. धार्मिक आचार ही काही सर्वसाधारणपणे शरमेची गोष्ट मानली जात नाही. पण विसाव्या शतकाच्या मध्यावर भारतीय डाव्यांच्या समूहांमध्ये मात्र तसे मानले जाऊ लागले. हे कसे झाले?
.............................................................................................................................................
रविशकुमार या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
भारतातील उजवे-डावे
या प्रश्नाचे उत्तर शोधताना एकोणिसाव्या शतकाकडे वळावे लागते. कारण त्याच काळात आपल्या आधुनिक रूपात भारतातील उजवे-डावे आकारास येऊ लागले. याच काळात ब्रिटिश राज्यकर्ते आणि मिशनरी यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी भारतातील हिंदू आणि इस्लाम हे धर्मही नवा आकार धारण करू लागले. युरोपमध्ये ख्रिस्ती, इस्लाम धर्माला शत्रुत्वाचा एक जुना इतिहास असला, तरी या दोन धर्मांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या घटकांसंदर्भात साम्य आहे. तसे ख्रिस्ती आणि हिंदू धर्माचे नव्हते. कितीतरी ब्रिटिशांनी असे म्हटले आहे, की त्यांना इस्लाम समजणे तसे सोपे गेले. पण हिंदू धर्म वा हिंदुवाद समजणे मात्र कठीण गेले. इस्लाम ख्रिस्ती धर्माप्रमाणे एकेश्वरी आणि एका धर्मग्रंथावर आधारलेला होता. याउलट हिंदू धर्म मात्र अनेक देवदेवता असलेला, मूर्तिपूजा मानणारा आणि अनेक धर्मग्रंथाशी निगडित असलेला धर्म होता. हिंदू धर्माचे रूप प्राचीन ग्रीक, रोमन धर्मांसारखे होते. आणि ख्रिस्ती धर्माने तर कितीतरी शतकांपूर्वी हे धर्म निपटून टाकले होते. हिंदू धर्माने असे निपटले जाणे नाकारले. वसाहतपूर्व काळात देवळे, मूर्ती आदींवर भंजक हल्ले होऊनही हा धर्म तगून राहिला आणि वाढला.
अनेक देव-देवता, मूर्तिपूजा यावरील आधुनिकांचा हल्ला मध्ययुगीन रानटी हल्ल्यापेक्षाही अधिक विषारी होता. त्यांच्या हल्ल्यातून त्यांनी ‘शेम’ (शरम) संस्कृतीची प्रक्रिया सुरू केली. आशिष नंदी आणि अन्य अभ्यासकांनी अत्यंत प्रभावी वर्णनपर लेखनातून दाखवले आहे, की स्वत:च अधिमान्यता दिलेल्या खास शैलीच्या आधारे ‘आधुनिक’, ‘प्रबुद्ध’ म्हणवून घेणाऱ्या राज्यकर्त्यांनी इंग्रजी विद्या शिकलेल्या भारतीयांना स्वत:च्या मूर्तिपूजेसारख्या प्रथेबद्दल शरम वाटावी, अशा रीतीने रानटी, मागास, राक्षसी ठरवले गेले.
या आपल्याबद्दल वाटणाऱ्या शरमेचे उत्तम उदाहरण म्हणजे आर्य समाजासारख्या नव्या हिंदू संघटनांनी एकीकडे योग्य दिशा घेण्यासाठी स्त्रियांचे शिक्षण, अस्पृश्यतानिवारण असे कार्यक्रम घेतले असले तरी त्यांनाही अनेक देव-देवता, पूजाअर्चा आदी गोष्टी टाकून द्याव्या, अशी सक्ती वाटू लागली. ‘हिंदू धर्माचे ख्रिस्तीकरण’ असे नाव आशिष नंदी यांनी या प्रक्रियेला दिले; पण ही प्रक्रिया मात्र मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली, असे दिसत नाही. हिंदू धर्मातील लवचिकतेमुळे, रोजच्या जीवनातील हिंदू धर्मामध्ये जेत्यांच्या सिद्धान्ताचा प्रतिकार करण्याची क्षमता होती. त्यामुळे आर्य समाजातील बहुतांश कुटुंबांनी शांतपणे घरीदारी, दुकानांवर आपल्या देवदेवतांचे फोटो व चित्रे लावून आपल्याला हवे ते केलेच. अनेक हिंदू नेते सार्वजनिक जीवनात हिंदू धर्म मुळात एकेश्वरीच आहे, असे मांडू लागले आणि वेदांताच्या शुद्ध स्वरूपाकडे परत जाण्याचा मार्ग सुचवू लागले. परंतु तरीही फारच थोड्या लोकांनी त्या काळात खासगी जीवनातील प्रादेशिक देवदेवतांच्या पूजा, कौटुंबिक सणसमारंभ यातील आनंद नाकारला. दुर्गापूजा किंवा दसरा किंवा गणेश चतुर्थी या सणसोहळ्यांपासून दूर राहण्याचा मूर्खपणा कोण करणार होते? ब्राह्मो समाजासारखे काही गट जे ख्रिस्ती हिंदुवादाला चिकटून राहिले, ते एक तर गट म्हणून आक्रसत तरी गेले किंवा आपल्या मरणाने काळाच्या ओघात नाहीसे झाले. आर्य समाजासारखे जे जुन्या पूर्जाअर्चांच्या व्यवहाराशी सांगड घालून उभे राहिले ते तगले.
या साऱ्याचे महत्त्वाचे परिणाम उजवे, डावे गट आणि त्यांची वैशिष्ट्ये ठरण्यावर झाले. एकोणिसाव्या शतकामध्ये रामकृष्ण मिशन आणि आर्य समाज यांसारख्या हिंदू संघटनांची कार्यक्रम पत्रिका काही प्रमाणात निश्चितच डावीकडे झुकलेले दिसते. (किती उत्तर भारतातील डावे आर्य समाजी कुटुंबांतून आले आहेत, याची पाहणी करणे उदबोधक ठरेल.) उदा. जेव्हा हिंदू समाज सुधारणावादी संघटना बालविवाहाविरुद्ध झगडत होत्या आणि विधवाविवाहाला पाठिंबा देत होत्या, तेव्हा त्यांच्यापेक्षा अधिक उजवीकडे झुकलेल्या लोकमान्य टिळकांसारख्यांनी त्यांना विरोध केला होता. यात हिंदुवादी चौकटीतील एक निरोगी वादविवाद उभा राहिलेला दिसतो आणि आधुनिक चौकटीत या वादाचा आपण डाव्या आणि उजव्या फळीतील हिंदुवाद्यांमधील वाद, असे म्हणू शकतो. अगदी प्रत्येक संघटनेमध्ये उदा. आर्य समाजामध्ये डावी-उजवी फळी दिसते. स्त्रीशिक्षणासंदर्भात त्याचा आशय आणि व्याप्ती ठरवण्याबाबत झालेले वाद तसे दिसतात.
गांधींविरुद्ध हिंदू महासभा
हे सारे राष्ट्रवादी चळवळीपर्यंत तसेच चालू राहिले. तेव्हा गांधी हिंदुवादामधील डाव्या फळीचे प्रतिनिधित्व करत होते आणि हिंदू महासभा जी हिंदू धर्मातील उजव्या फळीचे प्रतिनिधित्व करत होती, ती महात्मा गांधींच्या विरोधात उभी राहिली. अशाच प्रकारचा वाद मुसलमान राष्ट्रवाद्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांमध्ये उभा राहिलेला दिसतो. ज्या बंदुकीच्या गोळीने गांधींना संपवले, त्या गोळीने एका अर्थी हिंदुवाद्यांची डावी फळीही संपवली. उजव्या फळीतील हिंदुवाद्यांच्या हिंसक चढेलपणामुळे डावी फळी भूमिगत झाली.
परंतु हेही खरे आहे, की धर्मनिरपेक्ष डावेपणानेही जे जे काही हिंदू आहे, ते मूलत: मागास आणि अधोगतीकडे नेणारे, अशी वैचारिक पुनर्रचना करण्यास हातभार लावला. धर्मनिरपेक्ष डाव्यांची अगदी अलीकडच्या काळापर्यंत गांधींकडे पाहण्याची दृष्टी गांधींनी उघड धीट हिंदू असणे स्वीकारल्यामुळे नकारात्मकतेने रंगलेली दिसते. धर्मनिरपेक्ष डाव्यांनी हिंदू धर्माशी निगडीत असलेल्या कशाशीही संबंध न ठेवण्याची भूमिका सार्वजनिक जीवनात घेतली. हे फक्त अनेक अशा कृतींमधील एक उदाहरण आहे.
इंग्रजी शिक्षित भारतीयांना हिंदू धर्माविषयी वाटणारा ओशाळवाणेपणा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही संपला नाही. उलट तो अधिकच वाढला. मी दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाउसमध्ये १७ वर्षे अध्यापन करत होते. तेव्हा मी प्रत्येक नव्या बॅचच्या विद्यार्थ्यांना एकेश्वरी धर्म की अनेक देवदेवता धर्म, यापैकी अधिक चांगली व्यवस्था कोणती, असा प्रश्न विचारीत असे. अपरिहार्यपणे, बहुसंख्य (त्यातील जवळजवळ सर्व हिंदू) उत्स्फूर्तपणे सांगत, की एकेश्वरी धर्मव्यवस्था अधिक योग्य. पुढे चर्चेच्या ओघात मात्र त्यांची मते बदलत किंवा ते निदान या भूमिकेसंदर्भात प्रश्न उभे करण्यास तयार होत. परंतु येथे लक्षात घ्यायला हवे ते हे, की एकेश्वरवाद अनेक देवदेवता मानण्यापेक्षा श्रेष्ठ, विविधतेपेक्षा एकसाचीपपणा श्रेष्ठ, या विचारांमध्ये त्यांची घडण इतकी पक्की असे, की या विचारांसंदर्भात प्रश्नही त्यांच्या मनात उभे राहत नसत.
इथे मुसलमान, ख्रिश्चन, शीख डाव्या मंडळींची स्थिती काहीशी भिन्न दिसते. भारतातील हे अल्पसंख्याक समाज असल्याने डाव्यांना त्यांच्या हक्कासंदर्भात पाठिंब्याची भूमिका घ्यावीच लागे. म्हणून या अस्मिता आधुनिक आहेत, हे म्हणताना संकोचाचा प्रश्न फारसा उदभवत नाही. दुसरे असे, की त्यांना मागास, अनेक देवदेवता, मूर्तिपजक वगैरे दूषणांचे ओझे बाळगावे लागत नाही. शहरी स्त्री चळवळीत धर्मनिरपेक्ष स्त्रीवादी संघटना आणि यंग विमेन्स ख्रिश्चन असोसिएशनसारख्या ख्रिस्ती स्त्री संघटना बऱ्याच वेळा एकत्र काम करतात. अशा युत्या (coalitions) मध्ये संपूर्ण सहमतीची गरज नसते, हाताशी असणाऱ्या प्रश्नासंदर्भात पायाभूत सहमती पुरेशी असते. ते काहीही असो, जो कोणी हिंदुवादाबद्दल सैद्धान्तिकदृष्ट्या सकारात्मक बोलेल, त्याला भारतीय डाव्यांनी जमातवादी, असा शिक्का दिलाच म्हणून समजा, अशी मात्र परिस्थिती आहे.
अमेरिकेत पोचलेला हिंदुवाद
पुन्हा एक लक्षात घ्यायला हवे, की जगाच्या संदर्भात हा एक आश्चर्यकारक विरोधाभास आहे. डाव्या ख्रिश्चन आणि मुसलमान विचारवंतांकडे जगभराच्या अज्ञेयवादी निरीश्वरवादी डाव्यांनी गांभीर्याने पाहिले आहे. अमेरिकेमध्ये हिंदुवाद फार उशिरा पोचला. त्याला आधुनिक भारताप्रमाणे विशिष्ट इतिहास नाही. गुरुमयीसारख्या गुरूंचे अनेक शिष्य उदारमतवादी आणि डाव्या फळीतील प्रश्न हातात घेतात. त्यांना आपल्या चळवळींमध्ये काही आंतर्विरोध आहे, हे जाणवतसुद्धा नाही. विसाव्या शतकात भारतात घेतल्या गेलेल्या कर्मठ भूमिका आणि शिक्के मारण्याच्या प्रक्रियेचे परिणाम असे झाले, की आर्य समाज आणि रामकृष्ण मिशनसारख्या हिंदू संघटना बचावाचा पवित्रा घेऊ लागल्या. आणि कित्येक वेळा या संघटना उजव्या हिंदू संघटनांच्या कह्यात गेल्या. अशा गटांनी हिंदुवाद धिक्कारणे जसेजसे नाकारले, त्या प्रमाणात हिंदूशिक्षित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी या मंडळींची सामाजिक, राजकीय सुधारणांची कार्यक्रम पत्रिका फारशी गांभीर्याने घेतली नाही. त्यातच हिंदू उजव्या फळीतल्यांना मात्र खात्री पटत गेली, की असे सर्व गट मूलत: त्यांच्या बाजूचे आहेत. यातील विसंगती अशी आहे, की धर्मनिरपेक्ष डावे आणि एकेकाळचे हिंदू डावे, यांची समाजसुधारणेची कार्यक्रम पत्रिका अगदी सिद्धान्त, भाषा, शब्दप्रयोग यात भिन्नता असतानाही एकच आहे. अगदी आजही बऱ्याच मोठ्या प्रमाणात ती तशीच समानता चालू आहे.
उदाहरणार्थ एका प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर भिन्न पक्षांच्या महिला आघाड्या आणि संघटना हुंडा, कुटुंबांतर्गत हिंसाचार आणि बलात्कार या समस्यांशी झगडतात. हिंसा मान्य असलेली क्रांतिकारी मंडळी सोडली तर बहुतांश संघटना दारिद्रयात जगणाऱ्या माणसांसाठी काम करताना आरोग्य आणि साक्षरता या क्षेत्रांत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. आणि रोजगार निर्मिती, तसेच बालसंगोपन केंद्रे स्थापन करतात. त्यांच्यात अनेक प्रश्नांसंदर्भात मतभेद असले तरी सर्वच प्रश्नांसंदर्भात मतभेद नसतात. तरीही उघडपणे आपल्यातील ही सहमती मान्य करणे त्यांना जवळजवळ अशक्य होते.
काही अत्यंत विवादास्पद मुद्द्यांसंदर्भात पाहता पूर्वी आणि आजही हिंदू डावे आणि धर्मनिरपेक्ष उजवे यांच्यात टोकाचे मतभेद आहेत; पण त्यांच्यात बऱ्याच वेळा भरपूर साम्यही दिसते. सर्वांना मतभेदाचे मुद्दे माहिती असतात; पण साम्य असलेल्या मुद्द्यांची परीक्षा कधी केलीच जात नाही. गेल्या दशकात लैंगिकतेचा उघड व्यापार करणाऱ्यांवर सेन्सॉरशिप असली पाहिजे, याबाबत धर्मनिरपेक्ष डावे, धार्मिक डावे इतकेच नाही, तर धार्मिक उजवे यांच्या भूमिका समानच होत्या. ‘मिस वर्ल्ड स्पर्धा’ किंवा ‘चोली के पीछे क्या है…’ या गाण्यांवरील वाद पाहता कितीतरी उजव्या-डाव्या स्त्री संघटना वेगळी भाषा वापरून एकच भूमिका घेत होत्या. त्यांना राज्यसंस्थेने आपली सत्ता वापरून अशा प्रकारांना आळा घालावा, असे वाटत होते. मग डाव्यांनी त्याला ‘भांडवलशाही आविष्कार’ म्हटले, तर उजव्यांनी ‘सैल नीतिमत्ता’ म्हटले.
या विसंगतीचे नाते तपासून न पाहिलेल्या भिन्नतेशी आहे – ती म्हणजे अधिकारशाही वा हुकूमशाही आणि उदारमतवाद – जो उजव्या आणि डाव्या भूमिकांना छेदतो. अधिकारशाहीवादी उजवे, डावे असतात. त्यांच्यातील प्रमुख प्रश्नांवरील मतभेद लक्षात घेऊनही एकमेकांशी दिसणारे साम्य अधिक भासते. तसेच उदारमतवादी उजवे आणि डावे यांच्यातील मतभेद लक्षात घेऊनही साम्य खूप दिसते. अनेक देशांमध्ये अधिकारशाहीवादी आणि स्वातंत्र्यवादी उदारमतवादी यांमधील मतभेद विशिष्ट प्रश्नासंदर्भात उभे राहिलेले दिसतात. पोर्नोग्राफी हा असाच एक प्रश्न आहे. अमेरिका आणि अनेक युरोपीय देशांमध्ये धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष डावे, तसेच काही स्त्रीवादी आणि उजवे (त्यातील स्वातंत्र्यवादी) पोर्नोग्राफीवर राज्यसंस्थेने बंदी आणण्याविरुद्ध जी भूमिका घेतात, त्यामागे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक, असा मुद्दा असतो; तर धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष डावे, काही स्त्रीवादी आणि उजवे (उदा. सनातनी ख्रिस्ती) अशी बंदी हवी, असे म्हणतात. थोडक्यात येथे राजकीय वा तत्त्वज्ञानातला प्रश्न आहे तो हुकूमशाही विरुद्ध स्वातंत्र्य असा आहे. प्रौढ व्यक्तीला तिच्या वा त्याच्या वाचनाचे स्वातंत्र्य, निर्भयतेने साहित्य पाहण्याचे स्वातंत्र्य असावे, असा आग्रह एका गटाचा आहे, तर दुसऱ्या गटाचा प्रश्न असा होता, की राज्यसंस्था अथवा बहुसंख्याकांनी व्यक्तीच्या वतीने समाजामध्ये निर्णय घ्यावे की नाही?
जेव्हा अगदी वैयक्तिक आयुष्यात आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या जिवंत शरीरासंदर्भात प्रश्न निर्माण होतो, तेव्हा लोकांना व्यक्ती म्हणून, समूह म्हणून भूमिका घ्याव्याच लागतात आणि त्यातून सार्वजनिक जीवनातील त्यांचे सामाजिक संबंधही बदलू लागतात. समलैंगिकता हा प्रश्न भारतात आजघडीला अशी विभागणी स्पष्ट करणारा म्हणून फलदायी ठरू शकेल. ‘फायर’ चित्रपटावरील वाद सुरू होईपर्यंत या प्रश्नाबाबत डाव्या आणि उजव्या गटांनी, अगदी स्त्री संघटनांनीही संपूर्ण मौन व्रत धारण केले होते. भारतातील अभ्यासक एरवी मुक्तपणे सर्व विषयांवर बोलतात; परंतु या विषयावर त्यांनी कधी तोंड उघडले नाही. अनेक लोकांच्या जीवनातील, कुटुंबातील हा आणखी एक कुचंबणा वाटावा असा ‘शरमे’चा विषय होता.
दीपा मेहतांचा ‘फायर’ हा चित्रपट हिंदुवादावर काही प्रमाणात अनावश्यक आणि अज्ञानातून हल्ले करतो हे खरे असले, तरी तो हिंदू धर्माचे समलैंगिकतेशी कार्यकारणाचे नाते नक्कीच जोडत नाही. म्हणून शिवसेनेने या समलिंगी नात्याच्या चित्रपटावर जो हल्ला केला, त्याच्याशी हिंदुवादाचा काही संबंध नव्हता. त्यांचा हल्ला म्हणजे आपली सत्ता, अधिकार गाजवण्याचा साधा सरळ आविष्कार होय. शिवसेना महिला आघाडीने निरर्थक केलेले वक्तव्य जनसामान्यांच्या मनातील होते. त्यांनी असे म्हटले, की जर स्त्रियांना समलिंगी संबंध शोधण्यासाठी वाव मिळाला, तर विवाहसंस्था कोसळेल आणि अपत्यजनन थांबेल. शिवसेनेला यातून खरे साधायचे होते, ते म्हणजे लैंगिक जोडीदार मोकळेपणाने निवडण्याचा व्यक्तीचा अधिकार नाकारणे. भिन्नलिंगीयांची बहुसंख्याक अधिकारशाही समलिंगीयांच्या अल्पसंख्याकांना पुन्हा अधोरेखित करायची होती. आणि ही अशी अधिकारशाही भूमिका ‘हिंदू’ आहे, असा त्यांचा दावा होता.
ती निसर्गाचीच योजना
या त्यांच्या दाव्याच्या विरोधात कोणी श्रीनिवास राघवाचारियार यांच्यासारख्यांच्या भूमिकेचा दाखला देऊ शकेल. एक संस्कृत अभ्यासक आणि श्री रंगामधील वैष्णव मंदिराचे पुजारी असलेले हे संस्कृततज्ज्ञ सुखाचा संसार करणारे आणि १३ मुलांना जन्म देणारे गृहस्थ गणिताच्या जगातील जादूगार\चमत्कार मानल्या गेलेल्या शकुंतलादेवीबरोबर झालेल्या मुलाखतीत असे म्हणतात – ‘समलिंगी संबंध ही निसर्गाचीच एक योजना आहे. पृथ्वीवर माणसांचा अतिभार झाला आणि भूमीमाता आता ते ओझे घेऊ शकत नाही. म्हणून निसर्गरूपी आईचा लोकसंख्या कमी करण्याचा हा मार्ग आहे.’
त्याआधी समलिंगी संबंध हा पुनर्जन्माचा प्रकार आहे आणि गेल्या जन्मी यातील एक जण भिन्नलिंगी प्रेमिक होता, असाही तर्क त्यांनी मांडला. त्यांच्या मते अतिलोकसंख्येमुळे अन्य जीव कमी होतात आणि माणसांची वाढती आयुर्मर्यादा असमतोल निर्माण करते आणि थोड्याच काळात इतक्या लोकांसाठी पुरेसे अन्न उत्पादित करणे पृथ्वीला शक्य होणार नाही. त्यांच्या मते, अन्य ग्रहावर प्रवास करून जाण्याची मानवी इच्छा समलिंगी संबंधासारखीच आहे आणि ही सारी निसर्गाचीच करामत आहे लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी! ‘आपण आता फक्त निवांत बसून परमेश्वराच्या लीला पाहत राहायच्या’ असा सल्ला ते देतात.
थोडक्यात, येथे दोन हिंदू भूमिका दिसतात. एक हुकूमशाही आणि दुसरी स्वातंत्र्यवादी. अलीकडच्या वादविवादात ‘गे’ चळवळतील अशोक रावकवी यांनी ‘फायर’ चित्रपटास पाठिंबा दिला, शिवसेनेला विरोध केला आणि हे सारे हिंदू म्हणवून घेऊन, तसेच अनेक मार्क्सवादी व्यक्ती आणि संघटनांनी ‘फायर’ला पाठिंबा दिला, तर काही वर्षांपूर्वी बिमला फारुकी, नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन विमेन, सीपीआयच्या महिला आघाडीच्या प्रतिनिधी म्हणून मुंबईतील ‘गे’ परिषदेला विरोध केला, तेव्हा ‘पाश्चिमात्य भांडवलशाही आयात’ या शब्दात समलिंगी संबंध प्रश्नाची संभावना केली. अगदी अलीकडे म्हणजे १९९६ मध्ये एच. श्रीकांत यांनी मार्क्सवादी विचारवंत म्हणून सविस्तरपणे मांडले, की समलिंगीयता ही बूर्ज्वा विकृती आहे. म्हणून मार्क्सवादी त्याचा धिक्कार करतील आणि मानवशास्त्रीय उपचारांनी त्यांच्यात सुधारणा वा दुरुस्त्या करू पाहतील आणि जर हेही उपाय फसले, तर ‘समलिंगीयांची चळवळ बळाने मोडू काढण्यास पुढे मागे पाहणार नाहीत’. म्हणजे इथे पुन्हा एकदा आपल्यापाशी दोन डाव्या भूमिका आहेत. एक स्वातंत्र्यवादी, दुसरी हुकूमशाही.
अशा भिन्नता नाकारण्या, झाकून टाकण्याऐवजी त्यांचा खोलात जाऊन विचार, संशोधन करणे याला जीवनाचे चैतन्य मानले पाहिजे. जर अधिक उदारमतवादी, डावे हिंदू आपली हिंदू ही अस्मिता मान्य करू लागले आणि हिंदू वारशाच्या वतीने बोलू लागले, तर त्याने धर्मनिरपेक्ष डाव्यांची भूमिका उलट अधिक मजबूत होईल. हिंदू परंपरा हा शिवसेनेचा वा संघाचा किंवा कोणत्याही एका गटाचा मक्ता नाही. एका विशिष्ट अर्थाने तो इथल्या सर्व हिंदूंचा आहे. आणि एका व्यापक अर्थाने सर्व भारतीयांचा आहे. आशिष नंदी यांनी अत्यंत पटवून देणाऱ्या पद्धतीने असे मांडले आहे, की भारतीयांची दुहेरी अस्मिता असते. उदाहरणार्थ अनेक भारतीय एकाच वेळी व्यक्ती म्हणून ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही असू शकतात. तसे ते स्वत: आहेत. तसेच जगातील ख्रिस्ती वा इस्लामचा वारसाही एका अधिक व्यापक अर्थाने सर्व माणसांचा असू शकतो.
हिंदू वारशाची व्याख्या करणे किंवा त्याचे अर्थ लावणे, यावर आपला मक्ता सांगणाऱ्या संघटनांना खीळ घालण्याची हीच वेळ आहे. खरे तर हुकूमशाही मानणाऱ्या हिंदूंना आपल्या वारशाबद्दल फारच थोडे माहिती असते. त्यांनी बहुधा कधीच कामसूत्र वाचलेले नसते, नाहीतर प्राचीन भारतात समलिंगी संबंध नव्हते, असा दावा त्यांनी केला नसता. इतर प्रकारचे हिंदू म्हणजे ज्यांना हिंदू धर्माचे अधिक ज्ञान आहे, त्यांनाही हिंदू धर्माच्या वारशावर दावा सांगण्याचा समान हक्क आहे, नव्हे, ते त्यांचे कर्तव्य आहे. नाही तर हा वारसा हिंदुत्वाच्या चॅम्पियन मंडळींकडून स्वत:च्या शैलीच्या साहाय्याने गंजवला जाईल, नष्ट केला जाईल.
(पूर्वप्रसिद्धी - ‘साप्ताहिक सकाळ’, ३१ ऑगस्ट २००२)
.............................................................................................................................................
वनिता रूथ यांचा हा मूळ लेख ‘SEMINAR’ मासिकाच्या एप्रिल २००२च्या अंकात ‘Whatever happened to the Hindu Left?’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. मूळ लेखासाठी क्लिक करा -
https://www.infinityfoundation.com/mandala/s_es/s_es_vanit_left_frameset.htm
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sun , 30 September 2018
वनिताबाई, आयशप्पत, कलकत्त्याच्या कम्युनिस्टांची पण कमाल आहे. स्वत: दुर्गापूजा वगैरे देवाचे उत्सव करायचे आणि बाकी जगास मात्र धर्म ही अफूची गोळी असल्याचा उपदेश करायचा. लोकां सांगे ब्रह्मज्ञान, ....! डावे हिंदू ही जमात का अस्तित्वात नाही हे कळतं नाहीका ! पण एक गंमत सांगू? देवाधर्माच्या बाबतीत दुटप्पीपणा करणारे डावे कम्युनिस्ट हे काही पहिले नाहीत. रावणसुद्धा असाच होता हो. तो स्वत: लंकेत बसून भगवान शिवाची आराधना करायचा. मात्र त्याचे बगलबच्चे (खर, दूषण, मारीच, शूर्पणखा, वगैरे) भारतात येऊन ऋषिमुनींच्या यज्ञांत धुडगूस घालायचे. डावे कम्युनिस्ट हे रावणासारखेच राक्षसी आहेत. पण चिंता नको. या उचापतखोर राक्षसांची मायावी विद्या जाणणारे वानर सुद्धा निर्माण झालेच ना? या वानरांच्या राजा वालीने आपली पराक्रमी वानरसेना घेऊन रावणाचा धुव्वा उडवला. आपला नम्र, -गामा पैलवान तळटीप : मी एक कट्टर हिंदू आहे. म्हणून मुद्दाम रामाचं नाव घेत नाहीये. रावणाला सरळ करायला वानरराज वाली पुरेसे आहेत. रामाची तर बातच सोडा.
Dilip Chirmuley
Wed , 19 September 2018
I agree with Gamaji's comment. Furthermore It seems that by writing the following जगात फक्त हिंदू हा एकच धर्म असा आहे, की ज्यामध्ये उजवे असतात; पण डावे मात्र नसतात the author has forgotten that there is Islam.
Gamma Pailvan
Tue , 18 September 2018
वनिताबाई, तुमच्या लेखातलं शेवटास आलेलं हे वाक्य जाम रोचक आहे : >>"हे हिंदू वारशाची व्याख्या करणे किंवा त्याचे अर्थ लावणे, यावर आपला मक्ता सांगणाऱ्या संघटनांना खीळ घालण्याची हीच वेळ आहे. ">> रोचक अशासाठी की स्वत:ला डावे विचारवंत म्हणवून घेणारे सतत हिंदू धर्मास पाण्यात पाहतात. हिंदू असणे हा डाव्यांच्या लेखी अक्षम्य अपराधच आहे. म्हणूनंच कोणी हिंदू डाव्या विचारांची पाठराखण करीत नाही. तसंही पाहता स्वयंघोषित डाव्यांकडे फुटक्या कवडीइतकीही विचारशक्ती नाही, पण त्याची चर्चा इथे नको. आता हेच उपरोक्त विधान अशा स्वयंघोषित डाव्यांना लागू करायला हवं ना? हे डाव्या वारशाची व्याख्या करणे किंवा त्याचे अर्थ लावणे, यावर आपला मक्ता सांगणाऱ्या संघटनांना खीळ घालण्याची हीच वेळ आहे. काय म्हणता? आपला नम्र, -गामा पैलवान