प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : हरफनमौला, हरहुन्नरी, साक्षेपी, कलंदर फकीर
संकीर्ण - श्रद्धांजली
कॉ. विलास सोनवणे
  • प्रा. फकरुद्दीन बेन्नूर (२५ नोव्हेंबर १९३८ - १७ आॅगस्ट २०१८)
  • Mon , 17 September 2018
  • संकीर्ण श्रद्धांजली फकरुद्दीन बेन्नूर Fakruddin Bennur

मुस्लिम अभ्यासक प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचं १७ ऑगस्ट २०१८ रोजी सोलापुरात निधन झालं. मागच्या आठवड्यात झालेल्या त्यांच्या शोकसभेत त्यांचे प्रदीर्घ काळचे स्नेही कॉ. विलास सोनवणे यांनी केलेलं हे भाषण...

.............................................................................................................................................

१७ ऑगस्ट रात्री ८.३० वाजता सोलापूरहून इरफानभाईंचा फोन आला. त्यांनी सांगितलं – ‘बेन्नूर सर गेले’. नंतर हासिब नदाफ यांचा फोन आला. त्यानंतर फोन येतच राहिले. काही सांगण्यासाठी, काही चौकशीसाठी.

सरांच्या जाण्यानं ३४ वर्षांच्या मैत्रीचे एक पर्व संपलं. बेन्नूर सरांना पहिल्यांदा भेटलो सोलापूरमध्ये १९८४ साली. माझा मित्र प्रताप भोसलेच्या आग्रहावरून मी सोलापूरला गेलो होतो. सोबत तुळशी परब, शेखर सोनाळकर होते. तुळशीनेच माझी ओळख करून दिली- ‘हे बेन्नूर सर’. त्यानंतर भेटण्याचा सिलसिला सुरूच झाला. हे भेटणं मैत्रीत कधी बदललं ते आठवत नाही.

मी त्यावेळेला CPI (ML) च्या एका गटाच्या महाराष्ट्र कमिटीचा सेक्रेटरी होतो. आणि अनेक प्रश्न पडले होते. प्रमुख प्रश्न असा होता - जात आणि धर्माचे काय करायचं? सर मुस्लिम सत्यशोधकांचा भोज्या शिवून परत आले होते. कॉम्रेड शरद पाटलांची भूमिका त्या वेळेला आंबेडकरवादी होती. मुस्लिम ओबीसीचे अनुभव ऐकल्यानंतर त्यांनी भूमिका बदलली. आंबेडकरांची अस्मितादर्शी भूमिका दोघांनाही पटत नव्हती. १९८४ हे अत्यंत महत्त्वाचं साल आहे. इंदिरा गांधींची हत्या, शहाबानो केस, त्यावर काँग्रेसनं मारलेली उलटी उडी, बाबरी मशिदीचं टाळं उघडणं, जम्मूच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका इत्यादी. नक्षलवाद्यांना आणि संसदीय कम्युनिस्टांना कोणतेच प्रश्न सतावत नव्हते. त्यांचं उत्तर एकच होतं- वर्गसंघर्षातून सगळे प्रश्न सुटतील. 

आम्ही अस्वस्थ होतो. १९७५ पासून भारतामध्ये पक्षांच्या दावणीच्या बाहेर जाऊन स्त्रीवादी संघटना उभ्या राहत होत्या. आणि राजकीय विचारप्रणाली आणि अस्मिता म्हणून स्त्रीवाद आकाराला येत होता. ज्या पक्षात मी होतो तिथेही पडसाद उमटू लागले होते. मार्क्सवादाच्या ब्राह्मणी आकलनानुसार उत्तरं मिळत नव्हती. अपघात म्हणून आमचा जो नक्षलवादी गट होता, त्याच्या केंद्रीय समितीत एकही ब्राह्मण नव्हता. आणि सशस्त्र संघर्ष मासलाईन म्हणून कसा विकसित करायचा असे प्रश्न होते. 

बेन्नूर सर पठडीबद्ध मार्क्सवादी नव्हते. त्यांना मार्क्सवादाचं आकर्षण होतं, पण पठडीबद्ध नसल्यामुळे त्यांच्या संगतीनं नवं वारं आमच्याकडे आलं मंगळवार पेठेतील त्यांचं घर कधी आमचा अड्डा झालं हे कळलंच नाही. बेन्नूर सरांनी आणलेल्या नव्या वाऱ्यांमुळे आमच्यात घुसळण सुरू झाली. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

त्यातूनच जात धर्म आणि भाषा, भाषिक राष्ट्रवाद यांची चर्चा आमच्यात सुरू झाली. १९८६ साली आम्हाला अजीज नदाफ मिळाले. त्यानंतर मुस्लिम मराठी साहित्याची चर्चा सुरू झाली. त्या वेळेला बेन्नूर सर आणि नदाफ दोघांनाही उर्दू येत नव्हती. दोघंही घरी दखनी बोलायचे. त्यांच्यामुळे दखनीचा शोध सुरू झाला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटक येथील मुसलमान दखनीच बोलतो. १९८७ येता येता दखनी ही वेगळी भाषा आहे अशा निष्कर्षाला आम्ही पोहोचलो होतो. तेलंगणातील मुसलमान व्यवहाराची भाषा म्हणून घराच्या बाहेर तेलुगू बोलतो. उत्तर कर्नाटकातील मुसलमान कानडी बोलतो आणि महाराष्ट्रातील मुसलमान व्यवहाराची भाषा म्हणून मराठी बोलतो. मुस्लिम उच्चवर्णीयांच्या दबावामुळे सत्य कोणीच बोलत नव्हते. सोलापूर शहराची ३० टक्के लोकसंख्या कानडी आहे. ३० टक्के तेलगू आहे व उरलेली ४० टक्के मराठी आहे. सोलापूरच्या भाषिक रचनेचा बेन्नूर सरांच्या विचारांवर प्रभाव होता. त्यांचं मूळ गाव हुबळी होतं. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं ते सोलापूरला आले. त्यांचे वडील सोलापूरच्या सत्र न्यायालयात शिरस्तेदार होते व सुशीलकुमार शिंदे त्यांचे शिपाई होते. सुशीलकुमार शिंदे व बेन्नूर सर वडिलांच्या हाताखाली शिकले व पुढे सेक्शन रायटर म्हणून नोकरी केली. सुशीलकुमार शिंदे पुढे पीएसआय झाले, तर बेन्नूर सर डिफेन्स ऑडिटर म्हणून पुण्यात गोळीबार मैदानला आले. पुढे लातूरला प्राध्यापक झाले व १९६८ साली बेन्नूर सर प्राध्यापक म्हणून सोलापूरला संगमेश्वर कॉलेजात आले.

सोलापूरनं बेन्नूर सरांना घडवलं. सोलापूर कामगारांचं शहर आहे. पॅरिस कम्यूनसारखी सोलापूर कम्यूनची १९२९ साली सोलापूरला चळवळ झाली होती. सोलापूरच्या कामगारांनी चार दिवस कामगारांचं राज्य निर्माण केलं होतं. त्यांचा नेता होता कुरबान हुसेन! याची नोंद खुद्द स्टॅलिननं घेतली होती. या सगळ्यांचा परिणाम सोलापूरच्या जनमानसात होता. सोलापूरची भाषिक रचना, सोलापूरचं कामगारवर्गीय असणं. बेन्नूर सर त्याच्यातून सुटले नाहीत. कामगार वर्गीय एकजूट तोडण्यासाठी सोलापूरला वारंवार दंगे घडवले गेले. बेन्नूर सर जिथं राहत होते, ती मंगळवार पेठ दंग्यांचं केंद्र होती. दंगे लहानपणापासूनच पाहिल्यामुळे दंग्यांच्या मागचं राजकारण त्यांना माहिती होतं. जाणीवा जाग्या असलेला कुठलाही माणूस यापासून सुटला नाही. 

मी भेटलो त्या वेळेला बेन्नूर सरांची कुस व मूस अशी होती. १९८० नंतर सगळं वेगात बदललं. महाराष्ट्रातील सगळी टेक्सटाईल शहरं बदलायला लागली. भांडवलाच्या आणि तंज्ञत्रानाच्या बदललेल्या स्वरूपानं वेगाने बाजारी अर्थव्यवस्था आणली. राजीव गांधींनी एकविसाव्या शतकाचा नारा दिला आणि धर्म तोपर्यंत दुय्यम भूमिका करत होता, तो आता प्रमुख भूमिकेत आला. चळवळींच्या इव्हेंट झाल्या होत्या. धर्म जसजसा प्रमुख भूमिकेत आला, सगळे वर्गवादी अस्मितादर्शक झाले. 

धर्माचं काय करायचं, या प्रश्नाला भाषिक राजकारणानं उत्तर द्यायचं आम्ही ठरवलं. आर्थिक मुद्द्यांपेक्षा सांस्कृतिक मुद्दे प्रमुख झाले होते. त्यासाठी धर्माचा वापर होऊ लागला होता. बाबरी मस्जिद प्रकरण त्याचं उदाहरण होतं.

भांडवलशाहीनं ज्या अस्मितादर्शी पद्धतीनं धर्माचा वापर सुरू केला, त्यासाठी धर्माची अस्मिता ज्या पद्धतीनं विकसित केली ते नाकारणं एवढाच मुद्दा नव्हता. पर्यायही सांगायला पाहिजे होते. पर्याय गांधीजींनी भाषिक राष्ट्रवादाच्या मुद्द्यानं दिला होता.

खरं म्हणजे रशियन क्रांतीनं सोव्हिएत युनियनमधल्या सगळ्या भाषांना आणि बोलींना समान दर्जा दिला होता. भारतातल्या कम्युनिस्ट पक्षांनी साठ सालानंतर हा मुद्दा सोडूनच दिला. गांधीजी १९१९ साली भारतात आले. टिळकांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचं नेतृत्व गांधीजींकडे आल्यानंतर सगळ्या प्रादेशिक समित्यांची (काँग्रेसच्या) रचना भाषेच्या आधारावर गांधीजींनी केली आणि भारतातल्या भाषिक राष्ट्रवादाचा पाया घातला.

मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेमध्ये हीच भूमिका होती. त्याच्यामध्ये बेन्नूर सरांचा महत्त्वाची भूमिका होती. मी, बेन्नूर सर, नदाफ सर, इरफान सय्यद, डॉ. बशारत अहमद, प्राध्यापक शहाजिंदे, पनवेलचे कवी ए.के. शेख, डॉ. फातिमा मुजावर, डॉ. इक्बाल मिन्ने, कवी मुबारक शेख यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक पाऊल होतं.

मुस्लिमांचे प्रश्न म्हणून त्यावेळेला मुस्लिमांचं बहुपत्नीत्व, तलाक, शरीयत, खूप संतती हे प्रश्न मुस्लीम सत्यशोधक समाजानं पुढे आणले. त्याला पूरक हिंदुत्ववाद्यांचं राजकारण ‘हम पाँच हमारे पच्चीस’ असं होतं. चव बदलावी म्हणून प्रत्येक गावातल्या कब्रस्तानच्या भिंतींचा प्रश्न होता. या स्वरूपाच्या मांडणीमुळे मुस्लिम समाज अपराधभावामध्ये होता. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेनं त्यांना त्यांच्या अपराधभावामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचं एकमेव व्यासपीठ जे मुस्लिम समाजाला अपराधभावामधून बाहेर काढेल आणि भाषेच्या मुद्द्यावर इतर समाजाशी जोडेल, मुस्लिम मराठी साहित्य परिषदेनं दिलं. बेन्नूर सरांशिवाय हे झालं नसतं.

त्यांना विचारलं गेलं मुस्लिम साहित्य विद्रोही आहे का? त्यांचं उत्तर होतं- ‘सगळा मीडिया आणि मुस्लिमेतर साहित्यिक आम्हाला मराठीच मानत नाहीत. त्यावेळेला मराठीमध्ये अल्लाची प्रार्थना करणं हाच आमचा विद्रोह आहे.’ वरवर पाहता बेन्नूर सर निरीश्वरवादी होते. एका बाजूला निरीश्वरवाद आणि एका बाजूला अल्लाची प्रार्थना हे जोडलं गेलं. ते व्यक्ती म्हणून निरीश्वरवादी होते आणि समाज म्हणून मराठीमध्ये अल्लाची प्रार्थना करण्याचा आग्रह धरत होते.
मराठीतील स्वतःला विद्रोही समजणाऱ्या लोकांना प्रश्न पडले की, मुस्लिम मराठी साहित्याचा साचा काय विद्रोही आहे? दलित आहे? काय आहे? आणि अजूनही त्यांच्या प्रश्नाला त्यांना हवं ते आणि हवं तसं उत्तर मिळालेलं नाही.

मुस्लिम मराठी साहित्याची चळवळ सुरू झाल्यानंतर दुसरी चळवळ सुरू झाली, ती मुस्लिम ओबीसींची! त्यामध्येसुद्धा आम्ही तिघंच होतो. मुस्लिम ओबीसी चळवळीनं धर्माचं एकजिनसी स्वरूप नाकारलं. आणि जातीला उत्पादनाची व्यवस्था मानली. तुम्ही हिंदू असलात तर सवर्णांना गांधीजींनी जो अपराधभाव दिला, त्याच्यामध्ये जाता. पण इस्लाम एकेश्वरवादी द्वैतवादी धर्म आहे. समतेची पताका घेऊन जाणारा आहे. इस्लाम माणसामाणसांमध्ये कुठलाही भेद मानत नाही. चौदाशे वर्षांपासून इस्लामचं भारतात अस्तित्व आहे. मग मुसलमानांमध्ये जाती कशा असा प्रश्न पडण्याची शक्यता असते. हिंदू म्हणून ती शक्यता धूसर होते. 

मी आणि बेन्नूर सरांनी हाच मुद्दा केंद्रभागी केला. १९९३-१९९७ च्या काळात महाराष्ट्रामध्ये मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नावर चार हजार सभा झाल्या. ज्या गावात मशीद आहे, त्यातलं एकही गाव आम्ही सोडलं नव्हतं. बेन्नूर सर, नदाफ सर नोकरी करत होते. सगळ्या सुट्ट्यांच्या दिवसात ते हजेरी लावत असत. देशातील एकमेव चळवळ त्या वेळेला होती. आता तिचा विस्तार झाला आहे. बिहार, युपी, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात सगळीकडे ही चळवळ पसरली आहे. त्याच्यामध्ये बेन्नूर सरांचा मोलाचा वाटा आहे. 

२००० सालानंतर बेन्नूर सरांनी संशोधनाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. त्या काळात कँरेन आर्मस्ट्राँग ही ख्रिश्चन बाई इस्लामिक इतिहास, सर्व धर्मांचा इतिहास ही पुस्तकं लिहीत होती. त्याच्यामध्ये बायबलचा इतिहास, जेरुसलेमचा इतिहास इत्यादी विषय तिनं हाताळले होते. आम्ही दोघंही तिच्या या संशोधनाच्या प्रेमात होतो. भारतातल्या इस्लामचा इतिहास आणि मुसलमानांचा इतिहास याच्यावर काहीही संशोधन झालेलं नव्हतं. बेन्नूर सरांनी या विषयावर संशोधन करायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी तेच केलं. १९९४ सालापर्यंत त्यांनी एकही पुस्तक लिहिलं नव्हतं. पण १९९४ साली त्यांना पुण्याच्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं. अध्यक्ष होण्याची एक अट होती की, अध्यक्षांचं एक तरी पुस्तक प्रकाशित झालेलं असलं पाहिजे. त्यासाठी मुस्लिम मानसिकतेचा शोध घेणारं एक पुस्तक त्यांनी लिहिलं. २०१०पासून आतापर्यंत गेल्या अठरा वर्षांत त्यांची कितीतरी पुस्तकं आली. भारतातल्या मुसलमानांवर कुठला प्रभाव आहे, याची चिकित्सा या सर्व पुस्तकांत येते.

असा हा हरफनमौला, हरहुन्नरी, साक्षेपी, कलंदर फकीर आपण गमावला आहे. ही महाराष्ट्राची भरून न येणारी झीज आहे.

खरं म्हणजे ३४ वर्षांच्या या मैत्रीच्या इतिहासावर मी दिवसेंदिवस बोलू शकतो. पण सभेची मर्यादा लक्षात घेता मी इथेच थांबतो.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......