‘शब्द लीला’ : डॉ. धर्मवीर भारतींच्या साहित्यावरील अनोखा नाट्यप्रयोग
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘शब्द लीला’ या नाट्यप्रयोगाचं एक पोस्टर
  • Mon , 17 September 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe शब्द लीला SHABD - LEELA के. के. रैना K. K. Raina रराजेश्वरी सचदेव Rajeshwari Sachdev वरुण बडोला Varun Badola इला अरुण Ila Arun

डॉ. धर्मवीर भारती (१९२६-१९९७) हे आधुनिक हिंदी साहित्य व पत्रकारितेतील एक खणखणीत नाणं आहे. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह, कवितासंग्रह आहेत. त्यांच्या ‘सुरज का सातवाँ घोडा’ या कादंबरीवर श्याम बेनेगल यांनी १९९२ साली हिंदी चित्रपट केला होता. त्यांचं ‘अंधायुग’ हे महाभारतावर आधारित नाटक खूप गाजलं होतं. ते १९६० सालापासून १९९७ पर्यंत म्हणजे मृत्युनं त्यांना गाठेपर्यंत ‘टार्इम्स ऑफ इंडिया’तर्फे प्रकाशित होत असलेल्या ‘साप्ताहिक धर्मयुग’चे संपादक होते. त्या काळी हिंदी भाषिकांच्या जगतात ‘साप्ताहिक धर्मयुग’चं स्थान अनन्यसाधारण होतं. १९५४ साली त्यांचा पहिला विवाह कांता भारतींशी झाला होता. त्याच वर्षी त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर ते १९६० साली मुंबर्इला आले आणि ‘धर्मयुग साप्ताहिका’चे संपादक झाले. त्यांचा पहिला विवाह मोडल्यानंतर त्यानंतर त्यांनी पुष्पा भारतीशी दुसरा विवाह केला. त्यांनी वेळोवेळी पुष्पा भारतींना पत्रं लिहिली. ती ‘एक साहित्यिक के प्रेमपत्र’ या पुस्तकात उपलब्ध आहेत.

इला अरुण यांनी धर्मवीर भारती यांच्या ‘कनुप्रिया’, ‘अंधायुग’ व ‘एक साहित्यिक के प्रेमपत्र’ या तीन पुस्तकांतील काही भाग निवडून ‘शब्द लीला’ नावाचा अनोखा नाट्यप्रयोग हिंदी भाषेत सिद्ध केला आहे. अलिकडेच या दोन अंकी नाटकाचे प्रयोग मुंबर्इत झाले. यात धर्मवीर भारती व त्यांची पत्नी पुष्पा भारती यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांचं वाचन आहे, ‘अंधायुग’मधील काही प्रसंगांचं सादरीकरण आहे. यात इला अरुण सूत्रधाराची भूमिका करतात, वरुण बडोला हे धर्मवीर भारतीच्या भूमिकेत आहेत, तर राजश्री सचदेव पुष्पा भारतीच्या भूमिकेत आहेत. नाटकाच्या दुसऱ्या अंकात इला अरुण गांधारीच्या, तर राजेश्री सचदेव राधेच्या भूमिकेत भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतात. या नाटकाचं दिग्दर्शन के. के. रैना यांचं आहे. ते नाटकात एक-दोन छोट्या भूमिकांतही दिसतात.

‘शब्द लीला’च्या सुरुवातीला सूत्रधार इला अरुण धर्मवीर भारती, त्यांची पहिली पत्नी कांता भारती व दुसरी पत्नी पुष्पा भारती यांच्या जगावेगळ्या नात्याबद्दल सांगतात. इला अरुण कधी कधी धर्मवीर भारतींच्या पत्नीची भूमिका करतात. या नाटकाच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वच पात्रांना हिंदी भाषेचं उत्तम ज्ञान असलं पाहिजे. दिग्दर्शक रैना यांनी निवडलेले रंगकर्मी या महत्त्वाच्या कसोटीवर उतरतात.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

इला अरुण यांनी निवडलेल्या पत्रांतून प्रेक्षकांना पुष्पा व धर्मवीर भारती यांच्यातील प्रेमाचा, तरल नात्याचा अंदाज येतो. एखादे प्रियकर-प्रेयसी कसे वर्षानुवर्षं एकमेकांच्या प्रेमात असू शकतात, कसे त्यांच्या प्रेमाचे वेगवेगळे रंग समोर येतात आणि कसे ते एकमेकांच्या सहवासात वाढत जातात, हा प्रवास फार छान रंगवला आहे.

पहिल्या अंकातला एक प्रसंग फार हृदयस्पर्शी आहे. तरुण धर्मवीर विवाहित असूनही पुष्पाच्या प्रेमात पडतो. त्याला कळत नाही की, आता काय निर्णय घ्यावा. म्हणून तो त्याच्या गुरूंचं मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या गावी जातो. तिथं गेल्यावर सर्व प्रामाणिकपणे सांगतो. गुरू काहीही बोलत नाहीत. धर्मवीर बुचकळ्यात पडतो. दुसऱ्या दिवशी त्याला अलाहाबादला जायचं असतं. तो गुरूंना स्पष्टपणे सल्ला विचारतो. गुरू त्याला दोन अगदी सारख्या साड्या देतात व सूचित करतात की दोघींवर प्रेम कर.

दुसऱ्या अंकाचा बाज मात्र एकदम वेगळा आहे. यात ‘अंधायुग’ नाटकातील निवडक भागाचं सादरीकरण आहे. हे नाटक धर्मवीर भारतींनी १९५४ साली लिहिलं आहे. तेव्हा आपल्या देशात, खासकरून उत्तर भारतात फाळणीच्या जखमा ताज्या होत्या. धर्मवीर भारतींना दिसलं की जर भारत व पाकिस्तान अमानुष हिंसाचार, परस्परांबद्दल टोकाचा द्वेष वगैरे भावनांचा आधार घेऊन जगले तर दोन्ही बाजूंना याचा फक्त त्रासच होर्इल. त्यांना महाभारतातील शेवटचं महायुद्ध आठवलं, ज्यात अमानुष हिंसाचार झाला होता. या युद्धात कौरव हरलेच, पण जिंकलेले पांडवसुद्धा एका प्रकारे हरले होते. म्हणून धर्मवीर भारतींनी महाभारताच्या शेवटच्या दिवसांवर नाटक लिहिलं, ज्यात अश्वत्थामाचा हिंसाचार, गांधारीचा राग वगैरे प्रसंग घेतले होते. पं. सत्यदेव दुबेंनी हे नाटक १९६२ साली सादर केलं होतं. हे नाटक एवढं महत्त्वाचं ठरलं की, यानंतर हिंदी रंगभूमीनं कात टाकली, असं अभ्यासकांचं मत आहे. आजही देशात कोठे ना कोठे या नाटकाचे प्रयोग होत असतात.

‘शब्द लीला’च्या पूर्वाधात ‘कनुप्रिया’ व ‘एक साहित्यिक के प्रेमपत्र’सारख्या तरल साहित्यातून निवडलेले प्रसंग व दुसऱ्या अंकात महाभारतातील शेवटच्या दिवसांवर आधारित ‘अंधायुग’मधील निवडक प्रसंग, यांच्यात एक प्रकारचं आंतरिक नातं दिसतं. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ‘कनुप्रिया’ हे काव्य जेव्हा रसिकांसमोर आलं, तेव्हा हिंदी साहित्यविश्वात खळबळ माजली होती. यात धर्मवीर भारतींनी राधा-कृष्णाच्या अजरामर प्रेमाचा वेगळा अर्थ लावला होता आणि सर्व काव्य राधेच्या दृष्टिकोनातून लिहिलं होतं. ते १९५६ साली पुस्तकरूपानं रसिकांसमोर  आलं. आजवर त्याच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

या नाटकाच्या परिणामाचा विचार केला तर पहिल्या अंकातील ‘कनुप्रिया’ व ‘एक साहित्यिक के प्रेमपत्र’वर आधारित नाट्यपूर्ण प्रसंगांपेक्षा दुसऱ्या अंकातील ‘अंधायुग’मधील प्रसंग जास्त परिणाम साधतात. याचं साधं कारण म्हणजे ‘महाभारत’ ही जागतिक दर्जाची साहित्यकृती आहे. त्याबद्दल आजही जगभर कुठे ना कुठे चर्चा सुरू असते. त्यावर आधारित नवनवीन नाट्यरूपांतरं सादर होत असतात. त्यातही धर्मवीर भारतींनी त्यातील निवडलेले शेवटच्या दिवसांतील प्रसंग तर चटका लावणारे आहेत. गांधारीचे शंभर पुत्र मारले गेले, याबद्दल ती कृष्णाला दोषी मानते व शाप देते. तसंच सुडाचं बेभान झालेला अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडतो, ज्याचं लक्ष्य गर्भवती उत्तरा असतं. ही सर्व कथाच विलक्षण विचारगर्भ आणि थरारक आहे. यात प्रचंड नाट्य आहे. असं मटेरिअल जेव्हा इला अरुण यांच्या हातात येतं, तेव्हा त्यांची नाट्यसंस्था त्याचं सोनं करेल, यात शंका नाही.

या अनोख्या प्रयोगाचं दिग्दर्शन के. के. रैना यांनी फार समजुतीनं केलं आहे. नाटकाचा पूर्वार्ध भावपूर्ण तर सूडाच्या उत्तरार्ध भावनेनं पिसाटलेला, यात तोल सांभाळणं तसं सोपं नव्हतं. रैना यांनी उत्तम नटांच्या मदतीनं दृष्ट लागेल असा प्रयोग सादर केला आहे. या नाटकात छोटी-मोठी इतर पात्रं असली तर खरा भार वाहिला आहे इला अरुण, राजेश्री सचदेव, वरुण बडोला व के. के. रैना यांनीच. इला अरुण यांनी सादर केलेला गांधारीचा विलाप काळजाला चरे पाडून जातो.

अशा नाटकात पार्श्वसंगीत महत्त्वाचं असतं. ही जबाबदारी धृव घाणेकर यांनी सांभाळली आहे. तरल प्रसंगात त्यांनी सादर केलेलं पार्श्वसंगीत मनावर मोरपिस फिरवतं. प्रकाशयोजना व नेपथ्य सलिम अख्तरचं आहे. पहिल्या अंकात पत्रवाचनावर भर असल्यामुळे अख्तरनं रंगमंचाच्या तीन भागात तीन ठोकळे ठेवले आहेत. त्यावर बसून पत्रांचं वाचन होतं.

‘शब्द लीला’सारखे प्रयोग पारंपरिक नाटकं बघण्याची सवय असलेल्यांना कदाचित रूचणार नाहीत, पण प्रायोगिक नाटकं बघण्याची सवय असलेल्या रसिकांसाठी ‘शब्द लीला’ एक प्रकारची पर्वणीच आहे. 

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख