अजूनकाही
१. हिंदूंच्या लग्नसराईआधी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूविरोधी आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे २०० ते ३०० रुपये कमावणाऱ्या आणि सरकारी योजनांवर अवलंबून असलेल्या लोकांना फटका बसतो आहे. यामुळे श्रीमंतांना कोणताही त्रास झालेला नाही. तथाकथित हिंदुत्ववादी पक्ष असणाऱ्या भाजपचे नेते आता इस्लामिक बँकिंगला प्रोत्साहन देत आहेत. या निर्णयामुळे त्यांच्या सत्ताकाळाच्या शेवटाला प्रारंभ झाला आहे. : हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे
ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सरकार 'आपलंच' आहे. आपल्याकडे ना वर्षाचे बारा महिने काही ना काही सण-समारंभ साजरेच होत असतात; कधीही नोटाबंदी जाहीर केली असती, तरी तुम्ही हीच तक्रार केली असती? शिवाय, सरकार कोणत्याही प्रकारच्या बँकिंगला प्रोत्साहन देतंय, ही तुमची गैरसमजूत कशामुळे झाली? लोकांचा बँकिंगवरचा विश्वास उडावा आणि त्यांनी जास्तीत जास्त कॅश घरी नेऊन ठेवावी, यासाठी सगळी यंत्रणा राबते आहे, हे तुम्हाला दिसतच नाही काय?
………………………..
२. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता नसबंदी करण्याची गरज आहे. देशाची लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी नसबंदी आवश्यक आहे : वादग्रस्त वाचाळवीर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह
आपल्याच भक्तांची पंचाईत करण्यात ही माणसं पारंगत आहेत… तिकडे थोरले मिशीवाले काका सांगतात, देशकार्यासाठी जास्तीत जास्त पिलावळ जन्माला घाला, त्या महन्मंगल कार्यासाठी सज्ज झालेले असताना हे काका थेट नसबंदीची भाषा करून सगळा जोश लोळागोळा करून टाकतायत… भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी, भलत्या अवस्थेत तिष्ठलेल्या भक्तांनी आता नेमकं करायचं तरी काय?
………………………..
३. २००८पासून सलग चार वेळा सर्वोच्च पदावर असलेले न्यूझीलंडचे अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान जॉन की यांचा राजीनामा; राजकारणाच्या धबडग्यात पत्नीला वेळ देता येत नसल्यामुळे चौथी टर्म पूर्ण करणार नसल्याची घोषणा.
देशासाठी, समाजासाठी काही करण्याची सच्ची तळमळ असती, तर घरदार, कुटुंब, पत्नी, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा त्याग करून ते कधीच कायमचे घराबाहेर पडले असते; अशा उदात्त त्यागाच्या अभावामुळेच हे देश आपल्या तुलनेत मागास राहिलेले आहेत… काय म्हणता? बराच प्रगत आहे हा देश? अहो, पण, ते भौतिक बाबतीत! आध्यात्मिक, आत्मिक वगैरे बाबतीत (कोणी हिंग लावून विचारत नसलं तरी) आपणच जगद्गुरू!
………………………..
४. नोटाबंदी आणि रिअल इस्टेटच्या बाजारातली मंदी यामुळे दोन बिल्डरांनी आपल्याच उच्चभ्रू, आलिशान, महागड्या प्रकल्पामध्ये ११९ कोटी रुपयांचे चार आलिशान फ्लॅट खरेदी केले…
ही परिस्थिती कायम राहिली, तर उरलेले फ्लॅटही त्यांना एकमेकांतच खरेदी करावे लागतील… थोडा बदल हवा असेल, तर एका बिल्डरने दुसऱ्याचे फ्लॅट खरेदी करायचे, दुसऱ्याने तिसऱ्याचे खरेदी करायचे, असा आपापसात टाइमपासचा खेळही खेळता येईल काही काळ! पैसाही रोलिंगमध्ये राहील. बघा, जमतंय का!
………………………..
५. दिवंगत भारतरत्न उस्ताद बिस्मिला खान यांच्या पाच सनया घरातून चोरीला गेल्या
या चोरांनी आता काही डिंडिम, नगारे, पिचक्या पिपाण्या, ढोलताशे, तुणतुणी, डबल ढोलक्या यांच्याकडेही वक्रदृष्टी वळवली, तर देशातला मतामतांचा गल्बला थांबून थोडी शांतता प्रस्थापित होईल.
………………………..
६. फिडेल कॅस्ट्रो यांच्याच इच्छेनुसार व्यक्तीचे माहात्म्य वा स्तोम माजू नये यासाठी त्यांचे नाव कोठेही वापरणार नाही, असं त्यांचे बंधू आणि देशाचे नेते राऊल कॅस्ट्रो यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या मृत्यूनंतर आपलं नाव किंवा प्रतिमा संस्था, रस्ते, बागा किंवा सार्वजनिक ठिकाणांसाठी कधीही वापरू नयेत, तसंच अर्धपुतळे, पुतळे किंवा इतर कोणत्याही स्वरूपातलं स्मारक उभारलं जाऊ नये, असं फिडेल यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं.
या एका गोष्टीसाठी फिडेल कम्युनिस्ट विचारधारा किंवा त्याचं क्रांतिकारकत्व मान्य नसलेल्यांकडून आणि त्याला क्रूर हुकूमशहा मानणाऱ्यांकडूनही एक कडक लाल सलाम वसूल करून गेला!
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nilesh Sindamkar
Tue , 06 December 2016
वाह, नेहमी प्रमाणेच आज ही मस्त चिमटे काढले... !! स्तंभ लेखकाला मानाचा मुजरा... !!!
Nilesh Sindamkar
Tue , 06 December 2016
वाह, नेहमी प्रमाणेच आज ही मस्त चिमटे काढले... !! स्तंभ लेखकाला मानाचा मुजरा... !!!