जगातले प्रमुख धर्म तिरस्कार, संघर्ष आणि युद्ध यांविषयी काय म्हणतात?
पडघम - सांस्कृतिक
ओ. पी. घई
  • ओ. पी. घई यांच्या मूळ इंग्रजी व त्याच्या मराठी अनुवादित पुस्तकांची मुखपृष्ठे. दोन्हींमधील चित्र प्रातिनिधिक आहे.
  • Fri , 14 September 2018
  • पडघम सांस्कृतिक ओ. पी. घई O. P. Ghai युनिटी इन डायव्हर्सिटी Unity in Diversity

ओ.पी. घई हे विविध धर्मांचे गाढे अभ्यासक. ते दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल डेव्हलमेंट या संस्थेचे संचालकही होते. त्यांचे ‘Unity in Diversity’ हे इंग्रजी पुस्तक १९८६ साली प्रकाशित झाले. पुढच्याच वर्षी (१९८७) त्याचा ‘विविधतेतून एकता’ या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित झाला. प्रा. शिरीष चिंधडे यांनी हा अनुवाद केला असून तो दास्ताने रामचंद्र आणि कंपनी, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. जवळपास ११० पाने असलेल्या या छोट्याशा पण महत्त्वाच्या पुस्तकाचे महत्त्व कालातीत आहे.

घई यांनी जवळपास ५० वर्षे विविध धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. त्यातून हे पुस्तक साकारले आहे. या पुस्तकामागची कल्पना सांगताना त्यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे – “…हे लहानसे संकलन प्रसिद्ध करण्यासाठी नेमकी हीच वेळ निवडण्यामागे आज जगात प्रचंड वाढत चाललेली धार्मिक असहिष्णुता हे कारण आहे.” गेल्या पंचवीस-तीस वर्षांत आणि विशेषत: गेल्या चार वर्षांत देशात आणि देशाबाहेरही धार्मिक असहिष्णुता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ही घईप्रस्तुत झलक.

.............................................................................................................................................

तिरस्कार

बौद्ध धर्म

तिरस्कार मानवाचा विनाश करतो. तिरस्काराच्या आहारी जाणारा स्वत:ला आत्मसंयमी म्हणवू शकत नाही.

ख्रिस्ती धर्म

द्वेषाचे नव्हे तर प्रेमाचे साम्राज्य हवे. एखाद्याच्या मनात तिरस्कार असलाच तर धर्मकृत्ये करण्यापूर्वी तो काढून टाकला पाहिजे. तिरस्कार करणे म्हणजे खुनी असणे होय.

कन्फ्यूशयसचा धर्म

कठोरपणे बोलणारे तिरस्कारबुद्धी जागृत करतात. स्वत:कडून भरपूर अपेक्षा ठेवावी, इतरांकडून नव्हे. असे केल्यानेच तिरस्कार टाळता येईल.

हिंदू धर्म

तिरस्काराने संमोहन निर्माण होतो. हृदय तिरस्कारापासून मुक्त असेल तरच शुद्ध विचार आणि सुजाण कृती संभवते.

इस्लाम

अबू अय्यूब अल् अन्सारी याने ईश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे सांगितलेला आहे – “तीन दिवसांपेक्षा जास्त काळ स्वबंधूपासून विनासंपर्क राहणे आणि भेट झाल्यास काणाडोळा करणे मंजूर होण्यासारखे नाही. अशा दोघांपैकी प्रथम अभिवादन करतो तो चांगला.”

जैन धर्म

तिरस्कार आत्म्याला पायदळी तुडवून अपवित्र बनवतो. चित्तशुद्धी प्राप्त करून घेण्यासाठी वाटेल ती किंमत मोजून तिरस्कार टाळावयास हवा.

ज्यू धर्म

बांधवाचा तिरस्कार हा प्रमाद आहे. तिरस्कारातून संघर्ष निर्माण होतो आणि संघर्षामुळे मनुष्यहानी घडते. केवळ मूर्ख माणसेच तिरस्काराला थारा देतात.

ताओ धर्म

तिरस्काराच्या बदल्यात प्रेम द्या. ज्ञानी पुरुष तिरस्कार न करता सत्कर्म करायचा प्रयत्न करतो. तो वितंडवादात पडत नाही. त्यामुळे कोणी त्याचा प्रतिवाद करण्याचा किंवा तिरस्कार करण्याचा प्रश्नच उदभवत नाही.

शीख धर्म

ईश्वराचे छायीच ज्याचे चित्त विलीन झालेले आहे अशी व्यक्ती कोणाचाही मत्सर करीत नाही.

...................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...................................................................................................................................................................

संघर्ष\युद्ध

बौद्ध धर्म

हेतुत: कोणत्याही प्राणीमात्राची केलेली हत्या मनुष्यास रौरवात टाकते. युद्ध हा मानवाचा आदर्श नसून शांती हे उद्दिष्ट आहे. आणि सर्व धर्मनिष्ठांनी तेच प्राप्त करावयास हवे.

ख्रिस्ती धर्म

शांतीदूतांना ईश्वरी कृपा लाभते, युद्धपिपासू व्यक्तींना नव्हे. जे तलवार उचलतील ते स्वत:च तलवारीचे बळी ठरतील. युद्ध हा विनाशाचा मार्ग आहे आणि शांती हा वैभवाचा, सुखाचा मार्ग होय.

कन्फ्यूशयसचा धर्म

युद्ध नव्हे, तर शांतता नांदावी ही ईश्वराची इच्छा आहे. प्रत्येकाने आपल्या बांधवांसह शांततेने राहिले पाहिजे. बळाने नमविलेल्या माणसाच्या हृदयात बंड असते; परंतु प्रेमाने जिंकलेला सदैव एकनिष्ठ असतो.

हिंदू धर्म

कोणत्याही प्राणीमात्राची हत्या अनुचित होय. सुज्ञ मनुष्य नेहमी संघर्ष टाळून शांततेने राहतो. पार्थिव जीवनाचा आदर्श युद्ध नसून शांतता हा आहे. युद्धाने आपली शक्ती वाढविण्याचा प्रयत्न कोणी करू नये.

इस्लाम धर्म

सर्वांनी शांततेचा शोध घ्यावा. युद्ध भडकलेच तर धर्माचरणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील. शांती ही ईश्वराची आज्ञा आहे आणि साऱ्या जगाचीच स्थिरता धोक्यात न आणता कोणीच युद्ध करू शकणार नाही.

जैन धर्म

कोणत्याही प्राणीमात्राची कोणत्याही कारणासाठी कदापि हत्या करू नका. पडेल ते मोल देऊन सुज्ञ माणसे सर्वांसह शांततेने राहतात. युद्ध हे पूर्णपणे निषद्ध होय.

ज्यू धर्म

केवळ मूर्खच युद्धाचा मार्ग पत्करतात. सुज्ञ लोक शांततेचा शोध घेतात. शांतीप्रिय आणि निर्बल यांनाच पृथ्वीच्या साम्राज्याचा वारसा प्राप्त होईल. ईश्वर राष्ट्रांचा न्याय करील, तेव्हा युद्धाचा काहीच उपयोग होणार नाही.

ताओ धर्म

युद्धानंतर येणारा काळ नेहमीच यातनामय असतो. चांगला राज्यकर्ता असतो तो राष्ट्रावर युद्धाची पाळी येऊ देत नाही. शस्त्र हे शापित असून दु:खमय आहे.

शीख धर्म

युद्ध समाप्तीचे सर्व मार्ग खुंटले आणि शहाणपणाचा शब्द निरुपयोगी ठरला की, तलवारीचे पाते तळपू देणे हेच योग्य ठरते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाचा मराठी अनुवाद आता बाजारात उपलब्ध नाही. तो ग्रंथालयात मिळू शकेल. मूळ इंग्रजी पुस्तक पुढील लिंकवरून ऑनलाईन खरेदी करता येईल -

https://www.amazon.in/Sterling-Book-Unity-Diversity-Religions/dp/8120737393/ref=tmm_pap_swatch_0?_encoding=UTF8&qid=&sr=

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Alka Gadgil

Fri , 14 September 2018

गीते त काय सांगितलेय बरे, अर्जुना बाण मार


Ram Jagtap

Fri , 14 September 2018

@ Ashok Rajwade - दुरुस्ती केली. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!


Ashok Rajwade

Fri , 14 September 2018

संदर्भ: इस्लाम अबू अय्यूब अल् अन्सारी याने ईश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे सांगितलेला आहे – “तीन दिवसांपेक्षा जास्त काळ स्वबंधूपासून विनासंपर्क राहणे आणि भेट झाल्यास कानाडोळा करणे मंजूर होण्यासारखे नाही. अशा दोघांपैकी प्रथम अभिवादन करतो तो चांगला.” यात 'कानाडोळा' असा शब्द वापरला आहे. पण तो 'काणाडोळा' असा असायला हवा असं वाटतं. -अशोक राजवाडे


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......