अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात श्रीगणपती-उत्सव साजरा केला जातो. भाविक दरवर्षी गणेश-चतुर्थीला आपापल्या घरी वा सार्वजनिक ठिकाणी आपणास भावलेल्या मंगलमूर्तीची स्थापना करतात, आरत्यादी म्हणत तिची पूजाअर्चा करतात व अनंत-चतुर्दशीला तिचे विसर्जन करतात.
कार्यारंभीं गणपतीला वंदन करणे वा त्याचे मनोमन स्मरण करणे म्हणजे ‘गणेश मंगल’ होय. संतांनी ते केले आहे. उदा. श्रीज्ञानेश्वर व श्रीएकनाथ यांनी अनुक्रमे ‘ज्ञानेश्वरी’ व ‘भागवत’ या ग्रंथारंभी आत्मरूप गणेशाचा नमनपूर्वक जयजयकार केला आहे.
त्रिपुरासुराशी झालेल्या युद्धारंभी श्रीशंकरांना श्रीगणपतीने आपल्या सहस्त्रनामांचा उपदेश केला. त्या नामांचा अर्थ मनीं बाळगत त्याच्या रूपाचे ध्यान करणे हे आपले अपेक्षित कर्तव्य होय. परिणामी, आपल्या शरिरातील मूलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता असलेल्रा गणपतीचे दर्शन होते, अंतर्निष्ठ भक्तीचा शुभारंभ होतो आणि शेवटी मेंदूच्या पोकळीत असलेल्या सहस्त्रदलकमलातील चिदाकाशस्वरूप महागणपतीशी एकरूप होऊन जीव भक्तीची परिसीमा गाठतो.
श्रीमहागणपतीच्या स्वरूपाचे आकलन व्हावे, ते ध्यानीं, मनीं, हृदयीं ठसावे म्हणून ऋषीमुनींनी व संत श्रीएकनाथांनी काही नामांचे सकलार्थ सांगून ठेवले आहेत. ते समजून घेताना आपल्या अंत:करणातील भक्तिभावना उत्कट होत जाते. पण “जाहलिया पूजाविसर्जन । विसर्जू नये अनुसंधान । अखंड हरिचे स्मरण । सर्वस्वें आपण सदा कीजे ॥” या ओवीत (१) अपेक्षिल्याप्रमाणे श्रीमहागणपतीच्या स्व-रूपाचे अखंड स्मरण ठेवावयाचे असते. म्हणून श्रीगणपतीच्या १) गणपती / गणेश, २) लंबोदर, ३) मूषकवाहन, ४) विघ्नहर किंवा दु:खहर्ता, ५) सुखकर्ता आणि ६) गजानन या नामांच्या अर्थाधारे श्रीमहागणपतीचे स्व-रूप समजून घेऊयात.
१. गणपती किंवा गणेश
सर्व गणांचा पती तो गणपती व सर्व गणांचा ईश (अधीश = स्वामी = निरामक) तो गणेश होय. गण म्हणजे एखाद्या गुणप्रभावाने वैशिष्ट्य वा वेगळेपण प्राप्त झालेला जीवसमूह होय. जीवांचे अनेक प्रकार (जाती) आहेत. उदा. मनुष्य, देव, राक्षस, पशु, पक्षी, कीटक, जंतु इत्यादी जीवसमूह ज्यात आहेत ते हे ‘सर्व जगत् गणपतीपासून निर्माण होते व शेवटी गणपतीतच लय पावते.... ब्रह्मा, विष्णु, महेश, अग्नी, वायु, सूर्य, चंद्र, पृथ्वी, जल, आकाशादी सर्व काही तोच आहे,’ असे ‘श्रीगणपति-अथर्वशीर्षात’ म्हटले आहे.
अनेक सृष्टीतील अनेक जीवसमूहांचा मालक (शास्ता) म्हणजे गणपती होय. गणपती या नामाचा अर्थ अंशत: स्पष्ट करणारी आणखीही काही नामे ‘श्रीगणेशसहस्रनामावली’त आहेत. महागणपती, (महा गणांचा पती), चराचरपती:, गणाध्यक्ष: (शरीरातील छत्तीस तत्त्वरूप गणसमुदायांचा पालक), गणनाथ (गणसमूहाचा रक्षक), गणेश्वर (पंचभूतादी गणांचा ईश्वर), गणाधिप: (आदित्य इत्यादी गणदेवतांचा अधिपती म्हणजे ईश्वर), मनुष्या: (मनुष्यगणसमूदायरूप), पशव: (पशुगणसमुदायरूप), खगा: (पक्षिगणसमुदायरूप), गणनायक (काव्यपद्यातील म य व स वगैरे गणांचा अधिपती), गणप: (अध्वर्यू आणि होता आदी गणांचा मालक), विश्वेश्वर प्रभु:, देवदेव, देवत्राता, सर्वदेवात्मा इत्यादी.
‘परमात्मारूपी अपार सागरावर ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, गणपती, सूर्य, चंद्र, वरुण, यम, देवी, कुबेर इत्यादी ज्या मोठमोठ्या देवता आहेत त्या जणूकाय मोठ्या लाटा असून मनुष्यादी जीव या लहान लाटा आहेत’, असे ‘विचारसागररहस्र’नामक ग्रंथारंभी म्हटले आहे. या वर्णनातील गणपती देवता ही परमात्मारूपी श्रीमहागणपतीचे एक रूप आहे. यावरून गणपती अंतर्यामी, सर्वव्यापी, सर्वातीत, सर्वज्ञ व सर्वशक्तिमान असल्याची निश्चिती होते.
तिन्ही लोक ज्यापासून निर्माण झाले त्या या देवांच्या देवाला मात्र कोणी म्हणजे बहुसंख्य लोक ओळखत नाहीत, या विधानातून श्रीमहागणपतीचे स्वरूप समजून घेण्याची सूचनाच जणू श्रीरामदासस्वामींनी केलेली आहे.(२)
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
२. लंबोदर
श्रीगणपतीच्या लंबोदर या नामाचा अर्थ श्रीएकनाथांनी स्पष्ट केला आहे. ‘भागवतारंभी’ श्रीगणपतीला उद्देशून ते म्हणतात, “तुजमाजी वासु चराचरा । म्हणोनि म्हणिजे लंबोदरा । यालागी सकळांचा सोयरा । साचोकारा तू होसि ॥”(४) चराचर विेश तुझ्यामध्ये वसले आहे म्हणून तुला लंबोदर म्हणतात व यामुळेच तू खऱ्या अर्थाने सर्वांचा सोयरा आहेस, असा या ओवीचा सरळ अर्थ आहे. गणपतीच्या सर्वव्यापक, अतिविस्तीर्ण स्वरूपाच्या तुलनेत चराचर विश्व अगदीच छोटे आहे. जंगम व स्थावर विश्व त्याच्या पोटात मावले आहे. म्हणूनच जसे काय त्याचे उदर लंब म्हणजे मोठे झाले आहे. या वर्णनाशी ‘ज्ञानेश्वरी’त असलेले श्रीकृष्णाच्या स्वरूपाचे वर्णन मिळतेजुळते आहे. त्यामुळेही श्रीगणपतीच्या ‘लंबोदर’ या नामाचा परम अर्थ समजण्यास मदत होते : श्रीकृष्णाने लहानपणी ‘मी माती खाल्ली नाही’ असे म्हणत आपले तोंड उघडून यशोदामातेला त्यात चौदाही भुवने विस्तारासह दाखविली होती,(५) हे श्रीकृष्ण-परमात्म्याच्या विश्वरूपाचे दर्शन होत असताना अर्जुनास आठवते. श्रीकृष्णाच्या विश्वरूपात सर्व देवगणांसह स्वर्ग, महाभूतांची पंचके, प्राण्यांचे समुदार, ब्रह्मदेवाचा सत्यलोक असल्याचे तसेच कैलास आणि पार्वतीसह श्रीशंकर व सप्त पाताळेदेखील त्याच्या शरिराच्या एका भागावर असल्याचेही अर्जुनाला दिसून येते.(६) श्रीकृष्णाप्रमाणे श्रीमहागणपतीच्या दक्षिणभागात उमा व महेश्वर (पार्वती व शंकर) विराजमान आहेत म्हणून गणपतीला ‘दक्षिणोमामहेश्वर:’ या नामाने संबोधिले गेले आहे.
‘महोदर’ असेही गणपतीचे एक नाम आहे. अनंत ब्रह्मांडे ज्याच्या उदरात समाविष्ट आहेत तो महोदर होय. याशिवाय गणपतीचे महाकाय रूप सांगणारी आणखी नामे आहेत : अर्णवोदर: (सारे समुद्र ज्याच्या उदरान्तर्गत जल आहे तो), व्योमनाभि: (व्योम म्हणजे आकाश हेच ज्याचे नाभिस्थान आहे असा), कुक्षिस्थयक्षरक्षगंधर्वरक्ष: किंनरमानुष: (यक्ष, राक्षस, गंधर्व, किंनर आणि मानव ज्याच्या कुक्षित म्हणजे छातीत विराजमान आहेत तो), स्थूलकुक्षि: (ज्राची कुक्षि विशाल आहे असा), सप्तपातालचरण: (तल, अतल, वितल, सुतल, ससातळ, महातळ, व पाताळ हे सप्त पाताल ज्याच्या चरणांचे आश्रित आहेत तो), सप्तद्वीपोरूमंडल: (जंबू, कुश, वृक्ष, शाल्मली, क्रौंच, शाक आणि पुष्कर ही सप्तद्वीपे ज्याच्या उरुमंडलाची म्हणजे मांड्यांची आश्रित आहेत तो), कुलाचलांस: (महेंद्र, मलय, सह्य, शुक्तिमान, ऋक्ष, विंध्य आणि परित्राय हे सप्त पर्वत ज्याचे कणास्वरप आहेत असा), पृथ्वीकटि: (पृथ्वी ही ज्याची कमर आहे असा), ब्रह्मांडावलिमेखल: (संपूर्ण ब्रह्मांडपंक्ति हीच ज्राची मेखला म्हणजे कटिसूत्र आहे असा).
३. मूषकवाहन
संत श्रीएकनाथ श्रीगणपतीला उद्देशून म्हणतात, “सूक्ष्माहुनी सूक्ष्म सान । त्यामाजी तुझे अधिष्ठान । यालागी मूषकवाहन । नामाभिधान तुज साजे ॥”(७) सुक्ष्मातिसूक्ष्म वस्तूतही गणपतीचे अधिष्ठान आहे म्हणूनच त्याला मूषकवाहन असे संबोधिले आहे.
एका विद्यालयात ‘गणपतीचे स्वरूप’ या विषयावर व्याख्यान देत असताना ‘एवढासा उंदीर एवढ्या मोठ्या गणपतीला कसा बरे वाहून नेऊ शकत असेल?’ असे विद्यार्थ्यांना विचारले होते. एका छोट्याशा मुलीने त्वरित हात वर करून ‘तो देवाचा उंदीर आहे म्हणून!’ असे उत्तर दिले होते. तिच्या या उत्तरात देवबाप्पाचे स्वरूप समजून घेण्याची अपेक्षावजा सूचना असली तरी मूळ प्रश्न अनुत्तरित राहतो. म्हणून त्याच प्रकारचा आणखी एक प्रश्न उपस्थित करून सदर प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला होता व करूयात.
संत श्रीनामदेवांनी एक रूपक लिहिले आहे. त्या अभंगातील तिसरे चरण ‘मुंगीचे गळां तुळईचा लोढणा । विष्णुदास नामा बोलिला खुणा ॥’(८) असे आहे. इथे मुंगी म्हणजे जीव व तुळईचा लोढणा म्हणजे शरीर होय. ज्या न्यायाने दिसावयास, आकाराने लहान असलेली मुंगी (जीव) तुळईचा लोढणा (शरीर) सहज वाहून नेऊ शकते (शकतो) त्याच न्यायाने श्रीगणपतीच्या कृपेने सामर्थ्य प्राप्त झालेला उंदीर त्याच्यापेक्षा शरीराने मोठा असलेल्या देहधारी गणपतीला सहज वाहून नेऊ शकतो. समजून घेण्याची ही रीत म्हणजे खूण श्रीनामदेवांनी सांगितली आहे.
जडद्रव्याचे सूक्ष्म कण म्हणजे अणूरेणू होत. त्यातही त्याहून कैक पटीने सूक्ष्म असलेला आत्मरूप गणपती आहे. सुक्ष्मातिसूक्ष्म आत्मरूप गणपतीचे त्याहूनही स्थूलदृष्टीने मोठा असलेला उंदीर हा वाहन असू शकतो. या अर्थाने मूषकवाहन हे नाम सार्थ ठरते.
देवांचा देव (देवबाप्पा) आत्मरूप आहे. तोच गणेशु (झाला) आहे, असे ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओवीत म्हटले आहे, आत्मा ‘अणुहूनही लहान व मोठ्यात मोठ्या वस्तूपेक्षाही मोठा’ असल्याचे ‘उपनिषदात’ म्हटले आहे; तर, मी अणुरेणुहूनही लहान (थोकडा) व आकाशाएवढाही (व्यापक) आहे, असे श्रीतुकारामांनी म्हटले आहे. आपणही त्यांच्यासारखेच आहोत. ‘लहानातल्या लहान वस्तूपेक्षाही लहान व महानातल्रा महान वस्तूपेक्षाही महान असे जे ते पवित्र होय’, असे डॉ. आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे. ‘एव्हरी मॅन इज् पोटेंशिरली डिव्हाईन’ असे जे विधान स्वामी विवेकानंदांनी केले आहे ते देखील आपल्या सर्वांचे आत्मस्वरूप लक्षात घेऊनच!
अशा प्रकारे, नामदेवांनी सांगितलेली खूण म्हणजे आत्मस्वरूपाचे पवित्र ज्ञान होय. सर्व अवयवांपेक्षा व शरिरातील अतिसूक्ष्म कणांपेक्षा लहान असूनही आत्मा सर्व शरिरावर कसा सत्ता गाजवत असतो, आपल्या शरीराचा कारभार कसा चालवीत असतो, ते श्रीतुकाराम, श्रीनामदेव व श्रीएकनाथ यांच्याप्रमाणे समजून घेतले की स्थूल देहधारी गणपतीचे सूक्ष्म मूषक हे वाहन असू शकते, हे पटू लागते, मूषकवाहन या नामाचा श्रीएकनाथांनी घेतलेला पारमार्थिक अनुभव घेण्याची इच्छा तीव्र होत जाते आणि श्रीगणपतीच्या चराचरव्यापक दर्शनाने ती तृप्त होते.
४. विघ्नहर किंवा दुखहर्ता
भक्ताला असे दर्शन दिल्यानंतर देव सदैव त्याच्या समोर असतो. खरे तर, देव व आपण वेगळे नाही, असे तो भक्त अनुभवत असतो. असे अनुभवास येत राहणे म्हणजे सदोदित होणे हेच खऱ्या भक्तिचे व परमार्थाचे स्वरूप होय. हा विचार ‘स्वसंवेद्य सन्मुखता भेदु नाही आता । भक्ति आणि परमार्था हेचि रूप ॥’ या अभंगातून श्रीज्ञानदेवांनी व्यक्त केला आहे.(११) संत श्रीएकनाथ श्रीगणपतीला संबोधून लेखन करीत होते त्यावेळी ते गणपती सन्मुख असल्याचेही अनुभवीत होते. ते म्हणतात, “तुज देखे जो नरु । त्यासी सुखाचा संसारू । यालागी विघ्नहरू । नामादरू तुज साजे ॥.... तुझी अणुमात्र झालिया भेटी । शोधिता विघ्न न पडे दृष्टी । तोडिसी संसार फासोटी । तोचि तुझे मुष्टी निजपरशू ॥ भावें भक्त जो आवडे । त्याचे उगविसी भवसाकडे । वोढुनी काढिसी आपणाकडे । निजनिवाडे अंकुशें ॥”(१२) ‘तुला गणपतीला जो मानव पाहतो त्याचा संसार सुखाचा होतो. त्याचे संसाररूपी विघ्न लय पावते म्हणून मोठ्या आदराने दिलेले ‘विघ्नहर’ हे नाव तुला साजेसे आहे. तुझी अल्पकाळ जरी भेट झाली किंवा तुझ्या रूपाचे थोडे जरी ज्ञान झाले तरी शोधूनही विघ्न दृष्टीस पडत नाही. संसाररूपी फास तोडून टाकणारी कुऱ्हाड आत्मज्ञानरूपी अभर देणाऱ्या तुझ्या हातात आहे. सद्भावरुक्त भक्त तुला आवडतो. त्याचे संसाररूपी संकट दूर करून व आपल्रा स्वरूपाचे ज्ञान देऊन त्याला तू आपल्याकडे आकर्षित करतोस’, असा या ओव्यांचा अर्थ आहे.
आत्मज्ञान नसलेले जीव वेगवेगळ्या इच्छावासनांमुळे जन्ममरणाच्या फेऱ्यात गुंतून पडतात. जन्मल्यानंतर सुखदु:खात जगत राहतात. जीवावर ओढवणारे हे सर्वांत मोठे विघ्न होय. या विघ्नाचे निवारण गणपती आपल्या भक्ताला आत्मानात्मविवेक देऊन करतो. या अर्थाने तो ‘विघ्नहर्ता’ किंवा ‘दु:खहर्ता’ होय. आर्त भक्त हे शारीरिक दु:खांचे निवारण व्हावे म्हणून तर अर्थार्थी भक्त प्रापंचिक अडीअडचणी दूर होण्यासाठी धनधान्यसंपत्ती, मानसन्मान वा सत्ता मिळावी म्हणून देवाला प्रार्थना करीत राहतात. जिज्ञासू भक्त देवविषयक विविध प्रकारची माहिती होत रहावी या हेतूने वाचनमननपूर्वक भक्ती करीत असतात. या तिन्ही प्रकारच्या भक्तांच्या मनात वेगवेगळ्या इच्छाअपेक्षा असतात. ते सत्त्व, रज व तम या गुणांच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या सुखविषयक कल्पनाविेशात अडकून राहतात; त्यामुळे त्यांना स्वत:च्या व देवाच्या स्वरूपाचे ज्ञान होत नाही.(१३) चौथ्या प्रकारचे म्हणजे ज्ञानी भक्त मात्र निष्काम भक्ती करीत असतात. ते देवाला आवडतात. त्यांना देव आपल्याकडे आकर्षित करून घेतो व त्यांना भवसंकटातून (= जन्ममरणजन्य दु:खातून) मुक्त करतो. त्यांना गणपती आपल्या व त्यांच्या स्वरूपाचे ज्ञान देतो.
अशा प्रकारे भक्तावरील सर्व संकटांचे आकर्षण करून घेणाऱ्यास कृष्ण म्हणतात. (‘सर्व विघ्नांचे आकर्षण । करी रा नाव म्हणिजे कृष्ण ।...’(१४)) अर्थात्, भक्तांची विघ्ने नष्ट करण्याची श्रीकृष्णाची व श्रीगणपतीची रीत एकच आहे. कृष्ण या नावाने सूचित होणारी समान कृती करणारा गणपती व कृष्ण स्वरूपत: अभिन्न आहेत, दोघेही परमात्मरूपच आहेत.
गणपतीच्या पुढील नामांमुळे विघ्नहर्ता या नामाचा वर व यानंतर संत श्रीएकनाथांनी सांगितलेला सकलार्थ उलगडतो : ईषणात्रयकल्पान्त: (आपल्या भक्तांच्या अंत:करणातील लोकेषणा, पुत्रेषणा व वित्तेषणा या तीन ईषणांचा म्हणजे अनिवार इच्छांचा संपूर्णत: लय करणारा असा), दु:खभंजनकारक: (दु:खांचा नाश करणारा), स्वभक्तानाम् लुप्तविघ्नानाम् (आपल्या भक्तांचे विघ्न नष्ट करणारा) आणि विघ्ननायक म्हणजे विघ्नहर्ता.
५. सुखकर्ता
“साच निरपेक्ष जो नि:शंक । त्राचे तूचि वाढविसी सुख । देऊनि हर्षाचे मोदक । निवविसी देख निजहस्तें ॥”(१५) एक देवच भेटायला हवा, त्यातच आपले खरे कल्याण आहे, अशा दृढ श्रद्धेमुळे जो नि:शंक असतो तोच खरा (= ज्ञानी) भक्त होय. देवाशिवाय अन्य कोणत्याही लाभाची त्याला अपेक्षा नसते. अशा भक्ताला गणपती स्वहस्तें आत्मानंदरूपी हर्षाचे मोदक देऊन सुख, समाधान व शांती देतो.
जीव व आत्मा यांचे मीलन होते, जीव व शिव एकरूप होतात तेव्हा जो अनुभव येतो तो म्हणजे सुख होय. ‘किंबहुना सोये । जीवआत्मयाची लाहे । तेथ जे होये । तया नाम सुख ॥, अशी त्या सुखाची व्याख्या श्रीज्ञानदेवांनी केली आहे.(१८) यास आत्मसुख म्हणतात. ते अविनाशी असते. हे सुख उदा. संत श्रीतुकाराम अखंडपणे अनुभवीत होते. म्हणूनच ‘माझे आत्मसुख । कोण घेईल हिरावून ॥’, असे म्हणून त्यांनी ते सुख मिळविण्यास अपत्यक्षपणे उपदेशिले आहे. परमात्मारूपी डोहात आपण त्याचेच अंश असलेले आत्मारूपी तरंग आहोत. अर्थात आपण देवस्वरूपातच वास करीत आहोत. हा सर्वश्रेष्ठ सुखाचा अनुभव ‘आनंदाचे डोहीं आनंद तरंग’ या अभंगातून त्यांनी व्यक्त केला आहे. स्वरूपाचे ज्ञान झाले की भक्त हे आयते म्हणजे स्वयंसिद्ध असलेले सुख भोगू लागतो. अल्पकाळ टिकणारे इंद्रियजन्य तसेच बौद्धिक सुख मिळविण्यासाठी संसारी वा प्रापंचिक लोकांना जे काबाडकष्ट करावे लागतात, कष्टाचे डोंगर उपसावे लागतात, तसे ज्ञानी भक्ताला करावे लागत नाहीत. ‘आम्ही आरते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा व्यवहार । तेणेंचि वाढे॥’(१९) या अभंगातून श्रीतुकारामांनी तसे स्पष्ट केले आहे. ज्ञानी भक्त सदैव विश्वव्यापी महागणपतीतच स्थित असतात म्हणजे आत्मरत असतात. आत्मरतीचे सुख अविनाशी म्हणजे चिरकाल टिकणारे असते. गणपती हे सुख सद्भक्ताला देतो. या अर्थाने तो सुखकर्ता होय.
आत्मसुखाकडे दुर्लक्ष करून इतर सुखांची अपेक्षा करणे हे दु:खास कारणीभूत होते. भक्ताच्या मनात ऐंद्रिय सुखाची अपेक्षा निर्माण होणे हेच मोठे विघ्न होय. त्यापासून व तज्जन्य दु:खांपासून ज्ञानी भक्ताचे संरक्षण करणारा तो विघ्नहर भक्ताला खरे सुख (आत्मसुख) देऊन सुखकर्ता होत असतो.
वर उल्लेखिलेल्या चार प्रकारच्या भक्तांपैकी ‘ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझे ।..’ या वाक्याने निष्काम भक्ताला श्रीज्ञानेश्वरांनी गौरविले आहे.(१६) आणि श्रीगणपतीची आरती लिहिणाऱ्या श्रीरामदासस्वामींनी ‘निष्काम भावाचिया भजना । त्रैलोक्यीं नाही तुळणा ।..’ या ओवीतून निष्काम भक्ती करण्याची भाविकांना प्रेरणा दिली आहे.(१७)
६. गजानन
“पाहता नरू ना कुंजरू । व्यक्ताव्यक्तासी परू । ऐसा जाणोनि निर्विकारू । नमनादरू ग्रंथार्थीं ॥”(२०) ग्रंथारंभी संत श्रीएकनाथ श्रीगणपतीला म्हणतात, ‘तुझ्या सद्रूपाचे दर्शन झाल्यावर तू जसा मानव नाहीस तसाच गजही नाहीस, व्यक्त आणि अव्यक्तही नाहीस तर त्याही अतीत म्हणजे पलीकडचा असा तू निर्विकार आहेस, असे समजले म्हणून तुला आदरपूर्वक नमस्कार करतो’.
गणपतीचे ‘देवार्थनृगजाकृथ:’ असेही एक नाव आहे. देवतांच्या कार्यसिद्धिसाठी गणपतीने ‘नरदेह आणि गजमुख’ असे रूप धारण केले म्हणून तो गजानन होय. अगोदर श्रीशंकर व पार्वती यांच्यासारखे मानवरूप असलेल्या त्यांच्या पुत्राला नंतर हत्तीचे तोंड प्राप्त झाले, हे सर्वश्रुत आहे. पण, अप्रमितानन: असेही एक नाम आहे. ज्राने असंख्य मुखे धारण केली आहेत तो ‘अप्रमितानन’ होय.
ग्रंथारंभी नमन करताना विघ्नहराचे रूप जसे मानुष (मानवी) नाही तसेच ते कुंजरासमही (हत्तीसारखेही) नाही; ते व्यक्त (इंद्रियगोचर, साकार) व अव्यक्त (इंद्रियातीत, निराकार) या दोहोंपलीकडील आहे म्हणून ते ‘निर्विकारू’ आहे, असे श्रीएकनाथ म्हणतात. व्यक्त वा अव्यक्त, सगुण वा निर्गुण, दृश्य वा अदृश्य असणे म्हणजे उपाधियुक्त असणे होय. गणपती या द्वंद्वांच्या पलीकडचा म्हणजे स्वसंवेद्य निरुपाधिक आत्मरूप आहे.
श्रीगणेशसहस्रनामावलीतही सत्, असत्; व्यक्त, अव्यक्त आणि सचेतन, अचेतन ही परस्परविरुद्ध वाटणारी नामे दिली आहेत. त्यावरूनही गणपतीचे द्वंद्वातीत स्वरूप सूचित होते.
श्रीज्ञानेश्वरांनीदेखील गणपतीचे असे असलेले रूप समजून घेण्याची अप्रत्यक्ष सूचना केली आहे. श्रीगणपतीला ‘श्रीगुरुराया’ असे संबोधून ते म्हणतात, “जे तुझ्याविखी मूढ । तयालागी तू वक्रतुंड । ज्ञानियासी तरी अखंड । उजूचि आहासी ॥”(२१) ‘जे तुमच्या ब्रह्मस्वरूपाविषयी अज्ञानी आहेत, त्यांना तुम्ही वक्रतुंड असल्याचे दिसता व जे तुमचे यथार्थ स्वरूप जाणतात, त्या ज्ञानवानांना तुम्ही नित्य सरळसोंडी, सन्मुखच आहात’, असा या ओवीचा अर्थ आहे.
श्रीगणपतीचे दर्शन कधी होते?
‘अथर्वशीर्षात’ गणपती ‘अवस्थात्रयातीत:’ म्हणजे ‘तिन्ही अवस्थांच्या पलीकडील आहे’ असे विधान केले आहे व ‘चतुर्थीतिथीसंभव:’ हे गणपतीच्या हजार नामांपैकीचे एक नाम आहे. जागृती, सुषुप्ती व स्वप्न या तीन अवस्थेत होणारे ज्ञान हे आकार व गुण असलेल्या वस्तुंचे असते. यापैकी कोणत्याही अवस्थेत गणपती-दर्शन होत नाही. या तिन्ही अवस्थांच्या पलीकडील चौथ्या ‘तुर्या’नामक अवस्थेत दिव्यज्ञानदृष्टी प्राप्त होते. त्यावेळी आपल्या शरिरातील मूलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता म्हणून गणपतीचे दर्शन घडते. श्रीज्ञानदेवांनी उपदेशिल्याप्रमाणे श्रीमुक्ताबाईंनी आपल्या मूळद्वारीं म्हणजे स्वदेहातच गणपतीची स्थापना करून ‘देवाला आवडणाऱ्या थोर म्हणजे अंतर्निष्ठ भक्तीचा’ शुभारंभ केला होता, असे ‘श्रीज्ञानेश्वराची सनद’नामक अभंग वाचताना लक्षात येते. ‘मूलाधारचक्रावर नित्य स्थित’ असलेला म्हणजे श्रीतुकारामांच्या भाषेत ‘आपल्यापाशीच असलेला आपला (आत्मरूप) गणपती’ आपल्या डोळ्यांना दिसत नाही म्हणून त्यास अव्यक्त म्हटले आहे.
‘ध्याता-ध्येय-ध्यान’ ही त्रिपुटी ओलांडून गेल्यावर प्राप्त होणाऱ्या ज्ञानदृष्टीला तो दिसू लागतो म्हणून भक्तासाठी तो व्यक्त झालेला असतो. गणपतीचे दर्शन व्हावे म्हणून साधकांनी प्राप्त करून घ्यावयाची ही तुर्यानामक चतुर्थ स्थिती म्हणजे पारमार्थिक किंवा आध्यात्मिक चतुर्थी होय. ही चतुर्थ स्थिती प्राप्त झालेली नसते तोपर्यत जीव अज्ञानी असतो व त्यास गणपतीचे दर्शन झालेले नसते म्हणजे गणपती त्यासाठी अव्यक्त असतो. चतुर्थ स्थिती प्राप्त झालेल्या साधकास म्हणजे ज्ञानी व्यक्तींसाठी मात्र तो संभवतो म्हणजे व्यक्त होत असतो. या अनुभवाने ‘चतुर्थीतिथीसंभव:’ हे गणपतीचे नाम सार्थ असल्याची साधकाची निश्चिती होते. तुर्येच्या परिपक्व अवस्थेत म्हणजे उन्मनी अवस्थेत श्रीरामदासस्वामी म्हणतात त्याप्रमाणे ‘सन्मुख चहूंकडे तो एक देवाधिदेव’च असल्याचे त्यास सदोदित होते. म्हणूनच गणपतीचे स्वरूप व्यक्त व अव्यक्त या दोन्ही अवस्थांच्या पलीकडचे आहे, हे संत श्रीएकनाथांनी ‘व्यक्ताव्यक्तासी परु’ या शब्दांनी सांगितले आहे. अर्थात, चतुर्थीला जन्मलेल्या गणपतीचे तुर्यानामक चतुर्थ स्थितीत प्रवेशलेल्या साधक-जीवाला आत्मरूप गणपतीचे दर्शन होत असते. परिणामी मनबुद्धीचे अहंभावयुक्त व्यवहार लय पावून व्यक्ती उन्मन होते.
अशा प्रकारे स्वसंवेद्य आत्मरूप गणपतीशी सोऽहंभावजन्र तद्रूपता अनुभवणे म्हणजे अद्वरभावें त्यास नमन करणे शक्य होते. तसेच ते श्रीएकनाथांनी व आत्मज्ञानी साधुसंतांनी केले आहे. म्हणूनच उदा. ‘नमन हाचि अनुभव । नमन हाचि मुख्य भाव । नमन हाचि पैं देव । देवाधिदेव तू पावसी ॥’(२२) असे सन्मार्गदर्शक विधान संत श्रीनामदेवांनी करून ठेवले आहे आणि ‘मन मुरे मग जे उरे । ते तू कां रे सेवीसिना ॥’(२३) अशा अगदी विनम्र शब्दांत आपल्या आत्मरूपाचा म्हणजे श्रीमहागणपतीच्या ‘स्व’रूपाचा अनुभव घेण्याबाबत संत श्रीज्ञानेश्वरांनी आपणास विनविले आहे.
................
संदर्भसूची
१) श्रीएकनाथी भागवत, अ.३, ओवी क्र. ८४४; २) मनाचे श्लोक, श्लोक क्र. १७९; ३) श्रीएकनाथी भागवत, ३.८४१; ४) तत्रैव, १.३; ५) ज्ञानेश्वरी, अ.१०. ओव्या क्र.१८१-१८३; ६) तत्रैव, अ.१०. ओव्या क्र. २५९-२६३; ७) श्रीएकनाथी भागवत, १.१४, ८) श्रीनामदेव गाथा, अ.क्र. २१११; ९) तत्रैव, अ.क्र. ११४५; १०) दासबोध, ६.२.१३; ११) श्रीज्ञानदेव, अ.क्र. १३७; १२) श्रीएकनाथी भागवत, १.४.११ व १३; १३) तत्रैव, ११.७६५,७६६ व ११०१; १४) तत्रैव, २०.७२; १५) तत्रैव, १.१३, १६) ज्ञानेश्वरी, ७.१२६, १७) दासबोध, १०.७.१९; १८) ज्ञानेश्वरी, १३.१३१; १९) श्रीतुकाराम अ.क्र. १२७८; २०) श्रीएकनाथी भागवत, १.१५; २१) ज्ञानेश्वरी, १७.४; २२) श्रीनामदेव, अ.क्र. ३१७; २३) श्रीज्ञानदेव अ.क्र. ५६६.
.............................................................................................................................................
(२०१३-१४च्या ‘वेदान्तश्री’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचे नाव व आशय या दोन्हीत भर घालून प्रस्तुत लेख तयार केला आहे.)
.............................................................................................................................................
लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment