मानवेतर प्राण्यांमध्ये समलिंगी संबंध असतात का? आणि का असतात?
पडघम - विज्ञाननामा
प्रदीपकुमार माने
  • ऑयस्टरकॅचर, बोनोबो, बोनोबो, पोईसिलिया मेक्सिकाना आणि ‘Biological Exuberance’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 13 September 2018
  • पडघम विज्ञाननामा ऑयस्टरकॅचर Oystercatcher बोनोबो Bonoboपोईसिलिया मेक्सिकाना Poecilia mexicana बायॉलॉजिकल’ एक्झुबॅरन्स Biological Exuberance

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने ‘समलिंगी संबंध ठेवणे हा गुन्हा नाही’ असा निर्णय दिला. भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७७ नुसार अशा प्रकारचे संबंध ठेवणे हा गुन्हा समजला जात होता. अशा प्रकारचे संबंध हे नैसर्गिक नाहीत, त्यामुळे असे संबंध ठेवणाऱ्याला शिक्षा करावी असा युक्तिवाद या कलमात आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने आता त्यातून सुटका केली असून असे संबंध ठेवावे की नाही, ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे असे अधोरेखित केले आहे. हा फक्त खासजीपणाचाच प्रश्न नाही तर व्यक्तिस्वातंत्र्याच्याही प्रश्न आहे. न्यायालयाने असेही नमूद केले आहे की, ‘सेक्स ही जैविक कृती आहे’.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर आपणाला एक साधा प्रश्न पडू शकतो की, सेक्स ही नैसर्गिक बाब आहे, पण समलिंगी संबंध ही गोष्ट नैसर्गिक असू शकते का? यालाही सर्वोच्च न्यायालयाने उत्तर दिले आहे. डी. वाय. चंद्रचूड या न्यायाधीशांनी समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता देताना समलिंगी संबंध ही फक्त मानवप्राण्यांमध्येच आढळणारी गोष्ट नसून ती इतर पंधराशे जिवांमध्येही आढळते असे नमूद केले आहे.

खरोखरच समलिंगी संबंध निसर्गातही आढळतात का? निश्चित आढळतात. जगभरात यावर विविध जीवशास्त्रज्ञ संशोधन करत असून त्यामुळे मिळालेले निष्कर्ष चकित करणारे आहेत. साध्या कीटकांपासून ते डॉल्फिन, चिम्पांझी यांसारख्या बुद्धिमान जीवांपर्यंत समलिंगी संबंध आढळतात. एवढेच नव्हे तर चिंपांझींचा चुलतभाऊ असणाऱ्या बोनोबो या कपीमध्ये (Ape) समलैंगिक संबंधांचा झालेला विकास पाहिल्यावर तर आपणाला तोंडात बोट घालावे लागते.

जीवशास्त्रीय दृष्टीने पाहावयास गेल्यावर लक्षात येते की, समलिंगी संबंध ठेवण्याची कारणे विविध आहेत. ताणमुक्ती, आपल्या समूहातील आपला दर्जा वाढवण्यापासून ते आपल्या पिल्लांचे संगोपन चांगल्या प्रकारे व्हावे, यासारख्या विविध गोष्टी करण्यासाठी तर जीवांमध्ये समलिंगी संबंध ठेवले जातात.

सध्या जगभरातील विविध संशोधक मानवेतर प्राण्यांतील समलिंगी संबंधांवर संशोधन करत आहेत. पण या विषयाची खरी चर्चा सुरू झाली ती १९९९ साली ब्रुस बागेमिहल या संशोधकाने लिहिलेल्या ‘बायॉलॉजिकल’ एक्झुबॅरन्स या पुस्तकानंतर. या पुस्तकात बागेमिहल यांनी विविध उदाहरणांच्या साहाय्याने असे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की, प्राण्यांमधील समलिंगी संबंध दिसतात, तितकी सोपी गोष्ट नाही. नर-नरांचे, माद्या-माद्यांचे समलिंगी संबंध फक्त लैंगिक आनंद घेण्यासाठीच नसतात, त्याला इतरही बरीच कारणे आहेत. बागेमिहल यांच्या या पुस्तकानंतर प्राण्यांमधील समलिंगी संबंध यावर विविध दृष्टिकोनांतून संशोधन व्हायला गती मिळाली. संपूर्ण सजीवसृष्टीचे स्पष्टीकरण देणाऱ्या उत्क्रांतीवादामध्ये तिचे काय स्थान असावे, यावरही मंथन सुरू झाले.

या विषयातल्या उदाहरणांची सुरुवात माशांपासून करू. माशांमधील समलैंगिकता समजून घेण्यासाठी वुडी अॅलन या विनोदी अभिनेत्याने त्यावर केलेले भाष्य उपयोगी पडेल. तो म्हणतो, ‘नर आणि मादी दोघांत रस घेणे कधीही फायद्याचेच ठरते. त्यामुळे आपली डेंटिंगची शक्यता दुप्पट होते.’ मानवप्राण्यांतील सर्वांनाच अॅलनचे भाष्य (समलैंगिक सोडून) पटेल असे नाही, पण काही माशांच्या प्रजातींना हे शंभर टक्के लागू पडते. डेव्हिड बिअरबाक, ख्रिश्चन जुंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘बायॉलॉजी लेटर्स’ या पत्रिकेत याविषयीचे आपले संशोधन प्रसिद्ध केले आहे. ‘पोईसिलिया मेक्सिकाना’ या माशाच्या प्रजातीविषयीचे हे संशोधन आहे. इतर कोणत्याही माशाच्या प्रजातीप्रमाणे याही प्रजातीतील माद्यांना प्रजननासाठी ताकदवान, रंगीबेरंगी मोठे मासे आवडतात. आता साहजिकच आहे की, मोठे नर असताना त्यांच्यापेक्षा कमी ताकदीच्या नरांना मादीजवळ फिरकण्याची संधीच मिळत नाही. मग तिला आकर्षित करणे दूरच. यावेळी त्या माशांतील समलैंगिकता त्यांच्या कामाला येते. या प्रजातीतले मासे जरी मादीजवळ जाऊ शकत नसले तरी मोठ्या ताकदवान नराजवळ निश्चितच जाऊ शकतात. मादीच्या समोर ते या मोठ्या माशांबरोबर समलैंगिक कृती करू लागतात. या माशांमध्ये समलैंगिकता नैसर्गिक असल्यामुळे त्यालाही या गोष्टीचे काही वाटत नाही. पण या समलैंगिक कृती करताना तो मीलनोत्सूक मादीच्या नजरेला पडतो. अन त्यातून काही नरांना मादीशी मीलन करण्याची संधी मिळते. मोठ्या नराच्या सान्निध्यात कुठल्याही इतर नरांना आपले प्रदर्शन करण्याची संधी कधीच मिळत नाही. पण तीच मोठ्या नराबरोबर समलिंगी कृती करताना मिळते. आता आले का लक्षात की, वुडी अॅलनेचे उदगार!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

पोईसिलिया मेक्सिकाना या माशाच्या प्रजातीवरील संशोधनावरून लक्षात येते की, समलैंगिकता ही विषमलिंगी संबंध प्राप्त करण्यासाठी उपयोगी ठरते. काही प्रजातीत समलिंगी संबंध हे अपत्य संगोपनासाठीही उपयोगी पडतात. ‘ऑयस्टरकॅचर’ या पक्ष्यावरील ‘नॅचर’ या पत्रिकेत प्रसिद्ध झालेले संशोधन हे पटवून देण्यासाठी पुरेसे आहे. नेदरलँडमधील ग्रॉनीगटेन विद्यापीठातील दिंक हेग आणि रॉब टरुरेन या संशोधकांनी यावर संशोधन केले आहे. त्यांना आढळून आले आहे की, आयस्टरकॅचर पक्ष्यांमधील काही माद्यांना मीलन करण्यासाठी नरच मिळत नाहीत. याचे कारण म्हणजे या पक्ष्यांमध्ये आधीच बनलेल्या नर-माद्यांच्या जोड्या. आता यातून कसा मार्ग काढणार? हेग आणि टरुरेन यांना दिसून आले की, तयार झालेल्या जोड्यातील दोन टक्के जोड्या या दोन माद्या अन एक नर अशा बनलेल्या असतात. एका दृष्टीने बहुपत्नीत्वच! या दोन्ही माद्या नराशी तर संबंध ठेवतातच, पण एकमेकींशीही संबंध ठेवतात. माद्यांच्या संबंधांतून प्रजनन होत नसले तरी त्यातून दोघींमधील बाँडिंग वाढते. या दोन्ही माद्या पिल्लांना वाढवतात. संशोधकांना लक्षात आले की, या तिघांचा लव्ह ट्रँगल एक नर-मादी कुटुंब असणाऱ्या ऑयस्टरकॅचरपेक्षा पिल्लांचे संगोपन करण्यात यशस्वी ठरतो. यामुळे पिल्लांवर जास्त लक्ष तर राहतंच, पण अन्न शोधण्याच्या कामातही मदत होते. या उदाहरणांतून आपल्या लक्षात येते की, समलैंगिकता फक्त प्रजननासाठीच नव्हे तर अपत्य संगोपनासाठीही महत्त्वपूर्ण ठरते.

आता अशा एका प्राण्याची समलैंगिकता पाहू की, तो याबाबतीत सर्व जीवांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. नुसता वैशिष्ट्यपूर्ण नव्हे तर अद्वितीय आहे. तो आहे बोनोबो. चिम्पांझीचा चुलतभाऊ. फ्रान्स डी वॉल या कपीशास्त्रज्ञाने (Primatologist) यावर संशोधन केले आहे. वॉल चिम्पांझी आणि बोनोबो या दोघांवरच्या संशोधनामुळे त्यावरचे जागतिक तज्ज्ञ समजले जातात. त्यांच्या संशोधनातून जे समजले ते अचंबित करणारे आहे. चिम्पांझी हे तुलनेत जास्त आक्रमक, तर बोनोबो हे शांतताप्रिय समजले जातात. असे का बरे आहे, याचा शोध घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले की, बोनोबो हे समलिंगी संबंधांचा जास्त वापर करत असल्यामुळे त्यांचा समाज हा चिम्पांझीपेक्षा शांतताप्रिय आहे. या अर्थाने विचार करता बोनोबोमध्ये नर-नर आणि मादी-मादीमध्ये असणारे संबंध इतर कुठल्याही जीवात आढळून येत नाहीत. जेव्हा जेव्हा बोनोबोमध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष उदभवतो, तेव्हा तेव्हा ते वेळ न घालवता एकमेकांसोबत समलिंगी संबंध ठेवतात. साहजिकच आहे, अशा कृतीनंतर ते शांत होतात आणि संघर्ष टाळला जातो. अन्नात वाटणी असो, सत्ताप्राप्ती असो वा इतर कोणताही संघर्ष, तो या मार्गाने सोडवला जातो.

‘बोनोबो – सेक्स अँड सोसायटी’ या सायंटिफिक अमेरिकन मासिकातील लेखामध्ये त्यांनी या गोष्टींचा सविस्तरपणे परिचय करून दिलेला आहे. त्यांच्यात मुखमैथून, एकमेकांच्या लिंगांना मसाजाद्वारे उद्दिपित करणे, दीर्घचुंबन याही गोष्टी आढळतात. कुठलाही अन्नपदार्थाचा साठा मिळाला की, तो घेण्याआधी ते एकमेकांशी समलिंगी संबंध सुरू करतात. वॉल यांना आढळून आले की, यामुळे संघर्ष टळून अन्नसाठ्याची शांतपणे वाटणी केली जाते. एवढेच नाही तर त्यांना असेही आढळून आले की, खेळण्याची वस्तू मिळाली तरी ते आधी समलिंगी संबंध ठेवतात.

एकंदरीत समलिंगी संबंधांचा विचार करता असे दिसून येते की, ही गोष्ट गुंतागुंतीची आहे. रानटी कोवाला या जीवामध्ये ही गोष्ट कधीच दिसून येत नाही, पण क्वीन्सलँड विद्यापीठातील क्लाईव्ह फिलिप्स यांनी दाखवून दिले की, प्राणीसंग्रहालयामध्ये त्यांना कोवालात असे संबंध आढळून आले आहेत. नर-मादीची कमतरता, बंदिस्त रहिवासाचा ताण, यामुळे त्यांच्यात ही गोष्ट दिसून आली. तुरुंगात राहणाऱ्या कैद्यांमध्येही अशा कृती आढळून येतात.

अंतिमत: मानवेतर जीव आणि मानव यांच्यातील तुलनात्मक संबंधांचा विचार करणे महत्त्वपूर्ण ठरते. मानवेतर प्राण्यातील कुठलाच प्राणी फक्त गे किंवा लेस्बियन असत नाही. त्यांच्यात बायसेक्युलिटी आढळते. एक उत्क्रांतीशास्त्रज्ञ म्हणतो त्याप्रमाणे ‘प्राणी सेक्स करतात, पण त्यांच्या सेक्सला आयडेंटीटी नसते’. मानवाकडे संस्कृतीमुळे म्हणा किंवा उच्चतर बुद्धिमत्तेमुळे ही आयटेंटीटी आहे. त्याची सेक्सची गरज फक्त जैविक नाही, तर ती त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या जपणुकीचीही बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने या दोन्ही गोष्टींना अधोरेखित केले आहे.

.............................................................................................................................................

लेखक प्रदीपकुमार माने प्राध्यापक असून त्यांना तत्त्वज्ञान, विज्ञान, साहित्य, कला या विषयांत रस आहे.

pradeeppolymath@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......