अजूनकाही
१० सप्टेंबरला काँग्रेसनं पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात ‘भारत बंद’ची हाक दिली होती. काँग्रेसच्या आवाहनानंतर जवळपास २० छोट्या-मोठ्या पक्षांनी या बंदला पाठिंबा दर्शवत, सक्रिय सहभाग घेतला. ‘भारत बंद’ असल्यानं तो कडकडीत १०० टक्के यशस्वी होणं अपेक्षित नव्हतं. पण त्याचा अगदीच फज्जा न उडता, दखलपात्र असा संमिश्र प्रतिसाद मिळाला.
भाजपनं बंदवर अपेक्षित अशी ‘बंद फसल्या’ची प्रतिक्रिया दिली. ती देताना त्यांना इतर पक्षांची फारच काळजी वाटली. त्यांनी इतर पक्षांना ‘तुम्ही काँग्रेस, पर्यायानं राहुल गांधींचं नेतृत्व स्वीकारलं का’, असा प्रश्न करून एकीत बेकी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. राज ठाकरेंनी ‘हा कुणाचं नेतृत्व स्वीकारण्यासाठीचा, पाठिंबा देण्यासाठीचा बंद नव्हता, तर पेट्रोल-डिझेल दरवाढ व त्यामुळे वाढलेली महागाई याविरोधात होता. भाजप सरकारविरोधात होता. आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमचा सहभाग नोंदवला,’ असं सुस्पष्ट उत्तर देत पुन्हा एकदा ‘मोदीमुक्त भारता’चा पुनरुच्चार केला.
भाजपनं काल पत्रकार परिषदा आणि प्रवक्त्यांच्या मार्फत कैलासवासी मटका किंग रतन खत्री यांना लाजवेल असे आकड्यांचे खेळ केले. सरळ साध्या प्रश्नाला काळकामवेगाच्या गणितासारखं शब्दबंबाळ व आकडेजंजाळ उत्तर देऊन अक्षरक्ष: वेळ काढला. ठरवून खोटं बोलणं अथवा मुद्द्यावर न येणं यात भाजपनं गेल्या चार वर्षांत विशेष कौशल्य विकसित केलंय. या त्यांच्या गुंगारा नीतीचा अतिरेकी शेवट रविप्रसादांनी केला. त्यांनी सरळ ‘दरवाढीबाबत आमच्या हातात काहीच नाही’ म्हणून हात झटकले. भुरटा प्रेमी जसा भोळ्या प्रेमिकेला ‘माझं प्रेम आहेच तुझ्यावर, पण लग्न करीन असं कधी म्हटलं होतं मी’, असं म्हणून काढता पाय घेतो, त्याप्रमाणे भाजपचं सध्या चालू आहे. आपल्या कुठल्याच आश्वासनाला शब्दाला जागायचं नाही, असा भाजपनं विश्वामित्री पवित्री घेतलाय.
नोटबंदीनंतर आता भाजप ज्या पद्धतीनं पेट्रोल-डिझेल दर आणि डॉलरच्या तुलनेत रुपया यावर ज्या भूमिका घेतोय, ते पाहता या पक्षाला ‘स्मृतिभ्रंश’ जडलाय असं कुणीही म्हणू शकेल. चार वर्षांपूर्वी किंवा २००४ ते २०१४ या दहा वर्षांत भारत-पाकिस्तान संबंध, सीमेवरील तणाव, चीनबरोबरचे संबंध, सरकारी बँका, त्या बँकांनी दिलेली कर्जं आणि महागाई यावर हा पक्ष संसदेत आणि रस्त्यावर काय बोलत होता, याचे पुरावे आता थेट दृक-श्राव्य माध्यमातील क्लिपिंग्जमधून लोकच प्रसृत करून भाजपला प्रश्न विचारताहेत. पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून कुठल्या तरी आकडेवाऱ्या, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर, जीडीपी वगैरेची राळ उठवून लहान मुलं खेळताना, एखादा त्यातला दांडगट तो पटच उधळून टाकतो, तसं भाजपचं चाललंय. आपलेच दात आपल्याच घशात लोक समाजमाध्यमातून घालताहेत म्हटल्यावर भाजप हास्यास्पद प्रश्न विरोधकांना विचारू लागलाय.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘विरोधकांनी पंजाब आणि केरळमधील राज्य सरकारचे कर कमी करावे’ असं एक भाजप प्रवक्ता हुशारी दाखवत म्हणाला. आता एरवी आम्ही २० राज्यांत सत्तेत आहोत असं तथाकथित ५६ इंची छाती फुगवून म्हणणारा भाजप संपूर्ण देशात हाहाकार उडालेल्या पेट्रोल-डिझेलबाबत विरोधी पक्षांकडे असलेल्या दोन राज्यांकडे बोट दाखवतो? केरळला कर कमी करा म्हणताना प्रवक्त्यांनी किमान एवढं तरी भान राखायला हवं होतं की, ते राज्य एका महाभयंकर प्रलयातून सावरतंय. त्यांना अतिरिक्त आर्थिक मदत हवी असताना केंद्रानं ती दिली नाहीच. आता त्यांचं हक्काचं उत्पन्न त्यांनी कमी करावं, अशी अपेक्षा कशी करू शकतो? ही संवेदनशून्यता की राजकीय सूडाचा विकृत आनंद?
देशात आणि अनेक राज्यांत सत्ता भोगणारा पक्ष विरोधी पक्षांच्या दोन राज्य सरकारांना कर कमी करा म्हणून सांगतोय. भाजपशासित राज्यस्थान जर वॅट कमी करू शकतं, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र का नाही? तसंही महाराष्ट्रात एरवीही पेट्रोल महाग मिळतं. कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून व्हाया महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानकडे जाणारी वाहनं कर्नाटकातच इतकं इंधन भरून घेतात की, महाराष्ट्रात इंधन भरायलाच लागू नये! या बंदला प्रत्युत्तर म्हणून सरकारनं रोजची इंधन दरवाढ चालूच ठेवली असून परभणी जिल्ह्यात ९० रुपयांवर पेट्रोल गेलंय. यातून सरकारचा उन्मत्तपणा दिसून येतोय.
भरीस भर म्हणून भाजपला बंददरम्यान घडलेल्या हिंसेनं एकदम देशाची काळजी वगैरेच वाटायला लागली. एका आजारी मुलाला नेणारी रुग्णवाहिका बंदमध्ये अडकून त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला म्हणून राष्ट्रीय वाहिन्यांवर भाजप प्रवक्त्यानं अशी काही छाती पिटली की, वाटलं, आता यांचाच बांध फुटणार!
पण या राष्ट्रप्रेमी रुदालींना विचारावंसं वाटतं, नोटबंदीनंतर जे शंभर-सव्वाशे जण हकनाक जीव गमावून बसले, तेव्हा कुठे होता तुम्ही? गाय, बैल, म्हैस, पोरं पळवणारे, चेटूक करणारे म्हणून एकट्या-दुकट्याला ठेचून, जाळून मारणारी झुंड स्वत:च्या विकृतीचे व्हिडिओ अपलोड करत होते, तेव्हा कुठे होता? मशीद पाडल्यानंतर त्यानंतरच्या दंग्यात जे मेले, तेव्हा कोण जबाबदार होते? पंकजा मुंडेंच्या नावानं धमकावणारे, मारहाण करणारे, जबरदस्ती करणारे, शिवीगाळ करणारे खुले आम सोशल मीडियात मिरवत राहतात, तेव्हा कुठे जाते ही सारी नैतिकता आणि माणुसकी?
काय केलंय काय या सरकारनं चार वर्षांत? घोषणाबाजी, भाषणबाजी, जाहिरातबाजी आणि गांधी कुटुंबाच्या नावानं बोटं मोडण्याशिवाय केलंय काय? १० तारखेपासून इंधन दरवाढ आणि महागाईचा आगडोंब देशभर उसळला असताना स्मृति इराणी बाई पत्रकार परिषद घेऊन, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यावर जी एक आयकर विभागा संदर्भातली केस चालू आहे, त्यातल्या कुठल्या तरी न्यायालयाच्या कुठल्या तरी निकालावर बोलत, गांधी घराणं कसं स्वत:करता पैसे जमवतंय आणि पंतप्रधान कसे देशाला वाटताहेत, हे सांगत बसल्या. पंतप्रधानांनी वाटलेल्या पैशांवर बोलायचं झालं तर इराणी बाईंना पळता भुई थोडी होईल!
देश उत्तराच्या, उपायाच्या अपेक्षेत असताना पंतप्रधान लक्षावधी अंगणवाडी सेविकांना ‘तुम्ही माझे लक्ष लक्ष हात आहात’ असं काहीतरी भावगीत छाप सांगत होते. आज या सेविकांच्या घरातलं इंधन महागलं, भाज्या महागल्या, देवपूजा महागली आणि तुम्ही माझे लक्ष लक्ष हात? इतकी कमालीची संवेदनशून्यता याआधीच्या कुठल्याच पंतप्रधानात नव्हती. मनमोहनसिंग बोलत नव्हते, त्यांना धोरणनिश्चिती करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, मित्र पक्षांचे गैरव्यवहार ते थांबवू शकत नव्हते, पण ते संवेदनाशून्य नव्हते. अण्णा हजारेंना घोड्यावर बसवून रामलीला मैदानात ज्यांनी ज्यांनी आपली प्यादी दामटली, त्या सर्वांशी चर्चा केली, खास अभिनंदन घेतलं. निर्भया प्रकरणानंतर तर खास नवी विधी संहिता केली. चार वर्षांत हिंसेच्या, बलात्काराच्या घटनांनतर या सरकारनं काय केलं? तर अशा गावगुंडांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार!
माध्यमांना अंकित करून किंवा मालकांना धाकदपटशा दाखवून काही काळ ईप्सित साध्य करता येईल. पण मोदी सरकारनं लक्षात ठेवावं की, अख्ख्या देशाचा तुरुंग केलेल्या इंदिरा गांधींनाही लोकांनी घरी बसवलं होतं.
जगाचा इतिहास आहे की, सर्वशक्तिमान वाटणारा हुकूमशहा कायम मनातून धास्तावलेला भेकड असतो. त्यामुळे तो संवादाला, चर्चेला घाबरतो. तो स्वत:च्या कर्तृत्वाऐवजी विरोधकांचं चारित्र्यहनन, मुस्कटदाबी आणि प्रसंगी हत्या करायला अधिक महत्त्व देतो. हत्या ही काही नेहमीच मानवी देहाचीच होते असं नाही. ती संविधानिक स्वातंत्र्याचीही होते.
१० तारखेच्या सभेत राहुल गांधींनी माध्यमांना बोलतं, लिहितं व्हा असं आवाहन केलं. दबावाला झुकू नका, घाबरू नका, देश तुमच्या मागे आहे, सत्य मांडा असं सांगितलं.
काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनीही माध्यमांना, पत्रकारांना दडपण झुगारून सत्य मांडा. तुमच्या नोकरीच्या, कामाच्या ठिकाणी ते मांडू दिलं जात नसेल तर समाजमाध्यमावर व्यक्त व्हा, पण व्यक्त व्हा, असं सांगितलं होतं.
देशातले दोन तरुण राजकीय नेते सरकारच्या अघोषित नियंत्रणाबद्दल पत्रकार, माध्यमांना विश्वासात घेऊन त्यांना धीर देत असतील, सत्य मांडण्याचं आवाहन करत असतील तर ते गंभीर आहे. याचा अर्थ सुरुवातीला कुठे कुठे जाणवणारा दाब आता सर्वत्र जाणवायला लागलाय आणि जाहीर सभेतून त्याची सूचक वाच्यता या नेत्यांनी केलीय.
आता माध्यमांची, त्यात काम करणाऱ्या मंडळींची कसोटी आहे. उपजीविका महत्त्वाची आहेच. पण उपजीविकेसाठी असत्याची, असंवेदनशीलतेची, सत्तावर्चस्वाची गुलामी स्वीकारून निष्पक्षतेचा मुखवटा किती काळ वागवणार? बांधीलकी जनतेशी, व्यावसायिक नीतीमत्तेशी की सत्तेच्या मग्रूर संवेदनहीनतेशी?
राम कदम प्रकरणातील सरकारची भूमिका आपण सर्वांनीच पाहिली. माध्यमांनी कच खाल्ली असती तर राम कदम नावाची कीड पसरत राहिली असती.
भाजप सरकारला झालेला ‘स्मृतिभ्रंश’ उघड करण्याची आणि अशा सोयीस्कर स्मृतिभ्रंशात राहून वर मुजोर एकाधिकारशाहीचं दर्शन घडवणाऱ्या सरकारच्या अनेक फोलपणांना आता चव्हाट्यावर आणून जनता काय असते, हे दाखवण्याची वेळ आलीय.
नैतिक आधार व जनाधार गमावलेल्या विरोधी पक्षांनी चार वर्षांनंतर का होईना हातात हात घेतले, रस्त्यावर उतरले, तोंड उघडले.
आता या ‘स्मृतिभ्रंश’ झालेल्या सरकारला पायउतार करून मानसिक आरोग्य केंद्रात विश्रांती व उपचारासाठी पाठवायची नितांत गरज आहे. ही आपल्या सर्वांची संविधानिक जबाबदारी आहे.
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Thu , 13 September 2018
✔