कमाल अतातुर्क, खिलाफत आणि निजाम
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
कॅ. मिलिंद परांजपे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 11 September 2018
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय हैद्राबाद संस्थान Hyderabad State खिलाफत चळवळ Khilafat Movement कमाल अतातुर्क Kemal Atatürk

येत्या १७ सप्टेंबरला हैद्राबाद मुक्तीला ७० वर्षं होत आहेत. त्यानिमित्तानं हा विशेष लेख.

.............................................................................................................................................

पंधरा, सोळा आणि सतराव्या शतकात सर्व पूर्व युरोप तुर्कांनी जिंकला. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएनाच्या भिंतींपर्यंत त्यांचं सैन्य पोचलं. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेवरही त्यांचाच अंमल होता. तेथपासून ब्रह्मदेशाच्या हद्दीपर्यंत मुसलमानी सत्ता होती. त्यामुळे १६७४ मध्ये झालेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ‘ही गोष्ट सामान्य झाली नाही’ असं बखरकार सभासदानं म्हटलं आहे, त्यात अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र त्या प्रचंड साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. एकोणिसाव्या शतकात तर तुर्की साम्राज्याचा उल्लेख ‘दी सिक म्यान ऑफ युरोप’ असा रशियाच्या झारने केला. एखादा श्रीमंत म्हातारा मरायला टेकल्यावर त्याचे नातेवाईक, मित्र हा मेल्यावर याच्या संपत्तीतले आपल्याला काय मिळेल हे पाहत असतात, तशी अवस्था तुर्की साम्राज्यातील बिगर तुर्की भाषिक प्रदेश आणि आजूबाजूचे इतर देश यांची झाली होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस  घटनात्मक लोकशाहीसाठी राजकीय सुधारणांच्या मागणीकरता तरुण तुर्कांची (यंग टर्क्स) चळवळ सुरू झाली. भारतात अबुल कलाम आझादांसारख्या सुधारक मुसलमानांनी तिला पाठिंबा दर्शवला.  

पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान जर्मनीच्या बाजूनं सामील झाला होता. चर्चिल त्या वेळेस ‘फर्स्ट सी लॉर्ड’ होता. त्यानं इस्तंबूलच ताब्यात घेण्यासाठी एक धाडसी योजना आखली. डारडानेल्स सामुद्रधुनीच्या पश्चिमेकडील गॅलिपोली  द्वीपकल्पावर सैन्य उतरवायचं, त्याला आरमाराचं पाठबळ पुरवायचं आणि तुर्कस्तानचा इस्तंबूलसकट युरोपकडील सर्व प्रदेश काबीज करायचा.

सुरुवातीस केवळ आरमारानं तो प्रदेश जिंकायचा दोस्तांचा प्रयत्न तुर्कांनी जर्मन आरमाराच्या मदतीने हाणून पाडला. मग आधीच्या योजनेप्रमाणे ब्रिटिश, भारतीय, फ्रेंच, ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडच्या फौजांनी गॅलिपोलीवर उतरून आक्रमण सुरू केलं. पण दोस्तांना वाटलं होतं तसं काही घडलं नाही.

त्या वेळेस मुस्तफा कमाल नावाचा कर्नल तुर्की सैन्याचा कमांडर होता. त्याच्या पुढाकारात तुर्कांनी दहा महिने निकरानं (त्यातला पुष्कळसा भाग खंदकात) लढून दोस्तांना गालीपोलीतून समुद्रमार्गे माघार घेण भाग पाडलं. दोन्ही बाजूचे मिळून एकंदर दोन लाख सैनिक मेले, त्याच्या अडीच पट जखमी झाले. शंभर दीडशे वर्षानंतर तुर्कांना प्रथमच एक मोठा विजय मिळाला होता.        

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................                       

महायुद्धात पराभवानंतर तुर्की साम्राज्याचा बिगर तुर्की भाषिक प्रदेश स्वतंत्र झाला. युद्ध संपल्यावर ग्रीसनं तुर्कस्तानचा नैऋत्येकडील प्रदेश बळकावण्याचा निकरानं प्रयत्न केला, पण मुस्तफा कमालनं ग्रीकांचा पूर्ण पराभव केला. नंतरच्या तहाप्रमाणे तुर्कस्तान हल्लीच्या आकाराचा झाला. मुस्तफा कमाल, आता पाशा, त्याचा अध्यक्ष झाला. त्यानं आधी सल्तनत खालसा करून टाकली. परंतु तुर्की सुलतान हा जगातील समस्त सुन्नी मुसलमानांचा खलिफा म्हणजे मुख्य धर्मगुरूही होता. सुलतान आता सुलतान न राहता फक्त खलिफा राहिला. महंमद पैगंबरापासून चालत आलेली ती संस्था होती. कमालनं ती प्राचीन संस्थाच बंद करून खलिफाला देशाबाहेर हाकलून दिलं. देवभोळ्या प्रजेला सांभाळून ही गोष्ट करणं सोपं नव्हतं. पण कमालनं दोन्ही निर्णय कणखरपणे राबवले.

सुलतानाला इस्तंबुलचा प्रसिद्ध तोपकापी राजवाडा रातोरात सोडून इटलीत आश्रय घ्यावा लागला. कमालने मग सामाजिक, धार्मिक आणि राजकीय सुधारणा झपाट्यानं सुरू केल्या. तुर्की भाषेची अरबी लिपी बदलून रोमन लिपीचा वापर चालू केला. बॉलरूम डान्सिंग लोकप्रिय केलं. त्याबरोबर स्त्रियांचा पडदा आपोआप गेला हे सांगणं नकोच. मदरसे बेकायदेशीर ठरवले. धार्मिक संस्थांवर बंदी आणली. तुर्कस्तानला निधर्मी प्रजासत्ताक लोकशाही बनवून युरोपच्या बरोबर आणून बसवलं. तुर्की संसदेनं त्यासाठी कमालला अतातुर्क म्हणजे तुर्कांचा पिता अशी संज्ञा दिली. माधव जुलियनांनी कमाल पाशावर लिहिलेल्या कवितेतल्या ओळी यथायोग्यच वाटतात -

प्रसिद्ध तू रणांगणी... तसाच राजकारणी

सुधारकात अग्रणी... कमाल तूच मोहरा                       

जगातील, विशेषतः भारतातील मुसलमानांना, खिलाफत नष्ट होणं सहन होणारं नव्हतं. खलिफाला भारतात आणून खिलाफत भारतातून चालू ठेवण्यासाठी त्यांनी जोरात चळवळ चालू केली. लखनौत खिलाफत समिती स्थापन केली. मौलाना अबुल कलम आझाद तिचे सभासद होते. असहकार चळवळीत मुसलमानांचा सहभाग मिळावा म्हणून काँग्रेस आणि महात्मा गांधींनीही तिला पाठिंबा दिला. सावरकर त्यावेळेस रत्नागिरीस स्थानबद्ध होते. खिलाफत भारतात आणण्यास त्यांचा पूर्ण विरोध होता. भारतीयांनी शंकराचार्यांना हाकलून देऊन त्यांचं पीठच रद्द केलं, तर कुठला तरी मुस्लिम देश त्यांना आपल्या देशात बोलावून तिथं त्या पीठाची स्थापना करेल का, असा प्रतिप्रश्न सावरकरांचा होता. ‘ही खिलाफत म्हणजे आहे तरी काय’ या लेखात त्यांनी ते विचार मांडले आहेत. तिकडे कमाल अतातुर्कनं भारतीय मुसलमानांना किंवा खिलाफत चळवळीला कुठलंही महत्त्व न देता तुर्कस्तानातून खिलाफतीचं उच्चाटन केलं ते कायमचंच.

त्या काळात हैदराबादचा निजाम म्हणजे सातवा निजाम जगातील सर्वांत धनाढ्य माणूस होता. शिवाय त्याच्याकडे अमर्याद नसली तरी इंग्रज परवानगी देतील तेवढी सत्ताही खूपच होती. मीर उस्मानअलीखान सिद्दीकी असफ जाह (सातवा) हे त्याचं नाव. ‘His Exalted Highness’ हा त्याच्या बिरुदावलीचा एक भाग. भारतातील संस्थानामध्ये ते सर्वांत मोठं आणि क्षेत्रफळानं फ्रान्सएवढं होतं. भारतातील मुसलमानांना ते मुसलमानांच्या भारतातील वर्चस्वाचं प्रतीक आणि म्हणून गौरवास्पद होतं. तरीदेखील इंग्रजांकडून अनेकांना मिळणारी ‘सर’ पदवी घेण्यात निजामाला कमीपणा वाटला नाही, याच आता आश्चर्य वाटतं.

निजामाचा पूर्वज औरंगजेबाच्या वेळेस मध्य आशियातून आलेला तुर्क होता. हैद्राबादची कुतुबशाही राजवट नष्ट करून औरंजेबानं त्याला ‘निज़ाम उल मुल्क’ म्हणून नेमला. आपल्या तुर्की वंशाचा निजामाला फार अभिमान होता. वर उल्लेखिलेल्या परिस्थितीत शेवटच्या  खलिफाच्या दरू शेहवार या देखण्या राजकन्येचा निका निजामाच्या मोठ्या राजपुत्राशी ठरला. निका फ्रान्समधील नीस शहरी मौलाना शौकतअलींनी लावला.

शौकतअली आणि महमदअली हे दोघे बंधू खिलाफत चळवळीचे पुरस्कर्ते. निलोफर या दरू शेहवारच्या चुलत बहिणीचा निका निजामाच्या धाकट्या मुलाशी झाला. या विवाह संबंधांमुळे हैदराबाद संस्थान भारतातील अनेक लहान मोठ्या संस्थानाप्रमाणे न राहता त्यास आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला किंवा होईल, निजाम इंग्रजांचा मांडलिक नाही, खिलाफत भारतात आणणं सोपं जाईल, कदाचित निजामच खलीफा होऊ शकेल अशी भव्य दिव्य स्वप्नं काहींनी जोपासली होती. कैरो आणि मक्का इथं खिलाफत सुरू करण्यासाठी सभा झाल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही.

नेहरूंच्या मते खिलाफत चळवळीला भक्कम सामाजिक किंवा आर्थिक पायाच नव्हता. १९३०च्या आधीच खिलाफत चळवळही थंड पडली. अजिबात उत्पन्न नसलेल्या शेवटच्या खलिफाची स्थिती युरोपात शोचनीय झाली म्हणून निजामानं हैदराबादच्या तिजोरीतून त्याला सालीना चार हजार पौंड पेन्शन लावून दिलं होतं. खिलाफत चळवळीमुळे हिंदू-मुसलमान ऐक्य झालं असं काही लोक समजतात, तर बरेच मुस्लिमांसाठी वेगळ्या पाकिस्तानच्या मागणीची सुरुवात मानतात. शौकत आणि महंमद अली बंधूंना  पाकिस्तानचे एक जनक समजतात. मलबारातील मोपल्यांच्या बंडाला खिलाफत चळवळीमुळे खतपाणी मिळालं असं म्हणतात. पण खिलाफत चळवळीत जीनांचा भाग फारसा दिसत नाही.    

निजामाच्या राज्याचं अस्तित्वच बोगस आहे असं नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’त लिहिलं आहे. टिपूचा (आणि इतरांचा) पराभव करून ते राज्य वाटून घ्यायचं, पण इंग्रजांचं मांडलिकत्व मान्य करायचं असा इंग्रजांचा प्रस्ताव निजामानं स्वीकारला. त्याआधी पेशव्यांनाही तोच प्रस्ताव दिला होता, तो पेशव्यांनी त्या अटींवर स्वीकारण्यास नाकारला. संस्थानी राजवटी प्रशासकीय बाबतीत अकार्यक्षम, जुनाट सरंजामी विचारांच्या, मागासलेल्या म्हणून बहुतेक  कुप्रसिद्धच होत्या. कृष्णराव शेळवणकरांनी त्यांना ‘Britain’s fifth column in India’ म्हटलं ते योग्यच आहे, असाही उल्लेख नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी’मध्ये आहे.

सत्तेचाळीस साली सर्व संस्थानं खालसा झाली पण रझाकारांच्या प्रभावाखाली आलेल्या निजामानं भारतात विलीन होण्यास ठाम नकार दिला. १३ महिने चाललेला तो एक फार मोठा तिढा कायमचा होऊन बसत होता. रझाकारांचे अत्याचार आणि हैद्राबादचा मुक्ती संग्राम हा एक मोठा आणि वेगळा विषयच आहे. १९४८ साली झालेल्या पोलिस अॅक्शननंतर हैदराबाद संस्थान खालसा झालं. देशाच्या पायातील एक काटा कायमचा दूर झाला. (१७ सप्टेंबर ‘हैद्राबाद मुक्ती संग्राम दिवस’ म्हणून मानला जातो).

यंदा येत्या १७ सप्टेंबरला त्याला ७० वर्षं होत आहेत. स्वतंत्र भारतातील  हैदराबाद राज्याचा राजप्रमुख ही नेहरूंनी केलेली नेमणूक निजामानं स्वीकारली. राजप्रमुख या नात्यानं निजामाला भारतीय तिरंगी राष्ट्रध्वजाला अभिवादन करणं भाग पडलं. १९५६ साली हैद्राबाद राज्याचं त्रिभाजन झालं. मराठी भाषिक मराठवाडा महाराष्ट्राला जोडला गेला, तेलगू भाषिक जिल्हे आंध्रात गेले आणि कन्नड प्रदेश कर्नाटकात गेला. पुन्हा निजामाला आंध्रचं राज्यपालपद (गव्हर्नर) देऊ केलं होतं, पण प्रकृतीचं कारण देऊन त्यानं ते घेतलं नाही. तो निवृत्त झाला.

१९६७ मध्ये निजामाच्या मृत्युनंतर त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या मुलांना वारसा न मिळता नातवाला म्हणजे दरू शेहवारपासून झालेला मोठा मुलगा मुकर्रम जाहला मिळून तो आठवा निजाम झाला. सरकारकडून मिळणारी प्रीव्ही पर्सही त्यालाच सुरू झाली. मुकर्रम जाहचं शिक्षण डून स्कूल, हॅरो, केंब्रिज विद्यापीठ, सॅण्डहर्स्ट मिलिटरी अकॅडमी आणि लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स इथं झालेलं. नेहरूंशी त्याचे जवळचे संबंध. नेहरूंची इच्छा त्यानं मुस्लिम देशांना भारताचा राजदूत व्हावं अशी होती. आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा उच्चविद्याविभूषित मुस्लिम राजपुत्राचा भारताला खूपच उपयोग होण्यासारखा होता. पण तसं काही झालं नाही. सध्या तो इस्तंबुलला राहतो आणि अधूनमधून हैद्राबादला भेट देत असतो. 

............................................................................................................................................

लेखक कॅ. मिलिंद परांजपे निवृत्त नौदल अधिकारी आहेत.

captparanjpe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

shravan nalgirkar

Tue , 11 September 2018

१८ नाही १७ सप्टेंबर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......