आपणच दावेदारीस पात्र आहोत, हे पटवून देणे निराळे आणि हाती सत्ता दिली तर प्रश्न सुटतील, असा विश्वास निर्माण करणे निराळे!
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी
  • Tue , 11 September 2018
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi राहुल गांधी Rahul Gandhi

प्रचंड आशा-अपेक्षांसह एखाद्या नकारात्मक लाटेवर  स्वार होत सत्तेवर आलेल्यांना विधायक कामाच्या मुबलक संधी असतात. चार चांगल्या गोष्टी साध्य केल्या, थोडीशी व्यापक जनकल्याणाची चाड बाळगली तर जनता खरोखरीच दुवा देते. सत्तापालटाच्या खेळात अथवा शह-काटशहाच्या राजकारणात तसा सर्वसामान्य नागरिकाला फारसा रस नसतो. या सगळ्या घडामोडीकडे तो दुरूनच त्रयस्थपणे पाहणे पसंत करत असतो. राज्यसंस्थेच्या प्रवाही अस्तित्वाचे तत्त्व तो तंतोतंत पाळतो. आपले प्रतिनिधी निवडायचे काम तो तितक्याच तन्मयतेने करतो अन् आपापल्या कर्मकथा जगायला मोकळा होतो. उठसूठ प्रत्येक गोष्टीत दररोज नाक खुपसायची सवय आणि सवड त्याला कुठे असते? निवडणूक काळात तो राजकारणात सहभागी होतो. इतर वेळी या लोकशाहीच्या नायकाला संसारातल्या कैक भूमिकांना सामोरे जायचे असते.

लोकशाही व्यवस्थेच्या खऱ्याखुऱ्या मालकाची ही भूमिका राजकीय प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी घटकांसाठी किती सोपी-साधी-सरळ आणि पथ्थ्यावर पडणारी आहे. सत्ताधाऱ्यांनी थोडीशी जरी चाड बाळगली तरी ते त्याला पुरेसे ठरते. सरकारने सगळ्याच पातळ्यांवर सारखीच कामगिरी करावी हा त्याचा आग्रह नसतो. सगळ्याच विषयांत पहिला माझा नंबर मिळत नसल्याचे त्याला ज्ञात असते. शिवाय आपण निवडतो ते हिरे कुठल्या अंगभूत कौशल्याने प्रेरित असणार, याचाही त्याला अंदाज असतो. त्यामुळेच सरकार म्हणून काही जबाबदारी निश्चित केलेल्यांनी फार काही चांगले केले नाही तरी एकवेळ चालते. पण या सरकारने आपले जगणे असह्य करू नये, एवढी किमान अपेक्षा मतदार बाळगुन असतो.

या दृष्टिकोनातूनच तो राजकीय पक्षांच्या इतर वेळच्या ‘गजाल्या’ गांभीर्याने घेत नाही. दररोजच्या रडगाण्यात अंमळ करमणूक अथवा घटकाभर चेंज म्हणून या सगळ्या गंमतीजमतीकडे कटाक्ष टाकून कामाला लागतो. हे करताना मनातले रागलोभ उघड करत नाही कधी. जे काही असेल ते डोक्यात ठेवून, निवडणूक आली की, मगच सगळे हिशोब चुकते करायचे असा त्याचा परिपाठ असतो.  आपला संताप, राग, असंतोष विधायक, शांततापूर्वक मार्गाने लोकशाही पद्धतीने व्यक्त करण्याचा त्याचा निर्धार हे आपल्या व्यवस्थेत रुजलेल्या मूल्यांचे बळ असते.  त्याने हा संस्कार अद्याप मनापासून जपलेला, जोपासलेला आहे. अन्यथा व्यवस्थापरिवर्तनाच्या गप्पा मारणाऱ्यांनी किती ताळतंत्र सोडले आहे, हे त्याला अनुभवायला मिळतेच की! सत्ताधारी आणि विरोधकांच्या नित्य नव्या गंमतीजमतीबद्दल त्याला फारसे आक्षेप असायचे कारण नाही. २०१९ पूर्वी कोण काय म्हणते आहे, याचे त्याला सोयर असण्याचे कारण नाही. पण आता त्याच्यासमोर जरा निराळेच चित्र स्पष्ट व्हायला लागले आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

निवडकर्त्यांसमोर अनेक उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध असले की, त्यांच्या मनात चलबिचल व्हायला लागते. लहान मुलांना जसे खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर सगळीच खेळणी प्रथमदर्शनी आकर्षित करतात. हे घेऊ की, ते घेऊ, असा संभ्रम निर्माण होतो. त्यातलाच हा प्रकार. अर्थात खेळण्यांच्या दुकानात सगळीच खेळणी मोहक भासत असली तरी फार काळ टिकणारी, आनंद देणारी असतीलच असे नाही. म्हणून मग त्यातल्या त्यात टिकाऊ, चार दिवस खेळाचा आनंद देणारी खेळणी त्याचे रास्त मूल्य देऊन निवडली जाते. आपण निवडतो ते काहीतरी बरे करतील, चार दिवस सुखाचे आणतील हा विश्वास मात्र अमूल्य असतो.

असे मूल्य देऊन मतदार लोकप्रतिनिधींची निवड करत असतात. सध्या  मतदारांची अशीच चलबिचल होते आहे. कमाल जनहिताची काळजी घेणारे लोक त्याला निवडावे लागणार आहेत.  त्यातल्या त्यात व्यापक विचाराचे कारभारी निवडण्याची वेळ निवडकर्त्या मतदारांसमोर आली आहे. सगळेच पर्याय उत्तम या पहिल्या पर्यायांत होतो असा संभ्रम या दुसऱ्या परिस्थितीत होत नाही. इथे सगळेच एका माळेचे मणी असतील, जनकल्याणाबद्दल शक्य तेवढी बेफिकिरी असेल तर हा संभ्रम अधिक वेदनादायी बनतो. जनकल्याणाबद्दल त्यातल्या त्यात असणारा कळवळा, त्याबद्दलचे जरा सुसह्य अभिनिवेश अशा सगळ्या पर्यायांतून त्याला किमान बरे सरकार निवडून द्यावे लागेल की काय? हे म्हणजे टाकाऊतून टिकाऊ बाजूला काढण्यासारखेच आहे. 

स्वच्छ व पारदर्शक प्रशासन, सार्वजनिक व्यवहारातील भ्रष्टाचारनिर्मूलन, रिकाम्या हातांना काम, शेतीमालाला किमान आधारभूत मूल्य, महागाईवर नियंत्रण राखण्याचे प्रयत्न या महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल सत्ताधारी उत्तरदायित्वाचे कर्तव्य बजावतील अशी किमान अपेक्षा मतदात्यांना असणार. कोणाच्या नोटा कशा बंद केल्या? कोणाकडे किती नोटा बंद होत्या? या करमणूकप्रधान खेळात त्याला कधीच स्वारस्य नव्हते. रास्त दरात खाद्यान्न, दर्जेदार शिक्षण, मुबलक दरात आरोग्यसेवेची उपलब्धता अशा त्याच्या अपेक्षा होत्या. महागाईने कंबरडे मोडले असता मायबाप सरकार काहीतरी पाऊले उचलेल, अशी आस असताना २०२२ साली भारतात कायकाय असेल याच्या याद्या त्याच्या तोंडावर फेकल्या जात असतील तर त्या मतदाराने करायचे तरी काय? 

गत चार वर्षांपासून कुठल्या जनकल्याणकारी योजना कशा राबवल्या. त्याचे फलित काय,,  याचे उत्तर त्याला अपेक्षित आहे. सरकारी समृद्धीचे महामार्ग पुन्हा प्रशासनाच्या टक्केवारीतच जिरणार असतील तर भ्रष्टाचारनिर्मूलनाचे पोकळ दावेच त्याच्या नशिबी आले मानायचे का? किती जणांना रोजगार मिळाला, शेतीमालाचे भाव किती रुपयांनी वाढवले, प्रगती आणि विकासाची गंगा सर्वसामान्यांच्या वाट्याला नेमकी किती आली? या सगळ्यांबद्दल सत्ताधारी कधी बोलणार आहेत? का नुसत्या आकडेवारीवरच त्याला समाधान मानावे लागणार आहे?

निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी तरी गत पाच वर्षांत केलेल्या कामांची, यशापयशाची जाहीर कबुली देण्याचे सौजन्य दाखवल्याखेरीज २०२२ च्या समृद्ध भारताच्या गप्पांना काय अर्थ आहे? सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यांवर उतरल्याखेरीज, त्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारल्याखेरीज, त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा केल्याखेरीज लोकमान्यता मिळत नसते.

विरोधकांनी या सरकारला मुद्यांवरून धारेवर धरल्याचे एकही चित्र जनतेसमोर येत नाही. अवसान व पत घसरलेल्या विविध विरोधी पक्षांना आपणच पंतप्रधानपदाच्या दावेदारीस कसे पात्र आहोत, हे पटवून देणे निराळे आणि याच्या हाती सत्ता दिली तर कदाचित आपले प्रश्न सुटतील, असा विश्वास जनसामान्यांमध्ये निर्माण करणे निराळे! दुर्दैवाने हा प्रकार काँग्रेसच्या युवराजांना जमलेला नाही. जनसामान्यांमध्ये मिसळण्याची संधी वारंवार मिळूनही राहुल गांधी मोदींना अपेक्षित वर्तनच कसे करत सुटले आहेत, हे मतदाराला उमगेनासे झाले आहे.

मोदींना पर्याय म्हणून मोठ्या विश्वासाने आपली मान सोपवावी असा खांदेकरी मतदाराला विरोधकांत दिसू नये, यातच सगळे आले. मोदी म्हणतात तसे विरोधकांकडे ना नेता, ना नीती ना रणनिती, हे विधान यथार्थ ठरवण्याचा विडा विरोधकांनीच उचलला आहे. गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण, ते सोडवण्याचे प्रारूप असणारा विरोधी पक्ष आता मतदारांना खरोखरीच हवा आहे पण विरोधकांना त्यापेक्षा मंदिरभेटी, शर्टांवरील जानवे आणि ब्राह्मणांचे डीएनए महत्त्वाचे वाटत असतील, तर यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय? काँग्रेस नेते म्हणतात त्यानुसार महाआघाडीत राहुल गांधी यांच्याएवढा देशभरात संचार करणारा आणि सभांना गर्दी खेचणारा अन्य नेता नसेलही दुसरा. त्यामुळे ते आपोआपच पंतप्रधानपदाचे दावेदार ठरतीलही कदाचित. पण मतदारांमध्ये विश्वासार्हता गमावलेल्या आणि गत चार वर्षांत ती मिळवण्याचा यत्किंचितही प्रयत्न न करणाऱ्या विरोधकांवर जनतेने विश्वास ठेवावा तरी कसा आणि कशासाठी?

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 11 September 2018

देवेंद्र शिरुरकर, अगदी खरं बोललात पहा! आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......