त्या वेळी तो सोमनाथ बंदोपाध्याय होता. आता मानोबी बांदोपाध्याय.
आम्ही कलकत्त्यात गौरकिशोर घोष यांच्या घरी होतो. साल आठवत नाही नेमकं, पण दशक नव्वदचं होतं.
एक दिवस नुपूर (सोहिनी घोष), गौरदांची मुलगी, सोमनाथला घेऊन वडिलांच्या घरी आली. माझ्या फार लक्षात नाही, पण एक किडकिडीत शेलटा मुलगा नुपूर बरोबर होता. तो कॉलेजमध्ये एक प्राध्यापक होता. ती म्हणाली, “बाबा, एई शोमनाथ. ज्यार कोथा आमी आपनार शंगे कोरेछिलाम.” (बाबा, हा सोमनाथ ज्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलले होते) मग जेवणखाण करूनच तो निघाला. अशोक (शहाणे) त्याला पोहोचवायला खालपर्यंत गेले.
एका हिजड्याला एवढ्या जवळून मी प्रथमच पाहत होते. ते ही गौरदांच्या डायनिंग टेबलवर! तो हिजडा आहे. मला त्याचा विटाळ वाटला नाही. पण सर्वांच्या मनातली हिजड्यांची भीती चांगलीच माहितीची होती. तरी आज प्रत्यक्ष जेवणाच्या टेबलावर आपल्याबरोबर बसणारा हिजडा काहीच उपद्रवी वाटला नाही. उलट रोजच्या जीवनात तो आपले प्रश्न कसे हाताळणार याचीच कमालीची धास्ती वाटली. त्याच्या तोंडून मी त्याचं रोजच जगणं, कॉलेजमधल्या गोष्टी, तिथल्या प्राध्यापक मंडळींचं त्याच्याशी असलेलं वागणं ऐकत होते. ज्या कॉलेजमधून देशाचे भावी नागरिक बाहेर पडणार, ती अर्धीकच्ची मुलं या मंडळींच्या हातात असतात- त्या प्राध्यापकांची या सोमनाथकडे पाहण्याची वृत्ती, त्यांचं त्याच्याशी वागणं पाहाता मला धक्काच बसला.
तुमच्यासारख्याच योग्यतेचा तो एक तुमच्यापैकीच प्राध्यापक आहे – केवळ एक पुरुष म्हणून असलेलं त्याचं वागणं तुमच्या समजुतीच्या चौकटीच्या बाहेरच आहे, पण म्हणून एवढ्यावरून एक व्यक्ती म्हणून असलेले त्याचे अधिकार नाकारणारे तुम्ही कोण? शिकवणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत प्रश्न असतो, ती व्यक्ती शिकवते कशी एवढाच! ती स्त्री आहे की पुरुष आहे की तृतीयपंथी, याचा संबध काय? पण त्याचं तृतीयपंथी असणंच तिथं खुपत होतं. सोमनाथ येईल ते सहन करत होता. येणाऱ्या सगळ्या विपरीत परिस्थितीला तोंड देत होता. दरम्यान सोमनाथनं लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतलीय. ती आता स्त्री आहे. नाव मानोबी बंदोपाध्याय. २०१७ मध्ये ‘अ गिफ्ट ऑफ गॉडेस लक्ष्मी’ हे तिचं आत्मकथन प्रसिद्ध झालं. त्याचा सीमा भानू यांनी केलेला मराठी अनुवाद विश्वकर्मा पब्लिकेशननं ‘होय, मी स्त्री आहे’ या नावानं प्रकाशित केलाय. तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे.
गौरी सावंतच्या गणेश ते गौरीपर्यंतचा अवघड प्रवास थोडा का होईना पण मी पाहिलाय.
नेमका काय प्रश्न आहे तृतीयपंथीयांचा? का त्यांना समाजाबाहेर लोटलंय?
मला वाटतं, आपल्या समाजाची रचनाच मुळात बायनरी सिस्टीमवर आधारलेली आहे. एक तर पुरुष नाहीतर स्त्री. मधला तृतीयपंथ आम्हाला मान्य नाही. संपलं. जन्मायच्या अगोदर बाळाचं लिंग पक्क होत नाही. तेव्हा लिंग हा त्या मुलाच्या निवडीचा भाग बनतो. तो निसर्गदत्त भाग बनत नाही. यात दोष कोणाचाच नाही. तो जर हिजडा असेल तर त्याचाही नाही. आई-वडिलांचाही नाही. तर मग तो दोष त्या मुलाच्या माथ्यावर मारायचा कशाला? समाजानं उत्तर द्यावं याचं! वस्तुस्थिती कोणाच्याच हातात नाही. ना यांच्या, ना त्यांच्या, ना कोणाच्याच. संपलं.
आजही समाजाच्या ज्या समजुती आहेत त्या वस्तुस्थितीला धरून नाहीत. स्त्री-पुरुष सोडता बाकीच्या मंडळींना आम्ही विचारात घ्यायला तयार नाही असं समाजाचं म्हणणं न्यायालयात उभं रहात नाही. त्या दृष्टीनं ६ सप्टेंबर २०१८चा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. समलैगिकता हा आता कायद्यानं गुन्हा नाही. आणि ज्याला त्याला त्याच्या जोडीदाराची संमती असेल तर पुरुषा-पुरुषांमधले आणि स्त्री-स्त्रीमधले लैंगिक संबध आता कायद्याने वैध आहेत.
तू हिंदू की मुसलमान की आणखी कोणी, हा काय प्रश्न आहे? तसाच हा ही प्रश्न आहे. हा प्रश्न फक्त हिजड्यांचाच नाही. संपूर्ण एलजीबीटीक्यू कम्युनिटीचा आहे. समलिंगी पुरुष आणि स्त्रिया, उभयलिंगी आणि तृतीयपंथी व्यक्ती या सगळ्यांचाच हा प्रश्न आहे. आणि आपल्या मान्य समजुतींच्या चौकटीत न बसणाऱ्या या सर्वांना जगभर समाजानं समाजाबाहेर काढलंय. का? परंतु एलजीबीटीक्यू समाजामध्येही तृतीयपंथीय थोडे वेगळे पडतातच आणि संख्येनीही ते अधिक आहेत
इथं पुन्हा एक गोष्ट मनात डोकावते. निसर्गनियमांना नजरेआड करत अख्ख्या जगानेच संततिनियमनाचा हिरीरीनं पुरस्कार केला. तेव्हाच खरं तर समाजाच्या बायनरी सिस्टीममध्ये बसत असल्यामुळे समलिंगी स्त्रिया, समलिंगी पुरुष आणि उभयलिंगी व्यक्तींचा म्हणजे LGBQचा मार्ग मोकळा व्हायला हवा होता. पण भारतात घटनेमधलं कलम ३७७ रद्द होण्यासाठी २०१८ साल उजाडावं लागलं.
आता तरीही राहिला प्रश्न ट्रान्सजेन्डरसचा–तृतीयपंथीयांचा. म्हणजे ज्यांच्या समोर लिंगबदलाचाच प्रश्न उभा आहे त्यांचा. तर तो प्रश्न सोडवण्यासाठी जोरदार समाजप्रबोधन तर करावं लागेलच, पण त्याचबरोबर निसर्गतः लिंगधारणेमध्येच झालेली गडबड लक्षात घेता मोठ्या संख्येनं डॉक्टर मंडळीना हा प्रश्न हातात घ्यावा लागेल. सरकारला यात लक्ष घालून मदत यंत्रणा उभारावी लागेल. जन्माला आलेल्या कोणालाही सुखानं जगायचा अधिकार आहे. सुखाच्या आड जर जन्मदत्त लिंगच लिंगभावाच्या आड येत असेल तर लिंगबदल शस्त्रक्रिया शास्त्रीय पद्धतीनं, शारीरिक आणि मानसिक ताणतणावाला जमेला धरूनच व्हायला हव्यात. याचा विचार सरकार आणि समाजानं एकत्रितपणे करायला हवा.
अशी मदत आत्ता सायन हॉस्पिटलमधूनही मिळतेय. पण तेवढी पुरेशी नाही ही वस्तुस्थिती आहे.
म्हटलं तर समाज ही एक कल्पना आहे. ज्याला तुम्ही तृतीयपंथी म्हणता ती व्यक्ती प्रत्यक्ष आहे. ती व्यक्तीही एक माणूसच आहे. आणि एवढंच मान्य करण्याचा तर हा प्रश्न आहे.
एक लक्षात घ्यायला हवं की, कल्पना तुम्ही बदलू शकता, पण वस्तुस्थिती बदलता येत नाही. कोणीतरी लोक काल्पनिकतेपायी समाज चालवतायत. या कल्पनेला जे कोणी बळी पडतील, ते सगळे तृतीयपंथीयांना समाजाबाहेर काढण्यात सहभागी आहेत.
अशा या नाकारलेल्या परिस्थितीशी झगडत आज मानोबी बंदोपाध्याय देशातल्या पहिल्या तृतीयपंथी प्राचार्य आहेत. लक्ष्मी नारायण त्रिपाठी ‘बिग बॉस’मध्ये होत्या. त्यांना घरच्यांनी समजून घेतलं. अशा आणखीही तृतीयपंथी व्यक्ती आहेत पण कमी आहेत. गौरी सावंत किंवा जोयिता मंडल इ. अनेकांना मात्र घर सोडावं लागलं आहे.
गौरीला मी लहानपणापासून ओळखते. जेव्हा ती गणेश सावंत होती तेव्हापासून. तिची आई ती लहान असतानाच गेली. तेव्हा तर गणेश लहान होता. दहाएक वर्षांचा. आई अचानकच हार्ट अॅटकनी गेली. त्या वेळचा त्याचा आक्रोश आजही आठवतो. आई गेली आणि तो खऱ्या अर्थानं पोरका झाला. घरात गणेश सर्वांत लहान. त्याच्या भावंडात आणि त्याच्यात तर दहा वर्षाचं अंतर! तो मोठा होत होता. स्वतःत होणारे बदल त्याला धड समजत नव्हते. गणेश छान नाचायचा. नकलाही करायचा. पण बायकांच्या भूमिका करायला, बायकांचे संवाद म्हणायला त्याला आवडायचे. शाळेतही तो मुलींच्या ग्रुपमध्ये जास्त रमायचा. मधल्या सुट्टीत नाटुकली करताना तो सर्वांची लाडकी सासू असायचा. गौरीची मुलाखत मी काही महिन्यांपूर्वी ‘पुन्हा भेट’ या अनौपचारिक ग्रूपमध्ये घेतली होती, तेव्हा तिची एक वर्गमैत्रीण, लतिका गोसावी श्रोत्यांमध्ये होती. ती आठवणी सांगत होती.
सोसायटीत गणपती उत्सवात नाचात तो भाग घ्यायचा. पण त्याला मुलगी म्हणून ड्रेस-अप व्हायला, नाचायला आवडायचं. वडिलांचा तीव्र विरोध होता. मग त्यांनी कार्यक्रमात भाग घ्यायलाच बंदीही घातली.
मुलगा म्हणून वाढणाऱ्या गणेशला ‘बायल्या’, ‘गणपत पाटील’ म्हणून तर कधीपासूनच हिणवलं जायचं. शाळेत, घरात, नातेवाईकातही तेच. हळूहळू सर्वांपासून तो तुटत होता. पण आई गेल्यावर आता घरात कोणाशी बोलावं असं कोणी राहिलं नव्हतं. दरम्यान त्यानं आसपासचे त्याच्यासारखेच तृतीयपंथी मित्र शोधले होते. मोठा भाऊ आहे, पण अंतर जास्त. त्यात बहिणीचं लग्न झालेलं. वडिलांचं तुटक वागणं आणि शेरेबाजी त्याला असह्य होत होती. परिस्थिती हाताबाहेर गेलीयशी वाटून त्यानं घर सोडलं. त्यावेळी अवघे ६०/- रुपये घेऊन तो पुण्याहून मुंबईला आला. आणि एका वेगळ्याच विश्वात दाखल झाला. अतिशय सुखवस्तू संस्कारक्षम घरातून तो आलेला. ही दुनिया कशी झेपावली त्यानं?
गणेशपासून गौरी होण्याचा प्रवास त्यानं मुलाखतीत छानच सांगितला. वाट अवघड होती, पण ते अगदी कुणा दुसऱ्याच्याच आयुष्यात घडलेलं असावं इतक्या तटस्थपणानं तो, नव्हे ती सांगत होती.
तिच्या तोंडून हे सारं ऐकताना आपण नकळत अधिकाधिक गंभीर होत जातो.
ती छान उत्साहात मांडते सगळं. मात्र तेव्हा समाजाची दाहक नजर आपल्याला अक्षरशः जाळत राहते. ते सगळं ऐकणंही असह्य वाटतं. आपण सुन्न होतो. घर सोडल्यानंतर तिनं गुरूही केला. ती तृतीयपंथी झाली. तेव्हा तिच्या जिवंतपणीच सख्ख्या वडिलांनीच तिचं रीतसर श्राद्ध घातलं. हे कळल्यावर गौरीच्या काय भावना झाल्या असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही. ती त्यांना मेली. ते तिच्याशी आजही बोलतही नाहीत. त्याचं तिला अतीव दुःख आहे. तो तिच्या मनाचा एक अत्यंत दुःखी हळवा कोपरा आहे.
आणि आनंदाचा क्षण कोणता ग? विचारलं तर म्हणाली, की, मी लिंग बदल करून घेण्यासाठी ऑपरेशन केलं. शुद्धीवर आले तेव्हा मी पहिला प्रश्न विचारला- ‘काटा क्या?’ उत्तर मिळालं. तो तिच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण होता!
आय वॉज ट्रॅप इन अ राँग बॉडी, यु नो!! पण सांगा मला यात माझा दोष काय??
तिचा प्रश्न स्वच्छ होता.
का समाज आम्हाला त्यांच्यातलेच एक मानत नाही?
माझा लिंगभाव लपवून मी पुरुष वेषात गणेश या नावानं घरातच राहत असते तर घरच्यांचा, समाजाचा तेवढा विरोध झाला नसता. घराची ही सुरक्षितता भेदू न शकणारे काही तृतीयपंथी आपल्या भोवती वावरत असले तरीही दुर्लक्ष करत त्यांचं सहअस्तित्व, स्त्री वा पुरुष या समाजमान्य रूपात म्हटलं तर सुरक्षित असतं. पण तृतीयपंथीयांच्या या घुसमटीचा अंदाज कोणाला असणार?
वास्तविक अशा परिस्थितीत समाजानं जी नरमाईची भूमिका घ्यायला हवी, ती समाज घेत नाही.
खरं तर एखाद मूल जन्माला येताना त्याचं लिंग नेमकेपणानं ठरलेलं नसणं ही निसर्गानं केलेली गडबड आहे. समाजाला ते कळत नाही. त्यासाठी लिंग हा शरीराचा भाग आणि लिंगभाव ही मानसिक प्रक्रिया आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. अशा मुलाचे प्रश्न निरोगी मनानं समजून घेणारे काही आई-वडील आजही आहेत, पण ती संख्या खूप कमी आहे.
एकूणातच ज्या बायनरी सिस्टीमच्या चष्म्यातून आपण मानवी समुदायांना समाज म्हणून पाहतो, त्या समाजाच्या मर्यादा आहेत. निसर्गाच्या नाहीत. हिजडा कोणाच्याही घरात जन्माला येऊ शकतो. त्यामुळेच हिजड्यांच्या बाबतीत आई-वडील, कुटुंब आणि समाजाचे असलेले पुष्कळ भ्रम तोडून टाकणं गरजेचं आहे. रोग जर बरा करायचा असेल तर उपचार मुळातूनच व्हावा लागतो. आधी आई-वडील आणि समजातल्या समजुतींनाच भोज्ज्यावर आणायला हवं.
खरं तर, मुलासाठी पहिला समाज म्हणजे मुलाचे आई-वडीलच असतात. मग भावंड, शेजारपाजार, नातेवाईक, आसपासचे मित्र, पण शाळेत गेला की त्याचं सामाजिक आयुष्य खऱ्या अर्थान सुरू होतं. तेव्हा या मुलाचं भिन्नलिंगी आचरण ना घरात समजून घेतलं जातं ना शाळेत, मित्रात, नातेवाईकांत. बरं, हे मूलच आहे. त्याच्यात होणारे बदल त्यालाही समजावेत असं त्याचं वयच नसतं. तो कसंबसं स्वतःशी जमवून घेत स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि घरादारापासून सगळीकडे या मुलाला ते जसं आहे, तसं स्वीकारलं जात नाही. उलट सतत चेष्टा, अवहेलना, तिरस्कार आणि घृणा या सगळ्याला त्याला बालवयातच तोंड द्यावं लागतं. कुटुंबीय, मित्र, शाळेतल्या शिक्षकांमध्येही त्यांना समजून घेणारं त्यांच्या आजूबाजूला कोणीही नसतं. कधीकधी तर इतर मुलं बिघडतील म्हणून शाळेतूनही त्यांना काढून टाकतात. मूल करेल काय?
काही घरातून त्यांना जबरदस्तीनं हाकलून देतात. काही ठिकाणी मारतात. कोंडून ठेवतात, उपाशी ठेवतात, घरकामाला जुंपतात. डॉक्टरांकडे घेऊन जातात, पण डॉक्टर काही समजावायला गेले तर आम्हांला नका सांगू काही. आधी याला ठीक करा म्हणून आलोय म्हणतात. असं मूल आपल्या पदरी जन्माला आलंय या न्युनगंडातून मुलाचे आई-वडीलच बाहेर पडू शकत नाहीत. म्हणूनच खरी गरज आहे ती आई-वडिलांनी शिक्षित होण्याची आणि त्याच्या बरोबर उभं राहण्याची. पण हिजडे, सामान्य स्त्री-पुरुष आणि समाज यामध्ये एक भिंत उभी आहे. ती पार कशी करायची? हाच तर प्रश्न आहे आणि पाणी तर तिथंच मुरतंय!
होय. आमचं हे मूल तुम्ही म्हणता तसा हिजडा आहे, पण माणूसच आहे. निसर्गतःच मुलाचं लिंग आणि लिंगभाव यामध्ये फरक आहे, पण तेही नैसर्गिकच आहे. पुढे बाई म्हणून जगावं की पुरुष म्हणून जगावं या बद्दल त्याला काय वाटतंय हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि मान्यही आहे, असं ठणकावून सांगत आई-वडिलांनी त्याची शारीरिक मानसिक स्थिती समजून घेत मुलाच्या बाजूनं, मुलाबरोबर उभं रहायला हवं. आणि अशी परीस्थिती ज्या घरांत, ज्या मुलाची नसेल तिथं शाळेनं त्याची काळजी घेणं बंधनकारक करायला हवं. तसंच आवश्यक ते उपचार आणि कौन्सिलिंग, ट्रिटमेंट इ. सोयी सरकारनं मोफत उपलब्ध करून द्यायला हव्यात. ही मुलं समाजाचीच जबाबदारी आहे, याचं भान पुढारलेल्या जगात समाजाला असायला हवं.
त्या दृष्टीनं समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल व्हायला हवाय. नुकतंच कलम ३७७ रद्द करताना पाचही न्यायाधीशांनीही हेच अधोरेखित केलंय.
आता घराला जर या मुलाचा प्रश्न वाटला नाही तर हा प्रश्न समाजाचा होणारच नाही असं नाही पण प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा निवळू शकतो. ही जाणीव कुटुंबात वाढीला लागयला हवी. गुणसूत्रं आणि संप्रेरकं यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या गडबडीच्या लिंगभावाला बदलणं शक्य होत नाही. म्हणूनच तो लिंगभाव स्वीकारणं योग्य आहे. पण तसं होत नाही हाच मोठा गंभीर प्रश्न आहे. मग स्वतःचा स्वीकार शोधत ही मुलं हिजड्यांच्या पंथात जातात. म्हणजे त्यांना जावं लागतं. एरवी घराचं सुरक्षित कवच सोडून समाजबहिष्कृत जीवन जगायला कोणाला आवडेल?
घरदार सोडून मुलं हिजड्यांच्या समुदायात सामील होतात म्हणजे काय.. हे समजून घेताना गौरी म्हणाली, समुदायाची मुख्य सात घराणी आहेत. हिजडा यापैकी एका घराण्यातील गुरूची निवड करतो. गुरू ही हिजड्यांची आई असते. मग आपल्याकडे जशी आजी, पणजी असते तसेच त्यांचेही दादागुरू, परदादागुरू असतात. एका गुरूचं एक कुटुंब असतं. आपला वारसा कोण हे गुरू ठरवतो. कुटुंबाचे रीतीरिवाज सांगून त्याला कुटुंबप्रमुख केलं जातं. ‘हिजडा’ होण्याची प्रक्रिया मोठी आणि कठीण असते. एखाद्यानं हिजडा व्हायचं ठरवलं की, कुठल्या घराण्याचा हिजडा व्हायचं हे त्याला ठरवावं लागतं. साधारण: तो ज्या भागात राहतो, त्यातील घराणं तो निवडतो. तो गुरू हिजडा होऊ इच्छिणार्याची ‘रीत’ करतो. हा एक विधी आहे. त्यात त्या त्या घराण्याचा दुपट्टा डोक्यावर दिला जातो. साडी दिली जाते आणि घराण्याची निशाणी आणि नियम समजावून सांगितले जातात. त्यानंतर भीक मागण्याचं, टाळ्या वाजवण्याचं, गोड बोलण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. प्रत्येक घराण्याचा एक मुख्य असतो. मग खाली त्यांची उतरंड असते.
गौरीचे गुरू कांचना हे तामिळ आहेत. गुरू अतिशय परंपरावादी आहेत.
आमचा समुदाय परंपरांबद्दल अतिशय कट्टर असतो. अनेक गोष्टीबद्दल खूप गुप्तता प्रत्येक सदस्याला पाळावी लागते. त्यांचीही स्वतंत्र पंचायत भरते. नायक तिथला प्रमुख असतो. त्यात सुनावण्या होतात. निवाडे दिले जातात. जबरी दंड होतात. गुन्हे गंभीर वाटले तर वाळीत टाकण्याची शिक्षा होते. ती कठोरपणे अमलात आणली जाते. कुणी दोषी आढळला तर मृत्यूनंतरही त्याच्या मातीलाही कुणी जात नाही.
मग प्रश्न विचारला तर गौरी म्हणाली, मृत्यूनंतर त्यांना चपलेनं मारलं जातं ही एक मिथ आहे. एरवी अंत्यसंस्कार विधींसाठी त्यांना अडचणींना सामोर जावं लागत नाही.
समलिंगी संबंधांना विरोध करणाऱ्या घटनेतील ३७७ कलमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. लढाई समुदायाच्या हक्कांसाठीच आहे. आत्मसन्मानासाठी हिजड्यांनी भीक मागू नये. काम करावं अशा चर्चांना सुरुवात झाली. गौरीचं काम चालूच असतं. काही वेळा कामं करताना गौरीला कधी विरोधही झालाय. दंडही झालाय. आता गौरी स्वतः एक गुरू आहे. तिच्या कोत्यांना ती जाचक बंधनात ठेवत नाही. त्याचं स्वातंत्र्य नेहमी त्यांच्याबरोबर असते. त्यामुळे सगळ्या कोत्यांची ती आवडती नानी आहे. हे असं स्वातंत्र्य गौरीला तिच्या गुरुकडून अजूनही भांडून मिळवावं लागतं. पण तिचं तिच्या गुरूंवर खूप प्रेम आहे आणि तिच्या गुरूंचं तिच्यावरही.
घर सोडून मुंबईत आल्यापासून गौरीचं काम त्यांच्या क्षेत्रात चालूच आहे. पण ‘एव्हरीवन डीझरर्व्ह्ज द टच ऑफ केअर’ ही व्हिक्सची जाहिरात २०१७ मध्ये फ्लॅश झाली आणि रातोरात गौरी सेलेब्रेटी झाली. ही जाहिरात आहे तिच्या आणि गायत्रीच्या अनोख्या नात्याची. झालं असं की गायत्री पाच वर्षांची होती. तेव्हा वेश्या व्यवसाय करणारी तिची आई एड्सचा बळी ठरली. आणि निराधार गायत्री विकली जातेय असं कळल्यावर गौरी आक्रमक झाली. तिला दलालांच्या तावडीतून सोडवून गौरी तिची आई झाली. कागदोपत्री कायद्यानं गौरी गायत्रीची आई नाही. पण गौरी म्हणते, गायत्रीनं मला आईपण दिलंय. आणि मी तिला नाव दिलंय. गायत्री गौरी सावंत! मातृत्व ही भावना लिंगभेदाच्या पलीकडची आहे. मातृत्वाचा अनुभव एखाद्या पुरुषालाही येऊ शकतो आणि आम्हीही त्याला अपवाद नाही.
.............................................................................................................................................
या लेखाच्या उत्तरार्धासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखिका रेखा शहाणे या कवयित्री व पर्यावरण अभ्यासक आहेत.
rekhashahane@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment