‘समलैंगिकता’ पुरातन काळापासून आपल्या संस्कृतीत आहे!
पडघम - सांस्कृतिक
सविता दामले
  • देवदत्त पटनाईक यांच्या ‘शिखंडी’ या इंग्रजी पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि त्यातील चित्रं
  • Mon , 10 September 2018
  • पडघम सांस्कृतिक समलैंगिकता Homosexuality कलम ३७७ Section 377 एलजीबीटीक्यू समुदाय LGBTQ Community Lesbian Gay Bisexual Transgender Queer

सर्वोच्च न्यायालयानं नुकताच कलम ३७७ विषयी महत्त्वाचा निकाल दिला. त्यानुसार आता समलिंगी संबंध गुन्हा  नाही. मात्र त्यासंबंधी उलटसुलट बातम्याही वाचायला मिळत आहेत.

“असे संबंध ठेवणाऱ्यांना गुन्हेगार मानत नसलो तरी ते संस्कृती आणि निसर्गनियमांच्या विरुद्ध आहे,” असं काही संस्कृतीरक्षक गटांचं म्हणणं आहे. पण नीट विचार केला तर लक्षात येईल की, खूप पुरातन काळापासून समलैंगिकतेचा उल्लेख आपल्या संस्कृतीत आलेला आहे. शिवाय निसर्गत: वेगळं म्हणून एखाद्याच्या जे वाट्याला आलं असेल, त्याला आपण निसर्गनियमाविरुद्ध म्हणू शकत नाही. आधीच आपला समाज लैंगिकतेबाबत खूपच झापडबंद आणि दांभिक आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे आपल्या इथं दडपलंच गेलेलं आहे. मग लैंगिक बाबतीत वेगळं वर्तन करणाऱ्या लोकांना असा समाज बहिष्कृतच करणार! कारण मुळात जे नैसर्गिकरीत्या त्यांच्या वाट्याला आलं आहे, तेच आपण नाकारतो, त्यांची खिल्ली उडवतो आणि त्यांच्यासाठी सन्मानानं जगण्याचे रस्तेही बंद करून टाकतो. 

इंग्रजांनी १८६१ साली समलैंगिकता हा कायद्यानं अपराध मानला आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरही आपण त्यात काहीच बदल न करता त्याची री ओढत राहिलो. त्याचं कारण आपली लैंगिकतेकडे तुच्छतेनं बघण्याची वृत्तीच होय. परंतु ही आपली मूळ संस्कृती नाही. जेवढा मानववंश जुना तेवढीच ही समलैंगिकताही जुनी आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

त्याच संदर्भात हल्लीच मला एका पुस्तकाचा अनुवाद करायला मिळाला. त्या पुस्तकाचं नाव आहे- ‘शिखंडी आणि अन्य कथा’. देवदत्त पट्टनायक यांनी पुरातन भारतीय ग्रंथ आणि पुराणांचा दाखला देऊन अशा काही कथा त्यात सांगितल्या आहेत, ज्यांचा आपण फारसा उल्लेख करत नाही किंवा त्यांचं कथन टाळलं जातं. त्यात तामिळी, बंगाली, व्रज लोककथा आहेत, तसंच योगवासिष्ठ, स्कंद पुराण, महाभारत, भागवत पुराण, वाल्मिकी रामायण, हिंदी नवनाथ चरित्र, तामिळ पुराणनुरू, ओडीसी रामायण, शैव- आगम इत्यादी ग्रंथांतील कथाही आहेत. 

हे पुस्तक अनुवादासाठी आलं, तेव्हा ‘थर्ड जेंडर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींबद्दल माझ्याही मनात खूप गोंधळ होता, परंतु पुस्तक वाचत गेले तसतसं लक्षात आलं की, निसर्गत: जे असू शकतं त्याला आपण गुन्हेगार ठरवतोय आणि संस्कृतीचा जप करतोय. तसं करताना मुळात संस्कृती हीच मानवनिर्मित आहे, हेच आपण विसरून जातोय. आपल्या पूर्वजांनी मान्य केलेली बाब आपण बेदखल करत होतो, तेच किती चुकीचं होतं! केवळ आपल्याच नव्हे तर जगभरातील पुराणात अशा भिन्नवर्तनी लोकांच्या कहाण्या आहेत.

लवकरच हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होणार आहे.

त्या पुस्तकातली एक कथा नमुन्यादाखल. ही कथा स्कंद पुराणातली आहे.

मैत्रिणीचा सखा बनलेली रत्नावली

अनार्ताच्या राजाची कन्या रत्नावली आणि राजपुरोहिताची कन्या ब्राह्मणी या दोघी जीवलग मैत्रिणी होत्या. लग्नानंतर एकमेकींचा विरह सहन करण्याची कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती, त्यापेक्षा मरण बरं असं वाटायचं.

त्यांच्यातील भावोत्कटता पाहून राजानं ठरवलं की, दोघींचे विवाह एकाच घरात करून द्यायचे. म्हणजे रत्नावलीनं राजाशी लग्न करायचं तर ब्राह्मणीनं राजपुरोहिताशी लग्न करायचं. त्यानुसार दशर्नाचा राजा बृहद्बल यास विवाहाचा प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यानं तो स्वीकारला आणि आपल्या पुरोहितासह तो अनार्ताकडे यावयास निघाला. त्याच सुमारास अनार्तातील एका तरुणानं वेश्यागमन करून मद्यपानही केलं. हातून घडलेल्या या दुर्वतनाचं प्रायश्चित्त घेण्यासाठी दोन पर्याय समोर होते. एक म्हणजे त्यानं उकळतं गरमागरम लोणी प्यायचं किंवा एका कुंवार राजकुमारीच्या स्तनांना ती आपली माता आहे असं समजून स्पर्श करायचा. त्या तरुणाच्या पालकांनी राजाला विनंती केली की, आमच्या मुलाला तुमच्या मुलीला स्पर्श करू दे. कारण प्रायश्चित्ताचा दुसरा पर्याय महाभयंकर आहे आणि हा आमचा एकुलता एक पुत्र आहे.

राजानं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि मुलानं रत्नावलीच्या स्तनांना ती आपली माता आहे असं समजून स्पर्श केला. त्यावर तात्काळ तिच्या स्तनांतून दूध आलं. त्यामुळे मुलाचं प्रायश्चित्त होऊन आई-बापांचा जीव भांड्यात पडला.

ही बातमी राजा बृहद्बलाच्या कानी पोचली, तेव्हा तो मागे फिरला. कारण आधीच माता बनली आहे, अशा स्त्रीशी लग्न करण्यास त्यानं नकार दिला. पुरोहितही त्याच्यासोबत माघारी गेला. आता रत्नावलीचं लग्न होऊ शकत नव्हतं आणि ब्राह्मणीही लग्न करण्यास तयार नव्हती. त्यामुळे या दोघी अविवाहित कन्या आई-बापाचं घर सोडून बाहेर पडल्या आणि तळ्याजवळच्या जंगलात त्यांनी आश्रय घेतला. तिथं त्यांनी भार्त्यग्न मुनींच्या मार्गदर्शनाखाली तपश्चर्या केली.

शंकर ब्राह्मणीसमोर वर देण्यासाठी प्रकट झाला, परंतु ती म्हणाली की, जोपर्यंत तुम्ही रत्नावलीसमोर प्रकट होऊन तिलाही वर देत नाही, तोवर मी तुमचा वर स्वीकारणार नाही. मग शंकराच्या वरानुसार रत्नावली स्त्री असूनही ब्राह्मणीचा सखा बनली. ज्या ठिकाणी शंकरानं या दोन मुलींना वर दिला ते स्थळ ‘शुद्री-ब्राह्मणी’ तीर्थ म्हणून प्रसिद्ध झालं.

अशा तऱ्हेच्या कथा पुराणात सापडतात. त्या विशिष्ट तळ्याची, वनाची, पर्वताची किंवा नदीची महती सांगण्यासाठी असतात.

त्या पवित्र स्थानास शुद्री (म्हणजे राजकुमारीचा शुद्र वर्ण असल्याचा संदर्भ देऊन) आणि ब्राह्मणी (म्हणजे तिच्या मैत्रिणीच्या ब्राह्मण वर्णाचा संदर्भ देऊन) असे म्हणून भारतातील जातव्यवस्थेच्या उतरंडीस आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जातीबाहेर केलेल्या मैत्रीला देवाकडून आशीर्वाद लाभतो असं यातून म्हणायचं आहे. या नात्यातील समलिंगी वैषयिकतेबद्दल देवांची काही हरकत नव्हती का? की त्याबद्दल ते क्षमाशील होते, हा वेगळा प्रश्न इथं विचारला गेला पाहिजे.

पुरातन भारतात राजकुमारीच्या मैत्रिणींना ‘सखी’ म्हटलं जाई. त्या तिच्यासोबत तिच्या सासरच्या राजमहाली जात, बरेचदा तेथील दरबाऱ्यांशी त्यांचं लग्न होई किंवा त्या राजाच्या उपपत्नी म्हणून सेवा करत. त्या राजकुमारीसोबत सदैव राहून तिची मुलं वाढवण्यास मदत करत.

एखाद्या विचित्रलिंगी माणसाला या कथेतील दोन स्त्रियांतील बंध दिसू शकेल. हा बंध भावनिक असेल, परंतु तो लैंगिकही असेल का? की ते अस्वीकारार्ह होतं?

कांचीपुरम, तिरुअनंतपुरम, कोणार्क, खजुराहोसारख्या मंदिराच्या भिंतीवर समलिंगी संभोगाच्या प्रतिमा आहेत. त्यात बहुदा एकमेकींच्या उत्कट मिठीत असलेल्या स्त्रिया दिसतात. बहुदा प्रेमात असलेल्या स्त्रियाचं त्या प्रतिनिधित्व करत असाव्यात किंवा देवदासी पुरुषांचं मन रिझवण्यासाठी नाट्याभिनय करत असाव्यात किंवा मग त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असाव्यात. त्या मानानं लैंगिक संबंध करणाऱ्या दोन पुरुषांच्या प्रतिमा तुलनेनं कमी आहेत. कदाचित त्या भिंतींवर तृतीयपंथी व्यक्तींच्या प्रतिमा असतील आणि त्यांना आपण पुरुष किंवा स्त्री असं चुकीनं म्हणत असू. कुणास ठाऊक! शेवटी प्रत्येक गोष्ट बघणाऱ्याच्या नजरेवरच तर अवलंबून असतं.

ज्या स्त्रियांना विवाहापूर्वी किंवा माता होण्यापूर्वी हिंसक मृत्यूला सामोरं जावं लागलं, अशा स्त्रियांची मंदिरं उभारण्याची प्रथा ग्रामीण समाजात आहे. समलिंगी संबंध असल्यामुळे समाज जगू देत नाही, अशा स्थितीत आत्महत्या करण्याची जबरदस्ती झालेल्या स्त्रियांच्या नावानं तर ही ‘दोन देवीं’ची मंदिरं उभारली गेली नसतील? अशा विचित्र कल्पनांना मौखिक परंपरा दडपून टाकत असल्यामुळे ते आपल्याला कधीच कळणार नाही.

.............................................................................................................................................

लेखिका सविता दामले अनुवादक आहेत.

savitadamle@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 12 September 2018

नमस्कार सविताताई! समलैंगिकत्व आपल्या संस्कृतीत पूर्वापार आहे, याची ठळक जाहिरात होते. त्याचबरोबर अतिसंभोगामुळे विचित्रवीर्य राजा मरण पावला हे मात्र कोणी सांगंत नाही. विरोधाभास आहे, नाहीका? ते एक असो. तुम्ही म्हणता की काही संस्कृतीरक्षक गट समलैंगिकत्व निसर्गनियमांच्या विरुद्ध आहे असं सांगतात. पण त्यात चुकीचं ते काय? गुदमैथुनामुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवतात हे नवीन नाही. निसर्गाच्या विरुद्ध वागल्याने ज्या समस्या निर्माण होतात त्यांची जबाबदारी उर्वरित समाजाची नाही. इतकंच. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......