अजूनकाही
‘परी हूँ मैं ’ या नव्या मराठी चित्रपटात एका निरागस मुलीची सुंदर गोष्ट सांगितली आहे. मालिका-चित्रपटासारख्या ग्लॅमरस\मोहमयी दुनियेभोवती तिची ही गोष्ट फिरत असल्यामुळे ती अधिक रंगतदार आणि चित्तवेधक ठरली आहे. शिवाय या मोहमयी दुनियेचं वास्तव सांगताना ती अंतर्मुखही करून जाते.
साजिरी दिघे ही एका चाळीत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शाळकरी वयाची मुलगी. त्यामुळे तिच्या सुखाच्या वेगळ्या पण मर्यादित कल्पना असतात. अभिनयाची तिला आवड असते. शालेय कार्यक्रमातून आपल्या अभिनयाचं ती उत्तम दर्शन घडवते. त्यामुळे तिचं खूप कौतुक होतं. कल्पना आणि माधव या तिच्या आई-वडिलांनाही साजिरीच्या या अभिनय-वेडाचं अप्रूप असतं. विशेषतः तिच्या वडिलांना साजिरीच्या या गुणांचं लवकरात लवकर चीज व्हावं असं फार वाटत असतं आणि तशी संधी साजिरीच्या आयुष्यात येतेही. साजिरीचा अभिनय पाहून तिला ‘परी’ या मालिकेत परीचं काम मिळतं. पाहता पाहता ही मालिका अतिशय लोकप्रिय होते. त्यामुळे साजिरीचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. एका रात्रीत ती ‘सेलेब्रिटी’ बनते. जिथं जाईल तिथं होणारं उत्स्फूर्त स्वागत, सत्कार, सेल्फी, यामुळे तिचा सारा जीवनक्रम बदलून जातो.
प्रसिद्धीपाठोपाठ मिळणारा पैसा तिचं आणि तिच्या आई-वडिलांचं आयुष्य कमालीचं बदलून टाकतो. चाळीतून ते एका आलिशान फ्लॅटमध्ये राहायला येतात. हळूहळू ‘परी’मुळे मिळणारं ग्लॅमर हेच साजिरीचं विश्व बनतं. त्यामुळे शाळा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. अचानक एके दिवशी परी मालिकेतली तिच्या आईची भूमिका करणारी नायिका (जानव्ही कपूर) मालिका सोडून जाते. त्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शकांपुढे यक्षप्रश्न निर्माण होतो. त्याला पर्याय म्हणून मालिकेतील परी मोठी (तरुण) दाखवायचा ते निर्णय घेतात. त्यामुळे या छोट्या परीचं काम संपुष्टात येतं. काम गेल्यामुळे साजिरीला ‘परी’मुळे मिळालेलं ग्लॅमर लगेचच नाहीसं होतं. तिला पुन्हा दुसरं काम मिळालं तर हे ग्लॅमर पुन्हा टिकेल म्हणून तिचे वडील सारखे प्रयत्न करतात. परंतु साजिरीला पुन्हा काम मिळत नाही. त्यामुळे साजिरीचं एकूण भावविश्व उदध्वस्त होतं. साजिरीचं पुढे काय होतं, तिला तिचं भावविश्व पुन्हा परत मिळतं काय, यासाठी चित्रपट पडद्यावर पाहायलाच हवा.
इरावती कर्णिक यांची चित्रपटाची कथाच मुळी वेगळी आणि आकर्षण निर्माण करणारी आहे. शिवाय ती सध्याच्या ‘पैसा आणि प्रतिष्ठा’ यांना अधिक महत्त्व देणाऱ्या दुनियेचं अंतरंग उलगडून दाखवणारी आहे. साजिरीचं ‘परी’ होण्याचं स्वप्न साकार झालं असलं तरी याच ‘परी’मुळे तिची स्वतःची लहानपणापासून ‘साजू’ म्हणून असलेली ओळख ती कशी गमावून बसते, हे काही प्रसंगातून छान पद्धतीनं सांगितलं आहे.
याशिवाय कथेला आई-वडिलांमधील संघर्षाची किनार आहे. साजिरीनं मालिकेत काम करू नये, तिनं फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं तिच्या आईला (कल्पनाला) वाटत असतं. मात्र याउलट तिच्या वडिलांना (माधवला) मात्र साजिरीनं अभिनयातच करिअर करून पैसे आणि प्रसिद्धी मिळवावी असं वाटत असतं आणि त्यासाठीच त्यांची सारखी धडपड चालू असते. आई-वडिलांमधील विचारांचा हा संघर्ष कथेचा एक महत्वाचा भाग बनला असता, मात्र या संघर्षाला मर्यादित स्वरूप दिलं आहे. तसंच कल्पना आणि माधव यांच्यातील परस्परांबद्दलचं प्रेम आणि जिव्हाळा लक्षात घेता माधव, साजिरीला ऑडिशनसाठी शाळेतून घेऊन जाण्यासाठी जे कारण (कल्पनाच्या आईचे निधन) सांगतो, ते पटत नाही. (तिथं अन्य कोणतंही कारण चालू शकलं असतं). आपल्या अपेक्षांचं ओझं पालक मुलांवर कसं लादतात आणि त्यामुळे त्यांची काय अवस्था होते, हे सांगण्यात मात्र हा चित्रपट चांगला यशस्वी झाला आहे.
प्रमुख कलाकारांचा उत्तम अभिनय ही या चित्रपटाची फार मोठी जमेची बाजू आहे. देविका दफ्तरदार आणि नंदू माधव या दोन्ही कसबी कलाकारांनी आई-वडिलांच्या भूमिकेत चोख अभिनय केला आहे. साजिरी झालेल्या श्रुती निगडे हिनेही पदार्पणातच आश्वासक काम केलं आहे. याशिवाय फ्लोरा सैनी (अभिनेत्री जानव्ही कपूर), मंगेश देसाई (डॉक्टर) आदींचीही कामं चांगली झाली आहेत. समीर सप्तीस्कर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी केवळ कथेला चांगली पूरक ठरली आहेत. रोहन मडकईकर यांच्या छायाचित्रणामुळे चित्रपटाला वेगळं परिमाण लाभलं आहे.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment